माणूस मोठा होतो तो दोन प्रकारे. पहिला प्रकार म्हणजे तो दिवसागणिक काहीही न करता वयाने मोठा होतो आणि दुसरा अनुभवाने. अ‍ॅनी रोलँडचा समावेश या दुसऱ्या प्रकारात करावा लागतो. आज ती साठीच्या घरात आहे. पण तिच्यामध्ये असलेली प्रयोगशीलता वयागणिक वाढतेच आहे. कलावंतांचेही अनेकदा सामान्य माणसाप्रमाणेच होते. वयागणिक प्रयोगशीलता कमी होत जाते. शिवाय आयुष्याच्या मध्यापर्यंत स्वतची म्हणून एक शैली गवसलेली असते. अनेकांच्या बाबतीत त्या शैलीचा स्वीकार कलाजगताने आणि कला बाजारपेठेनेही केलेला असतो. मग त्याच्या शैलीचा साचा तयार होतो आणि साचेबद्ध कलाकृती(?) बाहेर पडू लागतात. दिवसागणिक किंमत वाढत असल्याने लौकिकदृष्टय़ा तो कलावंत(?) मोठा होत जातो.. पण आतील कलावंताने मात्र दम टाकलेला असतो! तर दुसऱ्या प्रकारातील कलावंत वयागणिक अनुभवाने अधिकाधिक परिपक्व, प्रगल्भ होत जातात. त्यांच्यातील प्रयोगशीलताही वाढत जाते. अ‍ॅनीचा समावेश या दुसऱ्या प्रकारच्या कलावंतांमध्ये म्हणजेच अस्सल कलावंतांमध्ये होतो. अमेरिकेतील व्हर्जििनआ प्रांतातील ब्लूमाँट येथे राहणाऱ्या अ‍ॅनीने कॅलिफोíनआ इन्स्टिट्यूट ऑफ आर्टस्मधून कलेतील पदवी संपादन केली. बोस्टनच्या स्कूल ऑफ म्युझिअम ऑफ फाइन आर्टस्मधून पदव्युत्तर पदवी ग्रहण केली. तिचे आजवरचे बहुतांश काम हे छायाचित्रणाशीच संबंधित आहेत. मात्र हे सरधोपट छायाचित्रण नाही, हे कुणालाही चटकन ध्यानात यावे. तिच्या प्रतिमांकनामध्ये एक वेगळाच विचार दडलेला असतो.
काही वर्षांपूर्वी मंगळ मोहिमेमध्ये मंगळ ग्रहावरच्या चित्रणासाठी एक विशिष्ट असा कॅमेरा विकसित करण्यात आला, ज्यामध्ये टिपल्या जाणाऱ्या प्रतिमेची घनता व सुस्पष्टता ही सर्वसामान्य कॅमेऱ्याने टिपलेल्या छायाचित्रांच्या क्षमतेपेक्षा खूप अधिक होती. सर्वसाधारणपणे टिपल्या जाणाऱ्या छायाचित्रांची क्षमता आपण मेगापिक्सेलमध्ये मोजतो. तर या छायाचित्रांचे रिझोल्युशन गिगापिक्सेलमध्ये आहे. त्यामुळेच त्यांची सुस्पष्टता अनेक पटींनी अधिक असते. समोरच्या दृश्यातील बारकावेही नेमके टिपले जातात. या प्रकारच्या चित्रणासाठी विशिष्ट प्रकारचा कॅमेराच नव्हे तर एक छोटेखानी रोबोटिक यंत्रणाच विकसित करण्यात आली आहे. या यंत्रणेच्या माध्यमातून एकाच वेळेस शेकडो फ्रेम्स उभ्या आणि आडव्या पद्धतीने टिपल्या जातात आणि नंतर डिजिटल यंत्रणेच्या माध्यमातून त्या एकत्रितपणे जोडल्या जाऊन एक वेगळे पॅनोरमिक छायाचित्र तयार होते. पॅनोरमिक छायाचित्रे टिपणारे इतरही कॅमेरे आहेत. मात्र यासाठी वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानामुळे एक वेगळीच खोली व सुस्पष्टता छायाचित्राला प्राप्त होते. हे तंत्र वापरून छायाचित्र नव्हे एक कलाकृती कशी निर्माण करता येईल, याचा विचार अ‍ॅनीने केला व प्रत्यक्षात आणलाही.
या तंत्राची बलस्थाने लक्षात घेऊन तिने विषयांची निवड केली. आपल्या आजूबाजूला अनेक झाडेझुडपे असतात. कधी वेलींनी त्यांना वेटोळे घातलेले असते तर कधी ती निष्पर्णही असतात. कधी त्यांच्या आजूबाजूला असलेला प्रदेश त्यांचे दृश्यसौंदर्य वाढविण्याचे काम करतो. नेहमीचे टिपले जाणारे छायाचित्र हे दोन मिती दाखविणारे असते. पण अ‍ॅनीच्या छायाचित्रात आपल्याला अनेक मिती पाहायला मिळतात कारण ती त्या तंत्राच्या क्षमतेच्या पुढे जाऊन त्याचा कलात्मक वापर करते. तंत्राच्या मर्यादाही ती यशस्वीरीत्या भेदते. याची सुरुवात तिच्या चित्रचौकटीपासून (फ्रेम) होते. फ्रेिमगसाठीचा नेमका कोन अशा प्रकारच्या चित्रणात खूप महत्त्वाचा ठरतो. या लेखात वापरलेले तिचे पहिले छायाचित्रच यासाठी खूप बोलके ठरावे. ज्या झाडाआडून ते टिपले आहे, त्याची मिती, समोरच्या दृश्यात नेहमीप्रमाणे दिसणाऱ्या दोन मिती, नदीच्या पाण्यातील प्रतििबबांमध्ये छायाचित्रातील खोलीमुळे जाणवणाऱ्या दोन मिती, एरवीपेक्षा अधिक प्रदेश डाव्या बाजूस दिसण्यामुळे तयार झालेली आणखी एक वेगळी मिती अशा मितींच्या संयुगातून हे छायाचित्र जिवंत होऊन समोर उभे राहते.
हे छायाचित्र अधिक बारकाईने पाहिले तर लक्षात येईल की, याशिवाय तिने आणखीही काही गोष्टींचा कलात्मक वापर केला आहे. त्यासाठी गिगापेनचे सॉफ्टवेअर तिने वापरले आहे. पण त्या सॉफ्टवेअरचाही तिने सरधोपट वापर केलेला नाही तर आवश्यकतेनुसार कलाकृती साकारण्यासाठी म्हणून डोकेबाज वापर केला आहे. तिच्या अनेक छायाचित्रांमध्ये जोपर्यंत काटेकोरपणे पाहिले जात नाही तोवर त्यातील वेगळेपण आणि फरक लक्षात येणार नाही, अशा खुबीने तिने काम केले आहे.
एका छायाचित्रात झाडावरचा काटा दिसतो आणि तो टोकाकडे येताना टोकदार न होता थेट निमुळता होत बोथट झालेला दिसतो. त्याचा प्रभाव एवढा असतो की चित्रातील बाकीच्या गोष्टी जणू काही अस्तित्वातच नाहीत, अशा प्रकारे रसिकाचे लक्ष त्या काटय़ाच्या दिशेने खेचले जाते. बोथट झाल्याने तो काटा; काटा राहातच नाही, पण तरीही लक्ष त्याच्याचकडे जाते.
एकाच झाडाची दोन वेगवेगळ्या ऋतूंमधील दोन छायाचित्रेही तिने टिपली असून त्यात तिने कौशल्य पणाला लावून केलेले बदल प्रथमदर्शनी लक्षात येतच नाहीत. छायाचित्रणाचे जोडकाम बारकाईने पाहिल्यावर लक्षात यावे, अशीच त्याची रचना मुद्दामहून करण्यात आली आहे. कारण ते लक्षात आल्यावर आपण पुन्हा पाहतो तेव्हा चित्रातील आधी जाणवलेली खोली आणि नंतरची जाणवणारी खोली यात निश्चित फरक जाणवतो व तो अधिक खोलीच्या दिशेने झालेला असतो. खरे तर सॉफ्टवेअर हे कारागिरीचे हत्यार आहे. पण ती ते कलात्मक हत्यार म्हणून वापरताना दिसते. यामुळे केवळ चित्रसौंदर्यातच नव्हे तर त्याच्या सर्वच गुणवैशिष्टय़ांमध्ये गुणात्मक व संख्यात्मक दोन्ही पातळ्यांवर फरक झालेला दिसतो. यातील संख्यात्मक फरक हा सॉफ्टवेअरमुळे आलेला तर गुणात्मक फरक हा मात्र तिच्यातील कलावंतामुळे आलेला दिसतो. उपलब्ध असलेले तंत्र वापरून कलात्मकता साधणे आणि ते तंत्राच्या असलेल्या कलात्मक मर्यादा भेदणे यात फरक आहे. कलात्मकता साधणारा कारागीर असतो तर कलात्मक मर्यादा भेदणारा कलाकार ठरतो! ..म्हणूनच अ‍ॅनी समकालीन कलावंत ठरते कारण ती तंत्र व कलात्मकता दोन्हींना भेदून पल्याड जाते!
response.lokprabha@expressindia.com
@vinayakparab