‘न्यायालयांवरही अन्याय’ हा मथितार्थ प्रलंबित खटले निकाली काढण्यासाठी पुरेसे न्यायाधीश नसल्याची सुप्रीम कोर्टाने जी खंत व्यक्त केली आणि राज्य सरकारची बेफिकिरी सामोरी आणली त्याची चर्चा करताना दिसतो. आपल्या देशात न्याय मिळण्यास इतका विलंब होतो, की आज्याने दाखल केलेल्या केसचा निकाल नातवाला मिळतो, असेच म्हटले जाते आणि म्हणूनच ‘शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये’ अशी म्हण निर्माण झाली आहे. या न्यायालयीन विलंबास कमी प्रमाणात असणारी न्यायालये आणि न्यायाधीश हेच मुख्य कारण आहे हे वास्तव सर्वच जाणतात; पण राज्य सरकारची बेफिकिरी प्रथमच सामोरी आली आहे. न्यायालयाने व्यक्त केलेली खंत आणि त्यावर राज्य सरकारला काहीही उत्तर द्यायची गरज भासली नाही यातच सर्व काही स्पष्ट होते. जनतेकडून गोळा केलेला भारंभार कर जर जनतेच्या हितासाठी वापरणे राज्य सरकारला शक्य नसेल, तर त्यांनी ‘सर्वात पुढे महाराष्ट्र माझा’ या जाहिराती ताबडतोब बंद कराव्यात. न्यायसंस्था ही लोकशाहीचा एक खांब आहेच; पण जनता जनार्दनासाठी न्याय मिळविण्याचे हक्काचे स्थान आहे. त्याबाबत इतके त्रयस्थ राहून जनतेला न्यायासाठी प्रतीक्षा करायला लावणे चुकीचे आहे. केंद्रातील सत्तापालटानंतर जनतेच्या अपेक्षा खूप वाढल्या आहेत; पण राज्य सरकारचे काम राज्य सरकारलाच करायला लागणार, त्यामुळे जनतेला दिलासा देणे त्यांच्याच हातात आहे.
‘धर्माचार्याचा(?) अधर्म’ ही चर्चा आपल्या देशात कसे एखाद्या गोष्टीला अवाजवी महत्त्व मिळून त्यावर चर्वितचर्वण चालू राहते हे ‘साईबाबा देव, संत वा गुरू नाहीत’ या आवाहनामुळे झाले आहे. किमान हिंदू धर्म तरी असा कुठल्याही आवाहनाच्या कच्छपी लागणारा नाही. ज्या धर्मात लोक तेहेतीस कोटी देवांचे पूजन करतात, त्याच वेळी वर्तमानात अनेक बाबा, बुवा, बापूंनासुद्धा पूजतात, तिथे एखाद्या पीठाचार्याच्या सांगण्याने काहीही बदलत नाही, कारण फतवे काढायची परंपरा हिंदू धर्मात नाही तसेच एखाद्याला संत, गुरू ठरविण्याची फूटपट्टीही उपलब्ध नाही. त्यामुळे एका व्यक्तीच्या मताला इतके महत्त्व द्यायचे कारणच काय? प्रश्न राहिला साईबाबांचा. तर ज्या व्यक्तीने आयुष्य साधेपणाने घालविले आणि लोकांना श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र दिला, त्यांना संतपदाची अपेक्षाच नव्हती. त्यांना त्यांच्या भक्तांनी थोर ठरविले आहे.
– माया हेमंत भाटकर, चारकोप गाव, मुंबई (ई-मेलवरून)
आजी-आजोबांचे वास्तव
किशोरांचे वास्तव हा लेख (१३ जून) वाचनात आला. पालकांनी त्यांच्या कोकरूंना किशोरवयीन मुलांना समजून घेण्याचा सल्ला दिला. हे पालकांच्या डोळय़ात अंजन घातल्यासारखे आहे. पालक (सर्वच) ज्यांनी हा लेख वाचला असेल त्यांच्या मुलांच्या बाबतीत जरूर फरक व्हावा ही ईश्वराजवळ (असल्यास) प्रार्थना करतो. आजकाल एकत्र कुटुंबपद्धती नाही, तरीपण वृद्ध आईवडील हे मुलगा-सून यांच्या बरोबर राहतात. वृद्ध हे आर्थिक दृष्टीने स्वतंत्र असतात फक्त एकत्र राहतात. ज्याप्रमाणे आजचे पालक व किशोरवयीन मुले यांच्यात तफावत असते तसेच आजी-आजोबा (वृद्ध) व मुलगा-सून यांच्या पिढीत, विचारांत, वागणुकीत, खाणे-पिणे, सामाजिक वागणूक यात महदंतर असते. त्यामुळे मुलगा व सून यांच्यात व वृद्धांत लहान लहान बाबींवरून खटके उडू शकतात. वृद्ध लोक बोलून दाखवितात, दाखवीत नाहीत त्यामुळे मुलगा-सून वृद्धाश्रम दाखवितात. ज्याप्रमाणे किशोरवयीन मुले व पालक यांच्यात खटके उडतात, तसाच हा प्रकार आहे. या लेखात समंजसपणा पालकांनी घ्यावा असे सुचविले, तसेच मुलगा व सून यांनी समंजसपणा वृद्धांच्या बाबतीत घ्यावा का? मुलगा-सून दोघेही नोकरी करतात, त्यामुळे घर, नोकरी, मुलांची काळजी यात पालकांचा जीव मेटाकुटीस येतो. तरीपण वृद्ध घरी असल्यास मुला-सुनेने ऑफिसमधून घरी आल्यावर दोन शब्द आपुलकीने बोलल्यास या भूतलावर वृद्धांकरिता स्वर्ग निर्माण होऊ शकतो. ते दोन आपुलकीचे शब्द ‘जेवण केलं का? चहा घेता का? नात-नातीने त्रास दिला नाही ना? रविवारी कुठे बाहेर जायचे का?’ अशी वागणूक वृद्धांना दिली तर किशोरवयीन मुलांवर त्याचा परिणाम कसा होईल याचा विचार करावा. तसेच वृद्धांचा, श्रेष्ठांचा आदर करण्याची त्यांच्या मनात कल्पना रुजू शकते म्हणजे तुमचे घरकुल असावे छान होईल.
– जयंत गुनानकर, नागपूर.
आकडेवारीच्या आणखी काही म्हणी
प्रशांत दांडेकर यांच्या सदराच्या अनुषंगाने सुधाकर देशपांडे यांनी आकडय़ांवरून लिहिलेल्या म्हणी व वाक्प्रचार वाचल्यावर लक्षात येते की, त्यांचा वापर आपण रोजच्या व्यवहारात करत असतो; पण प्रत्यक्षात आठवायला गेलो तर सलग आठवत नाहीत. ‘मराठी तितुकी फिरवावी’ सदराच्या माध्यमातून त्या एकत्रितपणे मांडल्यामुळे आणखी काही म्हणी व वाक्प्रचार आठवले, ते येथे मांडत आहे.
चार – चार चांद लागले; पाच – पंचम लावणे, पंचायत बसणे, पंचायतन; सहा – षठी सामासी; सात – तार सप्तकात ओरडणे, सप्तसूर लागणे; दहा – जामातो दशमग्रह; चौदा – चौदा चौकडय़ांचे राज्य; सोळा – सोळावं वरीस धोक्याचं; सतरा – नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्ने; अठरा – अठरापगड जाती; पंचवीस – गद्धे पंचविशी; सत्तावीस – सत्ताविसावे नक्षत्र दाखविणे; चाळीस – चाळिशी लागणे; साठ – साठी बुद्धी नाठी; शंभर – शंभरी गाठणे, शतक ठोकणे, शंभर टक्के.
या सदरातील सर्व लेख संग्राह्य़ आहेत.
– स्मिता गाडगीळ, कुर्ला (पूर्व), मुंबई</strong>
‘मराठी तितुकी फिरवावी’मधला मजकूर बरा असतो. काही पूरक उदाहरणे.. ‘हात’ – हात केळी सोलायला गेले नाही. ‘पाय’ – ० पाय लावून पळाले. अंकानुसार सुचलेल्या काही म्हणी – साठी बुद्धी नाठी. गद्धे पंचविशी, तीन तिघाडा काम बिघाडा, शंभरी भरणे, इजा बिजा तिजा. असो. स्वातंत्र्य दिन विशेषांक छान आहे.
एम. एन. देशपांडे, नागपूर.