इस्लामी सुफी तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून मानवी आयुष्यातील गूढतेचा घेतलेला हा दृश्यशोध आहे, असे इटालिअन कलावंत मैमौना गुएर्रसीला वाटते.
अर्ज तुझे..
कर दे मुझे; मुझसे ही रिहा
कुन फाया कुनफाया कुन फायाकुन
फायाकुन फाया कूनफाया कुन..
सुफी संगीताचं वैशिष्टय़च असं आहे की, ते तुम्हाला त्या नर्म नादमयतेच्या माध्यमातून वास्तवाकडून थेट अध्यात्माच्या दिशेने घेऊन जातं. ‘कर दे मुझे, मुझसे ही रिहा’ या शब्दांतून कोणत्या दिशेला जायचंय ते नेमकं स्पष्ट होतं. अधिक शब्दांतून समजावून सांगण्याची गरजच भासत नाही. या सुफी पंथांचं भारतीय अध्यात्म परंपरेशीही एक वेगळं नातं आहे. पारंपरिक मुस्लीम जेवढे कट्टरवादी समजले जातात तेवढेच सुफी मुस्लीम हे नातं जोडणारे. अध्यात्म हा त्यांचा पाया आणि तेच नातंदेखील.
माणूस जे काही जगतो त्याचंच प्रतििबब त्याच्या कलेमध्येही उमटतं. कलावंताचा िपड हा इतरांपेक्षा वेगळा आणि अध्यात्माला जवळचा असा असतो. चिंतन-मनन याची जोड अनेकदा त्याला अध्यात्माच्या पातळीवर घेऊन जाते. तशीच ती प्रसिद्ध इटालियन कलावंत असलेल्या मरिमौना गुएर्रसीलाही घेऊन गेली आणि मग तिला जाणवलेल्या सुफी परंपरेतील तत्त्वज्ञानाचा वेध घेणाऱ्या कलाकृती तिने साकारल्या. छायाचित्रण म्हणजे केवळ समोरचे दिसते ते टिपणे याला छेद देणाऱ्या अशा अनेक कलाकृती गेल्या काही आठवडय़ांपासून आपण पाहात असून आजचा भाग हा समकालीन अध्यात्माच्या दिशेने जाणारा आहे. गूढ असे काही या विश्वात असून तेच गूढतत्त्व आपल्यातही भरून राहिलेले आहे, यावर सुफी संतांचा गाढ विश्वास आहे, असे त्यांच्या रचनांतून लक्षात येते. त्या गूढत्वाचा शोध ते सतत घेत असतात. माणसातील त्याच गूढत्वाचा शोध ममौनाच्या कलाकृतीही घेतात.
तिच्या अनेक छायाचित्रांमधील स्त्री-पुरुष हे पांढऱ्या शुभ्र पायघोळ अंगरख्यामध्ये लपेटलेले दिसतात. डोक्यावर सुफी टोपी, महिलांचे डोकेही कापडाने झाकलेले. कधी त्या कपडय़ांवर नक्षीदार वेलबुट्टी तर कधी ते केवळ कृष्ण-धवल रंगातील. नेहमीपेक्षा खूप अधिक जाणवावी अशी उंची आणि त्या पायघोळ झग्याच्या आत माणूस दिसत असला तरी तो केवळ चेहऱ्याजवळ जाणवणारा. बाकी सारे रिकामे, आतून पोकळ, रिक्त. काय आहे हे नेमके?
इस्लामी सुफी तत्त्वज्ञानाने मानवी आयुष्यातील गूढतेचा घेतलेला हा दृश्यशोध आहे, असे ममौनाला वाटते. सध्या वयाच्या चाळिशीत असलेल्या तिला वाटते की, हे तत्त्वज्ञान तिच्या आयुष्याशी एवढे एकरूप झालेले आहे की, त्याचे प्रतििबब कलाकृतींमध्ये उमटणे ही एक स्वाभाविक प्रक्रिया आहे. प्रत्येकाचं एक अंतर्मन आणि अंतर्जगही असतं. त्याचा मार्ग अनंताकडे जाणारा असतो त्यामुळे त्याचा थांग लागत नाही. म्हणूनच कलाकृतींमधील आतील पोकळ भाग कुठे सुरू होतो आणि कुठे संपतो, याचाही थांग रसिकांना लागत नाही, अशीच ही रचना आहे. या कलाकृतींना तिने ‘प्रचंड’ असे शीर्षक दिले आहे. कलाकृतींमधील हात, चेहरा किंवा शरीराच्या ठेवणीचा भाग हा एखाद्या रूपाकाराप्रमाणे दिसतो, त्या वेळेस रूप तुमच्या आतच दडलेले आहे, हेच तिला सांगायचे असते. ती म्हणते, कलाकृतीमधील काळा रंग हा अनंताकडे जाणारा आहे, तर पांढराशुभ्र हा प्रकाशाकडे नेणारा आणि प्रसंगी आपल्यावर एक कृपाछत्र असल्याचे सांगणारा!
स्वतभोवती मारलेली हळूवार गिरकी हेही सुफी रचनांचे वैशिष्टय़, िहदू परंपरेमध्ये स्वतभोवतीच एक गोल प्रदक्षिणा घातली जाते, त्याचप्रमाणे. एका छायाचित्रात एरिअल अंगाने ही गिरकी पाहता येते. हे छायाचित्र आपल्याला आपण विश्वरचनेचा एक लहान-मोठा ठिपका आहोत, हे सहज सांगून जाते.
सुफी तत्त्वज्ञानाकडून आता ममौनाचा प्रवास सुरू आहे तो जगातील विविध धर्मामध्ये महिलांना जाणवणारी तत्त्वज्ञानाची गूढगर्भता आणि त्या दिशेने सुरू असलेला महिलांचा प्रवास. तो अनुभवून त्याचे दृश्यरूप तिला साकारायचे आहे.
या कलाकृती पाहिल्यावर प्रश्न पडतो. ..पण मग एरवी आपण माणसाकडे पाहातो तेव्हा त्यात अंतर्भूत असलेले ते रूपाकार किंवा हे सारे तत्त्वज्ञान आपल्याला जाणवत का नाही? कारण आपला दृष्टिकोन वेगळा असतो. आपण जे दिसतं तेच पाहण्याचा प्रयत्न करतो. या कलाकृती आपल्याला दिसण्यापलीकडचं बघणं शिकवतात.
विनायक परब – vinayak.parab@expressindia.com @vinayakparab