स्वप्निल जोशी – response.lokprabha@expressindia.com
इंटरनेट आणि त्यावर आधारित तंत्रज्ञानाचा वापर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या माध्यमातून वेळ आणि पैसा या दोन्हीची बचत करून बहुसंख्य कामे ऑनलाइन पद्धतीने करण्यावरच अधिक भर दिला जातोय. यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारी एक यंत्रणा म्हणजे दूरस्थ प्रवेश यंत्रणा (रिमोट अ‍ॅक्सेस सिस्टीम). अशा यंत्रणेद्वारे इंटरनेटच्या माध्यमातून आपण एका उपकरणातून दुसऱ्या उपकरणात अगदी काही क्षणात प्रवेश करू शकतो. यामुळे घरबसल्या आपण जगातील इंटरनेटने जोडल्या गेलेल्या कोणत्याही संगणक किंवा स्मार्टफोनमध्ये प्रवेश सहज मिळवू शकतो. ही यंत्रणा आणि तिच्यातील मूलभूत घटकांबद्दल जाणून घेऊ या.

दूरस्थ प्रवेश यंत्रणा ही तसं पाहायला गेलं तर काही वर्षांपूर्वीच अस्तित्वात आलेली प्रणाली आहे. इंटरनेटच्या वाढत्या प्रसाराबरोबर तसेच अद्ययावत तंत्रज्ञानाबरोबर यामध्ये आमूलाग्र बदल होत गेले आहेत. सध्या करोना महासाथीच्या काळात ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू असल्यामुळे या दूरस्थ प्रणाली मोठय़ा प्रमाणावर वापरल्या जात असल्याचे पाहायला मिळते. दूरस्थ प्रवेश यंत्रणेसाठी बाजारात उपलब्ध असणारे काही प्रमुख पर्याय हे पुढीलप्रमाणे आहेत.

FMCG Sector, share market, Investment Opportunities, Market Trends, Investment Opportunities in FMCG, Market Trends of fmcg, stock market, Fast Moving Consumer Goods, Food and beverages, personal use goods,
क्षेत्र अभ्यास : ‘एफएमसीजी’ : फक्त किराणा नव्हे बरेच काही…
Difficulties in the redevelopment of redeveloped buildings
मुंबई : पुनर्विकसित इमारतींच्या पुनर्विकासात अडचणी!
Elon Musk Is Testing Adult Content Group feature users to create communities around adult sensitive content
‘एक्स’ आता नव्या युजरला पैसे आकारणार, एलॉन मस्क यांचा निर्णय
Google agreed to destroy browsing of data records to settle a lawsuit claiming it secretly tracked internet use of people
गूगल करणार अब्जावधी युजर्सचा डेटा डिलीट, नेमकं काय आहे प्रकरण, जाणून घ्या

आरडीपी (रिमोट डेस्कटॉप प्रोटोकॉल)

हे दूरस्थ प्रवेश यंत्रणेतील फार आधीपासून उपलब्ध असणारे सॉफ्टवेअर आहे. ते मायक्रोसॉफ्टच्या मालकीचे असल्यामुळे  आपल्याला ते विंडोज ऑपरेटिंग सिस्टीममध्ये मोफत मिळते. याद्वारे आपण इंटरनेटच्या माध्यमातून एका संगणकातून दुसऱ्या संगणकात दूरस्थ प्रवेश करू शकतो. एखाद्या व्यक्तीची भेट घ्यायची असेल तर त्यासाठी आपल्याला त्या व्यक्तीचे भेटण्याचे ठिकाण किंवा पत्ता माहीत असणे आवश्यक असते. अगदी त्याचप्रमाणे ज्या संगणकामध्ये आपल्याला दूरस्थ प्रवेश करायचा आहे त्याचा इंटरनेटवरील पत्ता म्हणजे ‘आयपी अ‍ॅड्रेस’ आपल्याला माहीत असावा लागतो तरच आपण आरडीपीच्या माध्यमातून त्यात प्रवेश करू शकतो.

आरडीपीचा वापर हा प्रामुख्याने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कर्मचारी जास्त प्रमाणात करताना पाहायला मिळतात. याचे मुख्य कारण म्हणजे आरडीपीसाठी काही सेटिंग्स आणि इंटरनेट सुरक्षा उपाययोजनांची अंमलबजावणी करावी लागते. सामान्य वापरकर्त्यांसाठी ही प्रक्रिया काहीशी गुंतागुंतीची ठरू शकते. आरडीपीचा वापर काही वेळा ऑनलाइन तांत्रिक सपोर्ट देणाऱ्या कर्मचाऱ्यांमार्फतदेखील केला जातो. उदाहरणार्थ आपल्याला विंडोज प्रणाली असणाऱ्या संगणकात काही त्रुटी आढळल्या आणि आपण सव्‍‌र्हिस सेंटरशी संपर्क साधला तर तेथील कर्मचारी दूरस्थ पद्धतीने आरडीपीचा वापर करून आपल्या संगणकात प्रवेश करू शकतात.

व्हीपीएनआधारित दूरस्थ प्रवेश

व्हीपीएन म्हणजेच व्हच्र्युअल प्रायव्हेट नेटवर्क. सोप्या भाषेत सांगायचे तर इंटरनेटच्या माध्यमातून दोन संगणक एकमेकांशी जोडले गेले असतील तर त्यांची जोडणी ही पूर्णत: खासगी स्वरूपाचीच असेल याची खात्री देता येत नाही कारण इंटरनेट हे साऱ्या जगाला जोडलेले खुले माध्यम आहे. ही जोडणी खासगी स्वरूपाची असावी आणि माहितीच्या हस्तांतरणाची गोपनीयता टिकवून ठेवता यावी यासाठी व्हीपीएनचा वापर केला जातो. याद्वारे जे दोन संगणक इंटरनेटच्या माध्यमातून जोडले गेले आहेत त्यांच्या भोवती एक आभासी नेटवर्क किंवा मार्ग तयार केला जातो ज्यात तिसऱ्या कोणालाही प्रवेश मिळू शकत नाही.

व्हीपीएनचा वापर हा माहिती तंत्रज्ञान क्षेत्र किंवा आर्थिक व्यवहाराच्या माहितीचे जिथून मोठय़ा प्रमाणात हस्तांतरण होणार असेल अशा ठिकाणी केला जातो. याद्वारे माहितीची गोपनीयता तर टिकून राहतेच शिवाय इंटरनेटवर आपण कोणत्या पत्त्यावर म्हणजे आयपी अ‍ॅड्रेसशी जोडले गेलो होतो याची माहिती सहजपणे तिसऱ्या व्यक्तीला उपलब्ध होत नाही. मध्यंतरी भारतात काही वेबसाइट्सवर बंदी घातली गेली होती त्या वेळी अशा बंद वेबसाइट पाहण्यासाठी सामान्य वापरकर्त्यांकडून व्हीपीएनचा वापर केला गेल्याचं आढळून आलं होतं. वापरकर्त्यांंना असं वाटत होतं की बंदी घातलेली ही वेबसाइट आपण पाहिली हे गोपनीय राहील. या प्रकारात व्हीपीएन वापरणं हे बेकायदेशीर नसलं तरी बंदी घातलेल्या वेबसाइट पाहणं हे नक्कीच बेकायदेशीर आहे.

पुरेसे तांत्रिक ज्ञान नसल्यास सामान्य वापरकर्त्यांनी व्हीपीएनचा वापर करू नये कारण याद्वारे आपल्यावर सायबर हल्ला करणेदेखील तेवढेच सहज शक्य आहे. शिवाय व्हीपीएन जोडणी गोपनीय असल्यामुळे आपल्यावर झालेल्या सायबर हल्ल्याचा तपास करणे हे सुरक्षा यंत्रणांसाठी अवघड ठरू शकते. मोठमोठय़ा आस्थापना त्यांच्या अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या दूरस्थ प्रवेशासाठी व्हीपीएनचा वापर करतांना पाहायला मिळतात. व्हीपीएनसाठी बाजारात अनेक सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत.

रिमोट डेस्कटॉप अ‍ॅप्लिकेशन

सध्या बाजारात याची मोठय़ा प्रमाणात चलती आहे. दूरस्थ प्रवेशाची ही सर्वात सोपी आणि कोणालाही समजेल अशी पद्धत आहे. वरील दोन पद्धतींमधील तांत्रिक गुंतागुंत कमी करण्याच्या हेतूनेच दूरस्थ प्रवेशासाठी आता स्वतंत्र सॉफ्टवेअर्सची निर्मिती करण्यात आली आहे. ही सर्व सॉफ्टवेअर्स ‘प्लग अ‍ॅण्ड प्ले’ या प्रकारात मोडतात. ही अ‍ॅप्लिकेशन केवळ संगणकच नाही तर अँड्रॉइड आणि आयओएस या मोबाइल प्रणालींवरसुद्धा अगदी सहज उपलब्ध आहेत. काही अ‍ॅप्लिकेशन्स तर आपल्याला दूरस्थ प्रवेशाची सेवा मोफत पुरवतात. यांचा वापर करण्याची पद्धत एकदम साधी सरळ आहे. ज्या दोन उपकरणांमध्ये आपल्याला दूरस्थ प्रवेश स्थापित करायचा आहे त्यावर अशा प्रकारचे अ‍ॅप्लिकेशन असणे आवश्यक आहे. यानंतर ज्या उपकरणाचा प्रवेश हवा आहे त्याचे युजरनेम आपल्याला माहीत असल्यास आपण काही क्षणात दूरस्थ प्रवेश करू शकतो. यामध्ये प्राथमिक वापर करण्यासाठी कोणत्याही तांत्रिक सेटिंग्सची किंवा सुरक्षा उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याची गरज लागत नसल्यामुळे या प्रकारातील सर्वच सॉफ्टवेअर सध्या लोकप्रिय आहेत. यांचा वापर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कर्मचारी, टेक्निकल सपोर्टमधील कर्मचारी करतात. एवढेच नव्हे तर कोणत्याही सामान्य वापरकर्त्यांला एखादी अडचण आल्यास त्याच्यामार्फतसुद्धा या सॉफ्टवेअर्सचा वापर केला जातो.

दूरस्थ प्रवेश यंत्रणेतील धोके

दूरस्थ प्रवेश यंत्रणेमधील त्रुटी किंवा धोके हे आजवर मोठय़ा प्रमाणावर अधोरेखित झाले आहेत. घरबसल्या एखाद्या चांगल्या कामासाठी आपण दूरस्थ प्रवेश करू शकतो. पण त्याचबरोबर सायबर हल्लेखोरदेखील या अ‍ॅप्लिकेशन्सच्या माध्यमातून आपल्या उपकरणाशी जोडणी करून सायबर हल्ला घडवू शकतात किंवा आपली फसवणूकदेखील करू शकतात. टाळेबंदीच्या काळात अशा प्रकारच्या सायबर गुन्ह्य़ांची नोंद लक्षणीय स्वरूपात वाढलेली पाहायला मिळते. दूरस्थ प्रवेश घेऊन हल्लेखोर आपल्या स्मार्टफोन किंवा संगणकावर सुरू असणाऱ्या सर्व गोष्टी अगदी सहज पाहू शकतो. त्यामुळे फसवणूक करणे त्याला अगदी सहज शक्य होते. यात प्रामुख्याने पेटीएमसारख्या पेमेंट वॉलेटचे ‘केवायसी’ घोटाळे किंवा बँकेतील पैसे बँकिंग अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून काढून घेतले गेल्याचे प्रकार झाल्याचे पाहायला मिळतात. समोरच्या हल्लेखोराला आपला स्क्रीन जसाच्या तसा दिसत असल्यामुळे आपल्याला आलेला ओटीपीचा एसएमएस त्यालादेखील दिसतो आणि त्याआधारेच आपली आर्थिक फसवणूक केली जाते. काही वेळा अशा दूरस्थ प्रवेशद्वारे एखादे मालवेअरसुद्धा आपल्या उपकरणांमध्ये स्थापित केले जाते ज्याद्वारे पुढे सायबर हल्लेखोर आपल्यावर पाळत ठेवणे किंवा आपली खासगी माहिती गोळा करणे असे प्रकार करू शकतात.

फेब्रुवारी २०१९ मध्ये रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडियाने अशाच प्रकारे दूरस्थ प्रवेश उपलब्ध करून देणारे एनिडेस्क हे सॉफ्टवेअर आर्थिक गैरव्यवहार करण्यासाठी सायबर हल्लेखोरांद्वारे वापरले जात असल्याचे नमूद केले होते. त्यानंतर जवळजवळ सर्वच बँकांनी याबद्दलच्या सूचना जारी केल्या होत्या.

दूरस्थ प्रवेश यंत्रणेमधील त्रुटीच्या आधाराने एखाद्या वापरकर्त्यांवर रॅनसमवेअरसारखे हल्ले होऊ शकतात. २०१८ साली जपानमधील एका सायबरसुरक्षा क्षेत्रातील संस्थेने त्याबाबतचे पुरावे सादर केले होते.

काय काळजी घ्याल?

  • पूर्ण खात्री करून घेतल्याखेरीज कोणत्याही दूरस्थ प्रवेश यंत्रणेचा वापर करू नका.
  • एखाद्या कारणाने अशा प्रकारचे सॉफ्टवेअर आपण काही काळासाठी वापरत असू आणि नंतर आपल्याला त्याची गरज नसेल तर ते आपल्या स्मार्टफोन किंवा संगणकातून त्वरित काढून टाका.
  • शक्यतो अनोळखी व्यक्तीला आपल्या कोणत्याही ऑनलाइन उपकरणाचा दूरस्थ प्रवेश घेण्याची परवानगी देऊ नका.
  • आपल्या स्मार्टफोन किंवा संगणकावर असे कोणते सॉफ्टवेअर असेल तर खासगी संभाषण किंवा विशेषकरून आर्थिक व्यवहार करत असताना ते पूर्णत: बंद केले आहे ना याची खात्री करा.
  • प्राथमिक ज्ञान असल्याखेरीज व्हीपीएनसारख्या तंत्रज्ञानाचा अजिबात वापर करू नका.