डॉक्टरलोक खूपदा मीठ कमीत कमी खाण्याचा सल्ला देत असतात. मिठाशिवाय तर आपले काहीही चालत नाही आणि मीठ जास्त झाले तर त्याचे शरीरावर दुष्परिणामही होतात. तर मग काय करावे?
मीठमिरची, मीठभाकरी, मिठाला जागणे, नावडतीचे मीठ अळणी इत्यादी प्रकारे मीठ शब्द रोजच्या जीवनात आहाराव्यतिरिक्त सारखा वापरात येत असतो. मिठावाचून कोणाचेच चालत नाही इतके महत्त्व मिठाला आहे. मसाल्याच्या पदार्थात मीठ हे पाहिजेच. मीठ नाही म्हणजे सर्व बेचव. हिंदी भाषेत मिठाला ‘सबरस’ किंवा सर्व रसांचा राजा म्हणतात. आयुर्वेदात लवण वर्गाचे वर्णन करताना शरीरात द्रव वाढवणारे, खोलवर स्रोतसांत पोचणारे, मलप्रवृत्ती साफ करणारे, मृद्गुणयुक्त व वातनाशक असे सांगितले आहे. लवण अन्न लवकर पचविते. तसेच मिठाच्या वापराने जखम लवकर पिकते. रुची उत्पन्न करते. आपल्या तीक्ष्ण-उष्ण गुणांमुळे शरीरात पित्त वाढवते, रक्त वाढवते तसेच ओलावा निर्माण करून कफ वाढवते. आपण रोजच्या वापरात जे मीठ वापरतो त्याशिवाय आयुर्वेदात आणखी सात प्रकार सांगितले आहेत. यातील सैंधव-खाणीतील मीठ, पादेलोण- जमिनीतील विशेष गंध असणारे मीठ, सरोवरातील सांबरलवण, खाजण वगैरे ठिकाणच्या कचरा व खराब जागेतील बीडलवण यांचे वेगवेगळे गुण आहेत.
शरीरात मिठाचे योग्य प्रमाण असेल तर शरीरात ताकद राहते. त्याअभावी अशक्तपणा येतो. त्यामुळे जुलाब, कॉलरा, हगवण या विकारांत शरीरातील जलद्रव्याबरोबर मीठ खूप प्रमाणात बाहेर गेले असेल तर मीठ, साखर, पाणी घेऊन रसक्षय थांबवावा लागतो. डिहायड्रेशन म्हणजे शरीरातील आवश्यक क्षार निघून जाणेच होय. मीठ दातांकरिता व हाडांकरिता आवश्यक आहे. शरीरातील मीठ कमी प्रमाणात गेले तर दात लवकर किडतात. हाडे ठिसूळ होतात. मिठामुळे रूक्ष शरीराला ओलावा मिळतो.
मिठाची शरीराला आवश्यकता केव्हा हे पाहण्याकरिता पावसाळय़ात एखाद्या मातीच्या मडक्यात मीठ धरून ठेवल्यावर त्याला पाणी कसे सुटते व मडक्याच्या बाहेर मिठाचा पांढरट थर कसा बसतो हे बघावयास हवे. त्याप्रमाणे मिठाची जडणघडण कोणत्या पंचमहाभूतांपासून बनली आहे त्याचाही विचार करावयास हवा. कारण शरीरातील जिभेच्या शेंडय़ावर मिठाचा प्रवेश झाल्याबरोबर, कणभर मिठाचीही शरीरात पाण्याचा स्राव निर्माण करण्याचे, शरीरातील सूक्ष्मातील सूक्ष्म स्रोतसांत पोचण्याचे, त्याबरोबर कफपित्त यांचे प्रमाण वाढवणे, वाताचे अनुमोलन करणे, रुची आणणे, भूक उत्पन्न करणे, पूर्वी खाल्लेले पचवणे, शरीरात उष्णता व ऊब निर्माण करणे, रक्तवर्धक इत्यादी चांगली कामे सुरू होतात. त्याचबरोबर फाजील धातूंपासून रक्षण करणे, मलप्रवृत्ती साफ करणे, घामाचे प्रमाण वाढवणे, फाजील कफाला शरीरातून बाहेर पडायला मदत करणे इत्यादी कार्येही होतात.
रोगांचा विचार करताना ज्या विकारात मीठ हे अत्यावश्यक आहे. एवढेच नव्हे तर केवळ मीठ हा प्रमुख घटक रोगनिवारणाचे काम करतो. त्यांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. अग्निमांद्य या विकारात कणभर मीठ तात्काळ, तात्पुरती का होईना भूक उत्पन्न करते. त्याच्या जोडीला अनुपान म्हणून आले, लिंबू, आवळा, चिंच, तूप, दही, ताक, ओवा, बाळंतशोपा, मुळा, कोकम काहीही वापरा.
अजीर्ण विकारातही याच प्रकारे वेगवेगळय़ा प्रकारच्या पदार्थाच्या अजीर्णाकरिता योग्य ते अनुपान घेऊन मीठ वापरावे. कफ घट्ट झाला असेल, कोरडा खोकला हैराण करीत असेल तर कणभर मीठ कफ मोकळा करते. कान कोरडे पडले असतील, कानातून आवाज येत असतील व कान कधीच वाहत नसतील तर थोडेसे मीठ उत्तम काम करते. नको त्या ठिकाणी लव येत असली, सर्वागावर केस वाढत असले तर आहारात मिठाचे प्रमाण वाढवावे. उपयोग होतो. नाना तऱ्हेच्या कॅन्सर विकारात जेव्हा बल कमी पडते, अॅण्टिबायोटिक औषधांनी शरीर क्षीण होते, त्यावेळेस शरीररक्षणार्थ मीठ आवश्यकच आहे. खूप थंड प्रदेशात शरीर गार पडते, अन्नाचा पुरवठा पुरेशी ऊब देत नाही त्यावेळी थोडे-अधिक प्रमाणातील मीठ शरीरातील शीतप्रतिकारशक्ती वाढवते. पोटात वायुगोळा त्रास देत असेल तर चिमूटभर मीठ वायू मोकळा करून आराम देते. शरीरातून आवश्यक तेवढा घाम बाहेर पडत नसेल तर मीठ-पाणी घ्यावे. घाम येतो. शरीर हलके, मोकळे वाटते. जुलाबाने क्षीणता येत असली तर कोणत्या तरी स्वरूपात मीठ खावे म्हणजे शरीरात पृथ्वी व आपतत्त्वाची भरपाई होते.
कृमी, जंत, चिकट मलप्रवृत्ती, पोटात वायू धरणे या तक्रारीत मीठ, मिरपूड, ताक, लसूण इत्यादी पदार्थाबरोबर रोगपरत्वे वापरले की मलभेदन, मळाचा अवरोध दूर करण्याचे काम होते.
टॉनिल्स-घशात कफ होणे, कान वाहणे, सर्दी, पडसे, खोकला, दम, कफ, विकार, आवाज बसणे या विकारांत मीठ, हळद व गरम पाण्याच्या गुळण्यांचा तात्काळ उपयोग होतो. मीठ तव्यावर भाजावे व गरम पाणी व किंचित तूप याबरोबर घ्यावे, तात्काळ उपयोग होतो. पोटदुखी विकारात रक्तदाब कमी झाला, एकदम थकवा वाटू लागला, गळून गेल्यासारखे वाटू लागले, चक्कर आली, मेंदूला रक्तपुरवठा कमी पडला तर थोडे अधिक मीठ, किंचित साखर व पाणी असे मिश्रण घ्यावे. लगेच आराम पडतो. तीव्र मलावरोधात नेहमीच्या आहारात मिठाचे प्रमाण वाढवावे. विशेषत: पोळीचा आटा कालविताना, डाळ शिजवताना किंवा भात, कोशिंबीर यात अधिक मीठ टाकून जेवण घ्यावे. तीव्र मलावरोध कमी होतो.
मूत्रेंद्रियांच्या टोकाशी जर मूतखडा असला तर धन्याचा काढा करून त्यात अधिक मीठ मिसळून तो काढा प्यावा. मूतखडा पडून जातो. हाडांचा क्षय, आहाराच्या अभावाने होणाऱ्या क्षय विकारात मिठाचे प्रमाण वाढवावे, बरे वाटते.
आम्लपित्त, उलटी होणे, छातीत जळजळ या कफपित्तप्रधान विकारात मिठाचे भरपूर पाणी पिऊन उलटी करवावी. पित्त पडून जाते. आराम पडतो. ज्यांना शौचशुद्धीचा आनंद हवा आहे, आतडी साफ व्हावयास हवी आहेत, योगासने करावयाची आहेत, त्यांनी चमचा-दोन चमचे मीठ कोमट पाण्यात मिसळून घ्यावे. आतडी साफ होतात, शौचसुद्धा होते व जुनाट मलावष्टंभ बरा होतो.
सूतासारखे बारीक कृमी आपल्या जागेपासून सुटण्याकरिता दोन-तीन ग्रॅम मीठ पाण्यात मिसळून काही दिवस नियमित घ्यावे. कृमी पडून जातात, नवीन कृमी होत नाहीत. पचनक्रिया सुधारते. मूत्र गढूळ व अशुद्ध झाले असेल व मूत्राला अडथळा होत असला तर रोज सकाळी एक ग्रॅम मीठ एक ग्लासभर पाण्यात मिसळून घ्यावे. फायदा होतो. अंडवृद्धी विकारात मीठ तुपात मिसळून घ्यावे, फायदा होतो.
पित्तप्रधान उलटीत, मीठ आल्याबरोबर, कफप्रधान उलटीत मिऱ्याबरोबर मिसळून घ्यावे. उलटी थांबते, कोणतेही विष पोटात गेले असल्यास भरपूर मीठ घालून तांब्या दोन तांबे पाणी प्यावे. उलटी किंवा जुलाब होतात. सर्व विषार शरीरातून बाहेर पडून जातो.
रात्री झोपताना खोकल्याची उबळ येत असेल, कफ सुटत नसेल तर तोंडात खडे मिठाचा खडा ठेवावा. कफ सुटतो, आराम पडतो. तसेच छातीतील कफ मोकळा करण्याकरिता कोणतेही तेल थोड गरम करून त्यात मीठ मिसळून छातीला चोळावे. कफ पातळ होतो व श्वासाचा, खोकल्याचा जोर कमी होतो.
वैद्यकीय साधनांचा अभाव असलेल्या ठिकाणी कोणाला जखम झाल्यास तात्काळ त्या जागी मीठ पाण्याची पट्टी ठेवावी. जखम चिघळत नाही. लवकर भरून येते. मार, मुरगळा, सूज, ठणका, सांधेदुखी, गुडघेदुखी, खांदा दुखणे या विकारात मीठ मिसळून उकळलेल्या पाण्याचा शेक द्यावा. दाढ किंवा हिरडय़ात पू झाला असेल ठणकत असेल तर मिठाच्या पाण्याच्या गुळण्या कराव्यात किंवा त्या जागी मिठाचा खडा ठेवावा, ठणका थांबतो. तीव्र तापामध्ये लवकर उतार पाहिजे असेल, तर मीठ-पाण्याच्या घडय़ा कपाळ, डोके, तळहात, छाती इथे ठेवाव्या, घाम येतो, ताप उतरतो. दातांच्या पायोरिया किंवा कीड होऊन घाण वास येत असेल तर मिठाचा उपयोग दात घासण्याकरिता करावा. तात्पुरता उपयोग होतो.
मीठ : न खावे
आयुर्वेदीय औषधी वर्गीकरणाप्रमाणे आपल्या पृथ्वीवर आठ प्रकारचे क्षार मिळतात. ‘क्षार म्हणजे क्षरण करणारा पदार्थ’ अशी व्याख्या आहे. या आठ प्रकारच्या क्षारातील काळे मीठ म्हणजे आजचे खडे मीठ होय. दिवसेंदिवस सुशिक्षित समाजात मिठाचा वाढता वापर हे एक फॅड होऊन बसले आहे. ज्यात त्यात खाण्याच्या पदार्थात मीठ टाकल्याशिवाय ‘तरुणाईला’ चैन पडत नाही. उसाच्या गुऱ्हाळात गेल्यावर उसाच्या रसात मंडळी कणभर मीठ टाकून रस पितात तेव्हा त्यांची कीव करावीशी वाटते. आधुनिक जीवनातील अनेकानेक विकारांना मिठाचा फाजील अनावश्यक वापर करणे आहे हे मी सांगावयास नकोच.
रक्तदाबवृद्धी, सूज, विविध त्वचाविकार, जखमा, सोरायसिस, केसांचे व डोळय़ांचे विकार याकरिता माझ्यासारखी वैद्य मंडळी ‘रुग्ण मित्रांना’ मीठ पूर्णपणे सोडण्याचा किंवा अत्यल्प वापर करावयाचा बहुमोल सल्ला देतात. रुग्ण विचारतो; मिठाऐवजी सैंधव खाल्लेले चालेल का? रुग्णहिताच्या दृष्टीने मीठ व सैंधवात काहीही फरक नाही. संबंधित रुग्णाने विशेषत: ‘व्हाइट अॅण्ड ब्ल्यू’ कॉलरवाल्या; खुर्चीबहाद्दर, वातानुकूलित ऑफिसमध्ये किंवा चोवीस तास पंख्याखाली राहणाऱ्यांनी मीठ टाळावेच. जी व्यक्ती खड्डे खणते, ओझी वाहते, शेतात वा उन्हातान्हात शारीरिक काम करते तिलाच मीठ खाण्याचा अधिकार देवाने दिला आहे. अतिस्थूल, रक्तदाबवृद्धी, मधुमेहग्रस्त व्यक्तींकरिता ‘इतना इशारा’ काफी है।
मीठ कोणत्या विकारात खावे यापेक्षा कोणत्या विकारात खाऊ नये ही मोठी समस्या आहे. त्याकरिता पावसाळय़ात मीठ ठेवलेल्या मातीच्या मडक्याचा पाझर किंवा मडक्याच्या बाहेर बसणारा मिठाचा साका डोळय़ांसमोर आणावा. जल व अग्नी पंचमहाभूतांपासून लवणाची मिठाची उत्पत्ती होते. त्यामुळे ज्यांच्या शरीरात अगोदरच खूप चरबी, ओलावा, स्निग्धता व त्याचबरोबर खूप उष्णता वाढली आहे त्यांनी किमान मीठ खावे. व्यवहारात मात्र त्याच्या उलट घडते. सुखवस्तू, श्रीमंत, शहरी, सुशिक्षित राहणी असणाऱ्यांच्या आहारात ज्यात त्यात मीठ असते. भात, आमटी, फळे, कोशिंबीर, चटणी, भाजी, पोळी, पक्वान्न, तेलकट पदार्थ, फरसाण, लोणचे, पापड अशा सर्व पदार्थात चवीकरिता भरपूर मीठ असते. एवढेच नव्हे तर काही महाभाग कोल्ं्रिडक्स, सोडा, उसाचा रस या पदार्थातही मीठ चवीकरिता टाकतात.
वाढत्या वयाच्या उत्तरकालात, विशेषत: पन्नाशीनंतर शरीरातील मलमूत्रांना बाहेर टाकणाऱ्या यंत्रणेची कार्यकारी शक्ती तुलनेने कमी होते. पक्काशय व मूत्राशयामध्ये फाजील क्षार साठतात. तेव्हा शरीरात जास्त क्षार साठले आहेत असे लक्षात आले की मिठाचा वापर बंद करावा. विशेषत: थंड ऋतूमध्ये किंवा ज्या ऋतूत शरीरातून घाम बाहेर पडत नाही त्या कालात मीठ पूर्ण वज्र्य करावे.
अर्धागवायू, संधिवात, गुडघेदुखी, पाठदुखी, कंबरदुखी, मानेचे विकार, सायटिका, स्पॉण्डीलायटीस, आमवात या प्रमुख वातविकारांत मीठ बंद करावे किंवा कमी करावे. विशेषत: सूज, वेदना व जखडणे ही तीन लक्षणे असल्यास मिठाचा वापर पोटात घेण्याकरिता जरूर बंद करावा. आराम पडतो. कफपित्तप्रधान आम्लपित्त, उलटी, अल्सर, पोटदुखी या विकारांत मिठाचा अन्नातील वापर एकदम कमी करावा.
शरीराची विशेषत: त्वचेची मूत्रेंद्रिय, गुद, डोळा, जीभ या अवयवांची आग होत असल्यास किंवा कंड किंवा खाज या लक्षणांनी त्रस्त असल्यास मिठाचा वापर पूर्ण बंद करावा. आग व खाज लगेच थांबते. विशेषत: कावीळ व मधुमेह विकारांत मीठ बंद केल्याचा फायदा लगेच होतो. शरीराचे फाजील पोषण झाल्यामुळे होणाऱ्या रक्तदाबवृद्धी, स्थौल्य, मधुमेह, मुतखडा, कंड, हृद्रोग, शुक्रदौर्बल्य या विकारांत मीठ खाऊ नये.
कान वाहणे, डोळय़ांत चिपडे किंवा वारंवार पाणी येणे, सर्दी, पडसे वारंवार होणे, डोकेदुखी, कोड, समस्त त्वचाविकार, शीतपित्त, गांधी, चकंदळे, केस गळणे, केस पिकणे, मुखदुषिका किंवा मुरुम, गरमी, परमा, गोवर, कांजिण्या, पित्तप्रधान ताप या विकारांत मिठाचा वापर अजिबात टाळावा.
घाम खूप येणे, चक्कर, फेकल्यासारखे होणे, नाकातून रक्त वाहणे, जखमा, तोंड येणे, जळवात, छातीत दुखणे, थुंकीतून रक्त पडणे, दुबळेपणा, शुक्राणू कमी होणे, नागीण, निद्रानाश, फिटस् येणे, भगंदरे, मूळव्याधीत रक्त पडणे किंवा नुसती मोडाची सूज असणे, ‘फिशर किंवा परिकर्तिका, संडासच्या जागी कातरे पडणे, महारोग, अंगावर पांढरे जास्त जाणे, अंथरुणात शू होणे, सोरायसिस या विकारांत मीठ टाळावे किंवा वापर कमी करावा.
मिठाचे प्रमाण आहारात वाढविल्याने जठर व इतर आतडय़ांतील नाजूक मुलायम त्वचेची हानी होते. अधिक प्रमाणात मीठ खाणे शरीरात विषार वाढविणे आहे. हे विषार बाहेर काढावयास फार त्रास पडतो. खूप कफ असलेल्या दमा व खोकला विकारात मीठ बंद केल्यास, दम्याचा अॅटॅक येत नाही. ज्यांना तारुण्य टिकवायचे आहे, शुक्राणू वाढवायचे आहेत, त्यांनी मीठ खावे न खावे याचा विवेकपूर्ण निर्णय घ्यावा.
वैद्य प. य. खडीवाले वैद्य response.lokprabha@expressindia.com