सोमवार पेठेतील छोटय़ाशा घरात लावलेल्या आधार आश्रमरूपी रोपटय़ाचे आज गोदाकाठी वटवृक्षात रूपांतर झाले आहे. आश्रयास आलेल्या दोन बालिकांना घेऊन सुरू झालेला प्रवास सध्या १५० बालकांपर्यंत विस्तारला आहे. कार्यविस्तारामुळे जागा अपुरी पडू लागली. तेव्हा नगरपालिकेने ९९ वर्षांच्या कराराने गोदा काठावर मध्यवस्तीत जागा उपलब्ध करून दिली. या ठिकाणी उभारलेल्या भव्य इमारतीतून सध्या संस्थेचे कार्य सुरू आहे. सध्या आधाराश्रमात विविध वयोगटातील १५० बालके असून त्यात १४ जन्मत: अपंग बालकांचा समावेश आहे.
आश्रमात बालक दाखल झाल्यानंतर पालकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जातो. एका विशिष्ट कालावधीत पालक न आल्यास त्यांची जबाबदारी सर्वस्वी आधाराश्रमावर येते. राज्य शासनाने आधाराश्रमास बालगृह म्हणून मान्यता दिली आहे. शून्य ते सहा वयोगटातील मुले-मुली आणि सहा ते बारा वर्षांतील मुलींचा सांभाळ या ठिकाणी केला जातो. केंद्र सरकारने आश्रमाला शिशु संगोपन केंद्र आणि ‘स्पेशल अॅडॉप्शन एजन्सी’ म्हणून मान्यता दिली आहे. बालकांचे संगोपन व आरोग्यरक्षणासाठी परिचारिका, सेविका, काळजीवाहक व तत्सम कर्मचारी अविरतपणे कार्यरत आहेत. सेवाभावी डॉक्टर बालकांची नियमित तपासणी करतात. अपंग बालकांसाठी फिजिओथेरेपी केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. नियमित उपचारांमुळे अपंग बालकांच्या प्रकृतीत व प्रगतीत निश्चितच सुधारणा होते. या व्यतिरिक्त मानसोपचार, समुपदेशन आणि संगीतोपचार केंद्र येथे असून त्याचा बालकांच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम झाला आहे. मुले दत्तक देऊन मुलांना पित्याची छाया, मातेची माया आणि हक्काचे घर मिळवून देणे हे संस्थेचे महत्त्वाचे कार्य. संस्थेने पालकांचे प्रबोधन करून मागील काही वर्षांत मुलांपेक्षा मुली जास्त संख्येने दत्तक दिल्या आहेत. जन्मत: अपंग असणाऱ्या बालकांना दत्तक घेण्याची भारतीय पालकांची मानसिकता नसते. यामुळे अलीकडेच संस्थेतील तीन अपंग बालके सेंट्रल अॅडॉप्शन रिसोर्स अॅथोरिटीच्या माध्यमातून परदेशातील पालकांच्या कुशीत विसावली आहेत. अद्याप या स्वरूपाची अकरा मुले पालकांच्या प्रतीक्षेत आहेत.
आश्रयार्थ दाखल झालेल्या बालकांच्या शिक्षणाचा श्रीगणेशा आश्रमातील मुकुंद बालमंदिर बालवाडीच्या माध्यमातून होतो. प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या मुलींना मोहिनीदेवी रुंग्टा प्राथमिक विद्या मंदिरात तर माध्यमिक शिक्षणासाठी पुष्पावती रुंग्टा कन्या विद्यालयात शिक्षण दिले जाते. आश्रमकन्यांच्या शिक्षणाप्रमाणेच त्यांच्यातील कलागुणांचाही विकास व्हावा यासाठी सरस्वती संगीत साधना वर्ग चालविण्यात येतो. हस्तकौशल्य, चित्रकला व नृत्य या विषयाचेही प्रशिक्षण दिले जाते.
बालकांप्रमाणे हुंडाग्रस्त, परित्यक्ता, निराधार अशा महिलांना अन्न, वस्त्र, निवारा तसेच व्यवसायोपयोगी शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. महाराष्ट्र शासनाने आश्रमास आधारगृह (पूर्वीची माहेर योजना) योजनेसाठी मान्यता दिली आहे. २५ महिलांसाठी ही व्यवस्था आहे. या व्यतिरिक्त बाहेरगावाहून आलेल्या, शहरात नोकरी करणाऱ्या महिलांसाठी आधाराश्रमाने कर्मचारी महिला वसतिगृहाची उभारणी केली आहे. अत्यल्प दरात कर्मचारी महिलांना निवास सुविधा या ठिकाणी उपलब्ध झाली आहे. यात्रा, रेल्वे व बस स्थानक वा अन्यत्र हरवलेल्या व संस्थेत दाखल झालेल्या बालकांच्या पालकांचा शोध घेऊन त्यांना पालकांच्या ताब्यात परत देणे हे काम संस्था करते. कौटुंबिक समस्यांमुळे आश्रमात आलेल्या विवाहितांना धीर देऊन, त्यांच्या कुटुंबीयांचे प्रबोधन करून मनोमीलन घडवून आणणे व त्यांचे सन्मानाने पुनर्वसन करण्याचे कार्य संस्था करत आहे. परदेशी दत्तक गेलेल्या तसेच आश्रमकन्यांचे विवाह झाल्यानंतरही अनेक जणी आश्रमास आवर्जून भेट देतात.
श्वानांच्या कचाटय़ात सापडल्याने हात गमवावा लागलेला पण नंतर पालक लाभलेला मुलगा आज एका बँकेत व्यवस्थापक पदाची धुरा सांभाळत आहे. दहा महिन्यांची असताना स्वीडनमध्ये दत्तक गेलेली बालिका ३४ वर्षांची झाल्यावर सहकुटुंब आश्रमात आली. सर्वाची आस्थेने विचारपूस करून तिने आर्थिक मदत केली. बारा वर्षांची असताना परदेशी दत्तक गेलेली अन्य एक मुलगी अनेक वर्षांनंतर आपल्या मुलीसमवेत भेटीला आली. जिथे आपले बालपण गेले, ते ठिकाण पाहून तिच्या डोळ्यांत पाणी तरळले. आधाराश्रम आणि निराधार बालके यांचे दृढ नाते दर्शविणारी अशी कित्येक उदाहरणे आहेत.
आगामी काळात वृद्धाश्रम सुरू करण्याचा संस्थेचा संकल्प आहे. त्यासाठी जागा मिळविण्याचे प्रयत्न सुरू असून आर्थिक मदतीची गरज आहे. विद्यार्थिंनींच्या शिक्षण खर्चापासून ते एकवेळचे जेवण, नाश्ता यासाठीही मदतीची गरज आहे. या व्यतिरिक्त एका मुलीचा विवाह खर्च, गृहोपयोगी वस्तू, भांडी, फर्निचर, कपडे, खेळणी, इमारत देखभाल निधी, औषधोपचार आदींसाठी देणगीच्या रूपात मदत करता येईल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा