मथितार्थ
‘महाराष्ट्र म्हणजे महान राष्ट्र’ अशा फुकाच्या गप्पा आता पुरे झाल्या.. वस्तुस्थिती काही वेगळीच आहे, असे गेल्या आठवडय़ाभरातील घटनांनी आपल्या साऱ्यांनाच दाखवून दिले आहे. संपूर्ण देशात चर्चा सुरू आहे ती महाराष्ट्रामध्ये घडलेल्या दोन निर्घृण अशा घटनांची. देशातील कोणतीही दूरचित्रवाणी वाहिनी पाहा किंवा मग वर्तमानपत्र उघडून पाहा महाराष्ट्रातील या दोन घटनांचा उल्लेख हा पहिल्या पानावरच आहे किंवा ठळक बातम्यांमध्ये आहे. यातील मुंबई बलात्काराच्या बातमीने तर आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत प्रसारमाध्यमांचेही लक्ष वळवले आहे. या बातम्यांमुळे राज्याचे नाव जगभरात पोहोचले, पण ते वाईट आणि नको त्या कारणांसाठी. गेल्या आठवडय़ाभरात महाराष्ट्रातील दोन घटनांनी सर्वानाच सुन्न केले. त्यातील पहिली घटना होती ती अंधश्रद्धा निर्मूलनाचे मूलगामी कार्य करणाऱ्या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येची. हा मजकूर लिहीत असेपर्यंत तरी दाभोलकर यांच्या गुन्हेगारांचा ठाव पोलिसांना कळलेला नव्हता. त्यांची हत्या म्हणजे स्वत:ला पुरोगामी म्हणविणाऱ्या महाराष्ट्रावर लागलेला कलंकच आहे. डॉ. दाभोलकर यांचे कार्य जाणून घेऊन आधुनिक नवनिर्माणाच्या दिशेने नेणाऱ्या त्यांच्या त्या समाजकार्यात सहभागी होण्याऐवजी अनेकांनी ते धर्मविरोधी असल्याची बतावणी करून त्यांना नाहक बदनाम करण्याचेच काम अधिक केले. डॉ. दाभोलकर यांनी धर्म आणि श्रद्धा या दोन्हीही बाबींचे अस्तित्व कधीही नाकारले नाही. मात्र अंधश्रद्धेच्या ते ठाम विरोधात होते. अंधश्रद्धेलाच श्रद्धा सांगून त्यावर स्वत:ची पोळी भाजत समाजाला मध्ययुगाच्या दिशेने नेणाऱ्या प्रथांना त्यांचा ठाम विरोध होता, कारण या प्रथा समाजविघातकच आहेत. पण त्यांच्या कार्याला पाठिंबा तर सोडाच त्याला विरोध करण्यातच अनेकांनी धन्यता मानली. असे असले तरीही आज महाराष्ट्रात उभे राहिलेले अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य पाहता, सक्षम आधुनिक समाजाच्या दिशेने वाटचाल करू इच्छिणाराही वर्ग आता मोठा होतो आहे, याचे समाधान आहे. दाभोलकरांच्या कार्याला राजकीय विरोधही मोठय़ा प्रमाणावर झाला. अर्थात या विरोधामागे मतांचे आणि गुंतलेल्या हितसंबंधांचे राजकारण हेच प्रमुख कारण आहे.  अन्यथा समाजाच्या भल्यासाठी लढणाऱ्या डॉ. दाभोलकर यांना राजकीय विरोध होण्याचे काहीच कारण नव्हते. पण त्यांना पाठिंबा दिला असता तर अनेकांनी देवाधर्माच्या नावाने उघडलेली दुकाने बंद करावी लागली असती. सध्या जात- पात, देव- धर्म यांच्याच बळावर तर राजकारण सुरू आहे. डॉ. दाभोलकरांच्या हत्येनंतर पन्नासहून अधिक पोलीस तपास पथकांची निर्मिती करणाऱ्या राज्य सरकारला अद्याप आठवडा उलटल्यानंतरही गुन्हेगारांचा सुगावा न लागणे यामागे आता राजकीय वास येऊ लागला आहे. पुढील वर्षी निवडणुका आहेत, त्यामुळे आता प्रत्येक गणित राजकीय पटावर मांडले जाते ते निवडणुका नजरेसमोर ठेवूनच. त्यामुळे निवडणुकांतील राजकीय गणिते नजरेसमोर ठेवून तर तपासाला राजकीय दिशा देण्याचा प्रयत्न होतोय का, याचाही तपास करण्याची गरज आहे. विरोधात येणारा प्रत्येक आवाज दाबून टाकला जाईल, हाच संदेश डॉ. दाभोलकरांच्या मारेकऱ्यांनी दिला आहे. हा संदेश पुसून टाकून नवा संदेश लिहिण्याची गरज आहे. त्यासाठी आजवरचा अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कामाचा राहिलेला वेग आता अनेक पटींनी वाढावा लागेल. गणेश मूर्ती तलावात विसर्जित न करता त्या दान करण्याची मोहीम असो अथवा एक गाव एक गणपती मोहीम असो या समाज हिताच्याच मोहिमा आहेत. मारेकऱ्यांनाही थेट संदेश द्यायचा असेल तर आता येणाऱ्या काळात प्रत्येक समाजहितैषी व्यक्तीला दाभोलकर व्हावे लागेल.
एका बाजूला दाभोलकर यांच्या निर्घृण हत्येची घटना घडलेली असताना दुसरीकडे सर्वानाच दिल्ली बलात्कार प्रकरणाची आठवण व्हावी, अशी घटना मुंबईत घडली. महालक्ष्मी परिसरातील पडक्या शक्ती मिल कंपाऊंडमध्ये छायाचित्रण व वार्ताकनासाठी गेलेल्या महिला वृत्तछायाचित्रकारावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. या प्रकरणातील सर्व आरोपींना पोलिसांना लगेचच चार दिवसांत पकडलेही. त्यानंतर पोलिसांचा आव आपणच आपली पाठ थोपटून घेण्याचा होता. वास्तविक या प्रकरणात कोणतेही राजकीय हितसंबंध गुंतलेले नसावेत असे प्रथमदर्शनी दिसते. त्यामुळे पोलिसांना हे आरोपी तीन दिवसात सापडले, पण दाभोलकर खून प्रकरणातील राजकीय संवेदनशीलतेमुळे, राजकीय हितसंबंधांमुळे त्यांच्या हाती काहीच लागलेले नाही. म्हणूनच ही घटना स्वतकडे असलेले कौशल्य सिद्ध करणारी नाही तर संपूर्ण राज्याच्या दृष्टीने मान लाजेने खाली घालायला लावणारी आहे, याचे भान पोलिसांनी ठेवले पाहिजे. पोलिसांचा असलेला दरारा या राज्याच्या राजधानीतच राहिलेला नाही, हेच ही घटना सांगून जाते. या घटनेच्या आदल्याच दिवशी अमेरिकन महिलेवर मुंबईत लोकल गाडीमध्ये ब्लेडने हल्ला करण्यात आला. या घटनेनंतरही घाटकोपर, गोरेगाव आदी ठिकाणी बलात्काराच्या घटना घडल्या. हे भूषणावह नव्हे तर लज्जास्पदच आहे.
या घटनेच्या वेळेस आणखी एक महत्त्वाची बाब लक्षात आली, त्याकडेही समाजाचे लक्ष वेधणे हे महत्त्वाचे आहे. सध्या प्रसारमाध्यमांमध्ये जबरदस्त गळेकापू  स्पर्धा सुरू आहे. त्यामुळे प्रत्येकजण वेगळे काही तरी करण्याचा किंवा वेगळी बातमी देत इतरांपेक्षा दोन पावले पुढे राहण्याचा प्रयत्न करतो. यात चूक काहीच नाही. पण ते करताना आपण घोडचुका करत आहोत, याचे भान प्रसारमाध्यमांनाही राहिलेले नाही, असे या घटनेच्या वेळेस लक्षात आले. पीडित महिलेने दिलेल्या माहितीनुसार गुन्हेगारांची रेखाचित्रे तयार करण्यात आली आणि ती प्रसृत केली गेली. रेखाचित्रांचा उद्देशच आरोपींना पकडणे हा असल्याने ती प्रसृत होणे साहजिक आहे. पण त्यानंतर एका वर्तमानपत्राने त्यांची खरीखुरी छायाचित्रे प्रसिद्ध केली. एखादी वाईट गोष्ट घडली की, त्या विरोधात समाजामध्ये उद्वेग, संताप व्यक्त होणे साहजिक असते. अशा वेळेस समाजाची प्रतिक्रिया ही कितीही खदखद व्यक्त करणारी असली तरी पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांना मात्र मर्यादाभंग करून चालत नाही. गुन्हेगारांची छायाचित्रे या प्रकरणात प्रसिद्ध झाल्यानंतर समाजातील प्रतिक्रिया ही त्या प्रसिद्धीचे स्वागत करणारी होती. ‘बरे झाले फोटो छापले ते, कारण नराधम कोण आहेत हे कळायलाच हवे होते’ अशा आशयाची ही प्रतिक्रिया होती. पण अशा प्रकारे ओळख परेड होण्याआधीच आपण गुन्हेगार आरोपींचे फोटो प्रकाशित करतो, त्यावेळेस आपणच खटला कमकुवत करत असतो. ओळख परेडच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिलेले आहेत, म्हणून तर आरोपींना पकडल्यानंतर गेल्या दहा वर्षांमध्ये पोलिसांनी त्यांचे चेहरे कपडय़ांनी झाकण्याची प्रथा सुरू झाली. फोटो आधीच प्रकाशित झालेले असतील किंवा त्यांची ओळख आधीच एखाद्या कृत्याने झालेली असेल तर अशा वेळेस त्याचा फायदा मिळून आरोपी सुटतात. आपल्याला आरोपींना किंवा त्या गुन्हेगारांना कठोर शासन व्हावे, असे अपेक्षित असेल तर सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश लक्षात घेऊन आपण ओळख परेड होऊन त्याची व्यवस्थित कायदेशीर नोंद होईपर्यंत तरी वाट पाहायलाच हवी. पण या संवेदनशील प्रकरणामध्ये प्रसारमाध्यमांनी भावनिक होऊन ते भान राखलेले नाही. प्रसारमाध्यमांचे एक महत्त्वाचे कार्य हे समाजप्रबोधनाचे असते. त्यामुळे समाज भावनिक झाला तरी त्यांनी स्वतचे भान न सोडणे हे अतिशय महत्त्वाचे आहे.
या घटनेमधील समोर आलेली एक सकारात्मक गोष्ट म्हणजे पीडित मुलगी अतिशय धैर्याने या घटनेला सामोरी गेली. ‘मी पुन्हा जोमाने उभी राहीन’ हे तिचे शब्द धीरोदात्त असेच आहेत. केवळ तीच नव्हे तर तिच्या कुटुंबियांनाही एक चांगला आदर्श समोर ठेवला आहे. या घटनेनंतर तिच्या कुटुंबीयांच्या वतीने एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आले. त्यात ही माता केवळ स्वतच्या नव्हे तर समाजातील सर्वच महिलांच्या वतीने बोलली आहे. ती आई म्हणते, ‘न्याय मिळवण्याच्या लढाईत केवळ माझ्या मुलीच्याच नव्हे तर समाजातील प्रत्येक पीडित मुलीच्या व तिच्या कुटुंबीयांच्या मागे सर्वानी खंबीरपणे उभे राहावे. माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य केलेल्या नराधमांना कठोर शिक्षा जलदगतीने झाली तर कोणीही विकृत मनुष्य असे अमानवी व संवेदनाशून्य कृत्य करण्यास धजावणार नाही. माझ्या मुलीसह देशभरातील मुलींना न्यायहक्कासाठी लढताना सर्वाचाच खंबीर पाठिंबा हवा आहे.’ बलात्काराच्या घटनेत पीडित महिलेची चूक काहीच नसते, पण समाज तिला आणि तिच्या कुटुंबीयांना वाळीत टाकतो, जणू काही त्यांचीच चूक आहे, असे म्हणत. समाजाची ही मानसिकता बदलणे गरजेचे आहे. प्रस्तुत प्रकरणात मुलीचे कुटुंबीय ठामपणे तिच्यासोबत आहेत ही चांगली गोष्ट आहे. कारण आजवर आपण संबंधित सर्वाचाच धीर खचल्याचे पाहिले आहे. आईने निवेदन करताना केवळ आपल्या मुलीच्या नव्हे तर सर्व पीडित मुलींच्या बाजूने समाजाने उभे राहावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. कारण अशा घटनांमध्ये सोबत न देणाऱ्या समाजाच्या भेदक वास्तवाची त्या मातेला जाण असावी. त्यांना निवेदनात अशी आशा व्यक्त करावी लागणे हे मात्र समाज म्हणून आपण चुकतो आहोत, याची  जाणीव करून देणारे आहे. एका आईला समदुखींसाठी असे व्यक्त व्हावे लागणे हे समाजासाठी लांछनास्पद आहे. एका पाठोपाठ एक अशा घडलेल्या या दोन्ही घटनांमुळे महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली आहे!

Engravings on the wheels
चित्रास कारण की: जमिनीवरची मेंदी
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
pune bjp fight
पुणे: प्रचार फेरीत भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, संगमवाडीतील घटना
first time in history of Maharashtra 52 separate hostels for OBCs and vagabonds 5 thousand 200 students admitted
५२ वसतिगृहात तब्बल ५,२०० ओबीसी विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा…विद्यार्थी म्हणाले, फडणवीसांनी…
Dhananjay munde latest marathi news
भाजपमधील दुखावलेले कार्यकर्ते आपल्याकडे वळवण्याचे धनंजय मुंडेंसमोर आव्हान
Eknath Shinde bag checking
CM Eknath Shinde : “बॅगेत फक्त कपडे, युरिन पॉट…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्याही सामानांची तपासणी!
BJP advertisement in major dailies featured slogan Ek Hai To Seif Hain with caps
भाजपच्या जाहिरातीत सर्व जातींच्या टोप्या…एक टोपी मात्र मुद्दाम…
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : “प्रवीण महाजन यांना गोपीनाथ मुंडेंनी पिस्तुल घेऊन दिलं होतं, पूनमला..”, सारंगी महाजन यांचा दावा