lkp19
तेजाली कुंटे

‘हा प्रेमळ, ही रागीट, ही मनमिळाऊ, हा एककल्ली’- अशा अनेक व्यक्तिविशेषणांनी आपण इतर व्यक्तींना वारंवार संबोधत असतो. आपल्या नावापलीकडे जाऊन माणूस म्हणून आपण एक ओळख निर्माण करत असतो. लोकांबरोबरच्या विविध अनुभवांनी ‘व्यक्ती’ म्हणून आपण समृद्ध होत असतो आणि अशा असंख्य ‘व्यक्तिवैशिष्टय़ांनी’ लोक आपल्याला आणि आपण लोकांना ओळखत असतो!! खरं बघितलं तर हा विषय अगदी रोजचा; म्हणूनच कदाचित ‘अतिपरिचयात् अवज्ञा’ म्हणत त्याविषयी फार बोललं जात नाही आणि विचार केला जात नाही. मुळात मनुष्य हा समाजशील प्राणी-समूहात, समाजात इतर व्यक्तींबरोबर एकत्र राहण्याचा माणसाच्या जीवनावर मोठा परिणाम होत असतो. अगदी रोजच्या दिवसाला आपण हजारो, लाखो व्यक्तींना बघत असतो, पन्नासेक लोकांशी संवाद साधतो, (फेसबुकसारख्या सोशल नेटवर्किंग साइटमुळे तर एकाच वेळी प्रचंड लोकांपर्यंत आपण पोहोचतो.) मात्र त्यातले काहीच संवाद, काही घटना, काही व्यक्ती आपल्याला भावतात; नवीन विचार, नवीन दृष्टिकोन देण्यास प्रवृत्त करतात. कधीतरी पाच मिनिटं भेटलेली व्यक्तीसुद्धा कायम स्मरणात राहते, तर कधी कधी रोजच्या संपर्कातली व्यक्तीसुद्धा परकी वाटते. का घडतं असं? काही व्यक्तींशीच आपले सूर का जुळतात? आपल्याला आवडणारी व्यक्ती दुसऱ्याला आवडेलच असं नाही.. वर्षांनुवर्षांची मैत्री एका दिवसात कशी तुटते? हे आणि असे असंख्य प्रश्न आपल्याला सतावत असतात. प्रश्न जितके कठीण तितकीच त्यांची उत्तरंसुद्धा कठीणच.. कारण मुळात ‘व्यक्ती’ समजून घेणंच अत्यंत कठीण! खरं तर अशक्यच. पण जितका हा विषय गूढ आहे तितकाच तो मजेशीर आणि कुतूहल निर्माण करणारा आहे. ‘व्यक्ती आणि वल्ली’ सदरातून अशाच विविध व्यक्तींच्या मनाचा ठाव घेण्याचा, व्यक्ती विशेषणांचा, विविध घटना आणि किस्से या सगळ्यांचा विचार करण्याचा प्रयत्न करीत आहे. या सदरात कधी उत्तरं  मिळतील तर  कधी नवीन प्रश्न पडतील; कधी सभोवतालच्या व्यक्तींकडे, घटनांकडे बघण्याचा नवीन दृष्टिकोन मिळेल. काही घटना, व्यक्तिस्वभावाबद्दल चर्चा करताना त्याला  मानसशास्त्राची जोड दिली जाईल..

माणसाच्या अंतरंगात डोकावून बघण्याचा प्रयत्न आपण वारंवार करत असतो; तरीही जवळच्या व्यक्तींचं तर सोडा, पण आपण बरेचदा स्वत:लाही ‘व्यक्ती’ म्हणून पूर्णपणे ओळखू शकत नाही. किंबहुना म्हणूनच त्याचा शोध कायम राहतो आणि आपण स्वत:ला जितकं चांगलं ओळखायला लागतो तितकाच इतर व्यक्तींचा अभ्यास करणं सोपं होतं. मुळात माणसाच्या बाह्य़रूपापेक्षा त्याचं मन, भावना, इतरांसोबतचं वागणं या गोष्टी त्याची व्यक्ती म्हणून समाजात ओळख घडवत असतात. तरीही एखाद्या व्यक्तीला बघूनच आपल्या मनात त्याच्या/ तिच्याविषयी विविध विचार चालू होतात. केवळ बाह्य़रूपावरून विविध अंदाज बांधले जातात, पूर्वग्रह केले जातात; पण प्रत्यक्षात मात्र त्या व्यक्तीशी संपर्क वाढल्यावर तिची ‘नव्यानेच ओळख’ पटते- एक ‘व्यक्ती म्हणून!! या विषयाबद्दलचं कुतूहल वाटत राहातं आणि हीच जिज्ञासा नवीन दृष्टिकोनाने इतर लोकांकडे बघण्यास कारणीभूत ठरते.

खरं तर आपण एक ‘माणूस/ व्यक्ती’ म्हणून घडत असतो त्यात आपल्या संपर्कात आलेल्या, सहवास लाभलेल्या व्यक्तींचा फार मोठा वाटा असतो. मानसशास्त्रात ‘नेचर विरुद्ध नर्चर’ हा वाद बऱ्याच काळापासून चालत आला आहे- म्हणजेच माणसाचा स्वभाव, गुणदोषांसाठी पूर्वज आणि पालकांकडून आलेल्या ‘जीन्स’ (गुणसूत्र) कारणीभूत असतात की माणसाचा जन्म कुठल्या परिसरात झाला, आजूबाजूची सामाजिक-राजकीय परिस्थिती काय आहे, त्याच्या सहवासात आलेल्या व्यक्ती कारणीभूत असतात? नक्की कुठली बाजू जमेची आहे हे ठरवणं नक्कीच कठीण आहे; पण एक मात्र खरं की ‘नेचर आणि नर्चर’ दोन्हीही गोष्टी माणसाच्या जडणघडणीत महत्त्वाची जबाबदारी बजावतात आणि ही जडणघडणच एक व्यक्ती म्हणून आपलं अस्तित्व निर्माण करायला मदत करते!! ज्या व्यक्तींच्या आपण सहवासात येतो, कळत-नकळत त्यांचे गुण (आणि कधीकधी दोषसुद्धा) आपण अंगीकारतो; कदाचित यावरूनच मराठीमध्ये ‘ढवळ्या शेजारी बांधला पवळ्या, गुण नाही पण वाण लागला’ ही म्हण आली असावी!! तर मुद्दा असा की संपर्कात आलेल्या व्यक्तींचा आपल्यावर जसा प्रभाव पडतो तसाच आपलाही इतर व्यक्तींवर प्रभाव पडत असतो. वेगवेगळ्या घटनांमध्ये, वेगवेगळ्या ठिकाणी आपली जी भूमिका असते त्याप्रमाणे आपलं वर्तन बदलत असतं तसाच आपला लोकांवर होणारा प्रभावही बदलत असतो. कुठल्याही व्यक्तीला असंख्य छटा असतात, आणि याच विविध छटा प्रसंगांप्रमाणे आपल्या व्यक्तिमत्त्वात रंग भरत असतात. घरी आपण वेगळे असतो तर मित्रमैत्रिणींमध्ये वेगळे. ऑफिसमध्ये आपली वेगळी ओळख असते आणि एकांतात अजूनच वेगळी ओळख पटते किंबहुना ती आपल्याला सापडते. कधीकधी काही प्रसंगात तर आपण असे कसे वागलो? असा विचार कसा करू शकतो? याचं कोडं कधीच उलगडत नाही. कारण व्यक्ती म्हणून आपले काही मूलभूत पैलू जरी असले तरी विविध प्रसंगी, विविध लोकांबरोबर असताना आपले सुप्त पैलूसुद्धा आपल्या वागण्यातून, विचारातून डोकं वर काढत असतात..

आपल्यासारख्याच विचार करणाऱ्या, आवडीनिवडी असणाऱ्या व्यक्ती आपल्याला आवडतात की ‘अपोझिट्स अ‍ॅट्रॅक्ट’च्या नियमानुसार परस्पर विरुद्ध असलेल्या व्यक्ती भावतात? कुठलीच व्यक्ती पूर्णपणे वाईट नसते, असं म्हणताना जगात विचित्र, अमानुष गुन्हे का घडतात? ‘व्यक्ती’स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय? कधी त्याची सीमा आपण ओलांडतो, आणि हे कुणी ठरवावं? अशा अनेक गूढ प्रश्नांची उकल करणं म्हणजे एक तारेवरची कसरतच.. आपल्यात आणि इतर व्यक्तींमध्ये समान धागे, समान गुणदोष असतानासुद्धा आपण आपली ‘वैयक्तिक ओळख’ सातत्याने जपत असतो आणि म्हणूनच आपण सगळे एकमेकांपासून वेगळे ठरत असतो. अगदी दोन जुळी माणसंसुद्धा एकमेकांपासून निराळीच असतात. गमतीची गोष्ट अशी की, हे व्यक्ती-व्यक्तींमधील फरकसुद्धा ‘नॉर्मल कव्‍‌र्ह’ सांभाळून असतात. म्हणजे जशी जगात अतिउंच, अतिबुटकी, अतिलठ्ठ, अतिबारीक, अतिहुशार, अतिचंचल माणसांची संख्या विरळ तशीच अतिरागीट, अतिप्रेमळ, अतिशांत, अतिबडबडी माणसंही कमी प्रमाणातच आढळतात. एका अर्थी आपण गर्दीचा भाग असूनही गर्दीमध्ये हरवून जात नाही; आपली अशी वेगळी ओळख निर्माण करीतच असतो.

पु.लं.चं ‘व्यक्ती आणि वल्ली’ सगळ्यांनाच भावणारं पुस्तक- पुस्तक नव्हेच; त्यांच्या नजरेने केलेलं माणसाचं वाचनच!! कुणाला सखाराम गटणे भावतो तर कुणाला नाथा कामत; कुणाला चितळे मास्तर आपलेसे वाटतात तर कुणाला अंतू बरवा लक्षात राहतो.. थोडक्यात काय तर कुठेतरी या पात्रांमध्ये आपण स्वत:ला किंवा आपल्या ओळखीतल्या इतर लोकांना शोधत असतो; साधम्र्य सापडलं की अचानक आपण आणि ही पात्रं एका अदृश्य धाग्याने बांधलो जातो. या सदराद्वारे तरुणाईशी संबंधित अशा विविध व्यक्तींचं व्यक्तिचित्रण करण्याचा मानस आहे. खऱ्या आयुष्यात आलेल्या व्यक्ती असल्या तरी त्यांची नावं बदलली आहेत, काल्पनिकतेची जोडसुद्धा त्याला देण्यात येणार आहे; त्यामुळे तुम्हाला तुमच्या ओळखीतील व्यक्तींमध्ये आणि सदरातील लेखातील व्यक्तीत साधम्र्य वाटल्यास निव्वळ योगायोग समजू नये; किंबहुना दोन व्यक्तींमध्ये समानता असू शकते यावरचा विश्वास दृढ करू शकता.
तेजाली कुंटे – response.lokprabha@expressindia.com