वास्तविक पाहता आध्यात्मिक मार्गाने जाणाऱ्या लोकांनी इतरांच्या भावना समजून त्यांच्यावर प्रेम करावे, त्यांना तोशीस पडू देऊ नये याची काळजी घ्यावी अशी अपेक्षा असते. शिस्त पालन आणि अध्यात्म वृत्ती या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. संतांनीदेखील ‘पुण्य पार उपकार पाप ते परपीडा’ असे स्पष्ट म्हटले आहे. या अभंगाचे पाठांतर करून, भजन म्हणून काही सध्या झाले नाही हे उघड आहे. सरकारने जागे व्हावे हे खरंय, पण वारकरी मंडळींनी निदान शिस्त पाळावी. याबाबतीत न्यायालयाने योग्य भूमिका घेतली हे बरे झाले.
– डॉ. राजेंद्र बर्वे, मुंबई. (ई-मेलवरून)
‘लोकप्रभा’चा करिअर विशेषांक वाचला. दोन वेगळ्या वाटेवरून गेलेल्या व्यक्तींबरोबरच इतर क्षेत्रातल्या करिअर संधींची माहिती समजली आणि जाणवलं की काळ खरंच बदलला आहे. एक काळ असा होता की मुलाला शाळेत घातलं की आईवडिलांपुढचे प्रश्न संपायचे. शाळा कुठली हाही मुद्दा नसायचा. घराजवळची शाळा, तिथं घातलं की दहावी होऊन मूल तिथून बाहेर पडायचं, घराजवळच्याच कॉलेजमध्ये जायचं. कॉलेज होता होता एम्प्लॉयमेंट एक्स्चेंजच्या चकरा, बँकेच्या परीक्षा, शाळेतल्या नोकऱ्या यात कुठेतरी त्याची वर्णी लागायची आणि आईवडील धन्य व्हायचे. आता घरात मूल येण्याची चाहूल लागली की लगेचच शाळा कुठली हा प्रश्न उभा राहतो. पुढे शिक्षण घेण्यासाठीचे तर इतके पर्याय आहेत की डोळेच पांढरे होतात. इतक्या वेगवेगळ्या विद्याशाखा, तिथलं स्पेशलायझेशन, ती जीवघेणी स्पर्धा.. मुलांना सतत याच गोष्टींना सामोरे जायचं आहे या कल्पनेनेच जीव घाबरा होतो.
संगीता दिवाण, सातारा.
‘वाईट तितुके, इथे पोसले’ (मथितार्थ, दि. २७ जून) ज्यांनी वाचणे आवश्यक आहे ते तो वाचतीलच असे नाही. जोपर्यंत राज्यकर्ते व अधिकारी सामान्य जनता काय बोलते, लिहिते ते पाहत नाहीत, तोपर्यंत त्यांना जनतेचे प्रश्न समजणार नाहीत, मग त्यावर त्यांच्याकडून कारवाईची अपेक्षा कशी करणार? माधवराव चितळे यांनी खरे तर या अशा कमिटीचे अध्यक्षपद स्वीकारायला नको होते. ज्या ठिकाणी आपल्या शब्दाला मान नाही अशा ठिकाणी अधिकारी जातातच का? महाराष्ट्रात आज कोण राज्य करते आहेत? ज्यांचे आई-वडील मंत्री होते त्यांची मुलं आता मंत्री आहेत. या मंडळींना साधी अर्थशास्त्राची समज नाही. खरे म्हणजे जे उच्च अधिकारी आहेत तेच अशा भ्रष्टाचाराला जबाबदार असतात. आयएएस व आयपीएस अधिकारी हे बहुधा अन्य राज्यांतील असतात, ते येथे त्यांचा फायदा बघतात व निर्णय घेतात. शंभरात एखादा सापडतो तेवढेच. याला मतदार तेवढेच जबाबदार आहेत. वर्षांनुवर्षे या अशा मंडळीला निवडून कसे देतात? मला तर असे दिसते की आज राज्यात जे मंत्री आहेत, यांच्यापैकी ९० टक्के लोकांना साधी बँकेत कारकुनाची नोकरी लागली नसती. या अशा मंडळीकडून आपण कसली अपेक्षा करतो?
– मार्कुस डाबरे, वसई.
‘बेबी नंदा’वरील लेख आवडला
‘लोकप्रभा’ दिनांक ९ मेमध्ये प्रकाशित झालेला प्रभाकर बोकील यांचा ‘बेबी नंदा’वरील लेख माहितीपूर्ण व चांगला वाटला. परंतु या लेखात एक दुरुस्ती करायची आहे ती म्हणजे ‘तुफान और दिया’ चित्रपटामध्ये राजेंद्रकुमार हा नंदाचा भाऊ नसून ‘मंगेतर’ आहे (भावाचा रोल ‘सतीश’ नावाच्या मुलाने केला आहे) नंदा व सतीश राजेंद्रकुमारच्या आजारपणात खूप परिश्रम घेऊन त्याला ठीक करतात असे या सिनेमात दाखविले आहे. या लेखात बेबी नंदाच्या बऱ्याच चित्रपटांचा उल्लेख केला आहे, पण अनवधानाने किंवा विस्तार होत असल्याने काही चित्रपटांचा उल्लेख राहून गेला. नंदाच्या चाहत्यांकरिता अशा काही चित्रपटांविषयी माहिती खालीलप्रमाणे आहे.
’ ‘मौसी’ – (नायक) अनंत मराठे, (संगीत- वसंत देसाइ; गाजलेले गाणे : ‘टिम टिम टिम तारों के दीप जले’, लता व तलत)
’ ‘साक्षी गोपाल’, (नायक) भारत भूषण, (संगीत- चित्रगुप्त; गाजलेले गाणे : ‘कली एक पूछे तुमसे बात’, लता व रफी)
’ ‘कैदी नं ९११’, (नायक) महमूद, (संगीत- दत्ताराम; गाजलेले गाणे : ‘प्यार भरी ये घटाँए’, लता व मन्ना डे)
’ ‘आँचल’, (नायक) सुदेशकुमार, (संगीत- सी. रामचंद्र; गाजलेले गाणे : ‘गा रही है जिंदगी हर तरफ बहार है’, महेंद्र कपूर व आशा भोसले)
’ ‘उसने कहा था’, (नायक) सुनील दत्त, (संगीत- सलील चौधरी; गाजलेले गाणे : ‘अहा रिमझिम के ये प्यारे प्यारे गीत लिये’, तलत महमूद)
’ ‘अमर रहे ये प्यार’- (नायक) राजेंद्र कुमार, (संगीत- सी. रामचंद्र)
’ ‘परिवार’- (नायक) जितेंद्र, (संगीत- कल्याणजी आनंदजी; गाजलेले गाणे : ‘हमने जो देखे सपने’, लता व महेंद्र कपूर)
’ ‘चांद मेरे आजा’- (नायक) शशी कपूर, (संगीत- चित्रगुप्त; गाजलेले गाणे : ‘सजना काहे भूल गये दिन प्यार के’)
’ ‘अधिकार’- (नायक) नवीन निश्चल, (संगीत- आर. डी. बर्मन)
वरील चित्रपटांत आणखीही चांगली गाणी आहेत ती रसिकांना माहिती असतीलच.
– वसंत राजूरकर
दि. २० जून २०१४ च्या अंकातील श्री. विजय कांबळे (ठाणे पोलीस आयुक्त) यांची ‘अपघातांसाठी चालकच जबाबदार..’ ही चौकट वाचली. महामार्गावर खासकरून हा पैलू असेलही कदाचित पण इतर अनेक गोष्टींचाही विचार व्हायला हवा. वानगीदाखल,
१. रस्त्यांवरील कुप्रसिद्ध खड्डे आणि कपारी.
२. पांढरे पट्टे नसलेले व सूचना फलक नसलेले गतिरोधक. (परवाच सार्वजनिक बांधकाम खात्यातील माझ्या अभियंता मित्राच्या पत्नीला केवळ गतिरोधक न दिसल्यामुळे आपला जीव गमवावा लागला.)
३. रस्त्यांच्या कडेला बिनदिक्कत उभी केलेली नादुरुस्त वाहने.
४. चाकाला टेकण म्हणून तात्पुरती लावलेली दगडे न काढता तशीच ठेवून निघून जाणे.
५. रात्रीच्या वेळी अप्पर-डीपरचा वापर न करणे.
अशी एक जंत्रीच देता येईल. लैंगिक शिक्षणाच्या शालेय अभ्यासक्रमातील समावेशाबद्दल बरीच चर्चा होते, पण सार्वजनिक शिस्तीचे धडे समाजातील सर्वच स्तरावर लष्करी पद्धतीने राबविले जाणे यावर भर देण्याची गरज निर्माण झाली आहे.
अभिजीत भूमकर, लातूर.