कोणत्याही नदीकडे आपण पाहतो ते पाण्याचा स्रोत म्हणून. नदीला पूर आला म्हणून आनंदणारे, पुरात सगळं वाहून गेलं तरी नदीला दूषणं न देता उलट तिला माता मानणारे लोक तुम्हाला माहीत आहेत का?

‘प्रोजेक्ट मेघदूत’ला या वर्षी मान्सूनचा अभ्यास करत गंगेच्या खोऱ्यात फिरताना एक नदी असणं आणि त्याच्या आसपास संस्कृतीचा विकास होणं म्हणजे काय प्रत्यक्षात अनुभवायला मिळालं किंवा आणखी अभ्यास केल्यावर या संस्कृतीचं भविष्य काय असेल याचा किमान अंदाज आपण बांधू शकू असं वाटतं आहे. आणि तो बांधायलाच हवा असं वाटतं. निसर्ग बदलत राहणार. हे निश्चित आहे. पण या बदलासाठी माणसाने कशा तयारीमध्ये राहावं हे आपण ठरवायला हवं.
कोलकात्यामधला सर्व प्रवास हा डेल्टा आणि त्याच्या अनुषंगाने निसर्गात होणाऱ्या बदलांबद्दल होता. डेल्टाच्या प्रदेशात, जेव्हा गंगा नदीचा प्रवाह मूळ ठिकाणी होता, तेव्हा या ठिकाणी तिचं पात्र प्रचंड होतं. गंगा एवढी मोठी असल्याने त्याचा डेल्टा विविध ठिकाणांहून बाहेर पडणार हे निश्चितच आहे. आज गंगेच्या डेल्टाचा अध्र्याहून अधिक भाग हा बांगलादेशात आहे. आता गंगेने आपला प्रवाह बऱ्याच अंशी बदललेला आहे. मुळात कोलकात्यामधून वाहत असलेली गंगा आता तिथून वाहत नाही. तिथे बांधलेला गंगाघाट हा पूर्वेच्या गंगेच्या प्रवाहाचं प्रतीक बनून राहिला आहे.
सर्वाधिक पुराचं राज्य- बिहार
पाटण्यामध्ये प्रवेश करताना गंगेचं हे डेल्टाचं स्वरूप बदलत जाताना दिसतं आणि गंगा नदीची ओळख नव्याने व्हायला सुरुवात होते. बिहार राज्य हे भारतातलं कदाचित सर्वाधिक पूरग्रस्त असं राज्य असू शकेल. इथल्या जवळपास ७६ टक्के लोकसंख्येवर पुराचा परिणाम होतो. एखादा जिल्हा सोडला तर प्रत्येक जिल्’ाावर पुराचा परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. बिहारचा भूगोल जर आपण लक्षात घेतला तर त्याचा उत्तर आणि उत्तर-पूर्व भाग हा हिमालयाच्या छायेखाली येतो. त्याच्यावर नेपाळ आहे. हिमालयातून येणाऱ्या सगळ्या नद्या या बिहारला वळसा घालतात. या अनेक नद्या गेली शेकडो वर्षे हिमालयाच्या क्षेत्रातून या प्रदेशात गाळ वाहून आणतात. म्हणून आपण असं म्हणू शकतो की बिहारचा आणि पश्चिम बंगालचा प्रदेश हा गाळानेच बनलेला प्रदेश आहे. असं म्हणतात की बिहारपासून पश्चिम बंगालपर्यंत या भागात जवळपास पाच हजार फूट खोलपर्यंत खडक सापडत नाही. यावरून आपल्याला अंदाज येऊ शकतो की गेल्या काही हजार वर्षांमध्ये किती गाळ हा खाली आला असेल.
सरस्वती नदी कोरडी झाल्यावर जेव्हा गंगेच्या किनारी मानव वसाहती निर्माण व्हायला लागल्या तेव्हापासूनचा लिखित इतिहास आपल्याला माहीत आहे. हा काळ साधारणपणे गौतम बुद्धाचा काळ. म्हणजे इ.स.पू. पाचवे शतक. भारतीय संस्कृतीमधले जे ऐतिहासिक दस्तऐवज आहेत त्यानुसार भारताच्या इतिहासाला कलाटणी देणाऱ्या, जवळपास सगळ्या घटना या बिहारमध्ये घडल्या. प्रत्यक्ष घडल्या नसतील तरी त्याची बीजे या प्रदेशात रोवली गेली. एक प्रकारे आपण असं म्हणू शकतो की प्राचीन भारताची राजधानी बिहार आहे. जैन धर्मीयांची सर्व प्रमुख ठिकाणं याच प्रदेशात आहेत. गौतम बुद्धाची सर्व प्रमुख ठिकाणं इथेच आहेत आणि हिंदूंची सुद्धा बरीच प्रमुख ठिकाणं इथेच आहेत. नालंदा आणि पाटलीपुत्रसारखी प्रख्यात विद्यापीठे इथे होऊन गेली. या सगळ्या गोष्टी इथे का, इथेच का? याचा आणि इथे येणाऱ्या सुपीक गाळाचा काही संबंध आहे का? तर तो नक्कीच आहे. हा गाळ हिमालयातल्या समृद्ध खनिजांनी तयार झालेला आहे. त्यामुळे इथे तुम्ही काहीही पेरा ते उगवून येणारच आहे. इथे कुठेही खतांची गरजच नाही, इतका सुपीक हा गाळाचा प्रदेश आहे. त्यामुळे सरस्वतीच्या समृद्ध भूमीवरून येणाऱ्या लोकांनी ही जागा वसाहती करण्यासाठी निवडणं ही अजिबात आश्चर्याची गोष्ट नाही. इथे मुबलक पाणी आहे, सुपीक जमीन आहे, त्यामुळे उत्कृष्ट पीक इथे येणारच आहे. त्यामुळे प्राचीन काळात साहजिकच बिहार हे एक प्रमुख ठिकाण बनलं. प्राचीन काळात सर्वात पहिलं साम्राज्य मानलं जातं ते म्हणजे मगध. मगध साम्राज्याची राजधानी ही राजगिरी. पूर्वी याला राजगृह असंच नाव होतं. ही नालंदाच्या जवळ आहे. इथे गौतम बुद्धाने मगध साम्राज्याच्या त्या वेळेच्या सम्राटाला सांगितलं की तू या गंगेच्या काठी एक शहर वसव, त्याला खूप चांगले दिवस येतील. त्यामुळे हे ठिकाण बुद्धाच्या सांगण्यावरून निवडलं गेलं, ते ठिकाण म्हणजे पाटलीपुत्र. म्हणजे आजचं पाटणा. या बुद्धाने सांगितलेल्या शहराला खरे चांगले दिवस आले ते म्हणजे मौर्य साम्राज्याच्या काळात. कारण इथे चाणक्य आला, त्याने इथे सर्व व्यवस्था निर्माण केल्या. धान्याची कोठारे कुठे असावीत इथपासून ते शत्रूशी कोणत्या बाजूने सामना करावा, तो कसा करावा, नगररचना त्यासाठी कशी करावी इथपर्यंत व्यवस्था त्याने लावून दिल्या. यामध्येही एक गम्मत आहे. चाणक्य शिकला कुठे, तर तक्षशीलेमध्ये, हे विद्यापीठ होतं कुठे, तर गांधार प्रदेशात. म्हणजेच सिंधू नदीच्या खोऱ्यात. त्यामुळे तिथली नगररचना आणि पटण्याची नगररचना यामध्ये साम्य आपल्याला दिसून येतं. या साम्याचे काही पुरावेही ‘प्रोजेक्ट मेघदूत’च्या गटाला या वेळेच्या प्रवासातून मिळाले आहेत. नंतरच्या काळात आलेल्या अशोकाने पाटलीपुत्रची ही समृद्धी साम्पुर्ब भारतामध्ये पसरवण्याचा प्रयत्न केला. अशोकाने दिलेल्या बऱ्याच गोष्टी आपण आजही आपली राष्ट्रीय प्रतीके म्हणून वापरतो. तेव्हाचा समृद्ध बिहार हा तिथल्या गाळाने बनला, पण बिहारच्या आजच्या स्थितीचेही धागेदोरे या गाळामध्ये सापडतील का, हे शोधायला हवं.
या ऐतिहासिक गोष्टींमुळे बिहारचा अभ्यास करणं अत्यावश्यक होतं. त्यासाठी पहिल्यांदा डॉ. पी. एन. मिश्रा यांना हा गट भेटला. ते इथल्या विज्ञानभारतीचे प्रमुख आहेत. आणि तिथल्या मेडिकल कॉलेजमध्ये प्रिन्सिपल मेडिकल ऑफिसर या पदावर काम करीत आहेत. त्यांच्या कार्यालयामधून गंगेचा विस्तृत काठ दिसतो. साधारण २० वर्षांपूर्वी ते एका काठावरून दुसऱ्या काठावर पोहत जाऊ शकत असत. आज असं पोहत जाणं शक्य नाहीये. त्यांनी अजून एक आश्चर्याची गोष्ट दाखवली ती म्हणजे माणूस कुठे कुठे घर करू शकतो.. तर नदीच्या पात्रामध्ये एक गाळाचा मोठ्ठा पट्टा आला आहे. त्या पट्टय़ावर मोठ्ठाले टॉवर उभारले गेले आहेत. इथे कोठेही खडक नाही. गंगा नदी ही आपला प्रवाह बदलण्यासाठी प्रसिद्ध आहे. एखाद्या मोठय़ा पुरामध्ये या इमारती वाहून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. इथल्या गाळामुळे नदी हा प्रवाह बदलते हे सर्वाना माहीत आहे. त्यामुळे गंगेचं पात्र एका निश्चित प्रवाहात वाहणार नाही हे नक्की आहे. १० -१२ वर्षांमध्ये तिचा प्रवाह बदलू शकतो. त्यामुळे उद्या समजा या इमारतींना काही झालं तर त्याचं खापर पर्यावरणावर फोडलं जाणार. डॉ. पी. एन. मिश्रा यांच्या मते हे बदल हिमालयामध्ये घातलेल्या बंधांमुळेही झाले आहेत. महाराष्ट्रात जसं टिळक महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आहे, तसं तिथेही एक नालंदा नावाचं मुक्त विद्यापीठ आहे. तिथे या गटाने डॉ. सिंग यांची भेट घेतली. त्यांनीही गंगा नदी आणि तिच्या बदलत्या प्रवाहाबद्दल बरीच माहिती दिली. डॉ. सिंग यांनी दोन गोष्टी सांगितल्या. एक म्हणजे तिहरी धरण झाल्यापासून इथलं पाणी बऱ्याच प्रमाणात कमी झालं आणि या नदीचा प्रवाहही पटापट बदलायला लागला. दुसरं म्हणजे उत्तराखंडच्या भागामध्ये वृक्षतोड व्हायला लागली, त्यामुळे गाळ जास्त प्रमाणात यायला लागला.
बिहारमधल्या प्रवासाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये महात्मा गांधी पुलाजवळच्या काही गावांना भेट द्यायची होती. हा पूल साधारण चार किलोमीटरचा आहे. हा पूल पार केल्या केल्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना केळी विक्रेते दिसायला लागले. त्यांच्याशी बोलताना असं कळलं, की पाटण्याच्या दुसऱ्या टोकाला, गंगेच्या किनाऱ्याच्या १६ किलोमीटर आत ही केळीची शेती होती. १६ किलोमीटर का, तर पावसाळ्यामध्ये गंगेचं हे पाणी १६ किलोमीटर आतपर्यंत येतं. गावं त्यावेळी तिथेच असतात. या १६ किलोमीटरच्या प्रदेशात पुराबरोबर गाळ येतो, या गाळावर जर शेती केली तर उत्पन्न प्रचंड मिळतं. आणि तेही कोणत्याही खताशिवाय. गेल्या काही वर्षांत या लोकांना गाळ कमी मिळतो आहे. पाणी येतं पण गाळ नाही, त्यामुळे त्यांना आता खतं वापरावी लागत आहेत. त्यामुळे त्याचं पीक हे २० वर्षांंपूर्वी जेवढं यायचं त्यापेक्षा ५० टक्कय़ांनी कमी झालं आहे. या शेतकऱ्यांमुळे गंगेच्या काठावर, गाळाच्या जमिनीवर केल्या जाणाऱ्या शेतीचं थेट उदाहरण पाहायला मिळालं. ही गाळावरच्या शेतीची पद्धत सरस्वतीच्या काळातही होती, ती आजही टिकून आहे. त्यामुळे इथले शेतकरी पुराची आणि पुरामुळे येणाऱ्या गाळाची आतुरतेने वाट पाहत असतात.
पुढे जाताना २०-२५ फूट उभे असे गाळाचे थर बघायला मिळाले आणि त्याखालून गंगा वाहात होती. पूर असताना हे काहीही दिसत नाही. पाणी यावरून वाहात असतं. हे बघून लक्षात येतं की गाळाची मैदानं तयार होणं म्हणजे नक्की काय! हा गाळ एकटय़ा गंगेचा नाही तर मान्सूनमुळे या भागात पडणाऱ्या पाण्यामुळे तयार होतो आहे. मान्सून नसताना हे पात्र सहज पार करून जाता येतं. या सुपीक गाळामुळे प्रचंड आर्थिक लाभ मिळत असतो, म्हणूनच लोक गैरसोय आणि जोखीम पत्करून या भागात राहत असतात. एवढा सुपीक प्रदेश क्वचितच इतरत्र असेल.
बिहार सोडताना गंगेच्या अनेक छोटय़ा छोटय़ा शाखा दिसल्या आणि तिथेच झोपडय़ांचा मोठ्ठा पट्टा लागला. या झोपडय़ांच्या शेवटी गंगापूर नावाची पाटी बघायला मिळाली. २००३ मध्ये आलेल्या पुरात हे गाव वाहून गेलं होतं. जवळपास पाच हजार वस्तीचं हे गाव. मुख्यत: दलित वस्तीच्या या गावातल्या काहींना नुकसानभरपाई मिळाली, काही जण इतर गावांमध्ये राहायला निघून गेले. हे लोक त्या वाहून गेलेल्या गावाचंच नाव घेऊन गंगेच्याच काठावर वस्ती करून राहत आहेत. या वस्तीमध्ये हजारभर लोक राहत असतील. घरं वाहून गेलेली तरी तुम्ही याच प्रदेशात का राहता, हा स्वाभाविक प्रश्न. तर त्याला त्यांचं उत्तर होतं, आमची घरं झाली या गंगेमुळे, इतकी वर्ष तिने आम्हाला पाळलं, एक दिवस तिचं जे होतं ते ती घेऊन गेली.
या उदाहरणावरून इथे राहणाऱ्या लोकांचं या नदीशी असलेलं नातं लक्षात येतं. आपण नदीकडे कायम पाण्याचा एक स्रोत म्हणूनच पाहतो. पण गंगेशी इथल्या लोकांचं हे भावनिक नातं अधिक आहे. एका बाजूला पुराची वाट पाहणारे केळीवाले आणि दुसऱ्या बाजूला गंगेने ज्यांचं घर-दार वाहून नेलं तरीही तिला माता मानणारे हे लोक. गंगेची ही दोन रूपं पाहून हा गट गंगेची आणखी रूपं पाहण्यासाठी उत्तर प्रदेशाच्या दिशेने निघाला.
प्रज्ञा शिदोरे – response.lokprabha@expressindia.com

Story img Loader