विशेष मुलांसाठी शाळा सुरू करावी, या हेतूने मीनाताई इनामदार जागेच्या शोधात होत्या. ही गोष्ट आहे १९८० सालातली; विशेष मुलांसाठीची शाळा ही कल्पना ऐकल्यावर लोक दारच लावून घ्यायचे. या कामात मीनाताईंना नलिनी कर्वे या मैत्रिणीची सोबत होती; पण खूप वणवण करूनही जागा मिळत नव्हती. अखेर प्रभात रस्त्यावर कर्नाटक हायस्कूलजवळ असलेल्या भोंडे कॉलनीत एक छोटी जागा रोज काही तासांसाठी वापरायला मिळाली. भाडय़ापोटी दोनशे रुपये कोठून आणायचे, हा प्रश्न पुन्हा उभा राहिला. कशी तरी तोंडमिळवणी सुरू झाली आणि विशेष मुलांसाठी ‘जीवनज्योत मंडळ’ हा ट्रस्ट स्थापन होऊन शाळा सुरू झाली.. गेली चौतीस वर्षे विशेष मुलांसाठी लक्षणीय कार्य करीत असलेल्या पुण्यातील जीवनज्योत मंडळाच्या कामाला आरंभ झाला तो असा.
मीनाताई मूळच्या मीना गोपाळ जोगळेकर. संरक्षण खात्यात नोकरीला असलेल्या रामचंद्र इनामदार यांच्याशी त्यांचा विवाह झाला आणि १९६२ मध्ये त्या पुण्यात आल्या. वर्षभराने संसारात मुलाचे आगमन झाले, त्याचे नाव विजय. पुढे नऊ वर्षांनंतर संसारात एका कन्येचे आगमन झाले, तिचे नाव सुजाता. महिनाभरातच लक्षात आले की, सुजाता ‘विशेष मुलगी’ आहे. त्यातून सावरताना बराच कालावधी गेला; पण हळूहळू मीनाताई सावरल्या. त्यांनी सुजाताला ‘कामायनी’ या विशेष मुलांच्या शाळेत दाखल केले. त्यांनीही संस्थेतर्फे चालवल्या जाणाऱ्या ‘डिप्लोमा इन टीचिंग मेंटली रिटार्डेड’ या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊन पूर्ण केला.
विशेष मुलांसाठी शाळा सुरू करण्याचा निश्चय त्यांनी याच कालावधीत केला. हळूहळू मुलांची संख्या वाढू लागली. त्यामुळे जागाही कमी पडू लागली. अॅड. शांताराम जावडेकर या वेळी पुढे आले आणि त्यांनी कर्वे रस्त्यालगत असलेल्या तरटे कॉलनीतील महादेवराव तरटे यांचा एक मोकळा भूखंड नव्याण्णव वर्षांच्या कराराने शाळेसाठी मिळवून दिला. संस्थेला मिळालेली ही जागा अगदी पडीक अशा स्वरूपाची होती. आंब्याच्या झाडाखालच्या पारावर शाळा सुरू झाली. हळूहळू परिस्थिती सुधारू लागली. शाळेला शासकीय अनुदान सुरू झाले. मुलांची संख्या वाढली. या कामाची गरज लोकांना पटली. पुढे १९८५ मध्ये रामचंद्र इनामदार यांनी याच कामासाठी पूर्ण वेळ देण्याचा निर्णय घेतला.
विशेष मुलांच्या सर्वागीण विकासासाठी जीवनज्योत मंडळातर्फे पाच प्रकारची कामे सुरू आहेत. विशेष मुलांसाठी बालमार्गदर्शन केंद्र, कै. ज. र. तरटे मुक्तशाळा, व्यवसाय प्रशिक्षण केंद्र, पालक मार्गदर्शन केंद्र आणि जीवनज्योत वसतिगृह असे या कामांचे स्वरूप आहे. सहा मुलांनिशी सुरू झालेल्या शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या आता १६० वर गेली आहे. विशेष मुलांना शिक्षण देण्याचा हेतू त्यांची बौद्धिक प्रगती व्हावी असा नसतो. विशेष मुलांचा वेळ आनंदात जावा, त्यांना एकाकीपण जाणवू नये, स्वत:च्या शारीरिक गरजा त्यांना ओळखता याव्यात, थोडे व्यवहारज्ञान यावे, एकाग्रता यावी, दैनंदिन व्यवहार सुलभपणे करता यावेत असा या मुलांना शिक्षण देण्याचा उद्देश असतो. त्यासाठी निरीक्षण केले जाते, त्यांचे शारीरिक वय, त्यांचा बुद्धय़ांक आणि त्यांचे मानसिक वय निश्चित केले जाते आणि त्यानुसार त्यांना संस्थेत शिक्षण दिले जाते.
मुक्तशाळेनंतरचा पुढचा टप्पा आहे व्यवसाय प्रशिक्षण केंद्राचा. अठरा वर्षांवरील आणि पन्नास ते साठ बुद्धय़ांक असलेली मुले-मुली इथे आहेत. कापडी पिशव्या शिवणे, भरतकाम, पर्स तयार करणे, कागदी पिशव्या तयार करणे, मेणबत्त्या, तोरणे, फुलांच्या माळा, शुभेच्छापत्र, राख्या तयार करणे, साबणाची पावडर तयार करणे असे अनेकविध प्रकारचे प्रशिक्षण मुलांना दिले जाते. या वस्तू तयार केल्याबद्दल त्यांना थोडे विद्यावेतनही दिले जाते. या वस्तू लोकांसमोर याव्यात यासाठी प्रदर्शने भरवली जातात. चकली, लाडू, शंकरपाळे असे फराळाचे पदार्थही उद्योग केंद्रात वर्षभर तयार केले जातात आणि उद्योग केंद्रातील सर्व वस्तूंना, खाद्य पदार्थाना, कलाकुसरीच्या वस्तूंना वर्षभर चांगली मागणीदेखील असते.
शाळा, उद्योग केंद्राबरोबरच पौड रस्त्यावर जीवनज्योत मंडळाने स्वतंत्र वसतिगृहदेखील सुरू केले आहे. आता इथे राहणाऱ्या मुला-मुलींची एकूण संख्या आहे चाळीस. या मुलांना रोज वसतिगृहातून शाळेत नेण्या-आणण्यासाठी बसची सोय आहे. पुण्याच्या विविध भागांतून जी मुले शाळेत येतात त्यांच्यासाठी देखील बसची व्यवस्था आहे.
संस्थेपर्यंत कसे जाल?
संस्थेत कर्वे रस्त्यावरून किंवा प्रभात रस्त्यावरून जाता येते. प्रभात रस्त्याने गेल्यास कमला नेहरू उद्यानाकडून येणाऱ्या चौकातून केतकर पथाने कर्वे रस्त्याकडे जायला लागायचे. त्याच्या पुढच्या गल्लीच्या तोंडाशीच जीवनज्योत मंडळाचा फलक दिसतो.