दर शुक्रवारी मी ‘लोकप्रभा’ची आतुरतेने वाट पाहत असते, कारण हे साप्ताहिक खरोखरोच वाचनीय आहे. त्यामध्ये निरनिराळ्या विषयांची माहिती असते, राजकारणाविषयी, विविध कलाकारांविषयी, विविध देशांबद्दल, विविध आजारांविषयी, त्यांच्या उपचारांविषयी, तसेच अनेक सणांविषयी उपयुक्त माहिती असते. त्याच जोडीला परदेशांतील राहणीमान, त्यांचे आचार विचार, तेथील कायदे नियम, स्वच्छता अशा अनेक विषयांची आम्हाला घरबसल्या माहिती वाचायला मिळते. महत्त्वाचे म्हणजे आपल्या या लेखांमुळे आम्हाला अनेक ठिकाणी प्रत्यक्ष गेल्याचा भास होतो. उदा. मेघना घांग्रेकर यांचा ‘युरोप माझ्या नजरेतून’ हा लेख वाचताना प्रत्यक्ष आपणच युरोपमध्ये आहोत की काय असे वाटत होते.
दुसरे असे की १२ डिसेंबरच्या दत्त विशेषांकातील सर्वच लेख अतिशय माहितीपूर्ण होते. ‘दत्तोपासना – उदय आणि विकास’, ‘दत्त संप्रदाय’, ‘महत्त्वपूर्ण दत्तस्थाने’ दत्तसंप्रदायाचा वाङ्मयाधार’, गिरनार पर्वत, आडवाटेवरची दत्तस्थाने, दिगंबरा दिगंबरा हय़ा सर्वच लेखांमुळे घरबसल्या दत्तदर्शन घडले. काही लेखांमधील माहिती तर कघीही न वाचलेली होती. या सर्व सविस्तर लेखांबद्दल धन्यवाद. मुखपृष्ठावरील एकमुखी दत्ताचे छायाचित्र पाहून सर्वात जास्त आनंद झाला. आतील पानांवरील सर्वच छायाचित्रे उत्तम होती. दिवाळी अंकावरील सिनेतारकेचे छायाचित्र पाहून माझा विरसच झाला होता. किमान हिंदी तारकेऐवजी मराठी तारका तरी हवी होती. नऊवारी साडी, नथ, पारंपरिक दागिने असे चित्र असते तर छान वाटले असते.
वैशाली देसाई, मुलुंड (पूर्व)
गुजरातमधील दत्तभक्ती
दिनांक १२ डिसेंबरचा दत्त विशेषांक वाचला. या अंकातून दत्तप्रभूंबद्दल वरीच माहिती मिळाली. सर्व लेख उत्तम आहेत. आशुतोष बापट यांचा ‘आडवाटेवरची दत्तस्थाने’ हा लेख सुंदर आहे. त्यातील श्रीदत्तशेष नारेश्वर यामध्ये थोडी माहितीची दुरुस्ती करायची आहे. श्रीरंग अवधूत यांचे घराणे मूळचे कोकणातील देवळे गाव येथील आहे. त्यांचे नाव पांडुरंग विठ्ठल वळामे. त्यांचा जन्म गुजरामधील गोधरा गावी आमच्याच मूळ घरात झाला. त्यांनी गुजरातमध्येच राहून दत्तभक्तीचा प्रसार केला. त्यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी दोन्ही गुजरातमध्येच राहिले आहे. त्यांनी गुजराती, मराठी व संस्कृतमध्ये बरेच साहित्य लिहिले आहे. त्यांनी श्रीगुरुचरित्र या मराठी ग्रंथाच्या समक्ष गुजरातीमध्ये गुरुलीलामृत लिहिले. ‘दत्तबावनी’ हा ग्रंथ नसून ते बावनश्लोकी स्तोत्र आहे व ते गुजरातीमध्ये आहे. गुरुचरित्राचे सार यामध्ये आहे.
उपेंद्र सरपोतदार, वडोदरा,
संग्रहणीय दत्त विशेषांक
१२ डिसेंबर २०१४ चा लोकप्रभाचा दत्तविशेष अंक हा पूर्णत: वाचनीय व संग्रहणीय आहे. श्रीगुरुदत्तांविषयीचे सर्वच लेख वाचले. त्यातील डॉ. रा. चिं. ढेरेसरांच्या अभ्यासपूर्ण लेखाबद्दल शतश: वंदन. या अंकातील श्रीगुरुदत्तांच्या सर्वच लेखांमुळे एक वेगळाच दृष्टिकोन मिळाला. त्याबद्दल लोकप्रभाचे खूप आभार.
याच अंकातील ‘सह्य़ाद्रीचं आवतण’ या लेखातील फोटो लाजवाब आहेत. हा निवडक अंश जर असा तर संपूर्ण भाग कसा असेल बरे?
– दौलत वि. जाधव, मुंबई, ई-मेलवरून.
‘दत्त विशेषांक’ संग्राह्य़
दत्त जयंतीच्या दिवशी आमच्याकडे पूजन, भजन, उपवास व त्यांच्याबद्दलची भजनं, माहीत असलेली कथा एवढीच पुंजी त्या दिवशी मी, ‘दत्ता दिगंबरा या हो सावळय़ा मला भेट द्या हो..’ आळवून आळवून गात होते. ठीक १२ डिसेंबरला लोकप्रभाचा दत्तविशेषांक दत्तगुरूंना सोबत घेऊनच हातात आला. दत्तमहाराजांचे दर्शन दत्तोपासना, दत्त संप्रदाय, महत्त्वपूर्ण दत्तस्थाने व आडवाटेवरची दत्तस्थाने व दत्ताबद्दल अंकच संग्रहणीय आहे. त्याबद्दल लोकप्रभाचे मन:पूर्वक अभिनंदन.
संध्या राकमकृष्ण बायवार, म.प्र.
संवेदनशील व भावनिक
किशोरवयातील शिक्षण (सा. लोकप्रभा, १९ डिसेंबर) हा महत्त्वपूर्ण लेख व यातून किशोरवयातील मांडलेले बदल व पालकांना या माध्यमातून केलेली सूचना अत्यंत उल्लेखनीय आहे.
१३ ते १९ या किशोरवयातील मुलं-मुली अत्यंत संवेदनशील व भावनिक आतात. या वयातील मुला-मुलींचा काळ आनंददायी, उत्साहवर्धक व रम्य असतो, हे जरी खरे असले तरी या वयातील शारीरिक व भावनिक बदल यांना सांभाळणे गरजेचे असते. या वयात मुला-मुलीच्या आई-वडिलांनी आपल्या पाल्याचे मित्र व मैत्रिणी होणे आवश्यक असते. किशोर वयातील मुला-मुलींना त्यांचे वय, त्यांच्या भावभावना, त्यांचा आनंद उपभोगण्याची संधी जरूर द्यावयास ६वी. मात्र ती नियंत्रित असावी. कारण किशोरवयात अजाणतेपणे काही विपरित घटना घडली तरी त्याचे दूरगामी परिणाम कुटुंबाला भोगावे लागतात. हे कदापिही विसरता कामा नये. किशोरवयातील मुल-मुली चुकीच्या प्रवाहात वाहणार नाही, याची खबरदारी घ्यायलाच हवी. लग्नसराईच्या काळात हा ‘लोकप्रभा’चा अंक वधू-वरांना निश्चितच मार्गदर्शक ठरेल. छान अंकाबद्दल धन्यवाद.
धोंडीरामसिंह द. राजपूत, वैजापूर, जि. औरंगाबाद.
लिखाण एक छंद
दि. ५ डिसेंबरच्या ‘लोकप्रभा’मधल्या चिंतन या सदरातील मी का लिहिते? हा लेख महत्त्वपूर्ण वाटला. इतर अनेक छंदांप्रमाणेच लेखन हा छंद जपणारे अनेकजण आहेत. ज्यांना लिखाणाची आवड असते किंवा छंद असतो, त्याच्याद्वारे उत्स्फूर्तपणे लिहिले जाते. त्याकरिता विशिष्ट विषयाचीच आवश्यकता असते असे नाही. गदिमांसारख्या सिद्धहस्त लेखकाची लिहिण्यास बसण्याच्या वेळी मनाची उन्मनी अवस्था होत असे, हे वाचल्याचे आठवते. सुप्रसिद्ध लेखिका मंगला गोडबोले यांच्या ‘पण बोलणार आहे’ या पुस्तकातील एका लेखात मंगलाताई म्हणतात, ‘‘एखादी व्यक्ती का लिहिते? तिला एखादा अनुभव, एखादं निरीक्षण, एखादा विचार सांगितल्याशिवाय राहवत नाही म्हणून लिहिते. जगताना, बघताना असे अनेक अनुभव, निरीक्षण, विचार तिच्या मनामध्ये साचत जातात. मनाची विहीर बाहेरच्या पावसानं तसंच आतून स्फुरणाऱ्या झऱ्यांनी सतत भरत असते. अधूनमधून लेखन होतं तेव्हा त्यातल्या काही पाण्याचा निचरा होतो. पण सगळी विहीर कायमची वाळून खडखडीत झालीय, असं प्रतिभावंतांचं सहसा होत नसतं. सारखं काहीतरी छोटं-मोठं, क्षुल्लक किंवा महत्त्वाचं असं विहिरीत जमा होत असतं. मनातल्या मनात लेखक ते टिपत असतो, मांडत असतो, खोडत असतो, त्याच्याशी संवाद करीत असतो. हे सदैव सुरू असतं.’’ मंगलाताईंचे हे मनोगत माधवी घारपुरे यांच्या लेखाच्या संदर्भात उद्बोधक ठरावे.
अॅड. सुरेश पटवर्धन, कल्याण.
बहिष्कार एक दुधारी शस्त्र
स्वातंत्र्यपूर्व काळात आपल्या पुढाऱ्यांनी जनतेला, राज्यसत्तेतील अधिकारी आणि परदेशी मालावर बहिष्कार घालण्याची सवय लावली. आजमितीला आपण निवडून दिलेले प्रतिनिधीच आपल्याच राज्यसत्तेविरुद्ध बहिष्काराचे हत्यार वापरत आहेत. अधिवेशन सुरू होण्याआधीच बहिष्काराची आखणी होत आहे. जातपंचायतींनी किंवा ग्रामसभेने बहिष्कार टाकला तर पोलिसांत, सरकारदरबारी दाद मागता येते. संबंधितांना शिक्षाही होऊ शकते, पण आपणच निवडून दिलेले खासदार, आमदार, नगरसेवक जेव्हा याचा उपयोग करतात तेव्हा ते आपल्या राज्यव्यवस्थेलाच फास घालून मागास ठेवतात.
– शशिकांत काळे, डहाणू रोड.
‘लोकप्रभा’मध्ये आलेला ओंकार ओक यांचा भैरवगडावरील लेख खूप आवडला. वर्णन तर इतके छान आहे की जणू काही आपणच हाइकला गेलो, असे वाटते.
नंदा गोखले, बेलापूर नवी मुंबई, ई-मेलवरून.
..तर प्रबोधनास मदत होईल
‘देव आणि माणूस’ या २६ डिसेंबरच्या अंकातील हृषीकेश जोशी यांच्या लेखातील विश्लेषण योग्यच आहे. लेखात गांधी व वल्लभभाई या चरित्रपटांचा उल्लेख केला आहे, त्याबरोबरच वासुदेव बळवंत फडके (खूप जुना) आणि सुभाषचंद्र बोस यांच्या चित्रपटांचापण समावेश हवा असे वाटते.स्त्रीचरित्रपटांवरदेखील विचार मांडायला हवा होता. रमाबाई रानडे ही मालिका म्हणजे वस्तुनिष्ठ चरित्रपट आहे. पण पुरुषप्रधान संस्कृतीमुळे असा विचार होणे दुर्मीळच. पुरुषांच्या उदाहरणाबरोबर स्त्रियांचीपण उदाहरणे हुडकून देण्याचा प्रयत्न करीत राहिल्यास समतेच्या दिशेने परिवर्तन व प्रबोधन होण्यास मदत होऊ शकते. पत्रकारितेत हे भान सतत जागृत राहावयास हवे, म्हणून हा पत्रप्रपंच.
वृन्दाश्री दाभोलकर, सातारा, ई-मेलवरून.
विवाह विशेषांकातील ‘विवाहपूर्व समुपदेशन’ हा लेख आवडला. लेखात मांडलेली मते ही आपल्याला आजूबाजूला हमखास आढळणारे वास्तव आहे. तरुण आणि पालकांसाठी हे खूपच उपयुक्त मार्गदर्शन ठरणारा लेख आहे. समुपदेशन केंद्रांच्या संपर्काची माहिती द्यायला हवी होती.
– मिलिंद, ई-मेलवरून.