प्रत्येक कालखंडात फॅसिस्ट प्रवृत्ती असतातच, कधी बोथट तर कधी टोकदार. समकालीन चित्रकार या प्रवृत्तींवर कलात्मक माध्यमातून कधी विधान करतात तर कधी टीका.

हिटलर, मुसोलिनी हे काही फक्त इतिहासातच होऊन गेले आणि त्या प्रवृत्ती तिथेच संपल्या असे होत नाही. प्रत्येक कालखंडात फॅसिस्ट प्रवृत्ती जन्माला येतच असतात. आपण सांगतो तोच केवळ राष्ट्रवाद असा त्यांचा दुराग्रह असतो आणि मग ते न मानणाऱ्यांविरोधात अनेकदा दडपशाही सुरू होते. मूलतत्त्ववाद्यांचा मार्गच िहसेच्या माध्यमातून सुरू होतो. प्रत्येक कालखंडात या प्रवृत्ती असतात, कधी त्या बोथट होतात तर कधी अधिक टोकदार.. समकालीन चित्रकार या अशा प्रवृत्तींवर त्यांच्या कलात्मक माध्यमातून कधी विधान करतात तर कधी टीका. त्यांची कलाकृती हेच त्यांचे विधान असते. ते रसिकांना समजून घ्यावे लागते. सध्याच्या कालखंडात अशा प्रकारे आपल्या कलाकृतीच्या माध्यमातून राजकीय भाष्य करणाऱ्यांमध्ये मास्रेल झामा या कॅनेडिअन कलाकाराचे नाव आदराने घेतले जाते. झामाचे वैशिष्टय़ म्हणजे तो केवळ चित्र, शिल्प- मांडणीशिल्प यापुरताच अडकून राहिलेला नाही तर तो वेशभूषा, रंगसज्जा, नाटक- बॅले यासाठीचे कलादिग्दर्शन अशा सर्वच माध्यमांमध्ये लीलया संचार करतो. त्याच्या या टीकेतून कडव्या धार्मिक बाबीही सुटत नाहीत.

वर्ल्ड गॉन राँग, यू गॉट टू मेक रूम फॉर न्यू वन्स आणि ऑन द बँक्स ऑप रेड रिव्हर ही त्याची तीन चित्रे विशेष गाजली. यांपकी पहिल्या चित्रामध्ये झाडावर फासाला लटकवलेली माणसे, सनिक, मृत सनिकांचे पाíथव, कधी गणवेशातील तर कधी अर्धनग्न, तुटलेले अवयव, त्यांना लक्ष्य करणारे दुसरे सनिक तर एका बाजूला हे सारे सुरू असतानाच लाल फडका चेहऱ्यावर गुंडाळून चक्क संगीताची वाद्ये वाजविणारे सनिक असे हे चित्र आहे. महायुद्धातील हिटलरशाहीची आठवणच क्षणार्धात व्हावी असे हे चित्र पाहताक्षणी त्यातील िहसेचे लाल पक्षी आपले लक्ष वेधून घेतात. फॅसिस्ट प्रवृत्तीचे प्रतीक असलेल्या वटवाघळाचे चिन्ह असलेले लाल झेंडे सर्वत्र फडकताना दिसतात. या चित्रकाराचे हे चित्र तत्कालीन नव्हे तर आजच्या फॅसिस्ट प्रवृत्तींवर भाष्य करणारे आहे. चित्र पाहिले आणि जागतिक परिस्थिती आठवून पाहिली की मग आजच्या परिस्थितीतील साम्यस्थळे सहज आठवू लागतात.

मॅडकॅप फूल ऑफ ग्लॅमर हे चित्र भारतीयांच्या लैंगिक मानसिकतेवर भाष्य करणारे आहे. झामाचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे तो त्याच्या चित्रांमधून लैंगिक मानसिकतेवरही जळजळीत प्रकाश टाकण्याचे काम करतो. माणसाच्या वर्तनाच्या मुळाशी बऱ्याचदा लैंगिक मानसिकताच अधिक असते, असे विज्ञानही सांगते. त्याचाच वेध घेण्याचा प्रयत्न झामा करताना दिसतो. मार्सल दुचॅम्प या विख्यात समकालीन चित्रकारानेही त्याच्या कारकीर्दीत म्हणजे १९४० ते १९६० च्या दशकांमध्ये असा प्रयत्न केला होता. दुचॅम्पची अखेरची कलाकृती दरवाजाच्या एका छिद्रातून पाहावी लागते, त्याचे स्वरूप मांडणीशिल्पासारखे आहे. आत पाहिल्यानंतर एक नग्नावस्थेतील महिला पाय विलग असलेल्या अवस्थेत दिसते. तिच्या एका हातात दिवा आहे. जागतिक कलेतिहासात ही कलाकृती अजरामर झाली. या कलाकृतीवर भाष्य करणारी कलाकृती झामाने अलीकडेच सादर केली. यात दुचॅम्पप्रमाणेच मांडणीशिल्पाची मांडणी करताना त्यात त्याने नग्नावस्थेतील एक पुरुषही दाखविला आहे. एकाच वेळेस दुचॅम्पच्या गाजलेल्या कलाकृतीचे कौतुक आपल्या कलाकृतीतून करताना काळ बदललेला नाही आणि लैंगिक मानसिकताही हे झामा आपल्याला त्याच्या कलाकृतीतून दाखवून देतो.

वाईटाची फुले असे शीर्षक असलेले त्याचे एक प्रदर्शन सध्या अमेरिकेत सुरू आहे. यामध्ये सादर केलेल्या चित्र आणि शिल्पांमध्येही तो लष्करी, हुकूमशाही आणि लैंगिक मानसिकतेला भिडताना दिसतो. माणसाचा चेहरा आता प्राण्याचा झालेला आहे आणि त्याच्या शेजारी असलेली बंदूक त्याचा भविष्यातील िहसेचा मार्ग पुरता स्पष्ट करते, असे जाणवून देणारे एक शिल्प या प्रदर्शनात आहे. सर्वसाधारणपणे युरोप- अमेरिकेतील कलावंत धार्मिक म्हणजेच विशेषत: चर्च किंवा धर्मगुरूंवर टीका करणे टाळतात. पण झामा त्यांनाही सोडत नाही. बिशप्स हेड या कलाकृतीमध्ये लाल झगा परिधान केलेल्या बिशपच्या आजूबाजूला त्याच्या अंकित असलेला गोतावळा दिसतो. त्यांना स्वतचा वेगळा परिचय नाही. आणि बिशपच्या डोक्याच्या जागी मानवी चेहरा न दिसता तिथे क्षेपणास्त्राच्या पुढच्या बाजूस असलेल्या टोकाप्रमाणे असलेली आकृती मुखवटय़ामध्ये दिसते.. या व अशाच टोकदार, प्रसंगी राजकीय ठरणाऱ्या भाष्यामुळे झामा नेहमीच चच्रेत राहतो.
विनायक परब
@vinayakparab
vinayak.parab@expressindia.com