अलविदा
वानखेडेवर आपला शेवटचा सामना संपवून सचिन जेव्हा हात उंचावून अभिवादन स्वीकारेल, तेव्हा मनातील कोलाहलात फक्त सचिनची प्रतिमा असेल. ज्याने आपल्याला अवीट, सुरेल, सुरेख, अविस्मरणीय, अद्भुत खेळी दिल्या, त्या सचिनला निरोप देताना नक्कीच जड जाईल. अंत:करणात मिश्र भावना असतील, भावनाविवश होऊन डोळ्यांत पुन्हा एकदा पाणी तरळेल.
क्रिकेट कितीतरी लोक खेळत असतील, फलंदाजी करताना षट्कार, चौकार, धावा सारेच वसूल करत असतील, मग सचिन तेंडुलकरच्या बाबतीत, नेमकं असं काय घडलं की सामान्य क्रिकेटच्या खेळात तो असामान्य, अद्वितीय झाला? खरंतर हा प्रश्न बऱ्याच जणांना पडलेला असेल, पण या प्रश्नाचं उत्तर सहजासहजी मिळणारं नाही. थोडासा विचार केलात तर मात्र या प्रश्नाचं उत्तर मिळू शकेल.
गेली २४ वर्षे सचिन नावाचे गारुड क्रिकेट विश्वावर आहे, कारण अद्वितीय गुणवत्ता त्यामागे आहेच, पण त्याचं वागणंच असं आहे की, तो तुम्हाला आपलासा वाटतो. त्याच्याबद्दल आपुलकी, जिव्हाळा वाटतो, कारण मध्यमवर्गीय सचिन क्रिकेटमधला गर्भश्रीमंत. त्याने एकामागून एक विश्वविक्रम रचले, गगनाला गवसणी घातली, पण त्याचे पाय मात्र कायम जमिनीवर राहिले. थोडेसे यश मिळाल्यावर तो हवेत उडायला लागला नाही आणि तिथेच तो मोठा ठरतो. कारण मैदानाबरोबरच तुम्ही मैदानाबाहेर कसे वागता, बोलता, यालाही तेवढेच महत्त्व आहे आणि त्यामुळेच सचिनला देवत्व मिळतं. पण सचिन नावाचा हा देव काही एका झटक्यात निर्माण झाला नाही. कारण त्याच्यामागेही तपश्चर्या आहे. क्रिकेटचे जप, तप, व्रत त्याने अंगीकारले आणि त्यामुळेच तो देवत्वपणापर्यंत पोहोचू शकला.
शालेय, मुंबई आणि त्यानंतर भारतीय क्रिकेट गाजवत सचिनने झोकात आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रवेश केला. सचिनला पहिल्या सामन्यात जास्त काही करता आले नाही. पण दुसऱ्या सामन्यात मात्र त्याने झळकावलेल्या अर्धशतकाला तोड नव्हती. वकार युनूसच्या चेंडूने त्याचे रक्त काढले, पण त्या वेळी उपचार घेण्याऐवजी तो मैदानात खेळला. त्या वेळची त्याची जिद्द, जिगर ही संघातील अन्य खेळाडूंना लाजवेल अशीच होती. त्या वेळी पहिल्यांदा सचिन म्हणजे काय, याचा साक्षात्कार क्रिकेट विश्वाला झाला होता. त्या वेळी ‘बच्चा’ म्हणणाऱ्या अब्दुल कादिरला एकाच षटकात चार षट्कार हाणत त्याने बच्चा कोण आणि बाप कोण, हे दाखवून दिले.
इंग्लंडमध्ये संघ अडचणीत सापडला असताना त्याने मनोज प्रभाकरच्या साथीने मैदानात ठाण मांडत पहिले कसोटी शतक झळकावले. त्यानंतर १९९२ सालची त्याची पर्थमधली शतकी खेळी ही डोळ्याची पारणे फेडणारी होती. एकामागून एक भारताचे रथी-महारथी तंबूत परतत होते, त्या वेळी भारताची ८ बाद १५९ अशी अवस्था होती. पर्थची वाकाची खेळपट्टी म्हणजे फलंदाजांची वाताहत करणारीच, गोलंदाजांसाठी नंदनवन ठरणारी. पण त्या वेळी त्याने नवव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या किरण मोरेला साथीला घेत संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली होती. या वेळी त्याने जी शतकी खेळी साकारली त्याला तोडच नव्हती. कारण त्या वेळी त्याने जी मानसिकता दाखवली ती त्याच्या वयापेक्षा खूपच वरची होती. सचिनमध्ये हेच नेमके कुठून आणि कसे आले, याचा थांग काहीसा लागत नाही.
पर्थच्या खेळीनंतर सचिनमधला हीरो दिसायला लागला, देवत्वाचे अणू-रेणू जोडले जात होते. त्यानंतर काही काळ असा होता की, सचिनच भारतीय संघाचा कर्ता-धर्ता होता. तो खेळला तरच भारतीय संघ जिंकायचा, अन्यथा तो बाद झाल्यावर कुणीही सामना पाहायला धजावत नसे. शारजातील वाळूच्या वादळानंतर घोंगावणारे सचिनचे वादळ ऑस्ट्रेलियाला नेस्तनाबूत करून गेले. क्रिकेट विश्वाने त्याला या सामन्यापासून देव मानायला सुरुवात केली. जगातले कुठलेही मैदान असो, सचिन तिथे आल्यावर एक उत्साह संचारायचा. क्रिकेट विश्वानेही त्याला आपलासा मानला, त्याच्यावर हातचे न राखता प्रेम केले. असे सारे काही मिळायला नशीब लागते. सचिनने हे नशीब घडवले ते आपल्या बॅटच्या जोरावर.
चौकार, षट्कार सारेच मारतात, पण सचिनने मारला की तोच चौकार, षट्कार वेगळा ठरतो, कारण त्याच्या फटक्यांमध्ये असलेली नजाकत आणि त्याची प्रेक्षकांच्या मनात असलेली ठाशीव प्रतिमा. या प्रतिमेला सचिनने आतापर्यंत कधीही तडा जाऊ दिलेला नाही. सचिन नेहमीच आपलासा वाटला, कारण तो तसा वागला. मैदानात त्याने कधीही हुज्जत घातली नाही. ज्यांनी त्याला शिव्या वाहिल्या त्यांना त्याने आपल्या बॅटने पाणी पाजले. डोकं शांत ठेवलं असलं तरी नजर मात्र कायम रोख धरणारी होती. त्याच्या नजरेत एक अशी चमक होती की, जी सारे काही सांगून जायची. मैदानाबाहेरही त्याने आपली तीच प्रतिमा जपली. कायम जमिनीवर राहिला. कधी कुणाला विसरला नाही. त्याच्या या साऱ्या गोष्टींची ‘माऊथ पब्लिसिटी’ आपसूकच होत गेली आणि त्याच्याबद्दल बऱ्याच जणांच्या मनात आदर, आपुकली, जिव्हाळा, प्रेम निर्माण झालं. तो आपलासा, आपल्यातला वाटायला लागला असला. त्यामुळे तो केवळ प्रसिद्ध झाला नाही तर कीर्तिवान झाला.
सचिन हे जे काही रसायन आहे, ते अनाकलनीय आहे, असंच वाटतं. कारण तो नक्की काय करेल आणि काय करतो, हे सांगता येणे कठीण आहे. कारण त्याची तपश्चर्याच एवढी मोठी आहे की, त्याबद्दल सांगावे तेवढे थोडेच आहे. सरावाला सर्वाच्या आधी येऊन सर्वानंतर बाहेर पडणारा सचिन एकमेवच. रणरणत्या उन्हात चार-चार तास फलंदाजीचा सराव कोण करेल, सचिनने तो केला. त्यामुळेच तो मोठा झाला. ‘मला सचिन व्हायचंय’ हे बोलणं सोपं आहे, पण त्याने जी मेहनत घेतली, तेवढी कुणी घेतं का? प्रत्येकाला गोड फळ दिसतं, पण त्यामागची मेहनत, त्याचे पालनपोषण, मशागत कुणालाच नको असते. त्यामुळेच सचिन हा महान ठरतो. सोन्याला शुद्ध होण्यासाठी बावन्न कस लावले जातात, तेवढय़ा कसोटय़ांमधून पार होतं तेव्हा ते निदरेष, शुद्ध ठरतं. तसा तो गेला आणि आता बावनकशी सोनं आपल्यासमोर आहे.
सचिन निवृत्त होणार असल्याची बातमी ऐकल्यावर काही जण हेलावले, हळहळले असतील. डोळ्यांच्या कडा पाणावल्या असतील. कारण आपला माणूस यापुढे दिसणार नाही, याची जाणीव त्यामध्ये आहे. कारण त्याने जो लळा लावला ना, तिथेच सारे फसले. सचिनने एकामागून एक शतके पाहायची सवय लावली, एकामागून एक विश्वविक्रम मोडायची सवय लावली. विक्रम हे मोडण्यासाठीच असतात, ही त्यानेच रचलेली म्हण प्रत्यक्षात आणली.
सचिनला जात-पात, वंश, भेद नाही, धर्म नाही, देशाचा सीमा नाहीत. त्याच्यापुढे श्रीमंत-गरीब कुणी नाही. कारण त्याने जो आनंद वाटला तो साऱ्यांना समान असाच वाटला. कधीही, कुठेही त्याने पक्षपातपणा केला नाही. तो फलंदाजीला आला की, रस्त्यावरच्या टीव्हीच्या दुकानांसमोर रांगा लागायच्या. त्याची एक झलक, त्याची एक धाव, त्याचे चौकार, षट्कार पाहता यावेत, अशी एकच इच्छा मनात दाटलेली असायची. त्याला पाहणे अशी एक अद्भुत अनुभूती देऊन जायचे की, काय कोणास ठाऊक, निर्मळ, प्रसन्न वाटायचे, जगण्याची उमेद देऊन जायचे. दुखण्यावर फुंकर घालणाऱ्या आणि चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटवणाऱ्या त्याच्या खेळी होत्या. सचिन खेळला म्हणजे तो देशाचा राष्ट्रीय क्षण व्हायचा. त्या वेळी देशात सचिनोत्सव साजरा व्हायचा. फटाके फुटायचे, गोडधोड वाटलं जायचं, असा आनंद कधीच कुणी दिला नव्हता, जेवढा सचिनने आपल्या खेळींतून वाटला. प्रत्येक जण त्याच्याबरोबर मैदानात उतरलेला असायचा, जणू ती धाव आपल्यालाच काढायची आहे किंवा तो समोरचा गोलंदाज आपल्यालाच काहीतरी बोलला आहे, असं वाटायचं आणि हीच खरी सचिनची जादू होती, प्रत्येकाला मोहून टाकणारी, मंत्रमुग्ध करणारी, तरीही आपलीशी वाटणारी. कधी त्याचे होऊन गेलो, हे न समजणारी जादू. सारेच त्याच्या प्रेमात वाहत गेलो, एवढे की त्याला देवत्व बहाल केलं. कारण जे प्रत्यक्ष आयुष्यात देवाने करायला हवं, ते त्याने केलं. लोकांना हसवलं, आनंद दिला, एकमेकांशी जोडून ठेवलं, जगायला उमेद दिली, एक असं स्वप्न दाखवलं की, जे प्रत्येकाला जगायला आवडेल.
वानखेडेवर आपला शेवटचा सामना संपवून सचिन जेव्हा हात उंचावून अभिवादन स्वीकारेल, तेव्हा नेमकं मनात काय दाटून येईल सांगता येत नाही. मनातील कोलाहलात फक्त सचिनची प्रतिमा असेल. ज्याने आपल्याला अवीट, सुरेल, सुरेख, अविस्मरणीय, अद्भुत खेळी दिल्या, त्या सचिनला निरोप देताना नक्कीच जड जाईल. अंत:करणात मिश्र भावना असतील, भावनाविवश होऊन डोळ्यांत पुन्हा एकदा पाणी तरळेल. कारण गेल्या २४ वर्षांपासून पाहण्याची सवय कुठेतरी मोडली जाणार, याची जाणीव असेल. तो क्षण कायम हृदयात साठवून ठेवण्यासारखा असेल. सचिनचे मैदानातले शेवटचे दर्शन घेताना मन नक्कीच विषण्ण होईल. कारण सचिन एकदाच जन्माला येतो, यापुढे दुसरा सचिन होणार नाही. कुणी कितीही धावा केल्या, शतके ठोकलीत तरी देव्हाऱ्यात त्याला बसवता येणार नाही. कारण सचिनला बाजूला करण्याची धमक कुणाच्याही मनगटात नाही. सचिन हा सचिनच आहे. झाले बहु, होतीलही बहु, परि या सम हाच!

Story img Loader