‘लोकप्रभा’ १४ ऑगस्टच्या अंकातील ‘क्राइम टाइम प्राइम टाइम’ ही कव्हरस्टोरी वाचली. गुन्हेगारी विश्वावर आधारित कित्येक मालिका एखादा गुन्हा कसा केला जातो याचे सविस्तर चित्रण करताना दिसतात. बऱ्याचदा या कार्यक्रमांपासून प्रेरणा घेऊन गुन्हे घडवले गेले आहेत हे नाकारता येणार नाही. म्हणून अशा प्रकारचे कार्यक्रम बनवताना निर्माते आणि दिग्दर्शकांनी या मुद्दय़ावर जरूर विचार करावा.
याच अंकातील ‘युद्ध मुशाफिरीचे’ हा मथितार्थही वाचला. इंटरनेट एक्स्प्लोररबरोबर तुलना केल्यास गुगल क्रोम आणि मोझिला फायरफॉक्समध्ये वेबसाइट्स पटकन लोड होतात असे दिसून येते. विशेषत: आपल्या देशात अजूनही इंटरनेटचा वेग खूपच कमी असल्यामुळे हा फरक प्रकर्षांने जाणवतो. त्यामुळे इंटरनेट एक्स्प्लोररचा वापर खूपच कमी झालेला दिसतो. तसेच, क्रोम आणि फायरफॉक्समध्ये विविध माहिती सुरक्षितरीत्या बघता येते याबद्दल विश्वास वाटतो; परंतु इंटरनेट एक्स्प्लोरर वापरल्याने हॅकिंग आणि व्हायरसचा धोका कित्येक पटीने वाढतो हे सत्य आहे.
– केतन र. मेहेर, विरार.
विचार सर्वानी करावा
‘लोकप्रभा’ ३१ जुलैच्या अंकातील ‘नरेचि केला हीन किती नर’ कव्हरस्टोरी वाचली. पंढरपूरची आषाढी एकादशीची वारी ही आपली सांस्कृतिकदृष्टय़ा संपन्न परंपरा आहे. गेल्या काही वर्षांमध्ये तिला खूप ग्लॅमर प्राप्त झाल्यामुळे जगाचे या परंपरेकडे लक्ष वेधले गेले आहे. असे असले तरी या काळात पंढरपूरसारख्या छोटय़ाशा गावावर या काळात नागरी सुविधांवर पडणारा ताण ही खूप मोठी नागरी समस्या आहे. आणि त्याहूनही भयंकर म्हणजे या नागरी सुविधा अपुऱ्या पडत असल्यामुळे काही जणांना कामाचा भाग म्हणून या काळात हाताने मैला उचलावा लागतो.
‘सारी माणसे ही एकाच ईश्वराची लेकरे आहेत,’ असे थोर साधुसंतांनी सांगितलेले असताना केवळ पोटाच्या खळगीसाठी (पोट भरण्यासाठी) माणसाला इतरांसमोर लाचारी पत्करावी लागते. पंढरपूर शहरातच नव्हे, तर महाराष्ट्रातील इतर शहरांमध्ये आजदेखील माणूस हाताने मैला उचलतो. हाताने मैलाची साफसफाई करतो. विज्ञानाने प्रगती केली म्हणतात. मग मैला उचलण्यासाठी मशीन्स नाहीत का? हजारो, लाखो माणसांना वेठबिगारीचे जीवन जगावे लागते, हीन दर्जाचे जीवन जगावे लागते. जनावरांना किंमत आहे. पशू-पक्ष्यांना किंमत आहे. घरात कुत्री पाळली जातात. त्यांना प्रेम दिले जाते. मग ही तर साक्षात माणसे आहेत. गरिबांच्याच नशिबी असे का? माणसाला माणूस म्हणून जगू देण्यामध्ये आपली राजकीय इच्छाशक्ती कमी पडत आहे का याचा विचार सर्वानी करावा.
– राम शेळके, नांदेड.
वारकऱ्यांनीच विचार करावा
‘लोकप्रभा’ ३१ जुलैच्या अंकातील कव्हरस्टोरीमध्ये पंढरपूर वारीतल्या एका महत्त्वाच्या विषयावर दीर्घ चर्चा केली आहे ती ‘नरेचि केला हीन किती नर!’ आणि ‘न्यायालयाच्या प्रयत्नांनाही सुरुंग..’ या समर्पक मथळ्यांखाली. वारी पुण्यात येते तेव्हा प्रशासनापेक्षाही धर्मादाय संस्था आणि समाजसेवी संस्था, नागरिक हे वारकऱ्यांची मनोभावे बडदास्त ठेवण्याचा प्रयत्न करतात; पण जेव्हा वारीतले लोक पुढे जाऊ लागतात तेव्हा माळरानांवर, खेडोपाडी तंबू टाकून मुक्काम करत असतील, आणलेल्या दशम्या खात असतील, त्याच्या पत्रावळ्या, कागद, प्लॅस्टिक वस्तू वाटेल तिथे टाकत असतील, उघडय़ावरच शौच करत असतील. वारीचे ईप्सित स्थळ पंढरपूर येथेही या सगळ्यांसाठी प्रातर्विधींची सोय किती रहिवाशांकडे छोटेखानी हॉटेलांमध्ये होऊ शकणार? मग नदीकाठीच यांचे प्रातर्विधी उरकले जाणार. गावात उघडी गटारे, म्हणून त्यावर डीडीटी फवारणे, फिरत्या बंद शौचालयांची सोय करणे, मैला नि:सारणासाठी चर खोदणे इत्यादीसाठी स्थानिक प्रशासनावर मोठेच दडपण येत असणार.
यात यातनामय गोष्ट म्हणजे शौचाची अव्यवस्था. लेखातील छायाचित्र बघतानाही मनाला घरे पडतात. अनेक भाविकांनी घाण करायची आणि काही माणसांनी ती हाताने साफ करायची. न्यायालयाने सांगूनही ‘वारी आली, आता आयत्या वेळेला काय करणार’ म्हणून नगरपालिकेने पुन्हा चंद्रभागेच्या तीरी तीच कुप्रथा रेटायची याला काय म्हणायचे? यावर उपाय म्हणजे वारकऱ्यांनीच स्वयंशिस्त पाळणे आवश्यक आहे. ज्यांच्याकडे ट्रकसारखी वाहने आहेत, त्यांनी फिरत्या शौचालयासारखी व्यवस्था बरोबर ठेवून मुक्कामाच्या ठिकाणी त्याचा वापर करून साठलेल्या मैल्याची, आणलेले अन्नपदार्थ शिजवल्यानंतर आणि जेवणानंतर झालेल्या कचऱ्याची, स्थानिकांना त्रास न होता योग्य ठिकाणी विल्हेवाट कशी लावता येईल हे पाहिले पाहिजे. वारीला निघण्याअगोदर रोगराई पसरू नये म्हणून योग्य ते लसीकरण करून घेणे, गोळ्या- औषधे जवळ ठेवणे, नाका-तोंडावर मास्क परिधान करणे अशा आरोग्यदायी गोष्टी अमलात आणाव्यात. प्रशासनाने यासाठी योग्य ते परवाने देण्याची, डोक्यावर बोजे वाहण्याऐवजी बॅगा वाहण्यासाठी ट्रॉली उपलब्ध असते तशी ट्रॉली देण्याची व्यवस्था करावी. त्यावरच मुक्कामाच्या ठिकाणी कचरा वाहून योग्य ठिकाणी विल्हेवाटीसाठी नेता येईल असे डबे देण्याचीही व्यवस्था करता येईल. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अचानक भेट देऊन उपलब्ध करून दिलेल्या शौचालयांची देखभाल व उपयुक्तता यांची पडताळणी केली, तर त्यांची दुरवस्था टळू शकेल आणि गरजेच्या वेळेला ती व्यवस्थित वापरता येतील.
जेव्हा वैयक्तिक भक्तिभावनेच्या उत्सवी उत्साहाच्या उधाणाला संख्येची मर्यादा राहात नाही, ज्यात परमार्थापेक्षा आर्थिक स्वार्थलाभात हात धुऊन घेण्यासाठी जाणाऱ्यांची गर्दी वाढू लागल्यासारखे दिसू लागते तेव्हा वारीतील अपुऱ्या सुविधांसाठी कुणावरही बोट ठेवून चालणार नाही असे वाटते. म्हणूनच या महागाईच्या काळात, वाढत्या संपर्क माध्यमांच्या, दृक-श्राव्य माध्यमांच्या, प्रसारमाध्यमांच्या गतिमान काळात लाखो भाविकांनी दर वर्षीच्या वारीचा आग्रह धरून स्थानिक प्रशासन, नागरिक यांच्यावर खर्चाचा बोजा टाकणे कितपत योग्य आहे याचा विचार वारकऱ्यांनीच करण्याची वेळ आली आहे असे वाटते.
– श्रीपाद पु. कुलकर्णी, पुणे
कौतुकास पात्र
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना गुरुपौर्णिमा विशेषांकात संपादकीय श्रद्धांजली वाहण्याचे औचित्य दाखविल्याबद्दल
‘लोकप्रभा’ खरोखरच कौतुकास पात्र आहे. सत्तार शेखसारख्या असामान्य चित्रकाराला प्रायोजक मिळाला नाही? अजून वेळ गेलेली नाही. कोणी रसिक उद्योगपती किंवा शेखांचे विद्यार्थी मनावर घेतील काय? ओंकार पिंपळे यांनी दिलेली पुस्तकांची ओळख सुंदर!
– नरेंद्र चित्रे, ठाणे.
संपादकीय आवडले
‘सामान्यांचे असामान्य गुरू’ हे संपादकीय वाचून पैगंबरवासी डॉ. अब्दुल कलाम यांच्याबद्दल आधीपासून असलेला आदर शीर्षस्थानावर पोहोचला आहे. आपण लिहिलेले हे फार उपयुक्त आहे की, एक वैज्ञानिक जेव्हा देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान होतो तेव्हा नेमका कोणता कायापालट होतो, ते या वेळी पाहायला मिळाले. जाणता आणि लक्ष देऊन ऐकणारा श्रोता प्रमुख पाहुणा असला आणि त्याने सादरीकरणात काही खोचक प्रश्न विचारला म्हणजे नोकरशहांची बोबडी कशी वळते ते पाहून दुय्यम स्थानी असलेले अधिकारी कसे गालातल्या गालात हसत असतात हे अनुभव घेण्याची बात आहे. डॉ. कलाम यांनी आपल्याशी चर्चा करताना जे व्हिजन डोळ्यांसमोर ठेवून काम करा, असे आवाहन केले ती फार मोठी गोष्ट आहे. हे आम्हाला समजले आणि तद्नुरूप आम्ही काय करण्यासाठी झटू लागलो, तर या देशाची आर्थिक स्थिती चांगली राहील व ‘अच्छे दिन’ आपोआपच अनुभवास येतील.
चंद्रकांत लेले, भोपाळ .
अंक नेहमी आवडतो
मी ‘लोकप्रभा’ अंकाची नियमित वाचक आहे. आपला अंक वाचनीय, मनोरंजक, ज्ञानदायी, मार्गदर्शक, विचारप्रवर्तक सचित्र असतो. ‘लोकप्रभा’ १२ जूनचा अंक वाचला. या अंकातील ‘रेडकार्ड’, ‘क्रीडा क्षेत्रातही स्वच्छता अभियान’, ‘कधी सुधारणार रेल्वेचा कारभार’, ‘मसाल्याच्या पदार्थाचे गुणधर्म’ हे सर्वच लेख खूप आवडले. आपला अंक दर्जेदार असतो. ‘अबोल प्रेम’ ही कथा आवडली.
– शकुंतला जोशी, पुणे.
गुरुंबद्दल छान माहिती
गुरुपौर्णिमा विशेषांकात आपण विविध क्षेत्रांतील गुरूबद्दल छान माहिती दिलीत, त्याबद्दल धन्यवाद! सामाजिक जीवनात गुरू म्हणून बाबा आमटे आणि साधनाताई यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यांच्या सामाजिक कार्यापासून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रातील नव्हे तर भारतभरातील हजारो युवकांनी देशाच्या कानाकोपऱ्यातून गरीब, पीडितसाठी आपले काम सुरू ठेवले आहे. अशा आधुनिक गुरूंना प्रणाम!!!
– शिल्पा प्रफुल्लचंद्र पुरंदरे, वर्सोवा, मुंबई (मेलवरून)
‘स्वातंत्र्याची ऐशीतैशी’ हा उत्तम, सोदाहरण व यथोचित लेख लिहिल्याबद्दल पराग फाटक यांना धन्यवाद. आज स्वयं-अनुशासन, स्वयं-शिस्त, स्वत:च्या जबाबदारीची जाणीव आणि त्यानुसार वर्तन या गोष्टींची नितांत आवश्यकता आहे.
– सुधीर नाखरे, (मेलवरून).
‘लोकप्रभा’चा १४ ऑगस्टचा अंक वाचला. यातील ‘समाजमनातील आक्रमकता’ हा डॉ. जान्हवी केदारे यांचा लेख वास्तवाचे चित्र रेखाटणारा लेख आहे. हिंसाचार व समाजातील अस्थिरता दूर करण्यासाठी सर्व थरांत प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची आवश्यकता आहे. सर्वानी प्रयत्न केल्यास समाजातील वाढत असलेली आक्रमकता बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकते.
– धोंडीरामसिंह राजपूत वैजापूर, (मेलवरून).
आणखी माहिती हवी होती
१७ जुलैच्या अंकातील चैताली जोशी यांचा अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांच्यावरील लेख आवडला. त्यात रोहिणी हट्टंगडी यांची शिक्षण, त्यांचे कुटुंबीय ही वैयक्तिक माहिती द्यायला हवी होती. ‘मान्सून डायरी’ या सदरात छायाचित्रांची माहिती एका ओळीत द्यायला हवी होती. हीच बाब सुनील नांदगावकर यांच्या आगामी चित्रपटांवरील सदरासाठीदेखील लागू होते. ट्रॅव्हलॉग सदरातील श्रीलंका आणि नेपाळचे लेख उत्तम होते. मात्र त्यातील छायाचित्रांबाबत माहिती नसण्याची हीच उणीव भासली. याच अंकातील वजनाचा काटा आणि मन हा लेख अतिशय सुरेख व गरजेचा होता.
– प्रभाकर खरवडे, नागपूर.
मागील लेखात ‘हू केअर्स’ म्हणणाऱ्या प्राची साटम यांनी या वेळी सुखद धक्का दिला आहे. शी केअर्स! त्यांना मोबाइलच्या आहारी जाणाऱ्या गेलेल्या कोवळ्या वयातील मुलामुलींची काळजी आहे.
– सुरेश देवळालकर, हैदराबाद.
२४ जुलैच्या अंकातील ‘मेघदूत’, ‘कावीळ समजून घ्या’, ‘काय वापरू नये’ आणि ‘अशी मेंढरे बनू नका’ हे लेख खूप आवडले.
व्ही. पी. महाशब्दे, वाशी, नवी मुंबई.