zr15अंतर्मनातील आणि आध्यात्मिक शोधांचा प्रवास हा खूप प्राचीन आहे. मानवी मेंदूसंदर्भातील आजवरच्या सर्वच संशोधनांनी दाखवून दिले आहे की, आपण मेंदूची जी गुपिते जाणतो ती केवळ हिमनगाचे टोक आहे.
प्रत्येकालाच त्याच्या आयुष्यात काही उद्दिष्ट साध्य करायचे असते. मात्र एकसारख्या सुविधा लाभलेल्या दोन व्यक्तींच्या आयुष्याच्या प्रवासात असाधारणपणे थक्क करणारा फरक असतो, कारण आयुष्याचा प्रवास हा केवळ बाहय़ शक्तींवर नसतो, तर त्याला मानसिक परिमाणेदेखील बरीच असतात. अर्थात तुम्हाला हवे ते साध्य करण्यासाठी सर्वात आधी आपल्या नेणिवेत (सबकॉन्शिअस माइंड) काय सुरू आहे ते जाणून घ्यावे लागेल, त्या पातळीवर नेमके काय आणि कसे बदल होतात हे लक्षात घ्यावे लागेल. तुमच्या नेणिवेनुसार काम करणे जर तुम्ही शिकला नाहीत, तर इतर कोणत्याही प्रयत्नांचा उपयोग होणार नाही. नेणिवेची ताकद वापरायची इच्छा नसल्यामुळे आयुष्यात आलेल्या अडचणींची अनेक उदाहरणे देता येतील. असे लोकांना नेणिवेचा वापर करण्याबद्दल कितीही सांगितले तरी ते तसे करण्यास नकार देतात. प्रचंड संघर्षांनंतरदेखील ‘‘आयुष्य असेच आहे, असेच घडणार होते’’ असे हताश उद्गार त्यांच्याकडून हमखास ऐकायला मिळतात. खरे तर आयुष्य जसे मिळालेय तसे नसते, ते तुम्ही स्वत: घडवू शकता, हे मला पुन्हा एकदा सांगायचे आहे. अनेक लोक कर्माला- नशिबाला दोष देत अनेक गोष्टी अर्धवट सोडून देतात किंवा परिस्थितीला शरण जातात. ही विचारसरणी स्वत:वर मर्यादा घालणारी आणि स्वत:चा पराभव करणारी असते. आपल्या विचारप्रक्रियेत आपण खूप कमी वेळा थोडय़ाच प्रमाणात नेणिवेतील विचारांचा योग्य वापर करतो, परिणामी उर्वरित ऊर्जा वायाच जाते. नेणिवेला जर योग्य ते संदेश पोहोचले, तर आयुष्य मनाप्रमाणे आकार घेईल.
म्हणूनच आपल्या नेणिवेला जीवनाच्या सर्वच क्षेत्रांचा सामना करण्यासाठी तयार करावे लागेल. आपण स्वत: त्रास करून घ्यावा अशी मानसिकता नसते, पण ताणतणावामुळे आपल्यावर अनेक दुष्परिणाम होतात. ताणतणावांचे भविष्यातील दुष्परिणाम सर्वाधिक हानीकारक असल्याचे आरोग्यशास्त्राने मांडले आहे. मग आपले स्वत:चे मन आपणास का हानी पोहोचवत आहे असे तुम्हाला वाटू शकते. खरे तर तुमची नेणीव शरीरात अनियंत्रित ऊर्जा प्रसवीत असते. ही ऊर्जा सकारात्मक मार्गाला कशी वळवता येईल हे पाहण्याची गरज आहे, जेणेकरून हानी होण्यापेक्षा लाभ कसा होईल हे पाहावे लागेल. नेणीव ही किमान प्रयत्नांवर कार्यरत असते. किमान प्रतिबंधित रस्त्यावर त्याचा प्रवास सुरू असतो. जाणिवेच्या जाणीवपूर्वक प्रयत्नांच्या अभावी नेणीव सोप्या आणि बहुतांशपणे आपल्या मनात खोलवर रुजलेल्या नकारात्मक विचारांच्या नेहमीच्या वाटेने त्याचा प्रवास होतो.
निरोगी मन हे चांगल्या आजाराचे एक महत्त्वाचे कारण आहे. एखाद्या धक्कादायक गंभीर घटनेमुळे निराशावादी माणूस कोलमडून पडतो. कधी कधी तर हृदयविकाराचा झटकादेखील येतो, तर सकारात्मक विचाराचा माणूस त्यातून लवकरच बाहेर पडतो. त्यामुळेच औषधोपचारांबरोबरच चांगल्या समुपदेशनाचीदेखील आवश्यकता असते. आपल्या नेणिवेचा आपल्या जगण्यावर जबरदस्त प्रभाव असतो. तो आपल्या आयुष्यातील अनेक घटना, भावभावना, राग-लोभ यांचा संग्रह करतो, त्यांची वर्गवारी करतो. विचारांची सांगड घालण्याच्या कामावर नियंत्रण आणि सांभाळ हेच नेणीव करते. आपल्या जगण्यातील, विचारातील, कामातील ९५ टक्केगोष्टी या आपल्या नेणिवेतील जुन्या प्रोग्रॅमिंगमधून आलेल्या असतात. वैद्यकशास्त्राने योगाला दिलेली दाद, ही एक प्रकारे आपल्या योग तत्त्वज्ञानाची स्वीकृतीच आहे. अर्थात योग ही आपले शरीर आणि मनाचा समतोल साधणारी पद्धती आहे.
तुम्ही जेव्हा टीव्ही पाहता पाहता झोपी जाता तेव्हादेखील तुमचे नेणीव सर्व काही ऐकत असते. स्वप्नांसंदर्भातील एक थिअरी असे सांगते की, स्वप्ने म्हणजे आपण जे दिवसभर पाहतो त्याचीच आपल्या नेणिवेकडून केलेली रचनात्मक आवृत्ती असते. आपली नेणीव दिवसातील ९५ टक्के घटना कार्यरत ठेवत असते, तर सर्वसाधारणपणे आपण आपल्या जाणिवेचा केवळ पाच टक्केच वापर करतो.
जर आपण आपल्या नेणिवेचा संपूर्ण क्षमतेने वापर करू शकलो, तर हजारो वर्षांच्या साधनेतून तयार झालेल्या या शक्तिशाली साधनाचा आपल्या आयुष्याला हमखास फायदा होईल. यापुढील काळ हा नेणिवेमध्ये असलेल्या आपल्या भविष्याला जाणून घेण्याचा आहे. बऱ्याच वेळा आपणास अनेक बऱ्या-वाईट घटनांच्या अनुषंगाने सिक्स्थ सेन्सची अनुभूती येते. एखादी घटना घडण्याआधीच तिचे तरंग जाणवू लागतात. अर्थात ती गोष्ट घडल्यानंतर आपणास हे आधी कसे कळले याचे आश्चर्य वाटत राहते. कधी कधी तुम्ही एखाद्या माणसाबद्दल विचार करता आणि अचानक त्याचा फोन येतो. ही आपल्या रोजच्या व्यवहारातील काही उदाहरणे सांगता येतील.
जर आपण नेणिवेची ही शक्ती जाणू आणि पकडू शकलो, तर आपल्या भविष्याबद्दल अनेक गोष्टींची उत्तरे मिळतील. व्यवसायात एखाद्या नव्या भागीदारीची, उत्पादनाची सुरुवात करू की नको, एखादा नवा प्रोजेक्ट सुरू करू का नाही, त्यात यशस्वी होईन, की अपयश पदरी येईल, असे अनेक प्रश्न आपणास पडतात. झोपण्यापूर्वी स्वत:लाच विचारलेला प्रश्न तुम्हाला याची आश्चर्यकारक उत्तरे देऊ शकतो, चित्र स्पष्ट करू शकतो. वर्षांनुवर्षे यशस्वीपणे वापरात असणारी ही पद्धत तुम्हाला भविष्यात डोकावण्यासाठी आणि आश्चर्यकारक स्पष्टता मिळवून देण्यात मदतकारी ठरू शकते.
आपल्याच अंतर्गत असणारी नेणिवेच्या प्रांतातील ही ताकद वापरून भविष्यकथन हा या पुढील काळातील सर्वात महत्त्वाचे साधन असणार आहे. 

Story img Loader