अनेकदा संस्कृती बेमालूमपणे एकमेकांत विलीनही होतात. शिवाय त्या विलीनतेनंतर स्वत:ची छापही राखतात.. ते स्वतंत्र अस्तित्व नसते, असतो तो केवळ छाप!
दोन वेगवेगळ्या संस्कृती समोरासमोर येतात त्या वेळेस त्यांच्यामध्ये तीव्र संघर्ष होतो आणि एक संस्कृती लोप पावते किंवा दुसरीला गिळंकृत करते, अशी संकल्पना अनेक वष्रे इतिहासतज्ज्ञ, पुरातत्त्वतज्ज्ञ यांच्या मनात घर करून आहे. भारतीय संस्कृती मात्र या सर्वापेक्षा वेगळी आहे. मिलाफ हे तिचे वैशिष्टय़ होय. आता भारतीय संस्कृतीच्या सखोल अभ्यासास सुरुवात केल्यानंतर जागतिक स्तरावर इतर अनेक प्राचीन संस्कृतींच्या अभ्यासकांनी या विषयाकडे नव्याने पाहण्यास सुरुवात केली आहे. त्यात त्यांना असे लक्षात आले की, दरखेपेस संस्कृतींचा तीव्र संघर्ष अथवा वाद होतोच असे नाही. अनेकदा ही प्रक्रिया भारतीय संस्कृतीप्रमाणे मिलाफाच्या दिशेनेही जाणारी असते. कारण हे सारे घडते ते माणसाच्या संदर्भात आणि प्रत्येक माणसाच्या मनात युद्धखोरी नसते. शिवाय प्रत्येक माणूस नव्याला विरोध करतोच, असेही नाही. फरक असतो तो कमी-अधिक वेगात गोष्टी घडण्याचा. अनेकदा त्या वितळतात आणि नंतरही बेमालूमपणे विलीनही होतात. शिवाय त्या विलीनतेनंतरची स्वत:ची वेगळी छापही राखतात.. ते स्वतंत्र अस्तित्व नसते, असतो तो केवळ छाप! प्रत्यक्षात आपण पाहतो ती संस्कृती नवीन असते विलीनीकरणानंतरची. हे सारे दृश्यपातळीवर आपल्याला अनुभवायचे असेल तर मूळची इराणची असलेली आणि आता अमेरिकेत स्थायिक झालेली कलावंत हेदिए इल्ची हिच्या कलाकृती बारकाव्याने पाहाव्या लागतील.
तिची पाश्र्वभूमी आहे ती पर्शिअन कलेची. पर्शिअन कलेमध्ये ताझहिब हा प्रकार प्रसिद्ध आहे. एखादी गोष्ट मग ते पुस्तक असेल किंवा कलाकृती अथवा इतर काही ते सजवण्यासाठी ताझहिबचा वापर केला जातो. ताझहिब म्हणजे सोन्याचा वर्ख चढवून केलेले अलंकरण. अनेकदा यामध्ये फुले-पाने किंवा मग भौमितिक रचनांचा वापर अलंकरणासाठी केला जातो. त्यातही प्रामुख्याने वापरलेला रंग असतो तो पर्शिअन ब्लू! अमेरिकन कलावंत प्रसिद्ध आहे ते अमूर्त चित्रांसाठी. इल्चीने तिच्या चित्रांमध्ये या दोन्हींची बेमालूम मिसळण करून तिची स्वत:ची नवीन समकालीन शैली विकसित केली आहे. तिचे सर्व विषय हे समकालीन आजूबाजूला घडणाऱ्या घटनांबद्दलचे आहेत आणि त्याच वेळेस ती दोन संस्कृतींच्या माध्यमातून व्यक्त होत असते. कारण या दोन्ही संस्कृती तिला स्वत:च्याच वाटतात. त्यामुळे दोन संस्कृतींचा एक आगळा दृश्य मिलाफ आपल्याला तिच्या कलाकृतींमध्ये पाहायला मिळतो. त्यामुळे म्हटली तर ही दोन्ही संस्कृतींची अप्रतिम मिलाफ असलेली आणि त्याचवेळेस समकालीनत्व व्यक्त करणारी अशी चित्रे आहेत.
याशिवाय चित्रकर्ती ही आधुनिक जगातील सक्षम स्त्री आहे, त्यामुळे स्त्रीचे सक्षमत्व ती प्रसंगी ताठरलेल्या आणि लांबसडक झालेल्या केसांमधून व्यक्त करते. हा स्त्रीत्वाचा एक वेगळा कोनही या चित्रांना लाभला आहे.
रंगांची सरमिसळ, त्यांचे वाहणे, मग ते कधी जलरंगांप्रमाणे वेगात वाहणे किंवा मग वितळलेल्या सोन्याप्रमाणे काहीसे घट्ट घनरूप वाहणे यामधून ती संस्कृतींची सरमिसळ आणि वाहणे हे त्यांचे मूलभूत वैशिष्टय़ दिसते, जाणवते. तर दुसरीकडे कलात्मक पातळीवर त्यांच्या अलंकरणातून त्यांचे वेगळेपण जाणवते. खरे तर अमूर्त आणि पारंपरिक पर्शिअन अलंकरण हे दोन ठळक वेगळेपण असलेले भाग. पण ते तिने परिणामकारक पद्धतीने वापरले आहेत. ‘तू मला चंद्रावर पाहिलंस तर स्नेहपूर्णतेने भेटीस ये’ असे शीर्षक असलेले चित्र त्याचे उत्तम उदाहरण आहे. त्यात चंद्रासाठी तिने पर्शिअन अलंकरण पद्धती ताझहिब वापरली आहे आणि उर्वरित चित्रण रूपकात्मक पद्धतीने पण अमूर्त पातळीवर येते. त्यात संस्कृतीचे वितळणे, मिसळणेही अनुभवता येते. यातील काही चित्रांमध्ये ती विलीनीकरणाची प्रक्रिया नेमकी अनुभवताही येते. त्यासाठी रसिक वाचकांना त्यांची शीर्षके मार्गदर्शक ठरतील. म्हणून आजच्या मजकुरासोबत शीर्षके असलेली चित्रे दिली आहेत. चित्रे समजून घ्यायची तर प्रत्यक्ष कलाकृतीमध्ये म्हणजेच तिच्या आस्वादन प्रक्रियेत सहभागी व्हावे लागेल.. कारण सहभाग हा समकालीनत्वाचे एक व्यवच्छेदक लक्षण आहे!
विनायक परब – @vinayakparab
vinayak.parab@expressindia.com