वरोरा म्हटले की, सर्वाच्या ओठावर बाबा आमटेंच्या आनंदवनाचे नाव येते. याच आनंदवनाच्या मुख्य प्रवेशदारासमोर झाडांच्या गर्दीत ज्ञानदा वसतिगृहाची छोटेखानी वास्तू उभी आहे. शिक्षणक्षेत्रात चमकू पाहणाऱ्या, पण परिस्थितीमुळे ते शक्य नसलेल्या अनाथ हिऱ्यांना कोंदण घालण्याचे काम गेल्या ४३ वर्षांपासून ‘ज्ञानदा’त अव्याहतपणे सुरू आहे. विद्यार्थी सहायक समितीच्या माध्यमातून उपलेंचवार सरांनी सुरू केलेल्या ‘ज्ञानदा’ या लहानशा रोपटय़ाचे आता वटवृक्षात रूपांतर झाले आहे. १९७१ ला केवळ १५ विद्यार्थ्यांना सोबत घेऊन हे वसतिगृह सुरू झाले. दरवर्षी २०० विद्यार्थ्यांना या वसतिगृहात प्रवेश मिळतो.
सरांनी आरंभापासून विद्यार्थी निवडीचे सूत्र निश्चित केले आहे. ही निवड करताना जात पात, धर्म काहीही बघायचे नाही. विद्यार्थी गरीब असला पाहिजे. त्याच्यात शिकण्याची जिद्द असायला हवी. तो होतकरू असावा, अशी सरांची अपेक्षा असते. या वसतिगृहात विद्यार्थ्यांची आर्थिक कुवत लक्षात घेऊन नाममात्र शुल्क आकारले जाते. विद्यार्थी हुशार आहे, पण पैसे भरण्याची ऐपत नाही, हे लक्षात आले तर त्याचे शुल्क संस्थेकडून भरले जाते. आईवडील नसलेल्या विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जातो.
ज्ञानदाकडून हुशार विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत दिली जाते. सध्याच्या घडीला दहा लाख रुपये मदतीच्या स्वरूपात दिले जातात. गेल्या ४३ वर्षांत एक हजार विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या ज्ञानदाने आजवर ४०० विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मदत केली आहे. या वसतिगृहातून शिकलेले विद्यार्थी व्यवस्थापन शाखेत नावाजलेले आहेत. ५० पेक्षा जास्त विद्यार्थी डॉक्टर आहेत, अभियंते आहेत. शिक्षक व प्राध्यापक आहेत. जगातल्या नऊ देशात ‘ज्ञानदा’चे विद्यार्थी विखुरलेले आहेत.
कोणतेही शासकीय अनुदान न घेता विद्यार्थ्यांच्या निवास व भोजन व्यवस्थेचा खर्च करणाऱ्या, तसेच उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत करणाऱ्या ‘ज्ञानदा’ची वार्षिक उलाढाल आता एक कोटी २० लाखावर गेली आहे. या संस्थेला निवास, भोजन व शिक्षण शुल्कासाठी वर्षांला ३५ लाख रुपये लागतात. त्यातले दहा लाख रुपये संस्थेचे माजी विद्यार्थी देतात. वरोरा व आजूबाजूच्या परिसरातील अनेक देणगीदार दहा लाख रुपये देतात. कुणी वाढदिवसाच्या निमित्ताने एक अथवा दोन जेवणाची जबाबदारी उचलतो, तर कुणी आईवडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देणगी देतात. मुंबईत ‘केअरिंग फ्रेंडस’ नावाचा देणगीदारांचा एक गट आहे. या गटाकडून दरवर्षी १७ लाखरुपयांची देणगी मिळते. याशिवाय, देशविदेशात स्थायिक झालेले अनेक भारतीय दरवर्षी किमान ३५ लाखाची देणगी देतात.
उपलेंचवार सर आता प्राध्यापक म्हणून निवृत्त होऊन १९ वर्षे लोटली आहेत. गेल्या ४३ वर्षांपासून त्यांनी स्वत:चे जीवन या वसतिगृहासाठी वाहून घेतले आहे. केवळ तेच नाही, तर त्यांच्या पत्नी वीणा यांनीही संस्थेची जबाबदारी उचलली आहे. या संस्थेत एकूण १५ कर्मचारी मानधन तत्त्वावर काम करतात. मानधन जास्त देऊ शकत नाही, याची जाणीव असल्याने या १५ कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी संस्थेने उचलली आहे. स्वत: उपलेंचवार सरांनी आपली सारी मिळकत या संस्थेला देऊन टाकली आहे. या संस्थेत आता विद्यार्थ्यांसाठी एक उत्कृष्ट संगणक प्रशिक्षण केंद्र सुरू झाले आहे. या केंद्रात केवळ वसतिगृहातील विद्यार्थीच नाही, तर बाहेरच्या विद्यार्थ्यांना, महिलांना, मुलींना सुद्धा नाममात्र शुल्क घेऊन प्रवेश दिला जातो. स्पर्धा परीक्षा क्षेत्रात चांगले नाव असलेल्या जळगावच्या दीपशिखा संस्थेतर्फे सर्व अभ्यासक्रम या केंद्राला कोणतेही शुल्क न घेता पुरवला जातो. या केंद्रातही बाहेरच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. या केंद्रात व वसतिगृहात आनंदनिकेतन महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी शिकवणी घेतात.
संस्थेतर्फे दरवर्षी राज्यातील एका समाजसेवकाला ‘ध्येयवादी कार्यकर्ता’ पुरस्कार दिला जातो. ५१ हजाराच्या या पुरस्काराची रक्कम भद्रावतीचे श्रीधरराव पद्मावार देतात. या पुरस्काराच्या निमित्ताने होणारा सोहळा म्हणजे माजी विद्यार्थ्यांंचे स्नेहमीलन असते. देशविदेशात नोकरी करणारे झाडून सारे विद्यार्थी या सोहळ्याला एकत्र येतात. दरवर्षी जानेवारीत होणाऱ्या या स्नेहमीलनाच्या वेळी संस्थेच्या कामाचा आढावा घेतला जातो व विस्ताराचा कार्यक्रम निश्चित केला जातो. आता ‘ज्ञानदा’ संचालित करणाऱ्या संस्थेत उपलेंचवार सरांनी अनेक माजी विद्यार्थ्यांचा समावेश केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संस्थेपर्यंत कसे जाल?
मध्य रेल्वेवर नागपूर हे अत्यंत महत्त्वाचे ठिकाण आहे. देशात कोणत्याही ठिकाणावरून येथे येता येते. नागपूरला उतरल्यानंतर वरोरा १०० कि.मी. अंतरावर असून ज्ञानदा वसतिगृह आनंदवन प्रकल्पाच्या अगदी समोर आहे.

मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sarvakaryeshu sarvada