दरवर्षी २६ जानेवारीला होणारी चतुरंग प्रतिष्ठानची ‘सवाई नाटय़स्पर्धा’ ही महाराष्ट्राच्या प्रायोगिक रंगभूमीवरची नावाजलेली स्पर्धा आहे. नुकत्याच झालेल्या यंदाच्या ‘सवाई’तील नाटकांचा वेध-
एकांकिकांमध्ये व्यावसायिक नाटकाची चौकट गळून पडते. व्यावसायिकतेचे नियम इथे लागू होत नाहीत. प्रेक्षकांना अस्वस्थ करणं, हे मोठं पारितोषिक आहे. ही विषयातील अस्वस्थता प्रेक्षकांनी घरी घेऊन जायला हवी. पण हा अस्वस्थपणा कमी पडतो, असे ‘चतुरंग प्रतिष्ठान’च्या सवाई एकांकिकेबाबतचे परीक्षक सुबोध भावे यांचे उद्गार सर्व काही सांगून जातात. यंदाच्या ‘सवाई’च्या अंतिम फेरीमध्ये अस्वस्थ करणारे विषय, त्यांची मांडणी आणि त्यांचं गंभीरपणे सादरीकरण कुठं तरी हरवल्यासारखं वाटत होतं. यंदाच्या युवा पिढीमध्ये सळसळती ऊर्जा आहे, सर्जकता आहे, पण प्रेक्षकांच्या मनात घर करून राहील असा एखादा विषय हाताळल्याचे यंदाच्या ‘सवाई’मध्ये दिसले नाही आणि यावर युवा पिढीने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.
यंदाच्या ‘सवाई’मध्ये सहा पुरस्कारांसह बाजी मारली ती ‘बॉर्न वन’ या एकांकिकेने. ‘मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर’ हा या एकांकिकेचा विषय. एक मुलगी जिच्या मनामध्ये बऱ्याच व्यक्तींनी जन्म घेतला आहे, त्या व्यक्ती तिला आपल्यासारखं वागायला भाग पाडतात आणि तिच्या भावाची तारांबळ उडते. उपचार सुरू असूनही कुठलाच फरक तिच्यामध्ये पडत नसतो. एकामागून एक त्या भिन्न व्यक्ती तिच्यामध्ये संचार करतात आणि काही तिला हतबल करून सोडतात. पण एकांकिकेच्या मध्यानंतर एक गुपित उघडतं आणि साऱ्यांनाच त्याचा धक्का बसतो. तन्वी कुलकर्णीने या एकांकिकेमधील नेहा साठे या मुलीची व्यक्तिरेखा सुरेख साकारली होती. तिची देहबोली, वावर, टायमिंग अप्रतिम होतं आणि आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने सर्वोत्तम अभिनेत्रीचं पारितोषिक पटकावलं. गेल्या वर्षी सवाईचा सर्वोत्तम अभिनेत्याचा पुरस्कार पटकावणाऱ्या अजिंक्य गोखलेने या एकांकिकेची दर्जेदार मांडणी करत सर्वोत्तम दिग्दर्शनाचा पुरस्कार पटकावला. एकाच वेळी त्या मुलीच्या आयुष्यात येणारी माणसं कल्पकतेने आणि कमी वेळात दाखवण्याचा चांगला प्रयत्न अजिंक्यकडून झाला. मानस लयाळने ‘बॉर्न वन’ची चांगली संहिता लिहिली. हा विषय अर्थातच तसा नवीन नव्हता. पण या एकांकिकेमध्ये प्रेक्षक शेवटपर्यंत मग्न झालेले होते. अचूक टायमिंग, संवादफेक, प्रसंग आणि त्यामधला वावर या गोष्टींमुळे ही एकांकिका उजवी ठरली.
‘सर्वोत्तम एकांकिका निवडताना ‘बॉर्न वन’ आणि ‘मडवॉक’, असे दोनच पर्याय आमच्याकडे होते. कारण या दोनच एकांकिकांचं लिखाण चांगलं होतं. लेखनाकडे गांर्भीयाने लक्ष देण्याची गरज आहे. ठामपणे आपले विचार मांडण्याची गरज आहे. सादरीकरणावर भर द्यायला हवा आणि रंगभूमीची ताकद काय आहे, याचा साकल्याने विचार करायला हवा’, असं सुबोध पारितोषिक वितरणापूर्वी म्हणाला आणि वातावरण गंभीर झालं. एकांकिका सादर करणाऱ्या या युवा पिढीलाही ते कुठेतरी समजत होतं, जाणवत होतं.
बुद्धिझम आणि सध्याचं आपलं आयुष्य यावर ‘मडवॉक’ ही प्रेक्षकांची पसंती आणि द्वितीय पुरस्कार पटकावलेली एकांकिका सादर झाली. या एकांकिकेमध्ये बेंजामिन फ्रँकलिन हे पात्र अभिजित पवारने सुरेख वठवलं आणि त्यालाच सर्वोत्तम अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. या एकांकिकेचं नेपथ्य हे लाजवाब होतं. बुद्धाची बनवलेली मूर्ती असो किंवा लेणी असोत, सारं काही जिवंत असल्याचा भास सुयोग भोसलेच्या नेपथ्यामधून होत होता. काही वाक्यं ठरलेली असतात जिथे टाळ्या ठरलेल्या असतात. त्या वाक्यांचा अतिरेक या एकांकिकेमध्ये जाणवला आणि तिथेच ही एकांकिका मागे पडली. नवीन काही देण्याचा प्रयत्न या एकांकिकेमधून होताना दिसला नाही. फक्त टाळ्या मिळवण्यासाठीच हे व्यासपीठ नक्कीच नाही. त्यामुळेच यांना या माध्यमाची ताकद समजलेली नसल्याचे समोर येते.
‘जागरण’ ही एकांकिका लोककलेतून संदेश देणारी होती, पण त्यांचं सादरीकरण हवं तसं उठावदार नव्हतं. ‘दस्तुरखुद्द’ या एकांकिकेनेही काही जणांना भुरळ नक्कीच पाडली, पण चांगलं सादरीकरण करूनही विषय जुना असल्यामुळे कमी पडली. माणसाला शिक्षा हा देव किंवा अन्य कुणीही देत नसतो, तर ती त्याला त्याचा कॉन्शस देत असतो, ही सांगणारी ‘द कॉन्शस’ या एकांकिकेचं लिखाण चांगलं होतं, पण विषय गुंगवणारा नव्हता. एकांकिका संपल्यावर जी जादू प्रेक्षकांवर व्हायला हवी तेवढी झाली नाही. मुख्य पात्र वगळल्यास अन्य दोघांचाही अभिनय सुमार वाटला. त्याचबरोबर एकेक धक्के बसायला हवे होते, त्यामध्ये जास्त अवधी जात होता.
स्पर्धेमध्ये कठीण गाणं ५० टक्के गाण्यापेक्षा सोपं गाणं १०० टक्के गायला हवं, अशीच काहीशी सांगणारी एकांकिका म्हणजे ‘आयुष्य एक होताना’. एक मुलगा एका मुलीला लग्नासाठी नकार देतो, पण एका प्रवासामध्ये ती मुलगी त्याच्याबरोबर असते. या प्रवासादरम्यान ती त्याला आवडायला लागते, तो तिला विचारण्यापूर्वीच ती त्याला आपलं लग्न जमल्याचं सागते, तो दु:खी झालेला असला तरी या गोष्टीचा शेवट गोड होतो. ही एकांकिका अपेक्षेनुरूप होती, म्हणजे आता पुढे काय घडणार हे जवळपास अपेक्षित होतं. धक्कातंत्राचा वापर या एकांकिकेमध्ये असला तरी तो अनपेक्षित वाटत होता.
‘ई = एम. सी. स्क्वेअर’ ही विज्ञान आणि प्रेम कसं सारखं आहे, हे सांगणारी एकांकिका काहीशी बोजड वाटली. एका अभ्यासू विद्यार्थ्यांच्या आयुष्यात अल्बर्ट आईनस्टाइन येतो, तो फक्त त्यालाच दिसतो (चमत्कार चित्रपटातल्या नसिरूद्दीन शाहसारखा) आणि त्या अभ्यासू विद्यार्थ्यांला मुलीला कसं पटवायचं, हे फिजिक्सच्या शोधांमधून समजावण्याचा प्रयत्न करतो. हा विषय तसा जुनाच होता आणि सादरीकरणामध्ये नावीन्य नव्हतं. विज्ञान शाखेव्यतिरिक्त असलेल्या मुलांना या एकांकिकेचा विषय कळणं अवघडच होतं. लेखक विज्ञानामध्ये फार गुंतलेला पाहायला मिळाला.
आता मोबाइलमुळे संयम कमी झाला आणि त्याचा परिणाम प्रयोगशीलतेवर झाल्याचं पाहायला मिळतं. एखादा विषय दीर्घकाळ फार कमी जण मांडताना दिसतात. छोटे-छोटे तुकडे करून ते नंतर जोडायचं काम या एकांकिकांमधून दिसलं, असं सुबोध म्हणाला. यावेळी सुबोधबरोबर सीमा देशमुख आणि मिलिंद फाटक यांनीही परीक्षकांचं काम पाहिलं आणि एकमताने ‘बॉर्न वन’ या एकांकिकेवर शिक्कामोर्तब केलं.
गेल्या काही वर्षांमध्ये एकांकिका स्पर्धामध्ये चोख अभिनय पाहायला मिळतो. कदाचित व्यावसायिक कलाकृतींमध्ये जेवढा चांगला अभिनय दिसत नाही त्यापेक्षा कितीतरी पटीने उत्तम अभिनय एकांकिकांमध्ये पाहायला मिळतो. नेपथ्य, प्रकाशयोजना, संगीत या अंगांमध्येही चांगली प्रगती दिसते. पण एकांकिकेच्या मूळ गाभ्याकडे अर्थातच लेखनाकडे सध्याच्या घडीला दुर्लक्ष होताना दिसत आहे. एकच विषय एकांकिका संपल्यावरही काही महिने, वर्ष घोळत रहावा, असं हल्ली होताना दिसत नाही. सध्याच्या घडीला बरेच विषय आपल्या आजूबाजूला आहेत, पण त्याबाबत सकसपणे लिखाण होताना दिसत नाही. चांगला विषय, लेखन नसेल; पण, प्रकाशयोजना, नेपथ्य, संगीत अशा तांत्रिक गोष्टींमध्ये बाजी मारली तरीही त्या एकांकिकेला अर्थ रहात नाही. तो अस्वस्थपणाचा अपूर्णाक ठरतो.
एकांकिका हे माध्यम मुळात प्रयोग करण्यासाठीचं आहे. हे व्यासपीठ हशा आणि टाळ्या मिळवणाऱ्या वाक्यांसाठी नाही. या व्यासपीठावर विविधांगी विषय प्रयोगशीलतेने हाताळता यायला हवेत. त्यामध्ये ही पिढी कुठेतरी भरकटत चालली आहे असं नाही, पण उणीव नक्कीच आहे. सध्याच्या घडीला एखादा व्यावसायिक चित्रपट किंवा नाटक बनवण्यासाठी जे काही लागतं ते सध्याच्या एकांकिकांमधून पाहायला मिळतं, पण मुळात एकांकिका हे त्यासाठीचं माध्यम नाही, हे सर्वप्रथम समजण्याची गरज आहे. एकांकिका हे व्यक्त होण्याचं माध्यम आहे, जिथे कसलीही चौकट नसावी. विषय गंभीरच असावा असं नक्कीच नाही, पण त्या विषयातून नक्कीच काही तरी प्रेक्षकांना मिळायला हवं. त्या विषयावर चर्चा व्हायला हवी, वाद-विवाद घडायला हवेत. वेगवेगळी मतं त्यावर उमटायला हवीत, पण जर असं काहीच घडणार नसेल तर एकांकिका करणं हे नक्कीच व्यर्थ ठरेल. हेच यावेळच्या ‘सवाई’ने सांगितले आहे.
प्रसाद लाड