डॉ. गोपाळ रायते यांना फोन केला. मालाडच्या अहिंसा संस्थेत प्रमुख पशुवैद्य म्हणून सुरुवातीपासून सेवाभावाने काम करतात. महापालिकेच्या कोंडवाडय़ाच्या जागेत, एका बाजूला अहिंसाचं हे केंद्र आहे. कधी काळी इथे डम्पिंग ग्राऊंड होतं. अजूनही एका बाजूला, कठडय़ापलीकडे कचरापट्टी आहेच.
‘याच ठिकाणी मुंबई महापालिकेचा ‘कत्तल’खाना होता’.. अहिंसाच्या त्या शुश्रूषा केंद्रात सहज आजूबाजूला नजर फिरवत असतानाच डॉ. रायते बोलून गेले आणि मी त्यांच्याकडे बघितलं. त्यांनी दिलेली माहिती ऐकून मी क्षणभर गोठून गेलो.
‘इथे एक चेंबर होतं. खोल खड्डय़ात तांब्याचा पत्रा होता, त्यात विद्युतप्रवाह सोडलेला. कुत्री घेऊन पालिकेची गाडी इथे यायची आणि त्या कुत्र्यांना खड्डय़ात ढकललं जायचं. एकच क्षीण किंकाळी ऐकू यायची’.. डॉ. रायते पुढे बोललेच नाहीत.
मी आजूबाजूला पाहिलं. वेगवेगळ्या पिंजऱ्यांमध्ये जखमी अवस्थेत ठेवलेली कुत्री-मांजरं, डॉ. रायतेंचा आवाज ऐकून कुईकुई करू लागली होती. डॉक्टर एका पिंजऱ्यापाशी जाऊन थांबले.. मीही मागोमाग जाऊन तेथे उभा राहिलो.
त्या जखमी कुत्र्याच्या डोळ्यात अपार प्रेम दाटलं होतं. डॉक्टरांनी पिंजऱ्याचं दार उघडलं आणि त्याच्या पाठीवरून हात फिरवला. ..एका पिंजऱ्यात एक दांडगा कुत्रा जखमी अवस्थेत, केविलवाण्या नजरेनं डॉक्टरांकडे पाहात होता. बोरिवलीच्या संजय गांधी उद्यानाजवळच्या एका वस्तीतला हा कुत्रा. एका रात्री बिबटय़ानं त्याच्यावर हल्ला केला. तो खूप जखमी झाला होता. नंतर काही स्थानिकांनी त्याला इथे आणून सोडलं. सतरा टाके घालून त्याची जखम शिवली. तो जगलाय.. आता तब्येत सुधारली की पुन्हा त्याला त्याच्या वस्तीत नेऊन सोडायचंय.. त्याच्या कपाळावर हात फिरवत डॉक्टर बोलत होते.
पुढे एका पिंजऱ्यात एक टोळीच पहुडलेली होती. काही आडदांड, काही हडकुळी.. ‘ही सगळी आंधळी आहेत.. त्यांना आता बाहेर सोडता येणारच नाही. आम्ही त्यांना सांभाळणार’.. डॉक्टर म्हणाले.
अहिंसाच्या या केंद्रात जवळपास तीनशे पिंजरे आहेत. त्यापैकी अडीचशे पिंजऱ्यांत कुत्री-मांजरं पहुडलेलीच होती. काहींना पालिकेच्या कर्मचाऱ्यांनीच आणून सोडलं होतं. प्रत्येक पिंजऱ्याबाहेर त्या प्राण्याची माहिती देणारा तक्ता.. कुठून आणलं, काय झालंय, उपचार काय सुरू आहेत वगैरे..
काही कुत्र्यांची निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया झालेली. त्यांना काही दिवसांत पुन्हा त्यांच्या त्यांच्या वस्तीत सोडायचं असतं. दुसरीकडे सोडलं, तर नवख्या वस्तीत ती रुळत नाहीत, शिवाय तेथील भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात कधी कधी जीवही गमावतात.. म्हणून त्यांना पुन्हा सुरक्षित सोडायचं कामही संस्थेचेच कर्मचारी करतात. पुढे काही दिवस, त्या त्या भागात जाऊन येतात. सोडलेलं ते कुत्रं, तिथे नीट रुळलंय याची खात्री करून घेण्यासाठी!
हाती असलेल्या निधीतून दररोज अडीचशे-तीनशे प्राण्यांचं खाणंपिणं, १७ कर्मचारी आणि तीन पशुवैद्यकांचं मानधन, इमारत देखभाल असा खर्च धरला, तर महिन्याकाठी तीन ते साडेतीन लाख रुपये उभे करावेच लागतात. केंद्राच्या ओपीडीमध्ये बाहेरचे प्राणी उपचारासाठी येतात. त्यांच्याकडून नाममात्र फी आकारली जाते. कधी कधी शस्त्रक्रियाही केल्या जातात. ज्यांना पैसे देणं परवडतं, त्यांच्याकडून हजार-पाचशे रुपये घेतो, पण प्राणी जगवणं महत्त्वाचं.. त्यामुळे पैशासाठी आम्ही कुणाला परत पाठवत नाही.. पालिकेकडून जवळपास ४० लाख रुपये मिळायला हवेत. पण’.. डॉक्टरांनी बोलणं अर्धवटच थांबवलं.
पालिकेने निर्बीजीकरणासाठी आणून सोडलेल्या एका कुत्र्यामागे साडेतीनशे रुपये द्यावेत असा न्यायालयाचा आदेश आहे. त्याचे आजवरचे जवळपास ४० लाख रुपये मिळालेले नाहीतच पण शस्त्रक्रियेनंतरच्या उपचारांचा खर्चही अहिंसाच करते. अशा प्रत्येक कुत्र्यामागे जवळपास बाराशे रुपये खर्च येतो, पण निधीअभावी सेवा थांबवायची नाही, असा अहिंसाचा निर्धार आहे. केंद्राचा फेरफटका मारून आम्ही पुन्हा डॉक्टरांच्या केबिनकडे यायला निघालो. अहिंसाच्या कायमस्वरूपी रहिवाशांची पंगत अंगणात बसली होती. काही कुत्री, काही मांजरं घोळका करून एकत्र बसली होती..
आणि पंगत सुरू झाली. सहजीवनाचं एक आगळं चित्र अहिंसाच्या अंगणात उमटलं होतं.
संस्थेपर्यंत कसे जाल?
पश्चिम रेल्वेवरील मालाड स्थानकावर उतरल्यानंतर पश्चिमेला जायचे. काचपाडा परिसरात मूव्हीटाइम या मल्टिप्लेक्सनजीक ‘अहिंसा’ या संस्थेचे कार्यालय आहे.