कव्हरस्टोरी
चित्रपट, टीव्ही या क्षेत्रांतून होणाऱ्या लैंगिक शोषणाच्या बातम्या नेहमीच सगळ्यांचे लक्ष वेधून घेत असतात. या क्षेत्रात करियर करण्यासाठी येणाऱ्या मुलींना काम देण्याचे आमीष दाखवून त्यांचा वापर करून घेतला जातो. मुलीही करियरसाठी तडजोड करायला तयार असतात. त्यामुळे तक्रारीसाठी कुणीही पुढे येण्याचं प्रमाणही कमीच असतं.
काही वर्षांपूर्वी प्रीती जैन नावाच्या एका नवोदित अभिनेत्रीने बलात्काराचा आरोप करून खळबळ उडवून दिली होती. चित्रपटात काम देण्याचे आश्वासन देऊन आपल्याशी शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा आरोप तिने एका प्रसिद्ध दिग्दर्शकावर केला होता. ज्याच्यावर हा आरोप केला होता तो प्रसिद्ध दिग्दर्शक होता मधुर भांडारकर. बॉलिवूडमधले एवढे मोठे नाव या प्रकरणात आल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणात मधुर भांडारकरला अटक झाली होती आणि ते प्रकरण खूप गाजले होते. या प्रकरणानंतर बॉलिवूडमधला कास्टिंग काऊच आणि कॉम्प्रोमाइजचा मुद्दा समोर आला होता. चित्रपटात काम देण्याच्या बहाण्याने केले जाणारे लैंगिक शोषण हा नवीन प्रकार नाही. पण शोषण करूनही काम मिळत नसल्याने फसवणूक होत असल्याने  काही तक्रारीही समोर येऊ लागल्या आहेत. परंतु केवळ चित्रपटसृष्टीतच असा प्रकार होतो असे नाही, तर जवळपास प्रत्येक क्षेत्रात असे प्रकार कमीअधिक प्रमाणात सुरू असतात. अगदी राजकारण, सामाजिक क्षेत्रापासून वैद्यकीय, शिक्षण, कॉर्पेरेट क्षेत्रापासून थेट माध्यम क्षेत्रातही हे प्रकार सर्रास होत आहेत, अशी चर्चा आहे. पोलीस खात्यातही वरिष्ठांकडून कनिष्ठ महिला कर्मचारी लैंगिक शोषणाला बळी पडत असतात, असं सांगितलं जातं.

चित्रपटसृष्टीतील भयानक वास्तव
आपण नेहमी वर्तमानपत्रात अधूनमधून बातम्या वाचत असतो. त्यात चित्रपट क्षेत्रातील बातम्या सर्वाधिक लक्ष वेधून घेतात.  चित्रपटात काम देण्याचे आश्वासन देऊन बलात्कार अशा स्वरूपाच्या मथळ्याच्या या बातम्या असतात. चित्रपटसृष्टीत ग्लॅमर असल्याने अशा बातम्यांना मोठी स्पेस मिळते आणि त्यावर चर्चा होते. चित्रपटसृष्टीत हा प्रकार पूर्वीपासून सुरू आहे. पूर्वी केवळ मोठय़ा पडद्यावर संधी असायची. आता टीव्ही मालिका, गायन क्षेत्र, रिअ‍ॅलिटी शो, मॉडेलिंग, अँकरिंग आदी क्षेत्रात प्रचंड संधी निर्माण झाली आहे. एका रात्रीत प्रसिद्धी आणि अमाप पैसा मिळत असल्याने अनेक तरुणी या क्षेत्राकडे वळत असतात. ज्यांच्या मागे ताकद असते, मोठय़ा ओळखी असतात त्यांचा मार्ग सोपा असतो. पण जे नवीन असतात त्यांना खूप संघर्ष करावा लागतो. त्यांना स्ट्रगलर्स असे म्हणतात. तेच प्रामुख्याने या लैंगिक शोषणाला बळी पडत असतात. या क्षेत्रातील वाढत्या संधीमुळे मोठय़ा बॅनरप्रमाणे अनेक छोटे छोटे प्रॉडक्शन हाउसेस तयार झाले आहेत. छोटी का होईन पण भूमिका मिळावी म्हणून हे स्ट्रगलर्स धडपडत असतात. त्याचाच गैरफायदा या छोटय़ा बॅनरच्या लोकांकडून घेतला जातो. लैंगिक शोषणाचा प्रकार प्रामुख्याने छोटय़ा प्रॉडक्शन हाऊसेसकडून केला जातो, असं निरीक्षण आहे. उपनगरात छोटे कार्यालय टाकून वर्तमानपत्रात जाहिराती दिल्या जातात. नवीन टीव्ही सिरियलसाठी नवोदित अभिनेते अभिनेत्री हव्या आहेत. मग आलेल्या मुलींना शिकार बनवले जाते, अशी माहिती दिग्दर्शक प्रा. शशीकुमार पांडे यांनी दिली. मुळात या क्षेत्रात आलेल्या तरुणींची अशा कामासाठी मानसिक तयारी असते असे एका निर्मात्याने सांगितले. चित्रपट क्षेत्रात याला कॉम्प्रोमाइज म्हणतात. त्यामुळे त्यांनी जर नंतर बलात्काराचा आरोप केला तर ते चुकीचे आहे, असे या निर्मात्याने सांगितले. गिव्ह अ‍ॅण्ड टेक हा जगाचा नियम आहे. तो प्रवाह आहे. त्यामुळे आम्ही त्याला अपवाद नाही, अशी क बुली या निर्मात्याने दिली. आम्ही काम देतो म्हणण्यापेक्षा संधी देतो. मग त्यांचे नाव होते आणि त्या पुढे जातात. त्यांच्यावर आम्ही जबरदस्ती करत नाही. पण तांत्रिक कारणामुळे काही जणांना संधी मिळू शकत नाही, त्यामुळे फसवणूक झाल्याची भावना त्यांच्यात निर्माण होते आणि त्या तक्रारी करतात, असे त्यांनी सांगितले.  या संबंधांचा वापर नंतर त्या ब्लॅकमेलिंगसाठीसुद्धा करत असतात असेही ते म्हणाले. प्रा. शशीकुमार पांडे यांनी याबाबत धक्कादायक वास्तव  मांडले. ते म्हणाले, छोटे प्रॉडक्शन हाउसेस हे काही हौशी मंडळींनी आपली मौजमस्ती भागविण्यासाठी काढलेले असतात. साइनिंग अमाउंट म्हणून काही पैसे सुरुवातीला दिले जातात आणि मग त्यांना कॉम्प्रोमाइज करण्यासाठी सांगितले जाते. फसवले गेल्याचे त्यांच्या नंतर लक्षात येते पण इलाज नसतो. कारण इंडस्ट्रीमध्ये त्यांना काम करायचे असते आणि वर बदनामीची भीती असते ते वेगळेच. परंतु त्यातही काही जणी तक्रारी करत असतात. मग पोलीस त्या प्रकरणी संबंधित निर्मात्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करत असतात. अशा घटनांना पोलीस तांत्रिक बलात्कार म्हणतात. कारण फिर्यादी तरुणीलासुद्धा काहीतरी साध्य करायचे असते. त्यामुळे ती स्वखुशीने शरीरसंबंधांना संमती देते. त्यामुळे तो बळजबरीचा बलात्कार नसतो. चित्रपटसृष्टीत करिअर करायचे असा निर्णय ज्या मुलीने घेतलेला असतो तिला असे सर्व प्रकार माहीत असतात. असे प्रकार होतात, मागणी होते आणि ती पूर्ण करावी लागते याची पूर्ण जाणीव असते आणि ते ती आसपास पाहात असते. त्यामुळे त्या स्वत:हून जातात असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलेला किस्सा धक्कादायक आहे. एका मालिकेसाठी तीन तरुणींची गरज होती. पण त्यासाठी त्यांना तब्बल १२ जणांशी कॉम्प्रोमाइज करावे लागणार होते. ज्या तीन तरुणी तयार झाल्या त्या प्रत्येकीला चार चार जणांशी अशा प्रकारे कॉम्प्रोमाइज करावे लागले. त्यांना काम मिळाले आणि त्या आता बऱ्यापैकी नावारूपाला येऊन स्थिरावल्या आहेत.
  मोठय़ा बॅनरमध्ये असे फसवणुकीचे प्रकार होत नाहीत, पण संमतीने शोषण होतच असते. खालच्या पातळीवरील लोकांकडून असे प्रकार होतात. एका नामांकित निर्माता दिग्दर्शकाच्या प्रसिद्ध प्रॉडक्शन हाऊसमध्ये काही वर्षांपूर्वी घडलेला किस्सा याच क्षेत्रातील एका संबंधिताने सांगितला. अर्ज करणाऱ्या येणाऱ्या तरुणींपैकी ठराविक तरुणी निवडून वर मुख्य ऑडिशनला पाठविण्याचे काम त्या संस्थेतील एका व्यक्तीकडे होते. पण तो या मुलींचे लैंगिक शोषण करत असे. काही मुली त्याला बळी पडत असत. दिल्लीतील एका वजनदार घरातून आलेल्या मुलीकडे मागणी करताच त्याचे भांडे फुटले आणि त्याला त्या प्रसिद्ध निर्मात्याने सर्वासमक्ष हाकलून दिले होते. यावरून मोठय़ा प्रॉडक्शनमध्ये असे प्रकार थेट होत नसले तरी खालच्या पातळीवर असे प्रकार घडत असतात. असाच एक किस्सा. एक तरुणी काम शोधण्यासाठी मुंबईत आली. तेथे तिची ओळख एका प्रॉडक्शन हाउसच्या कोऑर्डिनेटरशी झाली. त्याने तिला काम देण्याचे आश्वासन दिले आणि तिला शरीरसंबंध ठेवण्यासाठी भाग पाडले. नंतर तिच्या लक्षात आले तो इसम कुठल्याही प्रॉडक्शन हाउसशी संबंधित नसून साधा स्पॉट बॉय होता. त्यामुळे या तरुणीने तक्रार दिल्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली होती.

कास्टिंग काऊच
काही वर्षांपूर्वी टीव्ही अभिनेता अमन वर्मा, शक्ती कपूर आदी अभिनेते एका वृत्तवाहिनीने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये कास्टिंग काऊच प्रकरणात आढळले. त्यांच्या बचावासाठी गोविंदा, सलमान खानसारखे अभिनेते पत्रकार परिषद घेत उतरले होते. त्यानंतरही कास्टिंग काऊचचे आरोप होत होते. काम देण्याच्या बहाण्याने केले जाणारे लैंगिक शोषण म्हणजे कास्टिंग काऊच. पण काही अभिनेत्री सवंग प्रसिद्धीसाठीही असे आरोप करत होत्या. दुय्यम दर्जाच्या चित्रपटात उत्तान दृश्ये बेधडक देणारी अभिनेत्री पायल रोहतगी हिनेसुद्धा एका नामांकित दिग्दर्शकावर अशा लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. पण या प्रकरणी पोलिसात तक्रार नसल्याने प्रकरण फार पुढे गेले नव्हते. मात्र स्वत:च्या घरी माध्यमांना बोलावून ती त्या प्रकरणाचे रसभरीत वर्णन करत होती.
मुळात चित्रपट श्रेत्र हे ग्लॅमरने ओतप्रोत भरलेलं असून दिखाव्याचे आहे. तेथे टिकून राहण्यासाठी तशा स्वरूपाची लाइफ स्टाइल हवी असते आणि त्यासाठी अर्थातच पैसा हवा असतो. कॉम्प्रोमाइजची तयारी दाखवूनही नंतर पुढे फार काही मिळत नाही. फुटकळ भूमिकांवर समाधान मानावे लागते. एवढे पुढे गेल्यावर मागे परतण्याचा मार्ग नसतो. एकदा टीव्हीवर दिसल्यावर लोकल ट्रेनने प्रवास करून कुठल्यातरी कार्यालयात काम करणे शक्य नसते, असे एका मॉडलने सांगितले. मग पुढेसुद्धा तडजोडी करत राहाव्या लागतात. वेळोवेळी ज्या धाडी पडतात त्यात ज्या मॉडेल अभिनेत्री सापडतात त्यासुद्धा अशाच बळी पडलेल्या असतात.
 
सेक्स लोकल
मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने काही महिन्यांपूर्वी मरीन लाइन्स येथील सरकारी निवासी इमारतीवर छापा घालून सेक्स रॅकेट उद्ध्वस्त केले होते. या प्रकरणात बाबूलाल वर्मा नावाच्या रेल्वेच्या एका अधिकाऱ्याला अटक करण्यात आली होती. त्या वेळी काही मुलींची सुटका करण्यात आली होती. त्यात अल्पवयीन मुलीचाही समावेश होता. लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात या प्रकरणाचा तपास सुरू होता. वर्माच्या डायरीत दीड हजारांहून अधिक मुलींचे मोबाइल क्रमांक सापडले होते. हा अधिकारी गेली अनेक वर्षे याच सरकारी इमारतीमध्ये राजरोस सेक्स रॅकेट चालवायचा. त्याच्याकडे तिकीट तपासणीचे अधिकार होते. तो विनातिकीट सापडलेल्या मुलींना घेऊन जायचा. त्यानंतर लोकल ट्रेनमध्ये प्रवास करून तपासणीच्या निमित्ताने मुलींशी ओळखी करायचा. नोकरी देतो असे सांगून त्यांना जाळ्यात ओढायचा. मोठा अधिकारी आणि त्याचा रेल्वेतला दबदबा पाहून मुली त्याला बळी पडायचा. याच मुलींना मग तो विशेष पाहुण्यांना खूश करायला सांगायचा. त्याचे हे प्रकरण सेक्स लोकल म्हणून बरेच गाजले होते. नोकरी देण्याच्या बहाण्याने शरीरसुखा- साठी भाग पाडले जाण्याचे हे उदाहरण अनेक क्षेत्रात राजरोस सुरू आहे.

आमिष दाखवून बलात्कार केल्याच्या काही घटना

१६ ऑक्टोबर २०१२
राणी मुखर्जीच्या भावाने केला विनयभंग
प्रसिद्ध अभिनेत्री राणी मुखर्जी हिचा भाऊ राजा मुखर्जी याला वर्सोवा पोलिसांनी एका मॉडलेचा विनयभंग केल्या प्रकरणी अटक केली होती. या मॉडेलला चित्रपटात संधी देण्याचे तसेच राणी मुखर्जीची भेट घालून देण्याचे आश्वासन त्याने दिले होते. त्या निमित्ताने बोलावून गाडीत तिच्याशी अश्लील वर्तन केले होते.

९ मार्च २०१३
तब्बल दोन वर्षे बलात्कार करणारा निर्माता
वर्सोवा येथील एका छोटय़ा प्रॉडक्शन कंपनीचा निर्माता जावेद हमीदुल्ला सिद्दीकी (४०) याला २२ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. हिंदी चित्रपटात काम मिळवून देतो असे आश्वासन त्याने या स्ट्रगलर अभिनेत्रीला दिले होते. त्याबदल्यात तो गेली दोन वर्षे तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करत होता. या काळात दोन वेळा या तरुणीला गर्भपात करावा लागला होता. दोन वर्षांनंतरही काम न मिळाल्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिने तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून त्याला मीरा रोड पोलिसांनी अटक केली.

२६ जानेवारी २०१३
मेकअप रूममध्ये बलात्कार
पवई पोलिसांनी एका अभिनेत्रीने तक्रार केल्यानंतर कथारसीस स्टुडियोमधील कार्यकारी निर्मात्याला बलात्कार प्रकरणी अटक केली. २ डिसेंबर रोजी मेकअप रूममध्ये घुसून बलात्कार केल्याचा आरोप तिने केला. सुमारे दोन महिन्यांनंतर या २८ वर्षीय अभिनेत्रीने तक्रार केली होती.  

२७ जून २००९
अल्बममध्ये काम देण्याच्या निमित्ताने बलात्कार
वर्सोवा पोलिसांनी बलात्कार प्रकरणी राम कुमार कुमावत (३२) याला अटक केली. एका मॉडेलला गाण्यामध्ये काम देण्याचे आश्वासन त्याने दिले होते. कुमावत हा छोटा निर्माता होता. एके ठिकाणी २८ वर्षीय मॉडेलबरोबर त्याची ओळख झाली होती. त्यानंतर त्याने आपले कार्ड देऊन अंधेरी येथील कार्यालयात भेटायला बोलावले होते. या वेळी त्याने काम देऊन प्रसिद्ध बनवेन असे सांगत तिच्यावर बलात्कार केला होता.

१६ जानेवारी २०१३
मराठी चित्रपट निर्माता बलात्कार प्रकरणी अटक
मराठी चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या एक  निर्माता रमेश सिंग (४९) याला एका स्ट्रगलर अभिनेत्रीवर बलात्कार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. आपण एका मराठी चित्रपटाची निर्मिती करत असून त्यात प्रमुख भूमिका देण्याचे आश्वासन त्याने पुण्याहून आलेल्या या नवोदित अभिनेत्रीला दिले होते. तिला त्याने ओशिवरा येथे भेटायला बोलावले आणि एका हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला.

१४ ऑक्टोबर २०१३
कंपनीत काम देण्याच्या बहाण्याने बलात्कार
एका मॅन्युफॅक्चरिंग कंपनीत काम करणाऱ्या मुलीवर तिचाच मालक नितीन नंदा (३९)  याने बलात्कार केला होता. ही पीडित तरुणी १६ वर्षांची असताना त्याने तिला कामावर ठेवले आणि त्याबदल्यात तिच्याशी जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले. तिची अश्लील चित्रफीत त्याने तयार केली होती. त्या आधारे तो तिला ब्लॅकमेल करत होता. ही चित्रफीत कुटुंबीयांना दाखविण्याची तसेच इंटरनेटवर टाकण्याची धमकी तो देत होता. या मुलीने त्याला चित्रफीत कुणाला न दाखविण्यासाठी दोन लाख रुपयेसुद्धा दिले होते. सात वर्षे हा प्रकार सुरू होता. जेव्हा या मुलीचे लग्न ठरले तेव्हा त्याने तिच्या होणाऱ्या नवऱ्याला आणि कुटुंबीयांना ती चित्रफीत दिली. त्यामुळे फसवल्या गेलेल्या या पीडिताने तक्रार दाखल केल्यानंतर नालासोपारा पोलिसांनी नंदाला अटक केली.

पोलिसांची भूमिका
एखाद्या महिलेवर तिच्या इच्छेविरुद्ध दुखापत करून बळजबरी करणे म्हणजे बलात्कार,अशी सर्वसाधारण बलात्काराची व्याख्या. परंतु लग्नाचे आमिष दाखवून किंवा कामाचे आश्वासन देऊन शरीरसंबंध ठेवले अशा स्वरूपाच्या तक्रारी आल्या तरी त्याला बलात्काराचा गुन्हा दाखल केला जातो. अशा बलात्कारांना तांत्रिक बलात्कार (टेक्निकल रेप) असे म्हटले जाते. चित्रपटसृष्टीत विशेषत: काम देण्याचे आश्वासन देऊन शरीरसंबंध प्रस्थापित करण्याच्या घटना घडतात. या मुली सुरुवातीला तयार असतात. पण नंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर ते तक्रार घेऊन येतात. याबाबत माहिती देताना गुन्हे शाखा ८ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक फटांगरे यांनी सांगितले की, मुळात अशा प्रकरणात फिर्याद आल्यावर आम्ही बलात्काराबरोबर (भारतीय दंड विधान संहिता कलम ३७६) बरोबरच फसवणुकीचा (भारतीय दंड विधान संहिता कलम ४२०) चा गुन्हाही दाखल करतो. पण अशा प्रकरणात बलात्कार झाला हे सिद्ध करणे कठीण असते. मला काम देणार होता असे सांगून शरीरसबंध ठेवले आणि काम दिले नाही, असे सांगत बलात्काराची तक्रार देण्यासाठी मुली येतात. परंतु अशा प्रकरणात बलात्कार झाला हे न्यायालयात सिद्ध करणे कठीण असते. कारण दोषी आहे की नाही हे सिद्ध करण्यासाठी भौतिक पुराव्यांची गरज असते.
बलात्कार झाल्यावर सुरुवातीला पोलीस घटनास्थळावरून फिर्यादीचे कपडे, वैद्यकीय चाचणीचा अहवाल, शरीरावरील इतर पदार्थाचे नमुने घेतात. अशा तांत्रिक बलात्काराच्या प्रकरणात असे पुरावे मिळणे शक्य नसते. त्यामुळे आरोपीला नंतर सहज जामीन मिळतो, असेही ते म्हणाले. अनेक प्रकरणांत सुरुवातीला तक्रार करून गुन्हा दाखल झाल्यानंतर न्यायलयाबाहेर तडजोड केली जाते. मुंबई उपनगरात विशेषत: जुहू, ओशिवरा, वर्सोवा, अंबोली, अंधेरी, वांद्रे आदी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ज्या ठिकाणी फिल्मी वर्तुळाचा वावर असतो तेथे अशा घटना अधिक नोंदविल्या जातात. याबाबत माहिती देताना ओशिवरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रर्वीद्र पाटील यांनी सांगितले की, इंडस्ट्रीत अशा प्रकाराला कॉम्प्रमाइज म्हणतात. या मुलींना त्याची कल्पना असते आणि तयारी असते. पण फसवणूक झाल्यावर तक्रार देण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. एका मॉडेलला कामाचे आश्वासन देऊन मॉडेल कोऑर्डिनेटरने फसवले होते. त्याच्या जाळ्यात ती पूर्णपणे फसली होती. तिच्या आईने तक्रार दिल्यानंतर आम्ही त्याला दिल्लीत जाऊन अटक केली. पण शेवटपर्यंत तक्रार देण्याची त्या मुलीची तयारी नव्हती. फसवले गेल्यानंतर या तरुणींची अवस्था अधिक बिकट होते. ते मग या प्रवाहात अधिक खोलवर रुतत जातात. पण तक्रारी देण्याचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे ते म्हणाले.
प्रेमसंबंधात फसवणूक झाल्यानंतरही बलात्काराची तक्रार दाखल केली जाते. मुलगा लग्नाचे आमिष दाखवतो आणि शरीरसंबंध ठेवतो. त्यानंतर तो लग्नास नकार देतो. यामुळे फसवले गेल्याची भावना निर्माण होते आणि मग ती मुलगी तक्रार दाखल करते. अशा प्रकरणात मुलीचा सुरुवातीला काही उद्देश नसतो. कारण ते प्रेमप्रकरण असते. त्यामुळे ती शरीरसंबंधांना संमती देते. परंतु व्यावसायिक उद्देशासाठी शरीरसंबंध ठेवणे आणि जेव्हा त्यात फसवले गेल्याचे समजल्यावर तक्रार दाखल करणे हा एक तसा गंभीर प्रकार. बढती हवी आहे, महत्त्वाचे राजकीय पद मिळवायचे आहे, बदली हवी आहे म्हणून शरीरसंबंध ठेवण्यास तयार असलेल्या महिला सर्वच क्षेत्रांत आहेत. कुणी कसे वागावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. नैतिकता किती मानायची हासुद्धा प्रत्येकाचा स्वतंत्र प्रश्न आहे. पण एखाद्याच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन, जाळ्यात ओढून शरीरसंबंध ठेवणे हा निश्चितच गंभीर गुन्हा आहे. काम मागायला आलेल्या, ज्या महिलेला कामाची किंवा आर्थिक गरज आहे अशा महिलांना भाग पाडले जाते. त्या वेळची गरज म्हणून त्या कधी जाणतेपणी कधी अजाणतेपणी बळी पडत असतात. नंतर तक्रार झाली तरी तो तांत्रिक बलात्कार मानला जातो. पोलीस अर्थात अशी तक्रार आल्यावर गुन्हा दाखल करतात. पण ज्या ठिकाणी मुळात बलात्काराच्या तक्रारी कमी असतात तेथे अशा स्वरूपाच्या तांत्रिक बलात्काराच्या तक्रारींचे प्रमाण जवळपास नाहीच्या बरोबर आहे. पडद्यामागे होणारे असे तांत्रिक बलात्कार सर्वच क्षेत्रांत राजरोसपणे होतात. हा पडदा प्रत्येक क्षेत्रात असतो. करणाऱ्यांचे मुखवटे असतात. हा पडदा कधी सरतो, कधी मुखवटे बाहेर येऊन खरा चेहरा समोर येतो. मग चार दिवस चर्चा होते. पण हे चक्र सुरूच राहते.