कायमच कोरडय़ा ठणठणीत परिसरामुळे फलटण तालुक्यातल्या संतोषगड-वारुगडाची भटकंती सप्टेंबरमध्ये केली काय अन् एप्रिलमध्ये केली काय.. पण तिथे पोहोचल्यावर मात्र सगळा शीण कुठल्या कुठे निघून जातो..

महाराष्ट्रातल्या काही दुष्काळग्रस्त भागांपैकी एक म्हणजे सातारा जिल्ह्य़ातील माण तालुका. हा माण तालुका ऊर्फ माणदेश म्हणजे सदासर्वदा कोरडाच. इथे भर पावसाळ्यात गेलात तरी मे महिन्यासारखा अनुभव यावा. त्यामुळे फलटण तालुक्यातल्या संतोषगड – वारूगडाची भटकंती सप्टेंबरमध्ये केली काय अन् एप्रिलमध्ये केली काय.. फार फरक पडणार नव्हताच. त्यामुळे सप्टेंबरच्या एका रविवारी मी आणि देवेश निघालो ते याच दोन किल्ल्यांचा मागोवा घ्यायला. वास्तविक पठारी प्रदेशात वसलेले हे किल्ले ‘‘बेलाग, बुलंद, राकट, कणखर’’ वगैरे ‘‘टिपिकल’’ सह्य़ाद्रीच्या विशेषणांच्या खात्यात जमा होणारे नाहीत आणि पावसाळ्याचा आजन्म पत्ताच नसल्याने निसर्गसुंदर किंवा सदाहरित या विभागातूनही वगळले गेले आहेत. त्यामुळे डोक्यावर कायमच हुलकावणी देणारं कृष्णमेघांनी भरून गेलेलं आभाळ आणि आसमंतात नावाला उरलेली हिरवळ असाच या प्रदेशाचा एकूण जामानिमा!!! इथला शेतकरी या ढगाळ वातावरणाकडे बघतो आणि तापलेल्या भूमीवर पावसाच्या ऐवजी फक्त त्याच्या डोळ्यातल्या आसवांचीच बरसात होते. बाकी सर्व शून्य!!! पण तरीही या दोन किल्ल्यांचं आकर्षण मात्र कायम होतं. पुण्याहून जेजुरी – नीरा – लोणंद – फलटण असा प्रवास करत संतोषगड पायथ्याच्या ताथवडा गावात पोहोचलो तेव्हा सप्टेंबर असूनही ऊन भाजून काढू लागलं होतं. ताथवडा गावात अतिशय प्रसिद्ध असं बालसिद्ध मंदिर आहे. मंदिराच्या मागून वर गेलेली पायवाट आम्हाला अतिशय सुंदर अशा गर्द झाडीत घेऊन गेली आणि नंतर समोर आला तो संतोषगडाच्या मध्यावर वसलेला एक आश्रम. आश्रमाच्या जवळच एक गुहा असून आतमध्ये थंडगार पाणी आहे. ताथवडा गाव ते आश्रम हा प्रवास फक्त पंधरा मिनिटांचा होता. मठापासून आपण किल्ल्याच्या दिशेने जात असताना भग्न दरवाजांमधून आपल्याला किल्ल्याच्या माथ्यावर प्रवेश करावा लागतो. किल्ल्याच्या एकाही दरवाजाची कमान आज शिल्लक नाही. पण तटबंदी मात्र काही प्रमाणात सुस्थितीत आहे. किल्ल्याच्या माथ्यावर मात्र भरपूर अवशेष आहेत. उल्लेखनीय म्हणजे धान्यकोठाराची वास्तू आणि किल्लेदाराचा भग्न वाडा. संतोषगड एकेकाळी नांदता होता याचे मूक पण उद्ध्वस्त पुरावे. किल्ल्याच्या साधारण मध्यभागी एक विहीरवजा भुयार दिसतं. पण खाली उतरत गेलं की लक्षात येतं हे एक महादेव मंदिर आहे. स्थानिक भाषेत याला तातोबा महादेव म्हणतात असं सांगत गडावर आलेल्या एका गुराख्याने आमच्या ज्ञानात स्वत:हूनच भर घातली. याविषयी एक दंतकथा ऐकायला मिळाली. तातोबा नावाचा एक साधू या डोंगरावर राहत असे. त्याच्या ख्यातीमुळे रोजच भक्तांची गर्दी व्हायची. त्यामुळे त्याला साधनेला वेळ मिळत नसायचा. शेवटी कंटाळून त्याने या डोंगरावर एक विहीर बांधली आणि त्या विहिरीत तो राहू लागला. जेणेकरून लोकांना आपण कुठे आहोत याचा अंदाज येणार नाही. त्यामुळे त्याच्या दर्शनासाठी येणाऱ्या लोकांना साधूबाबा अचानक कुठे गेले हेच कळेना. एक दिवस या डोंगरावर आलेल्या एका गुराख्याला प्रचंड तहान लागली. पण त्याला पाणी कुठे आहे हे माहीत नव्हतं. अचानक त्याच्यासमोर हे तातोबा प्रकट झाले आणि आपल्या कमंडलूमधलं पाणी त्याला प्यायला दिलं आणि अचानक ते अंतर्धान पावले. चकित झालेल्या गुराख्याने आजूबाजूला शोध घेतल्यानंतर त्याला त्या विहिरीत एक शिवमंदिर आणि हे तातोबा दिसले. पुढे त्यांच्या भक्तांनी त्यांचं मंदिर गडावर बांधलं आणि त्यांचंच नाव पायथ्याच्या गावाला दिलं. तेव्हापासून या डोंगराला आणि त्याच्या पायथ्याच्या गावाला ‘ताथवडा’ असं म्हणू लागले. अर्थात ही एक दंतकथा असून याचा कोणताही पुरावा नाही. पण घटकाभर मनोरंजनाची गंमत मात्र यात आहे हे नक्की!!
पुढे ऐतिहासिक संदर्भानुसार शिवाजीमहाराजांनी सातारा प्रांताच्या मोहिमेत या किल्ल्याचं नाव बदलून संतोषगड ठेवलं हे मात्र निश्चित. आज या गडाच्या पिछाडीची तटबंदीसुद्धा बऱ्यापैकी तग धरून उभी आहे. पण दुष्काळी भागात असूनही संतोषगडावर पाणी मात्र मुबलक प्रमाणात आहे.
उन्हं चढू लागली तसं आम्ही ताथवडय़ात परतलो. ताथवडा गावातून वारूगडाच्या पायथ्याच्या गिरवी (जाधववाडी) गावात जाणारा म्हणजेच रस्तात खड्डे की खड्डय़ात रस्ता हेच कळत नव्हते. उजाड.. वैराण माळरान.. रस्ता चुकलो तर सांगायला फक्त वाहता वारा.. पाऊस नसल्याने शेती नाही न शेती नसल्याने शेतकरी नाहीत.. अशातच व्हायचं ते झालं अन् एका वळणाला आम्ही येऊन थबकलो.
वारूगड एखाद्या सम्राटाच्या डोक्यावरचा मुकुट शोभावा तसा भासत होता. बराच वेळ इकडेतिकडे पाहिल्यावर समोरून एक सायकलस्वार तरुण आला अन् आमच्या ‘‘गिरवीला कसं जायचं?’’ या साध्या प्रश्नाचं उत्तर म्हणून कुणीही विचारलेलं नसताना त्याने ‘‘आपण सायकल कशी घेतली ते आत्ता फलटणहून येताना ती पंक्चर कशी झाली’’ हे संपूर्ण प्रवचन पंधरा मिनिटं ऐकवलं आणि मग आमच्या मूळ प्रश्नाला ‘‘गिरवी इथून जवळच आहे.’’ असं उत्तर देऊन तिथून क्षणार्धात अंतर्धान पावला!!
आता मात्र आमची वाटच खुंटली. काय करावं तेच सुचेना!! संपूर्ण रस्ता निर्मनुष्य होता. जणूकाही सरकारने आम्हाला अज्ञातवासात धाडलं होतं. दुपारच्या टळटळीत उन्हाने खरपूस भाजलेल्या कणसासारखी अवस्था झाली होती. बरं फलटणला जाऊन जेवण करून मोगराळे मार्गे वारूगडला जावं तर पुढे पुढे पळणाऱ्या घडय़ाळ्याच्या काटय़ांनी याही विचाराला सुरुंग लावला. शेवटी पुढे गेल्यावर एक आडवा डांबरी रस्ता जो फलटण – गिरवी रस्ता होता तो सापडला आणि उजवीकडे असलेल्या एका पानवाल्याची झोपमोड करण्याचं महत्पाप आम्ही पदरी पाडलं. दुपारच्या वेळी निवांतपणे दुकानातला छोटा पंखा लावून महाराज झोपले होते. रावणाला कुंभकर्णाला जागं करण्यासाठी जितके प्रयत्न करावे लागले नसतील तितके त्याला जागं करण्यासाठी आम्हाला करावे लागले आणि अखेरीस त्याची तपश्चर्या भंग करण्यात आम्ही यशस्वी झालो.
‘‘काये???’’ मारक्या रेडय़ाने गुरगुरावं तशा आवाजात त्याने विचारलं!!
‘‘वारूगडला कसं जायचं??’’ त्याच्या दृष्टीने अतिशय क्षुद्र असा प्रश्न आम्ही विचारला.
‘‘कशाला जायचं तिकडं?? मास्तर हाये का तुमी?? तिथल्या शाळेत शिकवायला आलाय काय??..’’ आता काही वेळाने हा माणूस ‘‘तुमचा पासपोर्ट दाखवा’’ म्हणत आमची झडती घेईल की काय असं वाटू लागलं !!
‘‘आहो मास्तर कसले डोंबलाचे. आम्हीच शिकतोय अजून. किल्ला बघायला जायचंय वारूगडला. रस्ता हवा होता.’’

‘‘हा. मंग ठीके..’’ असं म्हणत त्याने त्या अर्धवट झोपेतच गिरवीचा रस्ता सांगितला आणि त्याला एवढय़ाशा भांडवलावर सोडणं बरोबर वाटेना त्यामुळे त्याच्याकडून गोळ्या – बिस्किटांची थोडीफार खरेदी करून आम्ही तिकडून सुटलो आणि थेट वारूगड पायथ्याला येऊन दाखल झालो. (त्याच्या तोंडाला ‘पानं’ पुसण्याएवढे निर्दयी आम्ही नक्कीच नव्हतो!!)
वारूगड किल्ल्यावर घोडेमाची किंवा वारूगड याच नावाचं एक गाव असून फलटणहून मोगराळे घाटमार्गे इथपर्यंत थेट डांबरी रस्ता आहे. कदाचित विश्वास बसणार नाही पण मुंबईहून थेट वारूगडला मुक्कामी एसटी आहे. इथून वारूगड फक्त पंधरा मिनिटांत गाठता येतो. पण संतोषगड बघून गाडीरस्त्याने वारूगड करायचा असेल तर पुन्हा फलटणला येऊन मग मोगराळेमार्गे वारूगड गाठावा लागतो. गिरवीची जाधववाडी म्हणजे नावाप्रमाणेच जाधव आडनावांची वसाहत. त्यातल्या त्यात एक मोठं घर बघून तिथे गाडी लावली आणि घरातल्या आज्जींचा निरोप घेऊन मळलेली पायवाट तुडवू लागलो. दुपारच्या उन्हातही वारूगडाचा एकांडा पण देखणा किल्ला सुरेख दिसत होता. पायथ्यापासून गडाच्या बालेकिल्ल्याच्या दरवाजाचे बुरुज स्पष्ट दिसतात. वारूगड चढायला एक अशी ठरावीक वाट नाही. जिथे सोपं वाटेल तिकडून चढायचं!!! तरी गावापासून पुढे गेल्यानंतर एक खूप मोठं पठार लागतं. तिथपर्यंत उतरलेल्या सोप्या धारेने तासाभरात आम्ही गडाचा कमान हरवलेला दरवाजा गाठला आणि मगच तिथे विसेक मिनिटं ताणून दिली!!! वारूगड माची अन् बालेकिल्ला अशा दोन भागांत विभागला गेला आहे, माची तटबंदीने युक्त असून तिथे एक छोटं मंदिर आणि पाण्याचं एक जोडटाकं आहे. पाण्याची चव सुरेखच होती. हे टाकं थोडं खालच्या बाजूला असल्याने मस्त थंडावा देणारं होतं. माचीतून छोटी चढण चढून वीस मिनिटांत पडलेल्या दरवाजातून वारूगडचा माथा गाठला आणि वरच्या भैरोबाला दंडवत घातला. वारूगडच्या माथ्यावर एक सदरेची इमारत असून भैरवनाथाचं मंदिर, पाण्याचं टाकं अन् एक चुन्याचा घाणा आहे. तसा पठारी प्रदेशात असल्याने वरून दृश्य एवढं खास नाही. सीताबाईचा डोंगर आणि उजवीकडे अगदी कोपऱ्यात ओळखता आला तर संतोषगड.. इतकाच काय तो पसारा. पण सहजसोप्या चालीने एक सुंदर दुर्ग बघायचा असेल तर वारूगड म्हणजे भन्नाट ऑप्शन!!!
वारूगडचा बालेकिल्ला बघून पुन्हा पाण्याच्या टाक्यापाशी आलो आणि जवळच्या गावातलं एक कुटुंब तिथेच झाडाखाली बसलेलं दिसलं. काही क्षणातच त्यांची हाक ऐकू आली अन् नाव – गाव वगैरे नेहमीच्या प्रश्नांची देवाणघेवाण मायेने दिलेल्या बाजरीची भाकरी – खर्डा आणि वांग्याच्या खमंग भरताबरोबर झाली!!! डोळ्यात पाणी आणून त्यांनी सांगितलेलं इथल्या पाषाणहृदयी निसर्गाबद्दलचं गाऱ्हाणं ऐकताना यांच्याबरोबर हा घास आपल्याही घशाखाली उतरत नसल्याची बोचरी जाणीव काळजाला घरं पडणारी होती. पण निसर्गाच्या लहरीपणानं होणारी गरीब मनांची ससेहोलपट काही क्षणांसाठी का होईना, पण आपल्याला दिलासा देणाऱ्या चार गोड शब्दांनी टाळता येते हेही तितकंच खरं !!!

cm devendra fadnavis prohibiting appointments of private secretaries in government offices
खासगी व्यक्तींच्या नियुक्तीस मनाई; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाने मंत्र्यांना धक्का
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
maharashtra election commissioner news in marathi
राज्य निवडणूक आयुक्तपदाचा आज निर्णय; नितीन करीर, राजीव जलोटा, राजगोपाल देवरा स्पर्धेत
zilla parishad loksatta
राज्यातील सहा जिल्हा परिषद, ४४ पंचायत समितींवर ‘प्रशासक राज’; मुदतवाढ नाहीच
Land revenue exemption continues for heirs of Chhatrapati Shivaji Maharaj including Udayanraje Bhosale
उदयनराजेंसह वारसांना जमीन महसूल सूट कायम, राज्य शासनाचा निर्णय
maharashtra FASTag mandatory all vehicles
विश्लेषण : राज्यात १ एप्रिलपासून सर्व वाहनांना फास्टॅग बंधनकारक… नेमके काय होणार?
devendra fadanvis
३५०० एकर जमिनीचे १०० दिवसांत वितरण; ‘एमआयडीसी’च्या भूखंडांबाबत मुख्यमंत्र्यांचे आदेश
Sachin | M| Maharashtra Sadan free for literary conference Nagpur news aharashtra Sadan free for literary conference Nagpur news साहित्य संमेलनासाठी महाराष्ट्र सदन मोफत (लोकसत्ता टीम)Tendulkar and Raj Thackeray
साहित्य संमेलनासाठी महाराष्ट्र सदन मोफत
Story img Loader