नरहर कुरुंदकर हे महाराष्ट्रातील ख्यातकीर्त विचारवंत. १९८२ साली त्यांचे निधन झाले. त्यांच्या स्मृती स्मारकाच्या रूपाने चिरंतन राहाव्यात या कल्पनेतून ‘नरहर कुरुंदकर प्रतिष्ठान’चा जन्म झाला. प्रतिष्ठानचे विश्वस्त व कुरुंदकरांचे विद्यार्थी, चाहते यांच्या आíथक सहकार्यातून २०१० साली नरहर कुरुंदकर प्रगत अध्ययन व संशोधन केंद्राच्या कामाला सुरुवात झाली. या केंद्रासाठी नांदेड एज्युकेशन सोसायटीने जागा उपलब्ध करून दिली असली तरी अजूनही बांधकाम सुरू व्हायचे आहे.
सध्या नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या स्वामी रामानंद तीर्थ संशोधन केंद्रात या अभ्यास केंद्राचे (स्टडी सेंटर) काम सुरू आहे. या स्टडी सेंटरचा संकल्पित आराखडा तयार आहे. सध्या हा स्टडी सेंटरचा उपक्रम नरहर कुरुंदकर प्रतिष्ठान व नांदेड एज्युकेशन सोसायटीचा संयुक्त उपक्रम आहे. या अभ्यास केंद्रात कुरुंदकरांच्या आस्थेचे जे विषय आहेत त्या सर्व विषयांच्या प्रगत अभ्यासाची सोय करण्याची योजना आहे. प्रतिष्ठानच्या अध्यक्ष आणि कुरुंदकरांच्या कन्या श्यामल पत्की यांनी भविष्यातल्या योजनांबद्दलही माहिती दिली. पश्चिम भारतात या विषयात मूलभूत संशोधन करणाऱ्या संस्थांची वानवा असल्याने समाजातल्या सर्वच घटकांना सहभागी करून घेत हा उपक्रम अधिक व्यापक करण्याचा प्रतिष्ठानचा मानस आहे. या अभ्यास केंद्रातर्फे वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करणाऱ्या संशोधकांना त्यांच्या संशोधन प्रकल्पासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. आतापर्यंत संस्थेतर्फे विविध विषयांत आठ संशोधन वृत्ती प्रदान केल्या आहेत. मुख्य म्हणजे संशोधकांना शैक्षणिक अर्हतेची अट नाही. त्यामुळे संशोधक पदव्युत्तर असला पाहिजे, असेही नाही. पठडीतील संशोधन कार्यापेक्षा या कामाचे स्वरूप वेगळे आहे. आतापर्यंत संशोधन वृत्तीतून झालेल्या संशोधनाचे स्वरूप पाहिले तरीही या कामाची व्याप्ती लक्षात येऊ शकते. संत दासोपंतांच्या पदरचनांचा सांगीतिक व वाङ्मयीन अभ्यास, मराठय़ांचा इतिहास, कुरुंदकरांची भूमिका असे विविध संशोधन प्रकल्प या संशोधन केंद्रांतर्गत झाले आहेत, काहींची कामे सुरू आहेत.
भविष्यकाळात संशोधकांची गरज लक्षात घेऊन एका अद्ययावत डिजिटल लायब्ररीची उभारणी करायची आहे. एका संशोधन पत्रिकेचाही मानस आहे. सध्या कुरुंदकर स्मारकाचा जो संकल्पित आराखडा आहे तो कुरुंदकरांच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव या वास्तूत प्रवेशल्यानंतर यावा असा आहे. भूमितीच्या साध्यासोप्या सिद्धान्तावर आधारित व तर्काचा अनोख्या पद्धतीने आधार घेत या वास्तूचे आराखडे तयार करण्यात आले आहेत. स्मारकात अध्ययन कक्ष, सेमिनार हॉल, ग्रंथालय, सभागृह, खुले रंगमंच, चर्चा करण्यासाठी पोषक वाटणारे चौक आदी घटकांचा समावेश करण्यात आलेला आहे. नांदेड परिसरात मुबलकपणे आढळणाऱ्या दगडी बांधकामात ही वास्तू निर्माण करण्याचे नियोजित आहे. सरकारने सुरुवातीला स्मारकासाठी दोन कोटी रुपयांची तरतूदही अर्थसंकल्पात केली, पण आता आठ कोटींच्या घरात हा सर्व खर्च जाऊन पोहोचला आहे. केवळ बांधकाम झाले आणि स्मारकाची इमारत उभी राहिली म्हणजे काम संपले असे नाही. संगणक, फíनचर अशा अनेक गोष्टींसाठी निधी लागणार आहे. याशिवाय शाश्वत अशा स्वरूपाचा निधी उभारावा आणि त्या निधीच्या व्याजातूनच स्मारकाची देखभाल व सर्व खर्च केला जावा, अशी ही कल्पना आहे. या संदर्भात श्यामल पत्की म्हणाल्या, ‘संस्थेचे पदाधिकारी व संचालक कोणत्याही मानधनाशिवाय सेवाभावी वृत्तीने, पदरचे पसे टाकून हितचिंतकांच्या देणगीतून काम भागवत आहेत. सध्या दैनंदिन खर्च चालवत असतानाच निधी संकलनाच्याही गोष्टीकडे लक्ष द्यावे लागते. त्यातून कामात अडथळे येतात. गुरुजींचे विद्यार्थी, चाहते आणि त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या अनेकांनी मदत केली असली तरीही या सर्व गोष्टींना मर्यादा आहेत. अर्थात ज्यांनी सहकार्य केले त्यांच्याविषयीची मनोमन कृतज्ञता आहे, पण जोवर शाश्वत निधी उभारला जात नाही आणि स्मारकाचे काम तातडीने पूर्ण होत नाही तोवर संस्थेच्या मूलभूत कार्याला गती येणार नाही.
संस्थेपर्यंत कसे जाल?
नांदेड बस स्थानक आणि रेल्वे स्थानकापासून ही संस्था साधारणत: दोन किमी अंतरावर आहे. संस्था शहरातच आहे. ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी’ एवढा पत्ता सांगितला तरी संस्थेपर्यंत पोहोचता येते.