आषाढ महिना, वद्य त्रयोदशी, नामदेव महाराजांनी विठ्ठलमंदिराच्या शेवटच्या पायरीवर बसून मस्तक श्री चरणी ठेवले आणि ते अनंतात विलीन झाले. ती नामदेवांची पायरी प्रसिद्ध आहे.
जीवनाच्या सर्व क्षेत्रांत जीवनमूल्यांची घसरण होत आहे. जागतिकीकरण आणि खाजगीकरण झपाटय़ाने होत आहे. दहशतवाद, अस्थिर राजकीय परिस्थिती, अनामिक भीती यांनी आपले जीवन वेढले गेले आहे आणि म्हणूनच ह्या परिस्थीतीत संत सहवासाची, साहित्याची आपणा सर्वाना आवश्यकता आहे. विविध प्रांतांतील भारतीय संतांनी विविध भाषांना आपल्या संतवाणीने समृद्ध केले आहे. विविध काव्यप्रकारांतून जनजागृती आणि पारलौकिक जीवनमूल्यांचे अधिष्ठान दिले. करुणा, सौजन्य, सहिष्णुता, बंधुभाव, सामाजिक, वैचारिक तत्त्वज्ञानाचा प्रसार आपल्या अभंग, ओवी, पदे, दोहे अशा सोप्या बोलीभाषेमधून केला.
महाराष्ट्रात ज्ञानदेव, नामदेव, एकनाथ, तुकाराम आणि रामदास ही संत मंडळी जगविख्यात आहेत. ही सर्व मंडळी (रामदास सोडून) विठ्ठलभक्तीने प्रेरित झालेली होती. सन ११९२ साली संत नामदेवांचा जन्म झाला. एकूण ऐंशी वर्षांचे आयुष्य त्यांना लाभले. ज्ञानदेव व नामदेव हे समकालीन. ज्ञानदेवांच्या संजीवन समाधीनंतर जवळजवळ चोपन्न वष्रे नामदेवांचे कार्य अविरत, अखंड सुरू होते. आपले मर्यादित क्षेत्र न ओलांडणाऱ्या आमच्या मराठी मनोवृत्तीला संत नामदेवांनी त्याकाळी छेद देत तीर्थयात्रेच्या निमित्ताने गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब आदी प्रांतांमध्ये जाऊन आपले अनेक शिष्य तयार केले. जुलमी यवनांच्या राजसत्तेला कंटाळलेल्या पिचलेल्या लोकांना धीर दिला. संत नामदेव हे ७०० वर्षांपूर्वी केलेल्या राष्ट्रीय एकात्मतेचे पहिले उद्गाते आहेत असे ठामपणे म्हणायला हरकत नाही.
महाराष्ट्रामध्ये आषाढी एकादशीपासून चातुर्मास सुरू होतो आणि हे चार महिने विठुराया शेषाच्या शय्येवर निद्रा घेतात व ते चार महिने विश्रांतीनंतर कार्तिक शुद्ध एकादशीला उठतात. आषाढी एकादशीला ‘देवशयनी एकादशी’ आणि काíतकी एकादशीला प्रबोधिनी किंवा ‘देवउठी एकादशी’ असे म्हणतात. विठ्ठल हे साऱ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. ‘पुंडलिक वरदा’ असे म्हटल्यावर ज्याच्या तोंडून ‘हरि विठ्ठल’ असा उद्गार सहजगत्या निघतो तो मराठी माणूस असे चित्र एक वेळा दिसत असे, पण आज पंढरीच्या वारीमध्ये देशी-परदेशी वेगळ्या जाती-धर्माचे लोक आनंदाने सहभागी झालेले दिसतात.
होयसळ व कर्नाटक या साम्राज्यांच्या काळात कर्नाटकमध्ये विठ्ठल भक्तीचे वारे जोरात वाहात होते. पंढरपूरला आज मंदिरात असलेली विठ्ठलमूर्ती कर्नाटकातून आणलेली आहे, असा एक मतप्रवाह आहे. संत नामदेव म्हणतात, श्री विठ्ठलाला कानडी भाषा समजते. पण भक्तराज पुंडलिक महाराष्ट्रातला. त्याला विठ्ठलाची कानडी भाषा समजत नव्हती. विठ्ठल पुंडलिकाशी कानडीत बोलतो आणि पुंडलिक मराठी मायबोलीतून बोलतो, त्यामुळे अठ्ठावीस युगांत त्या दोघांमध्ये संभाषणच झालेले नाही. विठ्ठल पुंडलिकाने दिलेल्या विटेवर कमरेवर हात ठेवून भीमा नदीच्या तीरावर भक्तांची वाट पाहात उभा आहे.
संत नामदेव पुढे म्हणतात
‘पंढरीचा राजा उभा भक्त काजा।
उभारूनि भुजा वाट पाहे’
घ्या रे नाम सुखे प्रेमे अलौकिक।
साधने आणिक करू नका॥
मनाचेनि मने हृदयी मज धरा।
वाचेने उच्चारा नाम माझे।
बोलोनिया ऐसा उभा भीमातीरी।
नामा निरंतरी चरणाशी॥
लौकिक व्यवहारात सेवक हा स्वामींचे काम करण्यासाठी हात जोडून उभा असतो. पण परमार्थाच्या प्रांतात यापेक्षा वेगळे दृश्य दिसते. म्हणूनच ‘पंढरीचा राजा, उभर भक्तकाजा’ असे वर्णन नामदेवांनी केले. मला वाटते विठ्ठलोपासना हा कर्नाटक व महाराष्ट्र यांच्यातील भावबंध जोडणारा भक्कम सेतू होऊ शकतो.
श्री विठ्ठल साक्षात कैवल्यनायक आहे, भक्त पुंडलिकाच्या दृष्टी सन्मुख उभा आहे. संत नामदेवांच्या अंतरीचा ठेवा असणाऱ्या विठूरायास ‘अनंत’ म्हणतात. कारण अनंत गुणांचा तो सागर आहे.
नामा म्हणे ध्यानी घ्यावे विठोबासी।
अखंड मानसी भजा देवा॥
नामदेवांनी समाजात कर्मकांड-पूजा, मंत्र-तंत्र, बुवाबाजी, दांभिकता, अनीती आणि श्रेष्ठ-कनिष्ठतेने ग्रासलेल्या समाजात आपल्या अभंगातून कीर्तनातून नामस्मरणाचेच महत्त्व पटवून दिले. अंधश्रद्धेपासून लोकांनी दूर राहावे अशी शिकवण दिली. आनंदाचे डोही आनंद तरंग अशी अवस्था असतानासुद्धा जगातले दु:ख संपावे म्हणून आत्मक्लेश सहन करणारे अवतार पुरुष या जगात पुन:पुन्हा जन्म घेत असतात. त्यांची शिकवण आपण आचरणात आणून आपले जीवन समृद्ध केले पाहिजे.
मला एक गोष्ट येथे नमूद करावीशी वाटते की, ज्या मराठी घरामध्ये ज्ञानेश्वरी, भागवत, गाथा ह्यसारखे ग्रंथ नसतील तर ते घर कितीही वैभवसंपन्न असले तरी ते कर्मदरिद्रीच असे म्हणावे लागेल. ज्यांच्या जीवनामध्ये हे ग्रंथ आले ते सुख, समाधान, शांती यांना कधीच वंचित होणार नाहीत.
भागवत धर्माची पताका पंजाबपर्यंत फडकवून, तीर्थयात्रा करून, नामदेव महाराज वयाच्या ऐंशीव्या वर्षी पंढरपूरला परत आले. पंढरपुरी आषाढ महिना, वद्य त्रयोदशी, देहत्याग करण्याचा मनी निश्चय करून विठ्ठलमंदिराची एक एक पायरी उतरले व शेवटच्या पायरीवर बसून मस्तक श्री चरणी ठेवले आणि अनंतात विलीन झाले. ती नामदेवांची पायरी. नामदेव दरवाजा पंढरपुरात अजूनही नामदेवांच्या समíपत विठ्ठलभक्तीची साक्ष देतो.
नामदेवांचे पसायदान
आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा
माझिया सकळा हरिच्या दासा॥१॥
कल्पनेची बाधा न हो कोणे काळी।
ही संत मंडळी सुखी असो॥२॥
अहंकाराचा वारा न लागो राजसा।
माझिया विष्णुदासा भाविकांसी॥३॥
नामा म्हणे तया असावें कल्याण॥
ज्या मुखी निधान पांडुरंग॥४॥
विवेक वैद्य – response.lokprabha@expressindia.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा