अनेक मुले आपल्या आई- वडिलांची अपरंपार सेवा करतात आणि एक वेगळा आदर्श जगासमोर ठेवतात. आईवडिलांसाठी श्रावणबाळ होणारेही अनेक आहेत. पण आपले कोणतेही रक्ताचे नाते नसताना केवळ माणुसकीच्या सर्वोच्च नात्याचे बंध मनात ठेवून काम करणारे मात्र या भूतलावर विरळा आहेत. त्यात आता केईएम रुग्णालयामध्ये परिचारिका म्हणून काम केलेल्या सर्वांचाच एकत्रित समावेश करावा लागेल. आयुष्यावर ओढवलेल्या दुर्दैवी घटनेनंतर गेली तब्बल ४२ वर्षे कोमात राहिलेल्या अरुणा शानबाग यांनी आज अखेरचा श्वास घेतला. त्यांचे हे गेल्या ४२ वर्षांचे आयुष्य सुसह्य करण्याचे काम केईएमच्या परिचारिकांनी केले. आज त्यांच्या मनाचा बांध अरुणाच्या निधनानंतर फुटला असेल…
परिचारिकांच्या बदल्या होत असतात, त्या निवृत्त होतात आणि नवीन परिचारिकाही येतात. गेल्या ४२ वर्षांत अशा असंख्य जणी येऊन गेल्या असतील. पण वॉर्ड क्रमांक चारमध्ये निपचित पडून राहिलेल्या अरुणाचा सांभाळ करण्यात यांच्यापैकी कुणीही काहीही कमी ठेवली नाही. अरुणाचे त्यांच्याशी असलेले माणुसकीचे सर्वोच्च नाते त्यांनी पुढच्या पिढीकडेही नेमके पोहोचवले, हेच यातून दिसते. एखादी गोष्ट खूप आतून, मनापासून केली की, ती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचण्यात काहीच कमी पडत नाही. याचा आदर्श वस्तुपाठच केईएममधील या परिचारिकांनी घालून दिला आहे. अरुणावरील प्रसंग आणि नंतरचे तिचे आयुष्य ही अतिशय दुर्देवी बाब असली तरी तिच्यासाठी झटणाऱ्या परिचारिकांनी घेतलेली काळजी ही अतुलनीय सेवेचा परमबिंदूच ठरावी. गेली ४२ वर्षे अरुणा पाठीवर झोपून होती पण तिच्या पाठीला कधीही जखमा झाल्या नाहीत. हे एकच उदाहरण केईएमच्या समस्त परिचारिकांनी केलेल्या सेवेचा परमबिंदू स्पष्ट करण्यास पुरेसे ठरावे.
माणुसकीचे हे एव्हरेस्ट उभे करणाऱ्या केईएमच्या समस्त परिचारिकांना आणि त्यांच्या सेवाभावी वृत्तीला त्रिवार अभिवादन.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा