‘लोकप्रभा’ (२० जून २०१४) मध्ये विजय कांबळे (माजी पोलीस महासंचालक) आता ठाणे पोलीस आयुक्त यांचे ‘रस्त्यावरील भीषण अपघातांना बेदरकार-अप्रशिक्षित चालकच जबाबदार असतात’ – हे मत वाचले.
मुंडेसाहेबांच्या दुर्दैवी अपघातानंतर अपराधी ड्रायव्हरवर कडक कारवाई होईल, अशी नितीन गडकरींनी घोषणा केली खरी, पण लायसन्स रद्द करणे या अगदी प्राथमिक कारवाईचीसुद्धा अंमलबजावणी या देशात कधी होऊच शकणार नाही, कारण भीषण अपघाताला कारणीभूत असणाऱ्या अपराधी ड्रायव्हरचे लायसन्स एका गावात/ शहरात रद्द झाले तरी तो देशातल्या कोणत्याही कोपऱ्यात जाऊन अगदी बिनदिक्कतपणे नवीन लायसन्स मिळवू शकतो ही वस्तुस्थिती आहे. अमेरिका-युरोपप्रमाणे आपल्या देशात सर्व राज्यांतील एकूण-एक परिवहन कार्यालये इंटरनेटद्वारा एकमेकांशी जोडलेली नाहीत. त्यामुळे गुन्हेगार ड्रायव्हरचे नाव-फोटो-हाताचे ठसे असा बायोमेट्रिक तपशील देशात सर्व परिवहन कार्यालयात उपलब्ध होऊ शकत नाही, त्यामुळे फोटो खरा पण नाव-पत्ता मात्र खोटा असे अर्ज करून नवीन लायसन्स काढता येते. किंबहुना देशातील दूरच्या कोपऱ्यात जायचीदेखील गरज नाही. काही परिवहन कार्यालयात तर अगदी महिन्याभरापूर्वीची कागदपत्रे/ डेटा सापडत नाही अशी गोंधळाची परिस्थिती आहे. कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही. पैसे मोजले की दलालांमार्फत सर्व कामे होतात. त्यामुळे कदाचित तेच कार्यालय पुन्हा अपराधी ड्रायव्हरना लायसन्स (नजरचुकीने) देऊ शकते, ही २१व्या शतकात आपल्या देशातील परिस्थिती आहे.
मंत्री महोदयांनी घोषणा केली की त्यांचे कर्तव्य संपले. देशाचे माजी राष्ट्रपती झैलसिंग रस्ता अपघातात ठार झाले तेव्हा अशाच घोषणा दिल्लीतून झाल्या होत्या. दरवर्षी भारतात २ लाख लोक रस्ते अपघातात मारले जातात असे बीबीसीने मुंडेसाहेबांच्या दुर्दैवी अपघाताची बातमी देताना सांगितले. जे मरत नाहीत पण अपघातात गंभीर जखमी होऊन उर्वरित आयुष्य अपंगाचे जीवन जगतात त्यांची संख्याही काही लाखात आहे. अपराधी ड्रायव्हर निर्दोष सुटतात, पण अपघातग्रस्तांना (अथवा वारसांना) मात्र न्याय मिळत नाही आणि कधी कधी तर विम्याचे पैसेही मिळत नाहीत ही खरी शोकांतिका आहे.
अजय स्वादी, कोथरूड, पुणे.
फुटबॉलप्रेमाची कथा
‘लोकप्रभा’चा फुटबॉल विशेषांक ही खरोखरच मेजवानी होती. मी खरं तर नियमित क्रिकेट बघणारा माणूस. पण फुटबॉल वर्ल्ड कप सुरू होण्याच्या सुरुवातीला सगळ्या टीम, त्यांचे प्लेयर्स यांची माहिती मिळाल्याने बघू या तरी फुटबॉल असं म्हणून पहिल्या दिवसापासून वर्ल्ड कप मॅचेस बघायला लागलो आणि या खेळाच्या प्रेमातच पडलो. याआधीही मी माझ्या मित्रांकडून फुटबॉलच्या मॅचेसची वर्णनं ऐकायचो पण फारशा मॅचेस बघितल्या नसल्याने इंटरेस्ट निर्माण झाला नव्हता. पण ‘लोकप्रभा’चा अंक, वर्ल्डकप मॅचेस असा सगळा योग जुळून आला आणि बघता बघता मी फुटबॉलप्रेमी झालो. केवळ काही देशात खेळल्या जाणाऱ्या क्रिकेटच्या तुलनेत हे जग अद्भुतच आहे. वेग, अचूकता, टायमिंग, शारीरिक क्षमता, फिटनेस आणि कमालीची एनर्जी या सगळ्याचं रसायन बघताना आपणही उठून ग्राऊंडवर जावं आणि बॉलला मस्त किक मारावी असा मोह होतो यातच सगळं आलं.
संदेश तळेकर, कर्जत
आधुनिक सावित्रीला विज्ञानाची जोड
‘लोकप्रभा’ (६ जून) वाचला. यातील आधुनिक सावित्री हा डॉ. सुनीता कावळे यांनी लिहिलेल्या वटसावित्री पूजेबाबत परंपरागत माहिती आणि विज्ञानाची जोड देऊन लिखाण केलेली साहित्यकृती मनास भावली. लेखिकेने पारंपरिक पद्धतीची आजच्या वैज्ञानिकतेशी जोड घालून आधुनिक सावित्रीला वड व त्याच्या पूजेचे महत्त्व पटवून दिले ते प्रशंसनीय आहे. पूजेच्या भ्रामक कल्पना दूर करून त्याला वैज्ञानिक दृष्टिकोनाबाबत जागरूकता ही काळाची गरज आहे. आपली भारतीय संस्कृती, भारतीय सण व उत्सव अत्यंत वैशिष्टय़पूर्ण असून त्यांना वैज्ञानिक व नैसर्गिक जोड दिलेली आहे. या सण व उत्सवांचा अर्थ हा डोळसपणे व विज्ञानदृष्टय़ा समजून घेणे व तो आपण जपून इतरांनाही जपायला सांगणे हे आपले कर्तव्य आहे.
धोंडीराम सिंह राजपूत, वैजापूर, जि. औरंगाबाद</strong>
मनाला भिडणारे, प्रत्यक्षदर्शी चित्रण
‘कणखर लोकनेता’ (१३ जून) हा मा. गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली अर्पणारा लेख सद्गदित करणारा आहे. त्यांच्या कणखरपणाचे दोन भीषण अनुभव अवघ्या महाराष्ट्रालाच नव्हे तर माणूस जातीलाच धडकी भरविणारे होते. त्या उन्मळून टाकणाऱ्या प्रसंगीचे गोपीनाथजींचे पहाडीपणाचे वर्तन आणि भाष्य-शब्द- स्पर्शातून गलितगात्र माणसांना आधार देणे गहिवरून टाकणारे आहे. माझे आजोळ-नातलग बीड- आंबेजोगाई-परळी परिसरातील. मुंडेसाहेबांचे रंजल्या-गांजल्या, पीडित-शोषित, दुष्काळग्रस्त शेतकरी-कष्टकरी स्तरांसाठी जीव पाखडणे अनुभवल्याने त्यांचे असे नभस्पर्शी झेपावता-झेपावता आठच दिवसांत चितेवर पहुडणे आकांत उसळविते मनामध्ये! शरद पवारांसंबंधी एक वृद्ध शेतकरी प्रतापराव पवारांना दोघांतील नाते ठाऊक नसताना बारामतीच्या वाटेवर म्हणालेला, ‘‘शरद पवारसाहेबांना सारा महाराष्ट्र त्यांच्या तळहातातल्या रेषांवानी माहिताय!’’ गोपीनाथ मुंडे यांनाही त्यांचा महाराष्ट्र तळहातातील रेषांसारखा माहिती होताच, पण ते वंचित वर्गाच्या तळहातातील रेषा जाणून त्यांचे नशीब उघडण्यासाठी जीवाचे रान करीत होते. म्हणूनच त्यांच्या अकाली जाण्याने जिवाची काहिली होत राहते.
प्रा. अनुराधा गुरव, कोल्हापूर</strong>
यथार्थ तंगडतोड
प्रीती पटेल यांचा ‘तंगडतोड’ नावाचा लेख वाचला. नाव अगदी सार्थ आहे. वाचता वाचता माझीच दमछाक झाली. प्रीती पटेल आणि त्यांच्याबरोबरचे डोंगरयात्रींचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. सध्याच्या एकंदरीत चंगळवादाच्या युगात असे छंद लावून घेणे आणि आपले शिक्षण, नोकरी, व्यवसाय वगैरे सांभाळून ते जोपासणे खरेच कौतुकास्पद आहे. प्रीती पटेल या ग्रुपच्या लीडर दिसतात. त्यांना त्या भागाची चांगलीच माहिती होती असे दिसले. तेथील फुले, झाडे, पक्षी, प्राणी त्यांच्या ओळखीचे होते. लेख वाचता वाचता मीही नवीन शब्द शिकलो. सरी, डग्गा, घसारा, सोंड, दुंगा वगैरे. (लेख दोनदा वाचूनसुद्धा तंगडतोडीची सुरुवात ज्या अस्तान सरीपासून झाली त्या सरीचा अर्थ काही कळला नाही.) असो.
‘लोकप्रभा’ नेहमीच साहसी छंदांना प्रोत्साहन देत आहे. गिर्यारोहण आणि किल्ल्यांवर नेहमी लेख आणि छायाचित्रे असतात. त्यामुळे साहसी छंदांना उत्तेजन मिळते आहे. अशा प्रकारचे लेख वाचून मोठय़ा संख्येने तरुण मंडळी ट्रेकिंग, पर्यावरण संवर्धनासारख्या छंदांकडे वळोत. प्रीती पटेल यांनी या लेखात परिस्थितीचे, भोवतालचे हुबेहूब वर्णन केले आहे. भाषाही लेखाच्या विषयास साजेशी आहे. त्यांचे आणि त्यांच्या साहसी चमूचे मनापासून अभिनंदन! एक सूचना करावीशी वाटते. त्यांनी सुरक्षेकडेही लक्ष पुरवावे. आजकाल काहीही होऊ शकते हे आपण पाहतो आहोतच.
सुरेश देवळालकर, हैदराबाद (ई-मेलवरून)
असंतोष आता तरी लक्षात घ्या!
नरेंद्र मोदी यांनी प्रचारकाळात संपूर्ण देशभर झंझावाती दौरे आखले आणि भाजप नेतृत्व करीत असलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीला विजय मिळवून देत ‘काँग्रेसमुक्त भारत’ ही घोषणा शब्दश: खरी करून दाखवली (नो उल्लू बनािवग!, मथितार्थ, ३० मे). गेल्या काही वर्षांत, उघडकीस आलेला भ्रष्टाचार आणि काँग्रेस पक्षाने त्याविरोधात निर्णय घेण्यात दाखवलेल्या उदासीनतेचा जनसामान्यांमध्ये खदखदणारा असंतोष मतपेटीद्वारे व्यक्त झाला.
महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीत लोकसभा निकालांचीच पुनरावृत्ती होईल, अशी परिस्थिती दिसते. मनसेला पुन्हा अशा तऱ्हेने पराभव स्वीकारावा लागल्यास त्यांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण होईल. राज ठाकरे विकासाला चालना देणारा ठोस कार्यक्रम हाती न घेता केवळ वैयक्तिक आरोप-प्रत्यारोप करण्यापलीकडे कुठलाही नवीन विचार मांडत नाहीत. निवडणुकीत प्राधान्य विजय मिळवण्यात नसून शिवसेना उमेदवारांचा पराभव होण्यालाच महत्त्व देण्यात आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्तीचे ठरू नये.
केतन र. मेहेर, विरार (ई-मेलवरून)
दि. ६ जूनचा अंक वाचला. छायाप्रसाद फातर्पेकर यांचा ‘राम, रामाचं देऊळ आणि गीतरामायण’ लेख फारच अप्रतिम. खरंच मनाला वेगळ्या पद्धतीने भावून गेला. अगदी अशाच माझ्या गावातील राम मंदिराची आठवण ओली करून गेला. लेखिकेचा ई-मेल आयडी, फोन नं. मिळाला तर बरे होईल. गदिमा, बाबूजींचं ‘गीतरामायण’ खरंच एक अजरामर काव्य, राम-सीतेचं जीवन म्हणजे अनाकलनीय दिव्य.
– दिलीप बारवकर, नाशिक.
फिफा वर्ल्डकप विशेषांक वाचला, अंकातील सर्वच लेख उत्तम आणि माहितीपूर्ण आहेत. विनायक परब यांचे खेळाच्या दृष्टीने लिहिलेले मथितार्थ अत्यंत समर्पक असे आहे. आपल्या शासकीय व्यवस्थेचे अनास्थेबद्दल डोळे उघडणारे आहे. तुषार वैती यांचा ‘फुटबॉल शूटबॉल हाय रब्बा!’ आणि प्रशांत केणी यांचा ‘थराराचे वारसदार’ हे लेख खूपच माहितीपूर्ण आहेत. सुंदर विशेषांकाबद्दल धन्यवाद.
बी. एल. हेडावू, मुंबई.