माझी आणि गोपीनाथ मुंडेंची पहिली भेट झाली ती एक संघर्ष करणारा नेता म्हणूनच. १९९१ साली मुंडेंनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणारी संघर्ष यात्रा सुरू केली होती. त्या निमित्ताने ते जेव्हा पुण्यात आले तेव्हा मी सर्वप्रथम त्यांचे भाषण ऐकले. माझ्यावर काँग्रेस विचारसरणीचा प्रभाव होता. मात्र तरीदेखील मुंडेंचं भाषण ऐकून मी खूपच प्रभावित झालो. भाषणानंतर मुद्दाम जाऊन त्यांची भेट घेतली. त्यांच्यातील उमदेपणा खूप भावला तेव्हा. पुढे १९९५ ला मला काँग्रेसने तिकीट नाकारले, मी बंडखोरी करून निवडून आलो आणि युतीच्या मंत्रिमंडळात सामील झालो. उपमुख्यमंत्री म्हणून गोपीनाथ मुंडेंचा खूपच जवळून सहवास लाभला. या काळात त्यांच्या बहुआयामी अशा राजकीय व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडले. ते अत्यंत उमदे होते. खुनशीपणा त्यांच्यात अजिबात नव्हता. उपेक्षितांचा विचार करतानादेखील समाजाच्या सर्वच स्तरांतील उपेक्षित वर्गाचा समावेश असे. महत्त्वाचे म्हणजे ते अत्यंत संवेदनशील असे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्यातील उमदेपणामुळे त्यांची सर्वच पक्षांत मैत्री होती. त्यांच्या मैत्रीने पक्षांच्या सीमा केव्हाच ओलांडल्या होत्या, मात्र तरीदेखील त्यांच्या या मैत्रीकडे कधीच संशयाची सुई वळली नाही.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन. त्यामुळे ते कायम समाधानी असत. मात्र त्यांच्यातील संघर्ष करण्याची वृत्ती कधीच कमी झाली नाही. किंबहुना संघर्ष म्हणजे मुंडे आणि मुंडे म्हणजे संघर्ष असेच समीकरण होते. तरीदेखील ते एक उत्तम समन्वयक होते. साडेचार वर्षांच्या त्यांच्या या साऱ्या गुणांची खूप जवळून ओळख झाली. मुंडे हे नेते असले तरी त्यांना आपल्या सहकाऱ्यांची, कार्यकर्त्यांची कायम काळजी असायची. युती सरकारच्या काळात एकदा नागपूरच्या अधिवेशनाआधी आम्ही एका कार्यक्रमासाठी अकोल्याला गेलो होतो. तिकडून येताना मी आणि बाबासाहेब ठावेकर त्यांच्या गाडीतून प्रवास करत होतो. सुरक्षा रक्षकांचा ताफा सोबत होताच. अचानक पायलट कारने ब्रेक लावल्यामुळे आम्हालादेखील ब्रेक लावावा लागला. अर्थात गाडी वेगात असल्यामुळे पायलट कारला धडकली. मागून येणाऱ्या गाडय़ादेखील आमच्या गाडीला धडकल्या. दरवाजा उघडला जाऊन आम्ही तिघेही बाहेर पडलो. मुंडे ताबडतोब उठले आणि आधी आम्हा दोघांची चौकशी केली. आम्ही ठीक आहोत हे पाहिल्यावर इतरांची चौकशी करू लागले. यातच त्यांचे मोठेपण दिसून येते.
मुंडेंनी गेली २६ वर्षे महाराष्ट्र गाजवला. सत्ता नसतानादेखील विकासकामे कशी करून घेता येतात, समाजाच्या जडणघडणीसाठी केवळ सत्ताच असली पाहिजे असे नाही, तर त्यासाठी कामाची तळमळ, आच हवी, हे त्यांनी केलेल्या कामांतून दिसून येते. किंबहुना विरोधक असतानादेखील त्यांनी राज्यासाठी अनेक महत्त्वाच्या विषयांत योगदान दिले आहे. त्यामुळेच त्यांनी केवळ विरोधक न राहता शाळा, बँका, सहकारी संस्था अशा अनेक संस्थात्मक कामात योगदान दिले आहे. आजवरच्या संघर्षांचे त्यांना नुकतेच चांगले फळ मिळाले होते. केंद्र सरकारात त्यांना मिळालेल्या स्थानामुळे महाराष्ट्राच्या विकासास चालना मिळाली असती.
महत्त्वाचे म्हणजे मुंडे हे क्लासचे प्रतिनिधित्व करणारे नव्हते, ते मास लीडर होते. उत्तम वक्तृत्वाच्या जोरावर मोठय़ा समाजमनावर छाप पाडून प्रभाव निर्माण करून काम करण्यातून त्यांनी हे नेतेपद मिळवले होते. अलीकडच्या काळात असे नेतेपद विलासरावांनी मिळवले होते. मात्र हे दोन्ही लोकनेते आपल्यातून अकालीच निघून गेले. मुंडेंचं असं अकाली जाणं त्यामुळेच चटका लावणारे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

(शब्दांकन – मधु कांबळे)

(शब्दांकन – मधु कांबळे)