मराठी सिनेसृष्टीसाठी वर्षांची सुरुवात अतिशय उत्तम झाली आहे. पुढील दोन महिन्यांत येणाऱ्या सिनेमांमध्ये मैत्री, कौटुंबिक नातेसंबंध, राजकीय कथा अशा वेगवेगळ्या बाजांचे सिनेमे येताहेत.

‘नटसम्राट’ने या वर्षांची नांदी तर मोठी दिमाखदार झाली आहे. प्रचंड गाजलेल्या नाटय़कृतीवर आधारित चित्रपटदेखील तितकाच यशस्वी होऊ शकतो हे ‘कटय़ार काळजात घुसली’ या चित्रपटाने गेल्या वर्षी दाखवून दिलं होतंच. नटसम्राटदेखील त्याच पावलावर पाऊल ठेवत सध्या लोकप्रिय होताना दिसत आहे. कटय़ारनंतर लगेच असाच नाटकावर आधारित चित्रपट आणण्यात लोकांची मानसिकता कॅश करण्याचा मार्केटिंग फंडा कामी आला म्हणावा लागेल. त्यामुळे पूर्वनियोजनाप्रमाणे १ जानेवारीला येणारा आणि ज्याच्याबद्दल प्रचंड उत्सुकता होती असा नागराज मंजुळेचा ‘सैराट’ मात्र पुढे ढकलला गेला आहे. फॅण्ड्री नंतर नागराज काय करतोय याची सर्वानाच प्रचंड उत्सुकता आहे. मात्र त्यासाठी अजून काही महिने जावे लागतील असं दिसतंय.

नटसम्राटची लोकप्रियता कमी होत नाही तोपर्यंत पुढील महिन्याभरात मोठय़ा बॅनरचे, दिग्दर्शकांचे आणि स्टार कलाकारांचे चित्रपट प्रेक्षकांना पुन्हा चित्रपटगृहाकडे येण्यास प्रवृत्त करतात का हे पाहावे लागेल.

अवतीभवतीच घडणाऱ्या अनेक घडामोडींचा आधार घेत वास्तववादी सादरीकरणाबाबत ओळखले जाणारे गजेंद्र अहिरे यांचा १५ जानेवारीला येणारा ‘शासन’ हा चर्चेत आहे. शासन आणि प्रशासन या दोन्ही ठिकाणच्या राजकारणावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटाबद्दल उत्सुकता वाटते ती मुख्यत: त्यातील स्टारकास्टमुळे. डॉ. श्रीराम लागू, विक्रम गोखले, मोहन जोशी, मकरंद अनासपुरे, भरत जाधव, जितेंद्र जोशी, सिद्धार्थ जाधव, मनवा नाईक आणि आदिती भागवत अशी कलाकारांची भलीमोठी यादीच येथे आहे. खरे तर शासन-प्रशासन हा हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांचा हमखास यशस्वी फॉम्र्युला असतो. मराठीतदेखील हे सारं वापरून झालं आहे. पण गजेंद्र अहिरेंच्या मते या चित्रपटात हिंदी-दाक्षिणात्यांसारखा सिनेमॅटिक प्रकार नाही. तर उलट ही कथा तुम्हाला तुमच्या भवतालीच घडतेय असे वाटेल. चित्रपटाच्या ट्रेलरवरून तरी काही प्रसंग नक्कीच अंगावर येणारे वाटतात हे निश्चित. आजवर कायम विनोदी अथवा कधी कधी गंभीर भूमिका साकारणाऱ्या भरत जाधवला थेट नकारात्मक भूमिकेत दाखवलं गेलंय. काहीतरी वेगळे पाहायला मिळेल अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही. मोठी स्टारकास्ट हवी असं काही ठरलेलं नव्हतं. ‘हे कलाकारापेक्षा मित्र अधिक आहेत. पण ठरवून इतकी मांदियाळी जमवली नाही,’ असं दिग्दर्शक सांगतात.

या तगडय़ा स्टारकास्टची या आठवडय़ात थेट स्पर्धा आहे ती ‘फ्रेंड्स’बरोबर. आर. मधेश या दाक्षिणात्य दिग्दर्शकाचा पहिलाच मराठी चित्रपट आणि त्याच्या जोडीला चॉकलेट हिरो स्वप्निल जोशी असं हे समीकरण आहे. दाक्षिणात्य चित्रपटांएवढे बजेट नसतानादेखील आर. मधेश यांनी केलेल्या या चित्रपटातून टिपिकल दक्षिणी चित्रपटांच्या पलीकडचे काहीतरी पाहायला मिळेल, अशी आशा करायला हरकत नाही.

याच आठवडय़ात या दोघांच्या तुलनेत नव्या कलाकारांचा ‘७०२ दीक्षित’ हा रहस्यपट देखील येत आहे. शंख राजाध्यक्ष दिग्दर्शित या चित्रपटातून एका मध्यमवर्गीय कुटुंबावर अचानक आलेल्या संकटामुळे होणारा गुंता मांडण्यात आला आहे. घरकाम करणाऱ्या बाईमुळे अडचणीत आलेले कुटुंब कायद्याच्या कचाटय़ात पुरते अडकते. एका कुटुंबाचे भावजीवन ढवळून टाकणारी ही कथा प्रेक्षकांची दाद मिळवते का ते १५ जानेवारीलाच कळेल.

गेल्या वर्षी एकीकडे मध्यमवर्गीय चाळकरी नायक आणि दुसरीकडे दगडी चाळीचा उजवा हात अशा परस्पर भिन्न भूमिका साकारणाऱ्या अंकुशने तरुणाईवर बऱ्यापैकी गारुड निर्माण केलं आहे. त्याचाच फायदा त्याला २२ जानेवारीला येणाऱ्या ‘गुरू’मध्ये मिळेल असे दिसतय. रावडी राठोड स्टाईलची प्रचीती त्याच्या टिझरवरून होतेय. वेगवेगळ्या झगमगाटी गॉगलमधला एकदम शायनिंग असा लूक तरुण प्रेक्षकांना आकर्षित करू शकतो. मारझोडी करणारा नायक माणुसकी कसा जोपासतो हा तसा लोकप्रिय प्लॉट येथे दिसून येतोय. एखाद्या गावाचं भलं करण्यासाठी झटणारा गुंड नायक ही लोकप्रियतेची नस दिग्दर्शक संजय जाधवना चांगलीच समजली आहे असे म्हणावे लागेल. जोडीला इरॉससारखा हिंदीतला मोठा ब्रॅण्ड प्रस्तुतकर्ता असल्यामुळे एकंदरीत प्रसिद्धी प्रमोशनचा धडाका लागलाय.

तर याच आठवडय़ात येणारा मृण्मयी देशपांडे क्रिएशनचा ‘अनुराग’ मात्र अचानक पुढे गेला आहे. रिलेशनशिपवर आधारित कथासूत्र असणारा हा चित्रपट मृण्मयी क्रिएशनचा पहिलाच चित्रपट आहे. चित्रीकरणासाठी अत्यंत विलोभनीय पाश्र्वभूमी असणारं लेह लडाख आजवर मराठी चित्रपटांपासून दूरच होतं. ही विलोभनीयता अनुरागमुळे अनुभवता आली असती. मात्र त्यासाठी महिनाभर तरी वाट पाहावी लागेल.

पुढच्याच आठवडय़ात म्हणजेच २९ जानेवारीला येणारा ‘बंध नॉयलॉनचे’ हा त्याच एकांकिकेवर आधारित चित्रपटदेखील तरुणाईला धरूनच बेतला आहे. पण त्याचा भर हा काहीसा जनरेशन गॅपकडे जाणारा आहे. टेक्नोसॅव्ही तरुण पिढी आणि संवाद साधण्यावर भर असणारी पिढी यांच्यावर आधारलेला आहे. महेश मांजरेकर, सुबोध भावे, सुनील बर्वे, संजय मांजरेकर, मेधा मांजरेकर, श्रुती मराठे आणि प्रांजल परब अशी मोठी स्टारकास्ट यात असल्यामुळे काहीतरी चांगलं पाहायला मिळेल असे दिसते.

सलग तीन आठवडय़ात एवढी घमासान झाल्यानंतर फेब्रुवारीच्या सुरुवातीस मात्र काहीशी उसंत लाभणार आहे. चित्रपट निर्मिती जितकी कठीण तितकेच तो प्रदर्शित करणेदेखील अवघड असते, याचं प्रत्यंतर असणारा ‘अस्तु’ हा आशयघन चित्रपट वर्ष-दीड वर्षांनंतर अखेरीस फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ात येणार होता. पण आता पुन्हा तो पुढे ढकलण्यात आला आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी क्राऊड फंडिंगचा फंडादेखील वापरण्यात आला होता. मोहन आगाशे, अमृता सुभाष अशा सकस कलाकारांची कामं आणि सुमित्रा भावे-सुकथनकर यांचे दिग्दर्शन असलेल्या चित्रपटाची एकंदरीतच उत्सुकता आहे. मात्र अजूनही सुधारित प्रदर्शनाच्या तारखा जाहीर झाल्या नाहीत. आवर्जून पाहावा असा हा चित्रपट लवकरच पडद्यावर दिसेल अशी अपेक्षा करण्यास हरकत नाही.

फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवडय़ात मराठीतल्या पहिल्याच सायफाय फिक्शनचा अनुभव मिळणार. ‘फुंतरु’ असं काहीसं विचित्र नाव असणाऱ्या चित्रपटात सारी तरुण आणि नवीन कलाकारांची फौज दिसणार आहे. इरॉस इंटरनॅशनल आजवर अनेक मराठी चित्रपटांसाठी प्रस्तुतकर्ता म्हणून दिसते, पण या चित्रपटाचे ते निर्माते आहेत. मराठीतल्या त्यांच्या पहिल्याच निर्मितीत सायफाय फिक्शनचा वापर करण्याचे धाडसच म्हणावे लागेल. सुजय डहाके दिग्दर्शित चित्रपटातील सर्वच कलाकारांचे लूक्स हा नावीन्याचा आणि औत्स्युक्याचा विषय असेल. पण हे लूक्स पाहायला १२ फेबुवारीपर्यंत थांबावे लागेल.

जाताजाता – ‘कॉफी आणि बरंच काही’ या काहीशा वेगळ्या पठडीतल्या चित्रपटामुळे चर्चेत आलेले दिग्दर्शक प्रकाश कुंटे या वर्षी पुन्हा चर्चेत आले आहेत ते त्यांच्या नव्या सिनेमामुळे. ‘अ‍ॅण्ड जरा हटके’ असं मुळातच हटके नाव असणाऱ्या चित्रपटाचे नुकतेच चित्रीकरण पूर्ण झाले आहे. नाव आणि सिनेमाचा लोगो दोन्ही उत्सुकता निर्माण करणारे आहे. इरॉस इंटरनॅशनल निर्माते, प्रकाश कुंटे दिग्दर्शक आणि रवी जाधव प्रस्तुतकर्ता त्यामुळे एकंदरीतच पाच-सहा महिन्यांनंतर जरा हटके काहीतरी पाहायला मिळेल, असे म्हणायला हरकत नाही.
सुहास जोशी – response.lokprabha@expressindia.com

Story img Loader