जगाच्या राजकारणात किंवा अर्थकारणात अथवा समाजात असे काही दिसते आहे काय की, त्यावरचे हे भाष्य असावे?
जंगलात उभी असलेली अनेक झाडे. पण आपल्या नजरेस चित्रात पडतो तो केवळ त्या खोडांचाच मधला भाग, त्याला खालच्या बाजूस सगळीकडून तुकडे पाडत चिरत आणलेले. फक्त एकच कुऱ्हाडीचा घाव की मग अख्खे उभे झाड कोसळणार अशी स्थिती. फक्त एक झाड नव्हे तर जंगलातील सर्वच झाडे अशी कापून चिरत आणलेली. एक भयावह वास्तव, शहरीकरणाची कुऱ्हाडच त्यावर कोसळली असावी. दुसरे चित्र अंटाíक्टकावरचे असावे. गोठून बर्फ झालेल्या समुद्रातून प्रगतीची वाट काढत पुढे सरकणारी एक सागरी नौका, मागच्या बाजूस तिने वाट काढताना बर्फ फोडत तयार केलेला मार्ग लालेलाल झालेला असतो, चित्राचे शीर्षक असते जखम. प्रगतीच्या हव्यासात आपण नेमके काय करतोय, याचे भानच हरपत असल्याची खोल जाणीव करून देणारी ही चित्रे. फक्त चित्रेच नव्हेत तर शिल्पकृती, मांडणीशिल्पही आहेत इथे. एक शिल्पकृती अतिशय वेधक आहे. पक्षी अंडी घालतात ती, घरटय़ात. मुळात घरटे हे सुरक्षित आणि ऊब देणारेही. पण इथे अंडी ज्या घरटय़ात पाहायला मिळतात ते घरटेच मुळात तुटक्या बाणांचे तयार झालेले आहे. असुरक्षितता मोडून काढून त्यातच घरटे झाले आहे की, पुढे वाढून ठेवलेल्या असुरक्षिततेचा दिलेला हा संकेत मानावा, असा विचार करत असतानाच आपले लक्ष त्या शिल्पकृतीच्या शीर्षकाकडे जाते, बंकर. आणि मग सर्वच संदर्भ बदलत जातात. आता आपण एका वेगळ्या अर्थनिर्णयनाच्या दिशेने जाऊ लागतो.
समोर दिसते त्याला आपण वास्तव म्हणतो खरे. पण अनेकदा वास्तव हे त्या दिसण्याच्याही खूप पलीकडे असते, जे सर्वसाधारणपणे आपल्या नजरेत येतही नाही. त्याच वास्तवाकडे वेगळ्या नजरेने आपल्याला पाहायला लावणारे स्पॅनिश कलावंत पेजॅक याचे लॉ ऑफ द वीकेस्ट हे प्रदर्शन अलीकडेच पार पडले. पेजॅक ज्या जन्मगावातून आला तिथे ग्राफिक्स किंवा स्ट्रीट आर्ट हा प्रकार लोकप्रिय आहे. त्याने आजवर त्याचाही मुबलक वापर केला आहे. दोन्ही बाजूने येणाऱ्या रस्त्याचा उतार मधोमध असलेल्या गटारामध्ये जातो. त्या गटाराच्या तोंडावरच जगाचा नकाशा एकत्र येऊन प्रवेशत असल्याचे त्याचे ग्राफिक विशेष गाजले होते. जगातील भांडणे कायम राहिली तर अखेरीस हेच होणार हे त्याने दृश्यातून सुचवले होते.
समुद्राचे पृष्ठभागावरचे पाणीही दिसत नाहीए. दिसताहेत त्या पृष्ठभाग व्यापून राहिलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या आणि त्याही अवस्थेत गळाला मासा लागतोय का ते पाहणारी होडीतील दोन लहान मुले किंवा डंिपग ग्राऊंडवर कचरा ओतणारे डंपर आणि तिथे साचलेला केवळ आणि केवळ पुस्तकांचाच कचरा अशा असंख्य चित्रांमधून पेजॅक खूप काही सुचविण्याचा प्रयत्न करतो. पण ही झाली तशी सरळ चित्रे. काही बाबतीत मात्र तो विरोधाभासात्मक बाबी थेट वापरतो किंवा दृश्यटीका वेगळ्या पद्धतीने करतो. ब्रिटनमध्ये प्रदर्शनाच्या वेळेस त्याने विजेच्या खांबांवर खालच्या नव्हे तर वरच्या दिशेने लटकणारे बुटांचे जोड मांडणीशिल्प म्हणून सादर केले होते. तो म्हणतो, मी तुम्हाला माझ्या चित्र-शिल्पांचा अर्थ सांगणार नाही, कारण कलाकृतीच बोलकी आहे. तुम्ही विचार करा की, बूट कशाचे प्रतीक आहे, अस्तित्वाचे की, पाय रोवून उभे राहणाऱ्या अस्तित्वाचे आणि मग त्याची अवस्था गुरुत्वमुक्त केव्हा होते. जगाच्या राजकारणात किंवा अर्थकारणात अथवा समाजात असे काही दिसते आहे काय की, त्यावरचे हे भाष्य असावे. हे पाहिल्यानंतर भारतीयांना उध्र्वमूलं अधशाखम् या श्लोकाची आठवण निश्चितच होईल.
त्याची काही चित्रं ही तत्त्वज्ञानात्मक तर काही चक्क एखाद्याच्या दृश्यकवितेसारखी. धूळ झाडणारा माणूस या चित्रात ती व्यक्ती स्वतचेच झालेले विघटन आणि धुळधाण स्वतच स्वच्छ करताना दिसतेय. हे झाले तत्त्वज्ञानात्म.
पेजॅक हा समकालीन कलावंत आहे, त्यामुळे तो समकालीन घटनांवरही नवोन्मेषनात्मक पद्धतीने व्यक्त होतो. ब्रिटनच्या युरो समुदायातून बाहेर पडण्याच्या ब्रेक्झिट निर्णयानंतर त्याने डोंट लूक बॅक इन अँगर”प् ही कलाकृती साकारली. जग्वार ही जगातील सर्वोत्तम आलिशान गाडी एकप्रकारची ब्रिटनची शानच. तिच्या बोनेटवर त्याने व्हॅन गॉचे स्टारी नाईट खरवडून चितारले. एरवी एखाद्याच्या खरवडण्याने गाडीची किंमत कमी होते. पण पेजॅक त्या गाडीला कलाकृतीचे रूप देताना त्यावर राजकीय भाष्य सहज करून जातो. म्हणूनच त्याच्या समकालीन कलाकृतींकडे आता जगाचे लक्ष लागून राहिले आहे.
विनायक परब – response.lokprabha@expressindia.com @vinayakparab