जुन्नरकर – ‘दत्त विशेषांका’तील ‘समन्वयाचा इतिहास’ हा मथितार्थ वाचला. त्या संदर्भात काही विचार- महानुभाव हा नाथपंथानंतर आलेला महत्त्वाचा संप्रदाय. एकमुखी दत्तात्रय हे त्यांचे प्रधान दैवत, दहाव्या शतकापर्यंत दत्त एकमुखी आहे, नंतर तो त्रिमुखी झाला, तेव्हा मुस्लीम धर्म अधिक आक्रमक होता; हे सर्व मुद्दे पटले. पण पुढील मुद्दय़ांना प्रमाण मिळावे ही अपेक्षा- १. महानुभावातील एक परंपरा नागनाथाची आहे; २. महानुभावात मुस्लीम भाविकांचा भरणा अधिक आहे; ३. दत्त संप्रदायामध्ये मुस्लीम प्रथांचाही प्रभाव; ४. ब्राह्मण समाजाला नाकारणे.
 या मुद्दय़ांसंदर्भात माझे मत पुढीलप्रमाणे-  
नागनाथ आणि महानुभाव संप्रदाय यांचा दूरान्वयेही संबंध नाही. महानुभाव पंथात मुस्लिमांचा भरणा जास्त नव्हता. तीनशे वर्षांपूर्वीचा एक संदर्भ आढळतो. शहामुनी म्हणून एक मुस्लीम महानुभाव होते, त्या पूर्वीचा कोठेही संदर्भ आढळत नाही. कुमार मुनी कोठी निजामाबाद व औरंगबादशहा यांनी जिझिया कर महानुभाव संप्रदायावरील रद्द केला एवढाच संदर्भ दिसतोय, जास्त संदर्भ नाहीत. महानुभावांनी ब्राह्मण समाजाला नाकारले नाही तर, सर्वज्ञ चक्रधर स्वामींच्या सान्निध्यात जास्त भक्त हे ब्राह्मण समाजाचेच होते. महानुभावाचे पहिले आचार्य नागदेवचार्य व मराठीतील आद्य ग्रंथ लिळाचरित्राचे लेखक म्हाईंभट्ट हे ब्राह्मण समाजाचे होते. मुस्लीम प्रभाव म्हणून नाही तर धर्म स्वसंरक्षणासाठी, त्याच्या विचारांशी नव्हे तर व्यवस्थापनेशी तडजोड महानुभाव पंथातील त्या काळातील धर्मधुरीणांनी काळजी घेतली. याविषयी चर्चा व्हावी. माझे मत मांडले आहे. चर्चेतून महानुभावांची सत्य बाजू समोर यावी हीच अपेक्षा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दयाळदादा –
मागेही खंडीभर संशोधकांनी अशाच अफवा पसरवल्या होत्या. ते सर्व काळाच्या पडद्याआड गेले अन् महानुभाव पंथ आजही डौलाने सर्वासमोर उभा आहे. पूर्वी परिस्थिती फारच बिकट असताना त्यांनी अतिकष्टाने हा धर्म राखला. आताची परिस्थिती फार सुलभ आहे. स्वातंत्र्यानंतर तर समाजातील जुन्या-वाईट प्रथा जवळजवळ नाहीशाच झाल्यात. तेव्हा एवढय़ाशा अपवादाने डगमगायचे कारण नाही. जुन्नरकरांनी जे मुद्दे मांडलेत त्यापैकी तडजोडीचा एक मुद्दा खटकतो, कारण महानुभावांनी कधीच कुठलीही तडजोड केली नाही. उलट महानुभावांच्या विचारांच्या प्रभावानेच इतर धर्मीय लोक पंथात आले. जिझीया करमाफीसाठी थेट बादशहाकडे तक्रार केली, की आम्ही भिक्षुक आहोत. आम्ही कर भरू शकत नाही. मग बादशहाला पटले की, हे हिंदू फकीर आहेत. तेव्हा सर्व हिंदू फकिरांना जिझीया कर माफ करावा. हिंदू फकिरांकडून कुणीही करवसुली करू नये. याला तडजोड म्हणता येत नाही.

दत्ताजी खोब्रागडे –
महानुभावीयांनी आपल्या हुशारीने, चातुर्याने महानुभावासकट सर्व हिंदू भिक्षुकांचा जिझीया कर औरंगजेबासारख्या कडव्या हिंदूविरोधी प्रशासकाकडून माफ करवून दिला. हे महानुभावाचे हिंदू धर्मावर उपकार आहेत.

स्वप्निल थळे –
 ‘हिंदू.. जगण्याची एक समृद्ध अडगळ’ हा नेमाडय़ांचा कादंबरीवजा ग्रंथ वाचावा. महानुभाव पंथ आणि त्यांचा पाकिस्तान, अफगाणिस्तानमधील प्रचार, प्रसार सर्व मस्त सांगितले आहे आणि हा पंथ वारकरी संप्रदायासारखा बहुजनांना सामावणारा पंथ आहे.

जाणीवपूर्वक आणि धोरणी वाढ
दि. १२ डिसेंबरच्या दत्तात्रेय विशेषांकातील दत्तात्रेयांबद्दलच्या विस्तृत माहितीबद्दल धन्यवाद.
दत्त संप्रदायापूर्वी मूर्तिपूजक हिंदू हे शैव (शिवा) आणि वैष्णव (विष्णू) या दोहोंमध्ये विभागले होते आणि दोन्ही दैवतांच्या पुराणकथांच्या मिश्रणात एकत्र झाले होते. अर्थातच एक सर्वनाशी आणि एक सर्वाची काळजी घेणारा आणि ब्रह्मा विश्वाचा निर्माता; पण विश्वकर्मा सोडला, तर ब्रह्माची पूजा झाली नाही.
इस्लामने अल्ला हीच एकमेव सर्वशक्तिमान ताकद मानली, तर ‘पीरां’च्या माध्यमातून घरगुती अडचणी सोडविण्याची पद्धत रूढ झाली. अर्थात पीर हे हिंदूंच्या गुरू परंपरांशी साधम्र्य दाखविणारे होते. हा प्रभाव कमी करण्यासाठी हिंदूंकडून दत्तात्रेय दैवत म्हणून पुढे करण्यात आले. महत्त्वाचे म्हणजे हे करताना शिव आणि विष्णू यांना धक्का न लावता ब्रह्माला त्याबरोबर जोडून एकत्रितपणे गुरू म्हणून रूढ करण्यात आले. त्याचदरम्यान काही खास कारणांसाठी ब्रह्मा वगळून शैव आणि वैष्णवाचे एकत्रित रूप विठ्ठलाच्या रूपात मांडण्यात आले. इस्लामच्या प्रचंड प्रभावाला तोंड देण्यासाठी गेली पाचशे वर्षे अतिशय जाणीवपूर्वक आणि धोरणी पद्धतीने हे संप्रदाय पुढे नेण्यात आले आहेत. अर्थात या सर्वाचा फायदा असा की, कोणत्याही वादग्रस्त घटना न घडता दत्त आणि वारकरी या दोन्ही संप्रदायांची वाढ यशस्वी झाली.
सुनील सांगवीकर, ई-मेलवरून.