तत्त्वज्ञानाच्या पातळीवरील अनित्य आणि शून्यता कलेच्या माध्यमातून समजून घ्यायची असेल तर..

मी म्हणजे नेमका कोण, कुठून आलो आणि माझे अस्तित्व म्हणजे नेमके काय, असे प्रश्न आजवरच्या इतिहासात अनेकदा मानवाला पडले आहे. ऋषीमुनींपासून ते अगदी संशोधकांपर्यंत सर्वानीच आपापल्या परीने त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. कुणी तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून तर कुणी विज्ञानाच्या माध्यमातून. मुळातूनच संवेदनक्षम असलेल्या कलावंताच्या मनालाही हे प्रश्न पडतच असतात. तोही त्याच्या परीने या साऱ्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो. पण तो केवळ कलावंतच असेल तर त्याच्या कलाकृती फारशा वेगळ्या ठरत नाहीत, असा आजवरचा अनुभव आहे. मात्र त्याला तत्त्वज्ञानाची पाश्र्वभूमी असेल तर मग त्याच्या कलाकृती अगदी वेगळ्या, वेधक आणि प्रसंगी विचार करायला लावणाऱ्या ठरतात.

आजवर अनेक तत्त्वज्ञांनी मानवाला पडलेल्या आदिम प्रश्नांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, त्यातील एक प्रभावी तत्त्वज्ञ म्हणजे गौतम बुद्ध. बौद्ध तत्त्वज्ञानाची मांडणीच अनित्य आणि अनात्मा यावर बेतलेली आहे. यातील अनित्य म्हणजे जगातील प्रत्येक गोष्ट क्षणागणिक बदलते आणि ती क्षणभंगुर असते, अगदी क्षणदेखील. कारण तोही क्षणिकच असतो. आधीचा क्षण नंतरच्या क्षणी अस्तित्वात नसतो. बौद्ध तत्त्वज्ञ नागार्जुनाने हे तत्त्वज्ञान आणखी पुढे नेले ते शून्यतेच्या माध्यमातून. एखाद्या गोष्टीचे नसलेले अस्तित्वही म्हणजे शून्यता. त्याही पलीकडे जाऊन शून्यतेच्या माध्यमातून निर्वाणापर्यंत पोहोचणे कसे शक्य आहे, ते त्याने सांगितले. निर्वाण म्हणजे मोक्ष नव्हे तर अशी अवस्था की, जिथे मोहमायेचा स्पर्श नसतो. म्हणजे खरे सांगायचे तर मोहमाया कुणालाच टळत नाही, ती स्पर्श करतेच. पण शून्यतेच्या अवस्थेमुळे भिक्खूच्या आयुष्यात तिचा परिणामही शून्य असतो.. आता हे सारे कलेच्या माध्यमातून मांडायचे असेल, अनित्य आणि शून्यतेचे सर्व अर्थ कलेच्या माध्यमातून समजून घ्यायचे असतील तर.. तर मग आपल्याला फॅब्रिस साम्यन या बेल्जियन कलावंतांच्या कलाकृती पाहाव्या आणि समजून घ्याव्या लागतात.

या कलाकृती पाहताना सुरुवातीस काही विरोधाभासात्मक वाटूही शकेल. कदाचित असे कसे काय अशी शंकाही येईल पण ती राहू द्यावी. कारण कलाकृती समजून घेण्यासाठी याच वाटेने पुढे जावे लागते. त्याच्या कलाकृती अस्तित्वाचा शोध घेणाऱ्या कलाकृती आहेत. ‘‘च्यामध्ये’च्या मध्ये’ या शीर्षकाची एक कलाकृती म्हणजे विविध आकारांतील १२ फोटोफ्रेम्स असून त्या फ्रेम्सचा सांगाडा पाठमोरा टांगलेला असून त्या उलटय़ा बाजूने रंगविण्यात आल्या आहेत. प्रामुख्याने आकाशी-निळा रंग यात दिसतो. दिवसाच्या विविध प्रहरांतील या प्रकाशछटा आहेत. त्या पाहायच्या तर आयुष्याकडे पाठ करूनच अनेकदा बसावे लागे, असे कलाकाराला सुचवायचे आहे. त्याच्या या सर्व कलाकृती अशा प्रकारे ज्ञात-अज्ञाताच्या सीमेवरील अनुभव व्यक्त करणाऱ्या ठरतात.

याचप्रमाणे आणखी एक मोठय़ा आकारातील काळ्या फ्रेम्सची एक मालिका आहे. यामध्ये समोरच्या बाजूला काळी फ्रेम दिसत असली तरी मागच्या बाजूस पिवळी उजळ छटा पाहायला मिळते. बारकाईने पाहिल्यावर लक्षात येते की, मागील बाजूस सोनेरी रंग आहे. सोनेरी रंग समृद्धीचे प्रतीक मानले जाते. समृद्धीकडे पाठ फिरवल्यानंतरच तुम्हाला खरा साक्षात्कार होऊ शकतो. त्या साक्षात्काराने जीवन उजळूनही निघू शकते.. या दोन्ही कलाकृतींतील रिकामेपण म्हणजे आत चित्र किंवा छायाचित्र काहीही नसणे व फ्रेम रिक्त असणे हे तिचे शून्यतेशी नाते सांगणारे आहे. शून्यतेमध्येच साक्षात्कार अनुभवता येतो.

एका कलाकृतीमध्ये खालच्या बाजूस ठेवलेले तीन मोठय़ा आकारातील घनाकार दिसतात. त्यावर एक धातूची प्लेटही दिसते. त्यावर कधी काही एक कलाकृती ठेवलेली असावी, असे या प्लेटकडे पाहून लक्षात येते. आता ही धातूपट्टिका आणि घनाकार रिक्त असले, शून्य असले तरी त्याआधी त्यावर असलेल्या गोष्टींचे अस्तित्व ते स्पष्ट करते. आयुष्यातही असेच तर होत असते. आपण त्या त्या क्षणाला त्या त्या अस्तित्वाचा शोध घेत असतो. अनेकदा ते अस्तित्व पुढच्या क्षणी उरतही नाही. कारण ते अनित्य असते. कधी कधी एकाच वेळेस अनित्य आणि शून्यता अशी हातात हात घालून येतेही. फॅब्रिस अशा प्रकारे आपल्याला एकाच वेळेस आदिम आणि समकालीन असा विचार करायला लावतो.
विनायक परब
response.lokprabha@expressindia.com
@vinayakparab