श्रद्धांजली
कोणत्याही तात्त्विक भूमिकेत अडकून न पडता सर्वसामान्य माणसांच्या जिव्हाळ्याच्या विषयांना कथेचे कोंदण देणारे शंकर नारायण ऊर्फ शन्ना नवरे नामक आनंदाच्या झाडाची अखंड सळसळ गेल्या आठवडय़ात थांबली. कथा, कादंबरी, नाटक, चित्रपट आणि मालिका लेखन आदी विविध माध्यमातून गेल्या पाच दशकांहून अधिक काळ लालित्यपूर्ण लेखन करणाऱ्या शन्नांचा माणसे जमवून गप्पा मारणे हा शौक होता. एक छोटे गाव ते महानगर या डोंबिवलीच्या वाटचालीचे एक प्रमुख साक्षीदार म्हणून त्यांनी येथील मध्यमवर्गीय जीवनशैलीचे बारकाईने निरीक्षण केले. त्यांच्या सर्व लेखनामध्येही त्याचे पडसाद उमटले. पु.भा.भावेंनंतर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वात डोंबिवलीचे नाव झळकत ठेवण्यात त्यांचे मोठे योगदान होते. अर्थात ते डोंबिवलीत राहात असले तरी डोंबिवलीपुरते मर्यादित कधीच नव्हते. काळानुसार बदलणाऱ्या परिस्थितीत मध्यमवर्गीय जीवनशैलीत होत गेलेला बदल हा त्यांच्या लेखनाचा गाभा होता. त्यातूनच त्यांच्या अनेक ललित लेखांमध्ये ओघाने ‘तेव्हा आणि आता’ अशी नॉस्टेल्जिक तुलना येते. विविध नियतकालिकांमधून केलेल्या सदर लेखनांमधूनही त्यांनी ‘गुजरा हुआ जमाना, आता नहीं दुबारा’ याचा प्रत्यय आणून देणारी आठवणींच्या प्रदेशातील मुशाफिरी केली. त्याला वाचकांचा उदंड प्रतिसाद लाभला. विशेषत: ‘लोकसत्ता’ रविवार पुरवणीतील त्यांची ‘शन् ना डे’ आणि नंतर ‘ओली-सुकी’ ही दोन सदरे विशेष लोकप्रिय झाली. त्याची नंतर पुस्तकेही झाली.
सांस्कृतिक परंपरांचा एक प्रमुख आधारस्तंभ असूनही ललित कलांच्या आविष्कारात मध्यमवर्गीयांच्या भावविश्वाची म्हणावी तितकी दखल घेतली गेली नाही. साहित्यही त्यास अपवाद ठरले नाही. मात्र ज्या थोडय़ा लेखकांनी पांढरपेशी म्हणून हिणवल्या गेलेल्या मध्यमवर्गीयांचे भावविश्व रेखाटले, त्यात शन्ना प्रमुख होते. डावा अथवा उजवा असा कोणताही एक आविर्भाव न घेता ते सर्वसामान्यांच्या जीवनातील आनंद क्षण आपल्या गोष्टीवेल्हाळ शैलीतून लेखणीद्वारे टिपत राहिले. डोंबिवलीत २००५ मध्ये झालेल्या अखिल भारतीय नाटय़ संमेलनात उद्घाटन म्हणून सुपरस्टार आमिताभ बच्चन यांना निमंत्रित करणे त्यांना खटकले होते आणि संमेलनाचे मावळते अध्यक्ष या नात्याने त्यांनी त्याविषयी तीव्र नापसंतीही व्यक्त केली होती. ते जसे लिहीत, बोलत तसेच वागतही होते. सर्वत्र उपयुक्तता वाद आणि युज अ‍ॅण्ड थ्रो वृत्ती बोकाळली असताना वंचित घटकांसाठी कार्यरत संस्थांना समाजातील संवेदनशील व्यक्तींनी यथाशक्ती मदत करायला हवी, असे त्यांचे मत होते. त्यामुळेच ‘लोकसत्ता’ गणेशोत्सव काळात राबवीत असलेल्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमाचे त्यांना विशेष कौतुक होते. गेल्या वर्षी त्यातील काही संस्थांना मदतीचे धनादेश देऊन त्यांनी या उपक्रमात आपला सहभागही नोंदविला होता.
कथा, कादंबरी, ललित लेखन याबरोबरच आकाशवाणीवरील श्रुतिका, दूरचित्रवाणी मालिका, चित्रपट कथा, पटकथा आदी अनेक लेखनाची माध्यमे त्यांनी हाताळली. ‘दिसामाजी काहीतरी लिहीत जावे’ अशा वृत्तीने ते लिहीत असत. मात्र त्यातील फारच थोडे लेखन प्रसिद्धीस देत. स्वत:चे समाधान होईपर्यंत ते पुनर्लेखन करीत. लेखन हा त्यांचा छंद होता आणि शेवटपर्यंत त्यांनी तो कसोशीने जपला. त्यामुळे त्यांचे लेखन अखेपर्यंत टवटवीत राहिले, ते कधीही कालबाह्य़ झाले नाही. त्यांना माणसांना भेटण्याचा, त्यांच्याशी संवाद साधण्याचा सोस होता. मोबाइल आणि इंटरनेटयुगात संपर्क साधणे कितीतरी सोपे झाले असले तरी हल्ली माणसं एकमेकांना फारशी भेटत नाहीत. मनमोकळ्या गप्पा होत नाहीत, याची त्यांना खंत वाटत होती. गेल्याच वर्षी ऑक्टोबर महिन्यात डोंबिवलीतील त्यांचे एक परममित्र मनोज मेहता यांच्याशी असलेल्या ऋणानुबंधास ४० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्यांनी काही पत्रकारांना आवर्जून घरी बोलावले होते. त्यावेळी त्यांनी खूप मोकळेपणाने गप्पा मारल्या. ऐंशीच्या घरात असूनही वृत्तीने शन्ना तरुण होते. झाड कधी म्हातारे होत नाही, असे म्हणतात, शन्ना तर साधेसुधे नव्हे तर आनंदाने सळसळणारे झाड होते. शन्नांशी गप्पा मारण्याचा तो शेवटचा प्रसंग. खरे तर त्या भेटीत असेच किमान दोन महिन्यांतून एकदा भेटू या असे शन्ना म्हणाले होते, पण धावपळीच्या जीवनशैलीत पुन्हा तसा योग आला नाही. लौकिक अर्थाने आता शन् ना आपल्यात नाहीत, पण चैतन्य कधी लोप पावत नसते. साहित्य आणि आठवणींच्या रूपात ते सदैव अमर राहणार आहेत. कारण ‘आनंद कभी मरते नही।’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा