हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पावसाळा सुरू झाला की सह्य़ाद्रीच्या पठारावर डोंगरउतारांवर छोटी छोटी रानफुले फुलायला लागतात. विविध जातींच्या, रंगांच्या, आकारांच्या या फुलांची जणू काही एक बहारदार चादरच सह्य़ाद्रीच्या कडेपठारांनी ओढलेली असते. काही तासांपासून ते काही दिवसांपर्यंतचे आयुष्य असणाऱ्या या फुलांचे एक समृद्ध भांडारच डोंगरभटके आणि अभ्यासकांपुढे उघडलेले असते. सप्टेंबरअखेपर्यंत ही पुष्प चादर कमी-अधिक प्रमाणात सह्य़ाद्रीत हमखास असतेच.
सह्यद्रीतील फुले म्हटली की सर्वाच्या नजरेसमोर हमखास पहिल्यांदा येते ते कासचे पठार. कास पुष्प पठारावर पाऊस पडायला लागला की दर महिन्यात वेगवेगळी फुले फुलायला लागतात, पण कासच्या पठारावर मोठय़ा प्रमाणात असलेली टोपली कारवी सात ते बारा वर्षांत एकदाच फुलते, तेव्हाच कास पठाराचे दृश्य केवळ अवर्णनीय असते. इंटरनेटच्या महाजालात आणि प्रसिद्धीमाध्यमातून कारवीने खच्चून भरलेल्या कासच्या छायाचित्रांमुळे कासवर हवशा-नवशा-गवशा पर्यटकांचा लोंढा इतका वाढला आहे की, शहरातल्याप्रमाणे ट्रॅफिक जाम होऊ लागते. त्या प्रदूषणाने आणि लोकांच्या बॉलीवूड टाइप बागडण्याने आता कासच्या फुलांनाही धोका उत्पन्न झाला आहे. त्यामुळे वन खात्याने कास पठारालाच कुंपण घातलेय. शिवाय हिंदी सिनेमात दिसते तशी ऑíकडची एकाच प्रकारची फुले पाहण्याच्या अपेक्षेने आलेल्या पर्यटकांचा भ्रमनिरास व्हायला लागला. या सर्व गोष्टींमुळे पुण्या-मुंबईच्या पर्यटकांमुळे कासला पाहायला काही नाही म्हणून मग ठोसेघर, बारामोटेची विहीर या जवळपासच्या ठिकाणांची महती वाढायला लागली आहे आणि रानफुलांचा आनंद बाजूला राहू लागला आहे.
कास पठाराइतकी पुष्प वैविध्यता सह्यद्रीत इतर ठिकाणी नाही हे मान्य केले तरी कास हे रानफुले पाहण्यासाठी एकमेव ठिकाण नाही. सहज पाहता येण्यासारखी अनेक ठिकाणे सह्यद्रीत आहेत. तिथे जाऊन काय पाहायचे हे मात्र माहीत पाहिजे.
पाऊस पडायला सुरुवात झाली, की जमिनीत वर पडलेल्या बियांना, जमिनीतल्या कंदांना धुमारे फुटायला लागतात. जमीन हिरवीगार दिसायला लागते. पाऊस पडल्या पडल्या सर्वप्रथम हजेरी लावतात ती पाण कुसुमची फुले. त्यानंतर काळी मुसळीची चांदणीसारखी दिसणारी पिवळी फुले हजेरी लावतात. मात्र त्याच्या औषधी गुणधर्मामुळे ती मुळासकट उपटली जाते. मग येते आषाढ आमरी. आमरी म्हणजे इंग्रजीत ऑर्किड. ती येते तेव्हा गवत जास्त वाढलेले नसते, त्यामुळे त्याची पांढरी सुंदर फुले त्या हिरव्या गालिच्यावर उठून दिसतात.
एकदा एका पावसाळी संध्याकाळी एका पठारावर विसावलेलो. पावसामुळे वातावरण कुंद होते. संधिप्रकाशात गवताच्या वर डोलावणाऱ्या दांडय़ांमधून आषाढ आमरीची फुले फुलायला लागली आणि काही वेळातच ते पठार त्या पांढऱ्या फुलांनी चमकायला लागले. या फुलांमध्येपण गमतीजमती असतात. पाऊस पडल्यावर हबे आमरीच्या कंदातून एक दांडा बाहेर येतो. त्यावर पांढरी फुले येतात. त्यानंतर त्याला जमिनीलगत एकच मोठे पान येते. परागीभवन झाले की फुले गळून पडतात. पानात तयार झालेले अन्न कंदात साठवले जाते ते पुढच्या पावसाळ्यासाठी.
ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये तेरडय़ाची फुले आणि सोनकीने सह्य़ाद्रीची पठारे झाकली जातात. पायवाटेच्या कडेला, दाट झाडीत जागा मिळेल तिथे पेवाची (फुलाचा एक प्रकार) बेटे फुलायला लागतात. हा पुष्पसोहळा सह्य़ाद्रीत ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत सुरू असतो.
पावसाळ्यात फुटणाऱ्या पेवाच्या बेटाकडे आपले लक्ष वेधले जाते ते हिरव्या बेटावर डोलणाऱ्या त्याच्या नरसाळ्यासारख्या दिसणाऱ्या पांढऱ्या फुलांमुळे. या फुलांच्या खालच्या बाजूस किरमिजी-लाल रंगाची रूपांतरित पाने पाहायला मिळतात. पूर्ण फुललेल्या फुलाचे तोंड खालच्या बाजूला झुकलेले असते. फुले पांढऱ्या रंगाची असून आतल्या बाजूस मध्यभागी पिवळा रंग असतो. यामुळे परागीभवनासाठी येणाऱ्या कीटकांना मध कुठल्या दिशेला आहे त्याचे मार्गदर्शन होते. या लांब दांडय़ाच्या फुलांतील मध खाण्यासाठी/ परागीभवनासाठी लांब सोंड असलेले ग्रास डेमन हे फुलपाखरू पेवाच्या बेटातून उडताना दिसते. या कृष्णधवल रंगाच्या फुलपाखराच्या पंखांवर पांढरे ठिपके असतात. या फुलपाखराला सावलीत, जमिनीलगत उडायला आवडते. त्याची सोंड त्याच्या आकाराच्या दुप्पट असते. उडताना फुलपाखराची सोंड (ढ१ु२्र२) कॉईलसारखी गुंडाळलेली असते. पेवसारख्या लांब दांडय़ाच्या फुलांवर बसल्यावर हे फुलपाखरू आपली सोंड उलगडून फुलातील मध पिते. निसर्गातील हे परस्परावलंबन आश्चर्यचकित करणारे आहे. पावसाळ्यात डोंगरभटकंती करताना रानफुलांबरोबर कीटक, फुलपाखरे अशा अनेक गोष्टी पाहायला मिळतात.
रानफुलांची मराठी नावेही फार सुंदर आहेत. गिरीपुष्प, कुमुद, विष्णुकांत, आभाळी अशी नावे लक्षात ठेवायला पण सोपी आहेत. एकदा हा छंद लागला, थोडे वाचन वाढवले, की फुलांच्या अनेक गमतीजमती कळत जातात. मग जमल्यास एखादा ट्रेक फक्त फुले पाहण्यासाठीच करावा. त्या ट्रेकला आपल्याबरोबर एखादा वनस्पतीशास्त्रातला माहीतगार असावा. आमच्या ट्रेक क्षितिज संस्थेतर्फे दरवर्षी आम्ही फक्त फुले पाहण्यासाठीच एक ट्रेक घेऊन जातो. एकदा पुरंदर किल्ल्यावर आमच्या सोबत प्र. के. घाणेकर सर आले होते. त्या एका ट्रेकमध्ये आम्ही तब्बल ८४ जातींची फुले नोंदवली. गेल्याच वर्षी त्रिंगलवाडी कि ल्ल्यावर ४६ जातींची फुले पाहिली. तज्ज्ञ व्यक्तींबरोबर तर तुम्हाला रानफुलांच्या अनेक नव्या आणि रंजक गोष्टी उमजतात आणि मग त्या इवल्याशा फुलाबरोबर मनात ठसून जातात.
आता इतके वाचल्यावर हे सारे कोठे पाहायला मिळेल याची नक्कीच उत्सुकता लागली असेलच. कासप्रमाणेच पुष्पवैविध्य असलेले पुण्याजवळचे एक चांगले ठिकाण म्हणजे पुरंदर किल्ला. सासवडजवळ असणाऱ्या या १५०० मीटर उंचीच्या किल्ल्यावर ठरावीक अंतरापर्यंत वाहनाने जाता येते. किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्यावरील केदारेश्वर मंदिराकडे जाणारी पायवाट सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस फुलांनी गच्च भरून गेलेली असते. सोनकीच्या पिवळ्या फुलांनी जरी हा डोंगर झाकलेला असला तरी पुरंदरवर अनेक फुले पाहायला मिळतात. त्यात निळ्या, जांभळ्या रंगाची निलांबरी, आकाश तुळस अशी दुर्मीळ फुलेदेखील पाहायला मिळतात.
त्रिंगलवाडी किल्ल्याला नाशिकचे कास पठार म्हणतात. या किल्ल्याच्या पठारावर रानफुलांचे अनेक प्रकार विखुरलेले असतात. हरिश्चंद्रावरच्या गुहेसमोरचा आणि मंदिराच्या आजुबाजूचा प्रदेश सोनकीच्या चादरीने झाकलेला असतो. यावरून एक किस्सा आठवला, मध्यंतरी हरिश्चंद्रगड उतरताना काही गावकरी एका रानफुलाच्या बिया ओरबाडून पोत्यात भरत होते. विशिष्ट उंचीवरच आढळणाऱ्या या रानफुलांची मोजकीच झुडपे या परिसरात आहेत. आमचे कुतूहल चाळवल्यामुळे आम्ही गावकऱ्यांकडे चौकशी केली. त्यांनी दिलेली माहिती रंजक होती. या रानफुलाच्या बिया लैंगिक क्षमता वाढवण्यासाठीच्या औषधात वापरतात. व्यापारी एक किलोला शंभर रुपये भाव देतात. त्यामुळे या दिवसात गावातील सर्व लोक या बिया गोळा करण्याचे काम करतात. त्यांनी पोत्यातून काढून थोडय़ा थोडय़ा बिया सर्वाच्या हातावर ठेवल्या आणि म्हणाले खाऊन बघा. अख्खा गड उतरायचा असल्याने आम्ही काही बिया खाल्या नाहीत. थोडय़ा तरी बिया झुडपांवर ठेवा म्हणजे पुढच्या वर्षीसुद्धा झाडे येतील असा (फुकटचा) सल्ला देऊन आम्ही निघालो. पण त्यांच्या पाचवीला पुजलेले अठराविशे दारिद्रय़ आणि या झुडपांपासून मिळणारे पैसे याचा विचार केला तर काही वर्षांनी ही वनस्पती सह्यद्रीत नक्कीच दुर्मीळ होत जाणार आहे.
रतनगडाचा परिसरही सरत्या पावसात रानफुलांनी बहरून जातो. प्रतापगड, शिवनेरी, राजगड, रायगड, सिंहगड, तोरणा, तुंग या किल्लय़ांवरही या दिवसांत असाच पुष्पोत्सव सुरू असतो. कोकण आणि सह्य़ाद्रीला जोडणारे घाट वरंधा, कुंभार्ली, आंबा, राधानगरी, आंबोली रानफुलांनी बहरलेले असतात. मुंबईकर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात जाऊनही रानफुलांचा आनंद घेता येऊ शकतो.
गरज आहे ती या पुष्पोत्सवाची साद ओळखण्याची. मग तुमचा पाय घरात ठरत नाही. केवळ कासच्या वाटेला न जाता अशा आडवाटांशी जवळिकी होऊ लागते. एकदा का तुम्ही रानफूल ओळखायला लागलात, की आपल्या गावा-शहरांबाहेरच्या टेकडय़ांवरची रानफुलेदेखील साद घालू लागतात. त्यांच्या या हाकेला ओ द्या आणि मग बघा ही इवली इवली फुले तुमचे अवघे आयुष्यच समृद्ध करून टाकतील.
अमित सामंत – response.lokprabha@expressindia.com