‘डॉक्टर, पेढे घ्या. परीक्षेत पास झालो. डिग्री मिळाली. आता नोकरी शोधेन.’ अतुल उत्साहात सांगत होता. दुसऱ्याच क्षणी त्याने शंकाकुल होऊन विचारले, पण जमेल ना मला? स्कीझोफ्रेनियातून बरे होता येत नाही का?’ जवळच उभ्या असलेल्या सुरेश नावाच्या पेशंटने अतुलला धीर दिला. म्हणाले, अरे मला पण स्किझोफ्रेनिया आहे. पण बघ मी गेली तीस वर्षे कमावतो आहे. तुलाही जमेल.’ 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तीन वर्षांंपूर्वी अतुलला त्याचे आई वडील पहिल्यांदा घेऊन आले. कॉलेजला अ‍ॅडमिशन घेतल्यानंतर दोन तीन महिन्यांतच त्याला वाटू लागले की बाकीचे विद्यार्थी आपल्या विरुद्ध आहेत. विशेषत: विद्यार्थिनी आपल्याकडे बघून हसतात. तो एकटा बसून राहू लागला. झोप लागेनाशी झाली. भूक मंदावली. अभ्यासातले लक्ष कमी झाले आणि तो परीक्षेत नापास झाला. त्याचे आईवडील घाबरून गेले. त्यांनी सायकियाट्रीस्टकडे धाव घेतली. निदान झाले ‘स्किझोफ्रेनिया’ म्हणजेच छीन्नमनस्कता. लगेच उपचार सुरु झाले. ३—४ महिन्यात अतुल पुन्हा कॉलेजला जाऊ लागला. आज पेढे घेऊन आला होता.
स्किझोफ्रेनिया एक गंभीर स्वरूपाचा मानसिक आजार आहे. जवळजवळ १% लोकांना होणारा हा विकार तरुणपणातच सुरु होतो आणि अनेक वर्षे रुग्णाला त्याचा पुन्हा पुन्हा त्रास होत राहतो. पेशंट स्वत:चे वेगळेच वास्तव मनातल्या मनात निर्माण करतो. अनेक विचित्र विचार त्याच्या मनात निर्माण होतात, तेच खरे वाटू लागतात. अनेकांना विविध भास होतात. मनातल्या विचारांमुळे आक्रमकता वाढते. पेशंट रागाच्या भरात घरातल्या वस्तूंची तोडफोड करतात, मारहाण करतात.
काही रुग्ण मात्र एकलकोंडे बनतात. दात घासणे, अंघोळ करणे, जेवणे अशा गोष्टींसाठीसुद्धा त्यांच्या मागे लागावे लागते. ते घरात फक्त बसून राहतात. या उलट काही पेशंट असंबंध्द बडबड करत बसतात, त्यांना कपडय़ांचेही भान नसते, घरातून निघून जातात, कधी कचरा गोळा करून घरी आणतात. अशा सगळ्या लक्षणांमुळे स्किझोफ्रेनिया या मानसिक आजाराबद्दल घरच्यांच्या मनातसुद्धा भीती असते.
स्किझोफ्रेनिया झाला म्हणजे आपल्या कुटुंबाला कलंक लागला असे अनेकांना वाटते. त्यामुळे घरातल्या रुग्णाची लक्षणे लपवली जातात आणि उपचार सुरु व्हायला उशीर होतो.
जितक्या लवकर निदान होईल आणि उपचार सुरु होतील तितका आजार लवकर नियंत्रणाखाली आणता येतो. आता स्किझोफ्रेनियासाठी अनेक परिणामकारक औषधे उपलब्ध आहेत. त्याचबरोबर वैयक्तिक आणि सामूहिक मानसोपचार पद्धतींचाही उपयोग होतो.
या रुग्णांच्या उपचारांमध्ये नातेवाईकांचा मोठा सहभाग असतो. अनेक रुग्णांचे आई-वडील, भाऊ बहीण, पती पत्नी वर्षांनुवर्षे आपल्या रुग्णांची प्रेमाने काळजी घेतात आणि त्याच्या बरोबरीने स्कीझोफ्रेनियाशी दोन हात करून त्याला आयुष्यात यशस्वी करण्यासाठी झटतात.
कधी कधी लक्षणांच्या तीव्रतेमुळे पेशंटला काही दिवस रुग्णालयात ठेवावे लागते. तेव्हा आणि पेशंट घरी आल्यावरही त्याच्या औषधोपचाराची जबाबदारी नातेवाईकांनाच उचलावी लागते. कित्येक वेळा पेशंटना आपल्याला काही मानसिक रोग झाला आहे असेच वाटत नाही. त्यामुळे औषधाच्या गोळ्या घेण्याचीही त्यांना आवश्यकता वाटत नाही. त्या वेळेसही त्यांना पटवून, समजावून त्यांचे औषधोपचार सुरु ठेवण्याचे मोठ्ठे काम नातेवाईक करतात. त्यामुळेच नातेवाईकांना या आजाराविषयी माहिती असणे आवश्यक असते. स्किझोफ्रेनिया मेंदूतील रसायनांच्या संतुलनात बिघाड झाल्यामुळे होतो, अनुवांशिकता आणि मानसिक तणावही याला कारणीभूत असतात. अशा माहितीबरोबरच आजाराची लक्षणे, उपलब्ध असलेले विविध उपचार, औषधांचे शरीरावर होणारे दुष्परिणाम (२्रीिीऋऋीू३२), उपचारांमधील सातत्याची गरज या सगळ्याची पुरेशी माहिती असणे पेशंटच्या दृष्टीने अत्यंत उपयोगी ठरते.
स्किझोफ्रेनियाचा रुग्णाच्या आयुष्यावर खोलवर आणि दूरगामी परिणाम होतो. कुणाचे शिक्षण अर्धवट राहते, कुणाची नोकरी सुटते, स्त्रीला घटस्फोटाला सामोरे जावे लागते. अशा सर्व परिस्थितीमध्ये नातेवाईकांना आपल्या रुग्णामागे खंबीरपणे उभे राहावे लागते. त्यात भावनिक आणि कौटुंबिक आधार महत्त्वाचा असतो. स्किझोफ्रेनियाग्रस्त रुग्णाची काळजी घेणे हे एक अवघड काम असते. नातेवाईक कंटाळतात, चिडतात. त्यांना त्यांच्या जबाबदारीचे ओझे वाटू लागते. हे स्वाभाविकच असते. मग काही नातेवाईक रुग्णाला काहीच काम करू देत नाहीत, ‘नको उगाच, त्याला जमले नाही तर?’ असे म्हणतात. काही जण आपल्या रुग्णाच्या संदर्भातले सगळे निर्णय घेऊन मोकळे होतात. उदा. ‘तुला मी भरतकामाच्या क्लासला घालणार, कॉलेज काही तुला झेपायचे नाही.’ तर कित्येकदा पेशंटने केलेल्या प्रत्येक कृतीवर टीकाच केली जाते. नातेवाईकांच्या अशा वागण्याने रुग्णाचे खच्चीकरण होते.
या उलट नातेवाईकांनी आपल्या आवडत्या व्यक्तीला हा मानसिक आजार झाला आहे, हे वास्तव स्वीकारलेले असेल तर रुग्णाबद्दल मनात प्रेम आणि माया असते. मग अतुल आणि सुरेशसारखे अनेक जण भेटतात आणि त्यांच्या यशस्वी जीवनाच्या कहाण्या ऐकावयास मिळतात. अनेक रुग्ण जेव्हा आजार बळावतो तेव्हा कामावर जात नाहीत; लक्षणे नाहीशी झाली की पुन्हा नोकरीवर रुजू होतात. काही जण कानामध्ये ऐकू येणारे नकोसे आवाज, विविध भास सहन करत आपले काम करत राहतात. कुटुंबाची जबाबदारी उचलतात.
त्या त्या रुग्णाच्या क्षमतेप्रमाणे, लक्षणांच्या तीव्रतेप्रमाणे त्याच्या पुनर्वसनाची योजना बनवणे आवश्यक असते. त्याने स्वत:ची निगा राखणे, समाजात स्वतंत्रपणे वावरणे, नातेसंबंध राखणे, शिक्षण मिळवणे, स्वत:च्या पायावर उभे राहणे, कुटुंबात आपल्या जबाबदारीचा वाटा उचलणे अशा अनेक टप्प्यांमध्ये त्याचे पुनर्वसन केले गेले पाहिजे.
२४ मे हा स्किझोफ्रेनिया जागृती दिवस. त्या निमित्ताने, या आजाराशी यशस्वीपणे सामना करणारे रुग्ण आणि त्यांची काळजी घेणारे नातेवाईक यांच्याविषयीचे हे विचारमंथन!