धर्म म्हणजे काय आणि हिंदू धर्मात काय सांगितलं आहे, असा प्रश्न विचारला तर धर्माचा तथाकथित अभिमान बाळगणाऱ्यां आपल्याकडच्या लोकांना त्याचं उत्तर सांगता येत नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अभिनयाबरोबर लेखन हा ही माझा व्यवसाय झालाय. इतर बऱ्याच लिखाणाबरोबर सिनेमांच्या कथा, पटकथा, संवाद हा माझा रोजच्या कामाचा भाग झालाय. कोणतीही गोष्ट लिहिताना, विशेषत: सिनेमाची.. बघणाऱ्याला कल्पनाही येणार नाही अशा अनेक चर्चा, काथ्याकूट, भांडणं, वादविवाद, वैचारिक मंथन अपरिहार्य असतं आणि आजकालच्या बरबटलेल्या समाजव्यवस्थेत तर रोजच्या जगण्यापेक्षा कथेतलं जगणं अतिशय खडतर, भीतीदायक आणि चिंताजनक बनत चाललेलं आहे. आणि या सगळ्या चिंता, भीती, विवंचना जात आणि धर्म या मुद्दय़ांपासून सुरू होऊन याच मुद्दय़ांपाशी संपतात.

गोष्ट म्हटली की, हिरो आला आणि हिरॉईन आली. आणि फक्त हे दोघं येतात म्हणून कथेत रंजकता नसते, तर व्हिलन आला की कथेतली रंजकता वाढते. बऱ्याच गोष्टीत हल्ली परिस्थिती व्हिलन असते, पण त्या परिस्थितीला कलाटणी देणारा कुणी तरी असतोच. मग हिरो आणि हिरॉईन कोण आहेत? म्हणजे नावं काय त्यांची, मग आडनांवं? म्हणजे लगेच तिसरी पायरी जातीची आणि चौथी धर्माची. धर्म या टप्प्यापर्यंत जाताना कुणी उघड उघड चर्चा करत नाहीत यावर. पण बाबी सगळ्या अध्याहृत असतात. गोष्टीत चांगलं वागणाऱ्या पात्रापेक्षा वाईट वागणाऱ्या पात्राची जात, धर्म ठरवायची वेळ येते तेव्हा गोष्ट रचणाऱ्याच्या कसोटीचा क्षण आलेला असतो. अनेक उदाहरणांमधल्या, मीच लिहिलेल्या एका सिनेमातल्या पात्राचं उदाहरण सांगतो. हा सिनेमा काही महिन्यांत रिलीज होईल. स्वातंत्र्यसंग्राम वगरे काळातल्या या मनोरंजक कथेत ब्रिटिशांच्या बाजूचा आणि आपल्या देशाशी गद्दारी करणारा पोलीस अधिकारी मुसलमान लिहिला गेला होता. खरं तर पात्र म्हणून तो कुठल्या धर्माचा आहे याच्याशी त्याचा काहीही संबंध नव्हता आणि गद्दार म्हणून मुसलमान पात्रच घ्या.. असं तर चुकूनही नव्हतं. अगदी संवाद लिहून झाल्यानंतर प्रत्यक्षात शूटिंग सुरू व्हायच्या बेतात असताना, त्या ‘खान’चा ‘राणा’ करू असं ठरलं. आता खानचं राणात रूपांतर म्हणजे कागदावर त्याचं धर्मातरच. उघड उघड चर्चा नसली केली तरी उद्देश धर्म बदलणं हाच होता. खरं तर त्या कथेच्या ओघात हा मुद्दा कुणाच्या लक्षातही आला नसता. पण मुद्दामून गद्दार माणसाला मुसलमान केलंय, असं नंतर कुणाला वाटू नये म्हणून त्या खानचा सहज राणा झाला होता. मग हा राणा म्हणजे रजपूत असतो का? असेल तर रजपूत वगरे लोकांची गद्दारीची उदाहरणं आहेत का? वगरे प्रश्न मग बघणाऱ्यांना पडत नाहीत. तिथं फक्त एक गद्दार माणूस एवढंच अपेक्षित असताना तो कुठल्या धर्माचा दाखवला तर अडचण निर्माण होणार नाही एवढीच त्यातली सोय. म्हणजे गद्दार आपला दाखवला तरी चालेल. आपला म्हणजे सिनेमा कारणाऱ्याच्या धर्मानुसार. आणि परधर्मातला गद्दार आपण दाखवायला नको असं सहिष्णू धोरण. कारण कधी कुणाच्या शेपटीवर कसा पाय पडेल हे काही सांगता येत नाही. आता वारकरी संप्रदायातले लोक ‘एलिझाबेथ एकादशी’वर नाही उठलेत? एलिझाबेथ आणि आपल्या एकादशीचा एकत्र कसा काय संबंध येतो? हे आपल्या धर्माच्या विरोधात आहे; असं त्यांच्या प्रमुखाचं मत आहे.

धर्म.. खरंच आजही जगात अनेक समस्यांमधली सगळ्यात ज्वलंत समस्या. आपण मंगळावर पोहोचलो.. अगदी स्वस्तात. पण धर्म या समस्येवर आपल्याला काही मात करता आलेली नाही. धर्माची कट्टरता काही कमी होताना दिसत नाही. ती वाढू नये, त्यात सहिष्णू धोरण असावं यासाठी स्वत:ला विचारवंत ठरवणारे लोक सतत प्रयत्न करताना दिसताहेत. पण हे प्रयत्न खूप एकांगी आहेत, असं प्रकर्षांनं वाटतं. धर्मा-धर्माचा विचार करता यामध्ये किती प्रचंड तफावत आहे हे आज लगेच जाणवतं.

माणूस जन्माला आल्यावर त्याची विभागणी आधी रंगांवर झाली असली पाहिजे. काळा आणि गोरा. मधल्या रंगांच्या लोकांची संख्या भूगर्भ शास्त्रातल्या प्लेट टेक्टॉनिक्स थेअरीनुसार आधी फार नसावी. कारण समशीतोष्ण कटिबंधात, म्हणजे जिथं आत्ता आपला देश येतो तिथं.. तिथं तेव्हा हा भूभाग नव्हता. तो सरकत सरकत या जागी पोहोचला. त्या आधी काळा-गोरा एवढाच फरक असावा. या भेदानंतर माणसात मोठा भेद निर्माण करणारी गोष्ट निर्माण झाली असली पाहिजे ती म्हणजे प्रादेशिकता. आणि त्यानंतर माणसांत भेद निर्माण करणारी गोष्ट असली पाहिजे धर्म. पण कालांतरानं माणसानं रंग बदलला, प्रदेश बदलला तरी त्याचा धर्म काही बदलला नाही. मग ‘प्रदेश’ महत्त्वाचा की ‘धर्म’? यावरच आजची बहुतांशी युद्धं लढली जात आहेत. आपण कुठल्याही धर्माचे असू, पण नागरिक म्हणून आपल्या देशाला सर्वात महत्त्वाचं स्थान दिलं जायला पाहिजे; असा जगभरातला नतिक नियम मानला जातो, पण वास्तवात प्रदेशाला धुडकावून धर्माच्या बळावरच राज्य करण्याच्या अट्टहासाने सर्वत्र संहार चालला आहे. बाहेरच्या कोणत्याही देशात, सर्व नागरिकांसाठी त्यांनी ठरवलेला कायदा सर्वाना समान लावला जातो. त्याला अपवाद फक्त आपला देश. भारतात ‘समान नागरी कायदा’ अमलात आणू दिला जात नाही. कारण इतरांच्या धर्माची परवड होईल, धार्मिक भावना दुखावल्या जातील याचं अवास्तव स्तोम माजवलं जातं. इथंही छुप्या खापपंचायती चालतातच, पण त्यांचा बीमोड करण्यासाठी कडक पावलेही उचलली गेली. ती जायलाच हवीत. पण तेवढीच कडक पावले शरियतच्या नियमांविरोधात का उचलली जात नाहीत? बाकी काहीही बदलताना त्या अर्थानं माणसाला आज एवढं सोसावं लागत नाही; जेवढं धर्म बदलताना सोसावं लागतं. तुम्ही प्रदेश कधीही सहज बदलू शकता, पण धर्म? चुकूनही सहजासहजी बदलता येत नाही. काय आहे बाबा हा धर्म? याचा ऊहापोह करण्याची ही जागा नाही; आणि करायचा म्हटलं तर करता कुणाला येणार आहे?

टॉलस्टॉयने धर्म या विषयावर अप्रतिम विवेचन केलेलं आहे. धर्मासाठी म्हणून माणूस युद्धाला तयार होतो, प्रसंगी दुसऱ्याचा जीवही घेतो. पण ज्या धर्माचा तो आहे त्या धर्माबद्दल त्याला काय माहिती असते? आत्ताही दुसऱ्याच्या उरावर बसणाऱ्या लोकांना, जो धर्म टिकवण्यासाठी ते जिवावर उदार व्हायलाही कमी करत नाहीत त्यांना पाच वाक्यंही सांगता येत नाहीत; धर्म म्हणजे काय ते! काय आहेत बाबा तुझ्या धर्माची तत्त्वं, असं विचारलं तर दातखीळ बसेल.

त्याचं कारण धर्म म्हणजे काय हे आम्हाला शिकवलंच नाहीय. धर्मा-धर्मात याबाबतीत फरक आहे, पण परिणामांमध्ये काहीच फरक नाही. उदा. आज सगळ्यात जास्त चेष्टेचा आणि धारेवर धरला जाणारा धर्म म्हणजे िहदू धर्म. कुणीही विचारवंत धर्माचा ऊहापोह करताना पहिली सडकून टीका करतो ती िहदू धर्मावर. आपण सहिष्णू असलं पाहिजे, सर्व धर्माना समान वागणूक देणारी आपली विचारसरणी असली पाहिजे; वगरे वगरे तत्त्वज्ञान सांगताना; मुळात आपला धर्म म्हणजे काय? याचं काय शिक्षण दिलं जातं? मुसलमानांचं कुराण, ख्रिश्चन लोकांचं बायबल, तसं िहदूंचा धर्मग्रंथ काय मानतो आपण? एकच असं कुठलं पुस्तक प्रमाण नाही. पण आपण त्या जागी भगवद्गीता मानतो. िहदू लोक गीतेवर हात ठेवून कोर्टात शपथ घेतात. महात्मा गांधी गीता सदैव जवळ बाळगीत; गीतेचं रोज पठण करीत. गीता आपल्याला जगण्याचं सार शिकवते. पण हीच भगवद्गीता नरेंद्र मोदी यांनी जपानच्या राष्ट्राध्यक्षांना भेट दिली की, आता िहदुत्ववादाची दहशत निर्माण होणार म्हणून आपल्याकडे डांगोरा पिटला जातो. बरं हे डांगोरा पिटणारे अन्य धर्मीय असत नाहीत. िहदूच असतात. मग ते सर्वधर्मसमभाव मानणारे कुठल्या तरी राजकीय पक्षाचे असतात. त्या वेळी त्यांना त्यांचा धर्म महत्त्वाचा नसतो. ती गीता गांधीजींनी दिली असती तर गीता सहिष्णुतेचं लक्षण झालं असतं. पण ती नरेंद्र मोदी यांनी दिली की ते िहदुत्ववादाचं प्रतीक. माझा नरेंद्र मोदी यांच्याशी काहीही संबंध नाही. पण भगवद्गीतेशी नक्की आहे. आयुष्याच्या सगळ्या टप्प्यावर जगण्याचं सार श्रीकृष्णानं अर्जुनाला सांगितलं.. तीच ही गीता. ती एक क्षण कुणी कुणाला सांगितली हे आपण विसरून जाऊया; आणि ती कुणी कुणालाही देवोत, पण त्यात जगण्याबद्दल काय सांगितलंय याला काही महत्त्व आहे की नाही? पण त्या भगवद्गीतेशी आपल्याला काही देणं-घेणंच नाहीय. आज ती कुणाच्या हातात आहे, याला महत्त्व आहे. यामध्ये बाकी नाही, अवमूल्यन त्या गीतेचं होतं. कारण सरसकट टीका करणाऱ्यांना ती वाचायचीच नसते. इतर धर्मीयांचे धर्मग्रंथ भेट दिले की उदात्त धोरण वाटतं, त्याबद्दल जाहीर टीका करायचं कुणीही धाडस करत नाही; किंवा त्यात टीका करण्यासारखं काही आहे असं वाटत नाही. पण गीतेबद्दल आपल्या देशात वाटू शकतं.

स्वत:ला नुसतं िहदू सोडा, िहदुत्ववादी म्हणवून घेणारे काय अभ्यास करतात धर्म जाणून घेण्याचा? काहीही न वाचता, आपली मक्तेदारी फक्त हातात भगवा झेंडा घेऊन कशी सिद्ध होईल? काही अज्ञानी मूर्खामुळे बाकी समाज भरडला जातो आणि हे सगळ्याच धर्मासाठी लागू होतं. फक्त अज्ञानी िहदुत्ववाद्यांवर जेवढे कोरडे ओढले जातात, तेवढे इतर कट्टर धर्मीयांवर आपल्याकडे ओढले जात नाहीत. कारण त्यांच्या धर्माच्या आंतरराष्ट्रीय ताकदीचा आपल्याला कायम धाक आहे. लोकसभेच्या निवडणुकी वेळी ओवेसींच्या धर्माध जाहीर भाषणावर कोणतीही कारवाई सरकारला करता आली नाही किंवा केली नाही. नतिक प्रश्न तोच येतो शेवटी, राष्ट्र प्रथम? की धर्म?

कम्युनिस्ट चळवळीचे ज्येष्ठ विचारवंत गो. पु. देशपांडे एकदा मजेत म्हणाले ‘‘धर्म ही फार मजेशीर गोष्ट आहे. मी भारतात कट्टर कम्युनिस्ट म्हणून ओळखला जातो; पण चीनमध्ये माझं आडनाव कळल्यावर, एक नेता म्हणाला, देशपांडे?.. म्हणजे िहदू ना?’’

माझ्या एका वयस्क मित्राच्या उच्चशिक्षित मुलीनं आपल्या धर्मात किती मूर्खपणा आहे याबद्दल मौलिक निबंध लिहिला होता आणि मित्रांना सोशल नेटवर्कवर पाठवला होता. स्वत:ला प्रचंड लिबरल समजणाऱ्या काही पालकांनी आणि आपल्या परंपरा, संस्कृतीशी काहीही देणघेणं नसलेल्या तिच्या तरुण मित्रवर्गाने तिच्या विद्रोही विचारांचं कौतुक केलं होतं. माझा अभिप्राय मागितला तेव्हा मला एकच प्रश्न विचारावासा वाटला की, ‘हा विद्रोही विचाराचा स्टान्स उत्तम आहे, पण मुळात या विषयाचा काय अभ्यास केला आहेस? धर्म म्हणून समजून घेण्यासाठी काय वाचलं आहे? यावर अशी काही गरज आहे याचंच तिला आश्चर्य वाटलं. तिच्या लेखी घरात आई-वडील, नातेवाईक जो विचार करतात, जसे जगतात तोच रीतिरिवाज खरा अशी तिची समजूत होती. म्हणजे आपले आई-वडीलही काहीच अभ्यास नसतानाही मतं व्यक्त करत असतील असं तिला वाटलंच नाही. म्हणजे ‘माझ्या घरात जसे संस्कार, तसा धर्म’ अशीच काहीशी थेट समजूत ना ही?

कम्युनिस्ट चळवळीचे ज्येष्ठ विचारवंत गो. पु. देशपांडे हे माझे एन.एस.डी.चे शिक्षक होते. गो. पु. म्हणायचे, ‘‘कोणावरही, कशावरही टीका करण्यापूर्वी आधी समोरच्याच्या शक्तिस्थानाचा अभ्यास केला पाहिजे. टीका ही कमकुवत गोष्टींवर केली जाते. समोरच्याचा सर्वपांगी अभ्यास केल्याशिवाय त्यातला कमकुवतपणा, कमजोरपणा हेरता येत नाही.’’ मग िहदू चालीरीतींवर टीका करताना त्यांचा िहदू धर्माचा अत्यंत खोलवर अभ्यास झालेला होता. गमतीने ते म्हणायचे, ‘‘हिंदू धर्मावर टीका करताना माझ्या नेहमी लक्षात येतं की, एखाद्या िहदुत्ववाद्यापेक्षा माझाच िहदू धर्माचा जास्त अभ्यास झालाय. समोरच्या कोणत्याही धर्माध माणसाशी भांडण करता येत नाही कारण तो नक्की कशासाठी भांडतो आहे हे त्यालाच माहिती नसतं.’’ ते एकदा मजेत म्हणाले, ‘‘धर्म ही फार मजेशीर गोष्ट आहे. मी भारतात कट्टर कम्युनिस्ट म्हणून ओळखला जातो; पण चीनमध्ये माझं आडनाव कळल्यावर, एक नेता म्हणाला, देशपांडे?.. म्हणजे िहदू ना?’’ जगभरातले निरनिराळे लोक सगळीकडे कसा आणि काय विचार करतात, याचेच हे बोलके उदाहरण.

आपल्या देशात समजा एखाद्या प्रख्यात जबाबदार माणसानं, म्हणजे नट, शास्त्रज्ञ किंवा खेळाडूनं त्याच्या कामाबरोबरच चुकून किंवा सहज त्याची ओळख आणि ‘मी हिंदू आहे’ अशी जर करून दिली तर केवढा गहजब माजवतील माध्यमं! त्या व्यक्तीला ताबडतोब िहदुत्ववादी ठरवतील. आपल्याकडे एखाद्या िहदूनं तो िहदू आहे असं जाहीर करण्याला संकुचित मानलं जातं. पण आमीर खान जाहीर कार्यक्रमात ‘मैं पहले मुसलमान हूँ’ असं म्हणतो, तेव्हा ‘‘बघा त्याला किती धर्माचा अभिमान आहे’’ असं गौरवानं व्यक्त केलं जातं. एखादा ख्रिश्चन शास्त्रज्ञ चर्चमध्ये जाणं आपल्याला अत्यंत स्वाभाविकच असतं. ख्रिश्चन नाटककाराच्या गळ्यात क्रूस बांधलेला असेल तर त्याच्या बौद्धिक लौकिकाला कधी बाधा येत नाही. पण तेच एखाद्या मराठी नाटककाराच्या गळ्यात त्रिशूळ किंवा रुद्राक्षाची माळ दिसली की तो केवळ मूर्ख अंधश्रद्धच ठरतो. इतर धर्मीयांची धर्मश्रद्धा कौतुकाची असते, पण िहदूंची धर्मश्रद्धा मागासलेपणाची ठरवली जाते.

मी मागच्या महिन्यात लंडनला जाताना माझी मुंबई-कैरो-लंडन अशी इजिप्शियन एअरलाइन्सची फ्लाइट होती. कैरोला चार तासांचा हॉल्ट होता. मी पहिल्यांदाच इजिप्शियन एअरलाइन्सने प्रवास करत होतो. माझा सहकलाकार विमानात हळहळ व्यक्त करत होता. कारण मुस्लीमबहुल प्रदेशातल्या विमान प्रवासात कुठेही मद्य सव्‍‌र्ह केलं जात नाही आणि पोर्क, मीटला प्राधान्य. कैरोला विमानतळावर फिरलो तर ठिकठिकाणी स्त्री-पुरुषांसाठी नमाज पठणासाठी वेगवेगळ्या अद्ययावत, प्रशस्त, स्वच्छ खोल्या पाहिल्या. विमानांच्या वेळाही शक्यतो नमाजाच्या वेळेला धरून. विमानात वाचनासाठी कुराणाची प्रत. ही व्यवस्था सर्वच मुस्लीमबहुल देशात पाहायला मिळेल. इंग्लंडमध्ये तर उंची हॉटेल्समध्येही टेबलाच्या खणांत बायबलची, कुराणाची प्रत ठेवलेली पाहायला मिळेल. मी या प्रती पाहिलेल्या आहेत. ख्रिश्चनधर्मीय कोणत्याही देशांत शक्य तितक्या सार्वजनिक ठिकाणी, हॉटेल्समध्ये, अपार्टमेंट्समध्ये हाताला लागेल, नजरेत येईल असं बायबल ठेवलेलं असतं. त्यांचं म्हणणंच असतं, तुम्ही वाचलं पाहिजे.

पण आपल्या देशात विमानतळावर मंदिराचा विचारही आपण करू शकत नाही. काही कुणी उठल्या बसल्या कुणाला गीता देत बसत नाही की, कुठल्या हॉटेलमध्ये ती सर्रास टेबलाच्या खणात ठेवली जाते. तशी गरजच आपल्याला वाटत नाही. दररोजच्या कामात या गोष्टींना आपण तितकं अवास्तव धर्म म्हणून कधीच स्थान देत नाही आणि हीच खरी आदर्श परिस्थिती असायला हवी. जी आज आपल्याकडे आहे. िहदू धर्माचं स्तोम माजवणारे आहेतच, पण त्याला विरोध करणारे िहदूही तितकेच आहेत. पण त्यांनी तो विरोध ‘अवास्तव स्तोम माजवण्याला’ करायला हवा, धर्माला नाही. आपल्या देशातले कम्युनिस्ट, समाजवादी जेवढे, न पटलेल्या िहदू चालीरीतींवर तोंडसुख घेतात, तेवढंच धाडस त्यांनी मुस्लीम, ख्रिश्चन चालीरीतींवरही घेण्याचं दाखवावं. धर्माचं, संस्कृतीचं, त्यातून येणाऱ्या चालीरीतींचं मोजमाप सगळ्याच काळासाठी एकाच िभगातून बघून चालणार नाही. आपल्याच देशातल्या लोकांविरोधात वापरला जाणारा तोगडियांचा िहदुत्ववाद आणि ब्रिटिशांविरोधात लढा देणाऱ्या सावरकरांचा िहदुत्ववाद एकाच मापात तोलणाऱ्यांचं, शिवाजी महाराजांच्या िहदुत्ववादावर काय म्हणणं आहे? महाराजांनी समाजाची उभारणी धर्माच्याच बळावर केली होती. कारण एक मोठा समाज उभा करताना, लोकांना एकत्र आणणारा ‘धर्म’ हा एकमेव घटक होता. त्यांचं धोरण आदर्श सहिष्णू धोरण होतं आणि सर्व समावेशक होतं, पण राज्य ‘हिंदवी स्वराज्य’ याच नावानं ओळखलं गेलं, ते तसंच ओळखलं जावं आणि सगळ्याच धर्माना सामावून घेणारा ‘हिंदू राजा’ अशीच आपली सर्वदूर ओळख असावी, अशीच राजांची इच्छा होती आणि ती गरजच होती. कारण शत्रू खूप मोठा होता. ते िहदवी स्वराज्य स्थापलं गेलं नसतं, तरची कल्पनाही आज करता येणार नाही.

प्रत्येक धर्मात संक्रमण होत असतं. पण त्या संक्रमणाची गती सगळ्यांची एक सारखीच असेल असं नाही आणि खऱ्या समस्या त्यामुळेच निर्माण झाल्यात. आज आखाती प्रदेशातली स्थिती अनेक शतके मागे नेणारी आहे. असा एकही देश नाही जिथे शांतता आहे. गेल्या पाच वर्षांतच असंख्य देश धर्माच्या बळावर वेगळे होऊ पाहतायत. प्रत्येक ठिकाणी कुणी तरी कुणाला चिरडतंय. धर्मा धर्मातला फरक हा विचारात घ्यावाच लागणार आहे. एका बाजूला आपल्या देशात सर्वधर्मसमभाव राखण्यासाठी फक्तउदात्ततेच्या गाथा गायल्या जातायत, िहदूंनी सहिष्णू राहावं असा हेका धरला जातोय, पण मदरशांची संख्याही वाढतेय. गरीब, अनाथ मुलांसाठीच्या एनजीओज्च्या माध्यमातून ख्रिश्चन धर्मातराचे वाढते प्रमाणही चिंताजनकच आहे. प्रश्न मदरशांचा नाही, त्यातल्या कट्टर धार्मिक शिक्षणाचा आहे. प्रत्येक धर्माचा संदेश हा शांततेचाच आहे, पण म्हणून कट्टर धार्मिक शिक्षणाने शांतता निर्माण होतेय का? तर अजिबातच नाही. कुठलाच धर्म याला अपवाद नाही. जगाच्या पुढे असल्याचा आव आणणाऱ्या ख्रिश्चन धर्माच्या, धर्मगुरू पोपनी आत्ता २०१४ला, अगदी मागच्या महिन्यात, देव या संकल्पनेपेक्षा विश्वाच्या बिग बँग थेअरीला मान्यता दिली. जी आपल्या देशातल्या गणितज्ञांनी हजारो वर्षांपूर्वीच मांडली होती.

अनेक युद्धे, त्यातला संहार पाहिल्यावर, माणसाचा मृत्यू हेच अंतिम सत्य आहे हे लक्षात आल्यावर गौतम बुद्धाने बौद्ध धर्माची स्थापना केली. बौद्ध धर्माची मूलतत्त्वे, आत्मज्ञान आणि आंतरिक शांतता. ही मूळची तत्त्वे आहेत हे आजच्या बौद्ध धर्मीय नेत्यांना सांगितलं तर त्यांनाही अचंबा वाटल्याशिवाय राहणार नाही.

आजची लढाई ‘धर्म-अधर्मा’ची नसून, ‘धर्म-निधर्मा’ची आहे. एका बाजूला धर्माची पुटं उतरवणाऱ्यांसमोर धर्माला कवटाळून बसणाऱ्यांचे आव्हान आहे. धर्माची पुटं उतरलीच पाहिजेत; पण ती धर्माचा अभ्यास करून उतरवली गेली तर त्यातनं आत्मशोध घेतल्याचा आनंद होईल. धर्माला कवटाळून बसणारे, धर्म ही संकल्पना समजून घेण्यापेक्षा फक्त धर्माच्या ‘अस्मिते’ला कवटाळून बसले आहेत. म्हणूनच कट्टर धार्मिक समाजांत अशांतता आहे आणि दुसऱ्या बाजूला आपल्या देशात लिबरलायझेशनच्या नादात धर्माला नाकारणाऱ्यांची संख्या वाढते आहे. आपल्या धर्माला नाकारताना त्याला आधी समजून घ्यायला हवं की आपण नक्की काय नाकारतोय. कारण धर्माला नाकारल्याने आपला पुढारलेपणा सिद्ध होईल अशा काहीशा भ्रामक समजुतीमुळे आपण आपल्या संस्कृतीलाही नाकारत चाललो आहोत. सर्व धर्माची शिकवण सद्विचार, सदाचार आणि शांततेचीच आहे. पण आज हे धर्माला नाकारूनही साध्य होत नाहीय आणि त्याला कवटाळूनही होत नाहीय. आपल्या धर्माला नाकारताना हेही पाहायला हवं की वाईट गोष्टींबरोबर बऱ्याच चांगल्या गोष्टीही आपण फेकून तर देत नाही आहोत ना? कारण हजारो वर्षांची परंपरा आहे आपल्या धर्माला. काहीतरी चांगलं असल्याशिवाय तो एवढा टिकणार नाही.

कारण प्रत्येक धर्माची आपली आपली संस्कृती असते. त्या संस्कृतीला नाकारण्याने संस्कृतींचा ऱ्हास झालेला आहे हेच आजवरचा इतिहास सांगतो. मग ती भरभराटीला आलेली इजिप्शियन संस्कृती असो, बॅबिलॉनीयन असो, वा मोहंजोदडो, हडाप्पा असो. ऱ्हास झालेल्या संस्कृतींचे ‘धर्म कोणते होत?’ हे आज कुणालाच सांगता येत नाही.

जगाच्या लोकसंख्येत ७० टक्के समस्या कुपोषणाची आहे. भूकेपेक्षा धर्म कधीच मोठा होऊ शकला नाही.

श्रीकृष्ण जे म्हणाला, ‘‘यदायदाहि धर्मस्य, ग्लानिर्भवती भारत: अभ्यूत्थानं अधर्मस्य..’’ यामध्ये श्रीकृष्णाने ज्या धर्माचा उल्लेख केला आहे तो नेमका कोणता..?

आज काळाच्या उदरात गडप झालेले अवशेष सापडतात ते संस्कृतींचे.. धर्माचे नाही..