रिकामपणावर आपण कधी विचार करतो का? या रिकामपणालाही अनेक परी असतात..
अल्बर्टा नीमन आणि जेनी क्रोप या दोघांनी मिळून सादर केलेल्या प्रदर्शनाची अलीकडे खूपच चर्चा झाली. रिक्तपण असे या प्रदर्शनाचे शीर्षक होते. साहजिकच आहे की, रिक्तपणच असल्याने मांडणीही रिकामपणाचीच होती. म्हणजे समोर हारीने असलेले रॅक्स दिसत होते, पण त्यावर मांडलेले काहीच नव्हते किंवा समोरच्या बाजूस चॉकलेटचे वेंडिंग मशीन ठेवलेले होते, पण त्यात भरपूर चॉकलेट्स नव्हतीच; होते ते एकमेव शिल्लक राहिलेले चॉकलेट. बाकी संपूर्ण मशीन रिकामेच..
खरे तर हे सारे आपल्या दैनंदिन आयुष्यातील क्षणच. पण लक्षात राहतात ते भरलेले रॅक्स आणि चॉकलेटस्ने भरलेली वेंडिंग मशिन्स. म्हणूनच रिकामपण दाखविण्यासाठीची ही खास योजना होती. रिकामपणावर आपण कधी विचार करतो का? त्याचा विचार करण्यासाठीच ही कलायोजना करण्यात आली होती. या रिकामपणालाही अनेक परी असतात. त्याही याच प्रदर्शनात रसिकांना पाहायला मिळाल्या. मांडणीशिल्पाचा विशेष म्हणजे रसिक त्यात सहभागी असतो. त्याच्या सहभागाशिवाय मांडणीशिल्प पूर्ण होऊच शकत नाही.
हे रिकामपण कशाकशात असते? ते रिकाम्या मॉलमध्ये असते. दुकानाच्या बंद दरवाजा आणि परिसरामध्ये ते भरून राहिलेले असते किंवा केर काढून तो एका कोपऱ्यात झाडूसह ठेवलेला असतो, त्यामध्येही असते. हे सारे या प्रदर्शनात होते. प्रदर्शनाची सुरुवातच एका बंद दरवाजा असलेल्या दुकानाच्या समोरच्या परिसर मांडणीशिल्पापासून होत होती. बंद दरवाजाशेजारी असलेल्या तोंड बंद करून ठेवलेल्या तीन प्लास्टिकच्या पिशव्या.. रिकामपण इथे भरून राहिलेले होते.
दुसऱ्या एका कलाकृतीमध्ये दिसणारे समोरचे जवाहिऱ्याचे दुकान असावे. दरवाजा काहीसा वाकवलेला आणि आतमध्ये दिसणाऱ्या शोकेसची काच फोडलेली आणि आतील मालही लंपास केलेला.. आता आतमध्ये शोकेससह सारे काही रिकामेच आहे.
पुढचे दृश्य हे कोणत्या तरी एका शॉिपग मॉलमधील असावे. सर्व रॅक्स रिकामे. त्यावर काहीही नाही. माल तरी संपलेला असावा किंवा हा मॉल तरी बंद पडलेला असावा.. असे सुचविणारे हे दृश्य. हे सारे दिसते ते एका जाळीदार दरवाजातून. म्हणजे आत प्रवेश नाहीच. आपण पाहतो ते, त्या जाळीदार दरवाजाच्या छिद्रांमधून. दिसते आणि जाणवते ते केवळ रिकामपण. कुणी तरी सोडून दिलेले, सोडून गेलेले किंवा रिक्त झालेले.. बहुधा आपल्या दैनंदिन आयुष्यातीलच, पण आजवर कदाचित लक्षात न आलेले किंवा लक्ष न दिलेले.. रिकामपण!
समबॉडिज हे मांडणीशिल्पही केवळ अप्रतिम आहे. िभतीवर ओळीत असलेले हूक आणि त्यातील दोघांवर टांगलेली दोन जॅकेटस् असे हे मांडणीशिल्प. मजा म्हणजे यातील दोन जॅकेटस् कदाचित आताच टांगून त्या दोन व्यक्ती निघून गेल्या असाव्यात.. कारण ती जॅकेटस् हलकेच डावीकडून उजवीकडे हलताहेत.. व्यक्ती समोर नाहीत, पण त्यांचे अस्तित्व जाणवते. पण ते अस्तित्वही कसे, तर नसलेले अस्तित्व. कारण त्या व्यक्ती तिथे नाहीत. आहे ते त्यांचे रिकामपण.
अल्बर्टा आणि जेनी केवळ मांडणीशिल्पच सादर करत नाहीत, तर सादरीकरण आणि व्हिडीओ किंवा व्हिडीओ मांडणीशिल्पही सादर करतात. याच प्रदर्शनातील त्यांचे ‘द कॉिलग’ हे व्हिडीओ मांडणीशिल्प आपल्या अंतर्मुख करणारे व विचार करायला लावणारे आहे. हा व्हिडीओ आपल्याला कॉलसेंटरमधील वास्तव दाखवून विचार करायला लावतो. सततची खणखणणारी फोनची बेल, त्यावर होणारी विचारणा, सततची व्यग्रता, अगदी स्वत:साठीही तिथे वेळ नसणे, आजूबाजूलाही तीच व्यग्रता, सततचे आवाज, इतरांच्या बोलण्याचे, फोनचे.. या साऱ्या वातावरणामध्ये भरून राहिलेला ताण आणि अगदी त्याही अवस्थेत ताणामुळे झोप अनावर होऊन खुर्चीतच शांत झोपी गेलेले काही कर्मचारी.. कुणी एका बाजूला कलंडलेले, कुणाचा हात खुर्चीच्या खाली लटकतोय, तर कुणी टेबलावरचा टेडीबेअर हाताशी कवटाळून झोपलेले, कुणी डोक्यावरचा हेडफोनही काढायला विसरलेले.. त्यांचे ते तणावपूर्ण जीवन, त्यातील रिक्तपण.. सारे एका झटक्यात समोर येते.. आणि मग आपण समकालीन परिस्थितीचा विचार गांभीर्याने करू लागतो!
विनायक परब
response.lokprabha@expressindia.com
@vinayakparab

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा