सौम्या आजकाल फारच शांत झाली होती. तिच्या वागण्यातला बदल आईच्या लक्षात येत होता. कारण ४-५ वर्षांची असताना सौम्या खूप बडबडी होती. श्लोक, प्रार्थना, बडबडगीते म्हणण्यात, म्हणून दाखवण्यात पुढे असायची. शाळेतील वेगवेगळय़ा उपक्रमात, स्पर्धामध्ये उत्साहाने भाग घेत असे. नंबर मिळवत असे. वयात आल्यामुळे सौम्या हिरमुसली, शांत झाली असा रेवतीचा समज झाला. परवा तर बुद्धिवर्धन शिबिराला जाण्यासाठी विचारताच फणकारली. ‘आई, मला कुठल्याही शिबिराला जायचेच नाही. तू आग्रह करू नकोस ना, प्लीज.’ रेवती उत्तरली. ‘अगं, तुझ्यासारख्या खूप मुली असणारेत तिथे. नवीन गोष्टी शिकता येतील. शिवाय ट्रेकिंगचाही अनुभव देणार आहेत. स्वत:ची कामे स्वत: करण्याची सवय पण होईल. हो आणि आता थोडं धाडसी बनायलाच हवं तुला सौम्या..’ आईचे बोलणे शांतपणे ऐकून रागाने बघत तिथून निघून गेली. पण काहीही असले तरी मी शिबिराला जाणार नाही, हे नक्की.
तीन-चार दिवसांनंतर ऑफिसला निघताना रेवतीने सौम्याला हाक दिली, ‘अगं, बाबा सकाळी विचारत होते की शिबिराचे पैसे भरलेस का?’
‘एकच गोष्ट मला पुन्हा पुन्हा विचारू नकोस.’
अलीकडे पाच-सहा महिन्यांत सौम्या चिडखोर झाली होती. मागच्या दोन सुट्टय़ांमध्ये डान्स क्लास, लाठीकाठी शिकल्यामुळे तिला मामाकडे सुट्टीला जाता आले नव्हते. त्यामुळे कदाचित सौम्या नकार देत असेल, असा रेवतीचा समज झाला.
सौम्याच्या काळजीने रेवती अस्वस्थ झाली. बँकेत काम करतानाही तिचे मन स्थिर नव्हते. हा प्रकार तिची सहकारी नीरजाच्या लक्षात आला. ‘रेवती, राजनबरोबर वाद घालून आलीस की काय आज?’ असे विचारताच रेवती भानावर आली. ‘नाही गं, सांगेन नंतर, असे म्हणून कॉम्प्युटरवर काम करू लागली.’
संध्याकाळी घरी आल्यानंतर, फ्रेश होऊन नीरजला फोन केला. नीरजा आणि रेवती खास मैत्रिणी, त्यामुळे सौम्याविषयी रेवतीने नीरजाला सांगितले. बँकेतील लेडीज स्टाफ आपल्या नऊ ते पंधरा वयोगटातील मुलांसोबत बुद्धिवर्धन शिबिराला जाण्याचे ठरवत होत्या. परंतु अर्णव लहान असल्याने रेवती शिबिराला जाणार नव्हती. सौम्याला तर तिला शिबिराला पाठवायचे होते.
नीरजा तशी कुटुंबवत्सल, प्रेमळ. मुलांशी छान गप्पा मारणारी होती. स्वत:च्या मुलांनाही ती रागावत नसे. रेवतीच्या दोन्ही मुलांची ती लाडकी नीरू मावशी होती. रेवतीच्या समस्येवर तोडगा काढता येईल या हेतूने नीरजाने येणाऱ्या शनिवारी सौम्याला माझ्याकडे राहायलाच पाठव असा फोन केला. सौम्या एकदम खूष. कारण नीरू मावशी आवडती होतीच. शिवाय उपनगरात तिचा मोठा बंगला होता. खेळायला भरपूर जागा. शनिवारी सौम्या नीरजाकडे राहायला आली. ऋचा, ऋषी, सौम्या गट्टी जमली. दुसऱ्या दिवशी सकाळी नीरजाने मुद्दामच डोसा-चटणीचा बेत नाश्त्याला केला. सौम्या तर जाम खूश. नाश्ता करता-करता नीरूने सौम्याला बोलते केले. ‘अगं, तू शिबिराला येणार नाहीस म्हणे. ऋषी, ऋचा, मी जाणार आहोत. तू का नाही म्हणतेस? आईसोबत नाही म्हणून की काय. आजकाल खूप शांप पण झालीस. आजीपण सांगत होती, तू सारखी चिडतेस. सौम्या, काय झालंय असं की तू इतकी बदललीस. आता तर शिबिराला पण येत नाहीस. अर्थात तुझ्या लाडक्या नीरू मावशीलाही कारण सांगणार नसशील तर राहू देत बाई. शांतच राहा.’ सौम्याने थोडा वेळ विचार केला नि बालू लागली. ‘अगं, मावशी आईच्या ऑफिसमधील तुम्ही सर्व आहात शिबिरात. त्याचेच मला टेंशन आहे. कारण आई घरात नेहमी सांगत असते, इतरांच्या मुलांचे गुणगान. अय्यर आँटींची मुले हायफाय असली तरी त्यांना मॅनर्स खूप आहेत. प्रथमेश, अनिरुद्ध, आर्य यांचेही ती कौतुक करत असते. शिबिरात माझी आई नसणार. माझे काही चुकल्यास माझ्या आईलाच दोष देणार. आईला कुणी वाईट म्हटलेले मला नाही आवडणार. त्याचेच मला टेंशन आहे गं मावशी. खरं सांगू. मलाही शिबिराला यायचे आहे. पण..’ सौम्याने एका दमात हे सारे कथन केले. नीरू यावर हसत-हसत म्हणाली, ‘अरे बापरे! सौम्या, आजी इतक्या समजूतदार केव्हापासून झाल्या. तुला आता आजीबाईच म्हणायला हवे. अगं वेडी इतक्या लहान वयात एवढा विचार करतेस! कमाल आहे. इतकी समजूतदार तर माझी ऋचाही नाही. रेवती-राजन खूप नशिबवान आहेत. तुझ्यासारखी समंजस मुलगी मिळालीय.’
‘सौम्या, आता तर तुला शिबिराला यावेच लागेल. अगं, तुला माहिती नाही बँकेतल्या सगळय़ाच लेडीज तुझे खूप कौतुक करत असतात. कथ्थक, चित्रकला, लाठीकाठी, बॅडमिंटन, निबंध, रांगोळी काय येत नाही असे आणि हो सगळीकडे नंबर मिळवूनच येते माझी सौम्या, नशीबवान आहे रेवती. सर्वगुण संपन्न लेक मिळालीय. मग काय रेवतीच्या अंगावर मूठभर मांस चढते. नाडगौड काकू, जोशी काकू सर्वाना तू आवडतेस बरं का. अय्यर आंटी तर परवा तुझ्या आईला काय म्हणाल्या माहितीये, अगं रेवती तू नसलीस तरी चालेल. सौम्याला मात्र तयार कर. छान कंपनी मिळेल आम्हाला. बरं, ते जाऊ दे डोसा कसा झालाय?’ ‘खूप छान झालेत. आईचे डोसे इतके पातळ, कुरकुरीत नाही होत. तिला शिकव ना जरा.’ ‘अगं सौम्या, तुझ्या सुगरण आईनेच मला डोसा शिकवलाय. मी तिला काय सांगणार.’
‘चला, मुलांनो गप्पा खूप झाल्या. आता खेळायला पळा. सौम्या संध्याकाळपर्यंत मला तुझा होकार हवाय. विचार कर. शिबिरासाठी तयार झालीस तर मोठी फ्रुट अ‍ॅण्ड नट कॅडबरी.’ हसतच नीरजा आवराआवर करू लागली. ऋचानेही सौम्याला तयार केले. संध्याकाळी राजन तिला न्यायला आले. गाडीवर बसता बसता सौम्या म्हणाली, ‘मावशी उद्या फ्रुट अ‍ॅण्ड नट हवीये मला. बाय ऋचा, बाय ऋषी.’ नीरजाला हसू आले. बाबांना कळेना, कॅडबरी कशासाठी?
रेवतीला काय गरज असते घरात सगळय़ा गोष्टी सांगण्याची. मुलांवर दडपण येते, मानसशास्त्राची पदवीधर असून काही उपयोग नाही. या वयात मुलांची मानसिकता जपायची असते, हे कधी कळणार रेवतीला. धन्य आहे. उद्या खडसवायलाच हवे तिला, असा विचार करत नीरजा घरात आली.
ऋतुजा गुरव – response.lokprabha@expressindia.com

Story img Loader