‘लोकप्रभा’मध्ये प्रकाशित झालेल्या राजकुमार आणि मेहमूद यांच्यावरील आदरांजली लेख आणि ‘न संपणाऱ्या गाण्यांच्या आठवणी’ या लेखांच्या अनुषंगाने एका अभ्यासू वाचकाने पाठवलेली पूरक माहिती-
वसंत राजूरकर, नागपूर</p>
दिलीप ठाकूर यांचे राजकुमार (११ जुलै २०१४) व मेहमूद (२५ जुलै २०१४) यांच्यावरील लेख वाचनीय, मनोरंजक व माहितीपूर्ण आहेत.
लेखकाने ‘राजकुमार’ (भूषण पंडित) यांच्या कारकिर्दीचा चांगला आढावा घेतला आहे. पण काही महत्त्वाच्या चित्रपटांचा अंतर्भाव करण्यात आलेला नाही. अशाच काही चित्रपटांविषयी माहिती राजकुमार यांच्या (व सिनेरसिकांच्या) चाहत्यांकरिता खालीलप्रमाणे-
’ ‘दिल अपना और प्रीत परायी’ (१९६०) – हा राजकुमार यांचा एक महत्त्वपूर्ण चित्रपट. एका डॉक्टरच्या भूमिकेत, नर्स असलेल्या मीनाकुमारी यांच्याबरोबर, त्यांची अभिनयाची जुगलबंदी प्रेक्षक विसरू शकत नाहीत. शंकर जयकिशन यांचे बहारदार संगीत हे या चित्रपटाचे वैशिष्टय़. राजकुमार यांच्यावर चित्रित झालेले (पाश्र्वभूमीवर) ‘जाने कहा गई दिल मेरा ले गई..’ हे गाणे अजून रसिक प्रेक्षक विसरले नसतील!
’ ‘गोदान’ (१९६३) – हा ‘प्रेमचंद’ यांच्या कथेवरील एक सशक्त चित्रपट. राजकुमार यांच्या होरी (शेतकरी) या पात्रामुळे अविस्मरणीय झाला आहे. पं. रविशंकर यांचे वैशिष्टय़पूर्ण संगीत ही या चित्रपटाची एक जमेची बाजू. या चित्रपटात अन्जान (गीतकार) यांचे मुकेशने गायलेले व राजकुमारवर चित्रित झालेले ‘हिया जरत रहत बिन रैन’ हे गाणे केवळ अप्रतिम!
’ ‘नौशेरवाने-आदिल’ (१९५७) – या सोहराब मोदी यांच्या चित्रपटात माला सिन्हाबरोबर एक ऐतिहासिक पात्र रंगविले आहे. सी. रामचंद्र यांचे मधूर संगीत खूप गाजले. ‘ये हसरत थी की इस दुनिया में बस दो काम कर जाते..’ या परवेज शमसी यांच्या गजलवर राजकुमारने केलेली अदाकारी केवळ अविस्मरणीय.’
’ ‘उजाला’ (१९५९) – शम्मी कपूरबरोबर सहनायकाचा, थोडासा निगेटिव्ह रोल यात राजकुमारने केला आहे. या चित्रपटाला शंकर जयकिशन यांचे फडकते संगीत आहे. ‘तेरा जलवा जिसने देखा..’ व ‘मोरा नादान बालमा..’ ही कुमकुमच्या डान्सवर राजकुमारला उद्देशून चित्रित झालेली गाणी आजही लोकांना आवडतात.
’ ‘शरारत’ (१९५७) – किशोरकुमार – मीनाकुमारी नायक-नायिका असलेल्या या चित्रपटात राजकुमारने किशोरकुमार यांच्या भावाची एक भावस्पर्शी भूमिका केली आहे. (आठवा! अजब है दासताँ तेरी ए जिंदगी.. (महम्मद रफीचा किशोरकुमारला आवाज) (शैलेंद्र-शंकर-जयकिशन) यांची करामत!
राजकुमार यांचे काही महत्त्वाचे व उल्लेखनीय चित्रपट – ‘अर्धागिनी’ (१९५९) (मीनाकुमारी), ‘नीलकमल’ (१९६८) (वहिदा रहेमान), ‘जिंदगी’ (१९६४) (वैजयंतीमाला), ‘हमराज’ (१९६८) (सुनील दत्त), ‘मेरे हुजूर’ (१९६८) (माला सिन्हाबरोबर) वगैरे वगैरे..
दिलीप ठाकूर यांनी मेहमूद या विनोदवीराच्या कारकिर्दीचा चांगला परामर्श घेतला आहे. पण काही उल्लेखनीय चित्रपटांचा अंतर्भाव न करता आल्याने, मेहमूदच्या काही महत्त्वाच्या चित्रपटांबद्दल सांगावेसे वाटते.
’ ‘दिल तेरा दीवाना’ (१९६२) – या चित्रपटांत मेहमूदचा एक सुशिक्षित तरुण (नायक शम्मी कपूरचा मित्र) व एक गरीब रिक्षेवाला असा डबलरोल आहे. या दोन्ही भूमिका ‘अफलातून’ आहेत. विशेषत: शुभा खोटेंना उद्देशून म्हटलेला ‘ये पोट्टी क्यों रो रही है’ हा हैद्राबादी-हिंदी डायलॉग प्रेक्षकांच्या खूपच पसंतीस उतरला. या चित्रपटांतील ‘रिक्षे में मेरी तुम आ बैठो..’ (महमद रफी) हे गाढवाच्या रेकण्याच्या पाश्र्वभूमीवर चित्रित झालेले गीत तर एकदम झकास! मेहमूद यांचा एक उल्लेखनीय चित्रपट म्हणजे ‘गोदान’. यांत त्यांनी राजकुमार (होरी) यांच्या मुलाची महत्त्वाची भूमिका केली आहे. पं. रविशंकर यांची मेहमूदवर चित्रित झालेली ‘पूरवा से संदेश आया है की चल आज देसवा की ओर’ व ‘होली खेळत नंदलाल बिरज में’ (गायक महमद रफी, गीतकार अन्जान) ही दोन्ही गीते आजही रसिकांच्या स्मरणात असतील!
मेहमूदचे (नायक/ सहनायक) असलेले काही चित्रपट (सहकलाकारांबरोबर व एका गाजलेल्या गाण्यासहित) खालीलप्रमाणे-
’ ‘आओ प्यार करे’ (१९६४) – (जॉय मुखर्जी-सायरा बानू)
गीत : ये झुकी झुकी निगाहे तेरी.. (महमद रफी-उषा खन्ना)
’ ‘कही प्यार ना हो जाये’ (१९६३) – (जॉनी वाकर- शकिला)
गीत : ‘ठुमक ठुमक मत चलो..’ (मुकेश, कल्याणजी-आनंदजी)
’ ‘शबनम’ (१९६४)- (एल. विजयलक्ष्मी)
गीत : ‘तेरी निगाहों पें मर मर गये हम..’ (मुकेश-उषा खन्ना)
’ ‘प्यासे पंछी’ (१९६१) – (अमिता)
गीत : ‘तुम्ही मेरे मीत हो..’ (हेमंत कुमार, सुमन कल्याणपूर, कल्याणजी-आनंदजी)
’ ‘ससुराल’ (१९६१)/ ‘हमराही’ (१९६३) – (राजेंद्र कुमार-शुभा खोटे)
युगुल गीते – (मुकेश-लता)
‘अपनी उलफत पे जमाने का ना पहरा होता..’ (मुकेश-लता); ‘वो दिन याद करो..’ (रफी-लता, शंकर-जयकिशन)
इतर चित्रपट –
‘नमस्ते जी’ (१९६५) अमिता / जी. एस. कोहली; ‘फर्स्ट लव्ह’ (१९६१) बेबी नाझ/ दत्ताराम; ‘कैदी नं. ९११’ (१९५९) बेबी नंदा/ दत्ताराम; ‘परवरिश’ (१९५७) (राज कपूर-माला सिन्हा) इ. इ. ही यादी खूप मोठी होऊ शकते.
े े े
लोकप्रभाच्या १८ जुलैच्या अंकातील प्रभाकर बोकील यांचा ‘न संपणारे किस्से – गाण्यांचे’ हा लेख माहितीपूर्ण, अभ्यासू आणि तरीदेखील मनोरंजक होता. लेखकाने रुपया, आणे, पैसे या व्यावहारिक पातळीवर जुन्या चित्रपटाचील (सुवर्णयुग) गीतांची माहिती देऊन, नंतर सुमधुर व गाजलेल्या गाण्यांच्या थोडय़ाशा सुमार व नीरस सादरीकरणाचे उत्तम विश्लेषण केले आहे. त्याच अनुशंगाने जुन्या चित्रपट गीतांच्या चाहत्यांसाठी काही पूरक माहिती द्यावीशी वाटते.
१९५७ साली भारताने दशमान पद्धतीचा चलनात स्वीकार केला. त्या वेळी नया पैसा (खडकू) हे तांब्याचे लहान नाणे लोकांच्या विनोदाचे कारण बनले. या थीमवर १९५७ साली ‘मिस इंडिया’ हा चित्रपट आला. त्यात प्रदीपकुमार व नर्गिस प्रमुख भूमिकेत होते. या चित्रपटाच ‘आहा बदला जमाना, वा वा बदला जमाना, ६ नये पैसे का पुराना एक आना’ हे मास्तरांच्या भूमिकेत असणाऱ्य़ा आय. एस. जोहरवर चित्रित केलेले अफलातून गाणे खूप गाजले. याच चित्रपटात ‘अलबेला मै एक दिलवाला’ हे नर्गिसवर (तिच्या ‘मदर इंडिया’तील भूमिकेला छेद देणारे) एक ‘फडकते’ गीतही खूप गाजले होते. राजेंद्र कृष्ण यांच्या गीतांनी एस. डी. बर्मन यांनी संगीत दिले होते.
आपल्या लेखात सुधा मल्होत्रा यांनी गायलेल्या ‘तुम अगर भूल भी जावो तो’ या मुकेशबरोबर गायलेल्या गीताचे छान विश्लेषण आहे. याच अनुशंगाने सुधा मल्होत्रा यांच्या आणखीन काही बहारदार गीतांची आठवण झाली.
तलत मेहमूदबरोबर ‘सिमसिम मर्जिना’मधील ‘चांदनी है भिगी भिगी रात है’ हे ए. आर. कुरेशी यांनी संगीत दिलेलं गीत असंच आठवणार. यासाठी प्रसिद्ध तबलावादक अल्ला रख्खा यांनी तबलावादन केलं. ‘गर्लफ्रेंड’ चित्रपटातील ‘कश्ती का खामोश सफर है.’ हे किशोरबरोबर त्यांनी गायलं होतं. चित्रपटात ते किशोर आणि वहिदा रहमान वर चित्रित झाले आहे. साहीरच्या शब्दांना हेमंतकुमारांनी संगीताचा साज चढविला आहे. सुधा मल्होत्रा यांनी बरीच गीतं गायली आहेत, तो एक स्वतंत्र लेखाचा विषय होऊ शकेल.
केवळ एकाच गाण्याने गाजलेल्या जगजीत कौर आणि मीना कपूर यांचा पण लेखात परामर्ष घेतला आहे. मीना कपूर यांनी ‘मोरी अटरिया पे कागा बोले.. ’ हे मदनमोहनच्या संगीत कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या ‘आँखे’मधील गीत आठवते, तर किशोरकुमारबरोबर त्यांनी माशुका चित्रपटात एक फडकते गीतदेखील गायले आहे.
काही मोजक्याच पण दर्जेदार गीतं गायलेल्या अशा काही गायिकांचा उल्लेख येथे करावासा वाटतो. मुबारक बेगम, राजकुमारी, सुलोचना कदम, कमल बारोट, ललिता देवळकर, सविता चौधरी यांची देखील अनेक गाणी गाजली. काही गाणी तर सुपरहिट झाली होती. त्यातील काही मोजक्याच गाण्यांचा उल्लेख करावा वाटतो.
मुबारक बेगम : ‘कभी तनहाईयों में हमारी याद आयेगी’ (हमारी याद आयेगी १९६१), ‘ऐ जी सनम याद रखना प्यार की दांस्ता..’ (डाकू मन्सूर १९६०), ‘आप माने या ना माने मेरे कातिल आप’ (सुशीला १९६६)
राजकुमारी : ‘नजरों मे समाने से करार आना सकेगा..’ (हैदराबाद की नाझनीन १९५२), ‘घबरा के जो हम सर को..’ (महल १९४९). ‘घिर घिर के आयी काली घटाएं..’ (बावरे नैन १९५०)
सुलोचना कदम (चव्हाण) : ‘चोरी चोरी आग सी दिल मे.’, ‘मौसम आया है रंगीन’ (ढोलक), ‘वो आये है दिल को करार आ गया’ (मधुबाला).
या सर्वच गाण्यांच्या आठवणी आजही ताज्या आहेत. आपल्या लेखामुळे त्याला उजाळा मिळाला. लेखकाने चार संगीतकार असलेल्या ‘पठाण’ या चित्रपटाचा उल्लेख केला आहे. तशाच प्रकारे तीन संगीतकार असलेला ‘संग्राम’ हा चित्रपट गाजला आहे. लाला, असर आणि सत्तार यांनी त्यासाठी संगीत दिले होते. त्यातील महम्मद रफीच्या ‘मैं तो तेरे हसीना खयालों में खो गया’ हे गाणे खूप गाजलं होतं.
संशय म्हणजे काय?
शरद मोरे, कल्याण</p>
आपल्यासमोर प्रश्न असा येतो की ‘संशय म्हणजे नेमके काय?’ आणि आपल्या मनात काही नसतानाही मनात घर करून तो आपल्या मानगुटीवर बसतो. आणि काही केल्या तो आपला पिच्छा सोडत नाही. राग, लोभ, मद, मत्सर याप्रमाणेच संशय हा व्यक्तिस्वभाव आहे. बऱ्याचदा हा संशय सत्याची उकल होण्याआधीच मारा करतो आणि खूप घातक ठरतो. ती वेळ येण्यापूर्वीच त्या संशयाचा आपणास पुरेपूर बंदोबस्त करावयास हवा.
या संशयाची अनेक रूपे आहेत या ना त्या माध्यमातून तो सतत आपल्या अवतीभवती वावरत असतो. यात प्रामुख्याने व्यक्तीचा व्यक्तीवर संशय, एखाद्या वस्तूबाबतचा संशय, असे अनेक प्रकार आहेत. आपण मुख्यत्वेकरून व्यक्तिसंशयाचे विश्लेषण पाहणार आहोत. उदा. पोलिसांचा चोरावर संशय. एखादी व्यक्ती निदरेष असतानाही केवळ संशयामुळे एखाद्या गुन्ह्यामध्ये गोवली जाते. मग याला जबाबदार कोण? पोलीस, ती व्यक्ती की संशय! याचे उत्तर मी शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा मला असे दिसून आले की दोन्ही व्यक्ती त्यास कारणीभूत आहेत. निदरेष व्यक्ती भीतीपोटी पोलिसांच्या प्रश्नाला व्यवस्थित उत्तरे देत नाही, त्यामुळे पोलिसांच्या मनात त्या व्यक्तीविषयी संशयाचे दाट वलय निर्माण होते. तसेच गुन्ह्याचा पुरेपूर अभ्यास न करता त्याची योग्य ती शहानिशा न करता त्या गुन्ह्याशी संबंध नसलेल्या व्यक्तीवर हकनाक संशय घेतला जातो. हे झाले सर्वसाधारण उदाहरण.
हा संशय इथेच थांबत नाही. या संशयामुळे आपल्याला अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झालेली पाहायला मिळतील. उदा. पतीचा पत्नीवर संशय किंवा पत्नीचा पतीवर संशय. पतीला सारखे असे वाटते की आपल्या पत्नीचे कुणा दुसऱ्या व्यक्तीशी अनैतिक संबंध आहेत. हेच पत्नीला पतीच्या बाबतीतही वाटते. माझा पती रोज वेळेवर घरी येत असता आजकाल उशिरा घरी येऊ लागला आहे, म्हणजे नक्कीच त्याचे कुणाशी अनैतिक संबंध असतील वगैरे. या संशयासही कारणीभूत वरील दोन्ही घटक (पती/पत्नी) ठरतात. पती आपल्या पत्नीला एखाद्या गोष्टीचे कटाक्षाने पालन करण्यास सांगत असतानाही पत्नी त्याकडे दुर्लक्ष करते आणि यामुळे सदर पतीचा पत्नीबद्दलचा संशय वाढत जातो.
अशा या संशयामुळे पती आणि पत्नी दोघांचेही मानसिक संतुलन बिघडते आणि संसारात वारंवार खटके उडू लागतात. याचा परिणाम म्हणजे पती वेळेवर घरी येत नाही, व्यसनांच्या आहारी जातो. परिणामी, तो किंवा ती आत्महत्या करण्यासही घाबरत नाही. या संशयाच्या वादळातून बाहेर येण्यासाठी दोघांनीही एकमेकांवर पुरेपूर विश्वास ठेवला पाहिजे. आणि ज्या वेळेस असे घडेल त्या वेळेस या संशयाच्या राक्षसाचा नायनाट होईल.