शिवचरित्राचा जागर आजवर लेखक, कवी, गायक, शाहीर, चित्रकार अशा हरतऱ्हेच्या कलाकारांनी केलेला असला तरी त्याची मोहिनी कमी झालेली नाही. ‘शिवरुद्राचे दिग्विजयी तांडव’ या नावाने साकारलेला शिवचरित्राचा संगीतमय सोहळा हे त्याचेच द्योतक म्हणावे लागले.
शिवचरित्र, मराठी मनाचा अभिमानाचा हुंकार, जाज्ज्वल्य इतिहासाचा आविष्कार! हा इतिहास मांडण्यासाठी आजवर असंख्य लेखकांनी आपली लेखणी झिजवली. अनेक शाहिरांनी आपल्या वीररसाने ओथंबलेल्या रचनांनी आणि पहाडी आवजाने शिवचरित्राची धगधगती ज्योत असंख्यांच्या मनात तेवत ठेवली. अभ्यासकांनी व्याख्याने दिली. साहसवेडय़ांनी गडकिल्ल्यांच्या शेकडो वाऱ्या केल्या. तरीदेखील शिवचरित्राची मोहिनी काही कमी झाली नाही. किंबहुना ती वाढतच गेली. पिढय़ान्पिढय़ा त्यात आणखीनच भर पडत आहे. अर्थातच आजची तरुणाईदेखील यात मागे नाही. विशेष म्हणजे पठडीतल्या वाटेने न जाता ही पिढी नवे पर्याय शोधते आहे. त्यावर अभ्यास करते आहे. आणि त्यातूनच काही आगळेवेगळे उपक्रम सादर होताना दिसतात. असाच एक उपक्रम म्हणजे शिवशाहीचा संगीतमय सोहळा असणारे ‘शिवरुद्राचे दिग्विजयी तांडव’.
शब्द हे भावना व्यक्त करण्याचं प्रभावी माध्यम. त्याला संगीताची जोड मिळाली की जनमानसात ते शब्द, त्या भावना खोलवर पोहचतात. त्यातून जे काही मांडायचंय ते अधिक प्रभावीपणे होतं. शिवचरित्रासारखा वीररसपूर्ण विषय जर संगीतात बांधला तर तो थेटच भिडतो. जाणता राजा, शिवकल्याण राजासारख्या आजवरच्या कार्यक्रमाच्या लोकप्रियतेने हे दाखवून दिलं आहे. अर्थात हा कार्यक्रम जरी संगीतमय सोहळा असला तरी तो वेगळा आहे त्याचं उत्तर संगीतापेक्षा त्यातील शब्दांमध्ये दडलं आहे. आणि त्याला जोड मिळाली आहे ती भव्य-दिव्य अशा सादरीकरणाची. शिवचरित्रातल्या २२ प्रसंगांवर ‘शिवरुद्राचे दिग्विजयी तांडव’ साकारलं आहे.
स्वत: शिवछत्रपतीच आपल्या आयुष्यातील घटना या कार्यक्रमात उलगडून दाखवतात अशी मांडणी करण्यात आली आहे. शिवरायाच्या जिवाभावाचे सवंगडी, अफझलखान-शाहिस्तेखानासारखी स्वराज्यावरील अस्मानी संकटं, राज्याभिषेक, स्वराज्याचे प्रशासन, आरमार अशा घटनांचा समावेश तर यात आहेच, पण काही प्रसंग एकदम वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न झाला आहे.
शिवरायांची पहिली पत्नी सईबाई यांच्या तोंडी असलेलं विरहगीत हे त्यापैकीच एक. महाराजांच्या कौटुंबिक आयुष्यावर भाष्य करण्याचा हा प्रयत्न नक्कीच वेगळा असा म्हणता येईल. आपल्याकडे वीरांच्या कौटुंबिक भावनांवर प्रकाश टाकण्याचा फारसा प्रयत्न होत नाही. त्या पाश्र्वभूमीवर एका राणीच्या भावना, ‘‘मी अबोलवाणी तुझीच राणी.’’ अशा साध्या सोप्या शब्दांत मांडली आहे. असेच आणखीन एक गीत म्हणजे शहाजी राजेची भावना मांडणारे ‘एक पाठीराखा पिता’. साध्या-सोप्या शब्दांतून उलगडणारी गीतं हेच या कार्यक्रमाचं खरं वैशिष्टय़ म्हणावं लागेल.
गीतं हा कार्यक्रमाचा आत्मा आहे. आजवर ज्या प्रसंगावर फारशी गीतरचना झाली नाही अशा घटना आणि व्यक्तींचा समावेश हे या कार्यक्रमाचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्टय़ म्हणावं लागेल. साठ मावळ्यांनिशी काळोख्या रात्री पन्हाळ्याला शिडय़ा लावणाऱ्या कोंडाजी फर्जद यांची यशोगाथा मांडताना गीतकार म्हणतो,
सर सर चढले साठ निशाचर
काळकभिन्न त्या रातीला,
थरथरला तो उभा पन्हाळा,
काय म्हणावे जातीला.
या मर्द मराठी मातीला
हे ऐकताना आपसूकच पन्हाळ्याच्या कडय़ाशी झोंबणारे कोंडाजी डोळ्यांसमोर येतात. तर बाजीप्रभूंच्या स्वामीनिष्ठेचे वर्णन करताना गीतकार वर्णन करतो,
‘‘दिंडी निघालो घेऊन आम्ही
शिवशाहीच्या देवाची,
भर भर पाऊल उचला आता,
उसंत नाही मरणाची’’
याच प्रकारे शाहिस्तेखानावरील छापा, बहिर्जी नाईक, रामजी पांगेरा, फिरंगोजी नरसाळा, प्रतापराव गुजर, अष्टप्रधान मंडळ अशा अनेक व्यक्तिमत्त्वांना जणू काही सांगीतिक आदरांजलीच वाहिलेली आहे. सध्या एकूण २२ गीतांच्या आधारे हा सोहळा सादर केला जातो. त्यात अजून दहा नवीन गीतांचा समावेश झाला. लवकरच कान्होजी जेधे, उंबरखिंडीची लढाई, बेलसरची लढाई अशा घटनांचा व्यक्तींवरदेखील गीतरचना करण्यात येणार आहे. अर्धशतकी आकडा पार केल्यावर या सर्व शिवगीतांचे लोकार्पण करण्यात येईल. महाराज विवक्षित क्षणी नेमका काय विचार करत असतील, आपल्या संवगडय़ांच्या मनात काय सुरू असेल, प्रजा काय म्हणत असेल या अनुषंगाने सारी रचना करण्यात आली असल्यामुळे पोवाडा अथवा इतर सांगीतिक कार्यक्रमापेक्षा हा कार्यक्रम नक्कीच वेगळा वाटतो.
या कार्यक्रमाची भव्य-दिव्य मांडणी हा या कार्यक्रमातील दखल घेण्याजोगा पैलू म्हणावा लागेल. भव्य-दिव्य अशा सेटवर प्रसंगानुरूप पात्रांची रचना आणि काही प्रसंगाचे सादरीकरण केल्यामुळे आपण थेट शिवशाहीतच जातो. शिवशाही सर्वप्रथम चित्रपटातून मांडली ती भालजी पेंढारकर यांनी. त्यांच्याच चित्रपटातील काही निवडक दृश्यं भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्राच्या सौजन्याने वातावरण निर्मितीसाठी या कार्यक्रमात वापरली आहेत.
सईशा फाऊंडेशनतर्फे ११ ऑक्टोंबर २०११ रोजी या कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचा व्याप प्रचंड असल्यामुळे आजवर मोजकीच पण दर्जेदार अशी अकरा सादरीकरणं झाली आहेत. या सर्व गीतांची रचना, कार्यक्रमाचे लेखन आणि संगीत अशी तिहेरी जबाबदारी पेलली आहे ती अनिल नलावडे यांनी. तर संकलन, दिग्दर्शन आणि सूत्रसंचालन पद्मश्री राव यांनी केलं आहे. शिवाजी महाराजांच्या निवेदनासाठी विनय आपटे यांचा आवाज वापरण्यात आला आहे.
केतन पटवर्धन, अभिषेक पाळंदे, ऋषीकेश पाटील, नाजूक वीरकर, अनिल नलावडे यांनी या गीतांना स्वरसाज चढवला आहे. तर गणेश केरकर आणि सहकारी यांनी नृत्याची बाजू सांभाळली आहे. ओंकार कंग्राळकर यांच्या शस्त्रांच्या प्रात्यक्षिकाने वीरश्रीपूर्ण गीताना आणखीनच धार पडली आहे. प्रकाश योजना विजय गोळे आणि अभय शिंदे यांनी सांभाळली असून दृक् श्राव्य सादरीकरणाची जबाबदारी अनंत मळेकर यांच्याकडे आहे. अशा सुमारे २५ कलाकारांच्या ताफ्याच्या माध्यमातून हा कार्यक्रम सादर केला जातो.
कार्यक्रमाच्या सादरीकरणाचा खर्च तुलनेने जास्त असला तरी आजवर मिळालेला अतिरिक्त निधी सईशा फाऊंडेशनने सामाजिक कामासाठी वापरला आहे. एका कार्यक्रमातून मिळालेला सुमारे एक लाखाचा निधी सानेगुरुजी विद्यालयातील दत्तक पालक योजनेस देण्यात आला आहे.
शिवचरित्राची ही मोहिनी जनमानसापर्यंत पोहचविण्यासाठी केलेली ही नवीन रचना अनेक थोरामोठय़ांनी गौरवली आहे. पण त्याहीपेक्षा याचं महत्त्व जाणवतं ते जेव्हा ही गीतं आपण गुणगुणतो तेव्हा नकळतपणे आपल्यावर शिवचरित्राचे संस्कार होत राहतात. शिवचरित्राच्या या संगीतमय सोहळ्याचं हेच खरं श्रेय म्हणावं लागेल.
सुहास जोशी – response.lokprabha@expressindia.com
उपक्रम : शिवचरित्राचा संगीतमय सोहळा
शिवचरित्राचा जागर आजवर लेखक, कवी, गायक, शाहीर, चित्रकार अशा हरतऱ्हेच्या कलाकारांनी केलेला असला तरी त्याची मोहिनी कमी झालेली नाही. ‘शिवरुद्राचे दिग्विजयी तांडव’ या नावाने साकारलेला...
First published on: 17-07-2015 at 01:29 IST
मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivrudrache digvijayi tandav