पुरस्कार सोहळ्यांमुळे नवीन वर्षांची सुरुवात बॉलीवूडकरांसाठी नेहमीच उत्साहाची असते. यंदा कोणते कलाकार, सिनेमा बाजी मारतील, कोण पुढे-कोण मागे; या सगळ्याचा बांधलेला अंदाज!
जानेवारी महिना उजाडला की बॉलीवूडकरांना वेध लागतात ते पुरस्कारांचे. नवीन वर्षांच्या सुरुवातीलाच पुरस्कार सोहळ्यांची रेलचेल असते. एक संपला की दुसरा आणि दुसरा संपला की तिसरा. ही साखळी सुरुवातीचे काही महिने तरी सुरूच असते. यात कधी कधी काही नवीन पुरस्कार सोहळ्यांची भर पडते. कलाकारांची चंगळ! अशा वेगवेगळ्या पुरस्कार सोहळ्यांना उपस्थित राहून दिग्दर्शक-निर्मात्यांना भेटून ओळखी वाढवणं, आपण इंडस्ट्रीत आहोत हे ‘दाखवणं’ या गोष्टींसाठी का होईना कलाकारांना छान नटूनथटून बसावंच लागतं. आफ्टरऑल प्रोफेशन मॅटर्स! पण कलाकारांचंही कौतुक करायलाच हवं. एका सोहळ्यात दिसतील तसेच ते दुसऱ्या सोहळ्यात अजिबातच दिसत नाहीत. आणि हे असं सतत करायचं म्हणजे कमाल. रिअली, इट्स टफ टास्क. पण असो, कलाकारांची रोजीरोटीच ती. त्यामुळे इतना तो बनता है. पुरस्कार सोहळ्यांची संख्या वाढली तशी पुरस्कार कोणाला मिळेल याची उत्सुकताही वाढली. २०१५ या वर्षांत अनेक उत्तम आशयाचे सिनेमे आले. काही मनोरंजन करून गेले. काहींनी अपेक्षाभंग केला. तर काही अनपेक्षितरीत्या लोकप्रिय झाले. या सगळ्याची परिणती यंदा पुरस्कार सोहळ्यांमध्ये दिसेल. कोण पुरस्कारांवर बाजी मारेल हे लवकरच येणाऱ्या काही सोहळ्यांमधून समजेल.
यंदा अभिनेत्रींमध्ये पुढे होती दीपिका पदुकोण. खरं तर २०१५ मध्ये तिचे तीनच सिनेमे आले. ‘पिकू’, ‘तमाशा’, ‘बाजीराव मस्तानी.’ तिन्ही सिनेमे वेगवेगळ्या प्रकारचे होते. त्यामुळे दीपिकालाही तिचं अभिनय कौशल्य दाखवण्याचा वाव होता. तिने तो दाखवलाही. दुसरीकडे ‘मसान’मधली रिचा चढ्ढाा, ‘तनू वेड्स मनू रिटर्न्स’मधली कंगना राणावत, ‘एनएच टेन’मधली अनुष्का शर्मा यांचीही कामं चांगली झाली होती. कल्की कोएलचिन उत्तम अभिनेत्री आहे. आजवर तिने साकारलेल्या भूमिका लक्षात राहिल्या आहेत. तिच्या अभिनयात सहजता आहे. ती ‘मार्गारेट विथ अ स्ट्रॉ’ या सिनेमातही दिसली. म्हणूनच सवरेत्कृष्ट अभिनेत्रीसाठी या नायिकांची स्पर्धा आहे. पण यातही दीपिका पदुकोण किंवा कल्कीचा नंबर लागू शकतो. नायकांमध्येही जरा गंमत आहे. सवरेत्कृष्ट नायकासाठी ‘बाजीराव मस्तानी’साठी रणवीर सिंग याला साधारण सगळ्याच पुरस्कार सोहळ्यांमध्ये नामांकन असू शकेल. खरं तर रणवीरने ‘दिल धडकने दो’ या सिनेमातही उत्तम काम केलंय. सिनेमा अपेक्षेप्रमाणे गाजला नसला तरी रणवीरच्या कामाचं कौतुक झालं होतं. ‘मांझी द माऊंटन मॅन’ या सिनेमाची खूप चर्चा झाली. पण हवा तसा सिनेमा जमून आला नाही. त्यामुळे त्याचा प्रभाव प्रेक्षकांवर फारसा पडला नाही. पण नवाझुद्दीन सिद्दीकीचं काम उत्तम झालंय. त्यामुळे या शर्यतीत तोही असू शकेल. इरफान खानला मिश्कील भूमिकांमध्ये तसं फार बघायला मिळालं नाही. पण ‘पिकू’ आणि ‘जजबा’ या दोन्ही सिनेमांमध्ये प्रेक्षकांना वेगळा इरफान बघायला मिळाला. त्याचं काम उत्कृष्ट झालं असलं तरी त्याला नामांकनाच्या रांगेत बसायला मिळण्याची शंका आहे. ‘हिरो’ वाटायला हवा तो, असा कदाचित नियम असेल बहुधा यांचा. असो.. ‘दृश्यम’ सिनेमा लोकप्रिय झाला. शेवटपर्यंत टिकवलेलं रहस्य, सिनेमाची मांडणी, अभिनय या सगळ्यामुळे सिनेमाने बाजी मारली. अजय देवगणचा अभिनयही उत्तम जमलाय. वरुण धवन ‘बदलापूर’मध्ये चमकलाय. पुन्हा इथे तोच मुद्दा येतो. सिनेमाने बाजी मारली नसली तरी वरुणने नेहमीपेक्षा वेगळं काम केलंय. त्यामुळे या सवरेत्कृष्ट नायकांच्या स्पर्धेत तोही असण्याची शक्यता आहे.
साहाय्यक अभिनेता आणि अभिनेत्री या पुरस्कारांसाठी यंदा थोडी वेगळी नावं पुढे येण्याची शक्यता आहे. यात अभिनेत्यांमध्ये सगळ्यात पहिलं नाव येईल ते बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांचं. ‘पिकू’मध्ये त्यांनी कमाल काम केलंय. असंच काहीसं झालंय ते ‘तनू वेड्स मनू रिटर्न्स’मधल्या दीपक डोब्रियाल याचं. आर. माधवनच्या मित्राची भूमिका त्याने साकारली. कंगना, माधवनप्रमाणेच तोही लक्षात राहतो. ‘गब्बर इज बॅक’मधल्या सुनील ग्रोव्हरचंही काम चांगलं झालंय. ‘बदलापूर’ आणि ‘बजरंगी भाईजान’ या दोन्ही सिनेमांमध्ये नवाझुद्दीन सिद्दीकीने चोख काम केलंय. तर, या सहाय्यक अभिनेत्यासाठी या कलाकारांची वर्णी लागू शकते. अभिनेत्रींमध्ये सगळ्यात आधी समोर येते प्रियंका चोप्रा. ‘बाजीराव मस्तानी’मध्ये ती साकारलेली काशीबाई लोकांच्या पसंतीस उतरली. सुंदर दिसण्याबरोबरच तिने तिच्या अभिनयाने ती भूमिका जिवंत केली आहे. ‘दिल धडकने दो’मध्ये कलाकारांची मोठी फौज असली तरी शेफाली शहा जास्त लक्षात राहते. तसंच तब्बूचं. ‘दृश्यम’मध्ये इन्स्पेक्टरचा आब, रुबाब तब्बूने उत्तमरीत्या हेरला होता. तब्बू इन अॅक्शन आलीये सध्या. अभिनयाचं तिचं नाणं खणखणीत होतंच. आता नव्या फळीसोबत पुन्हा ती सिनेमांमध्ये दिसू लागली आहे. यात पुरस्काराची मानकरी ठरण्याची प्रियंका चोप्राची शक्यता जास्त वाटतेय.
बॉलीवूडचं संगीत म्हणजे संगीतप्रेमींसाठी पर्वणी असते. वर्ष संपताना ‘तमाशा’ या सिनेमाच्या निमित्ताने ए आर रेहमान यांच्या संगीताची मेजवानी मिळाली. पण अनपेक्षितपणे त्यातली गाणी फारशी पसंतीस उतरली नाहीत. तरी या स्पर्धेत हा सिनेमा असणार. कारण वेगळं सांगायला नको. ‘बदलापूर’ची गाणी श्रवणीय होती. त्यामुळे सचिन-जिगरही यात असू शकतात. अंकीत तिवारी आणि अमला मलिकने दिलेल्या संगीतामुळे ‘रॉय’ हा सिनेमा प्रेक्षकांना माहिती झाला. अन्यथा या सिनेमात विशेष काहीच नव्हतं. ‘बाजीराव मस्तानी’ हा सिनेमा विविध कारणांसाठी गाजला. संगीत हा त्यातलाच एक भाग. संजय लीला भन्साळींनी दिलेलं संगीत झालंय चांगलं, पण त्यातली काही गाणी ‘रामलीला’ या सिनेमातल्या गाण्यांची आठवण करून देतात. तरीही भन्साळी या स्पर्धेत असतील. इथेही कारण वेगळं सांगायला नको. नाव, व्यावसायिक गणितं एवढं सांगितलं तरी पुरे. यात कोण बाजी मारेल हे आता निश्चित सांगता येत नसलं तरी ‘बदलापूर’ आणि ‘रॉय’ हे पुढे असतील असं वाटतं. ‘मोह मोह के धागे’ हे ‘दम लगा के हैशा’ या सिनेमातलं गाणं फारच सुंदर आहे. मोनाली ठाकूर यासाठी सवरेत्कृष्ट गायिकेसाठी पुढे असू शकेल. ‘तमाशा’मधलं ‘तुम साथ हो’ यासाठी अलका याज्ञिकही यात असेल. तर श्रेया घोषाल ‘दिवानी मस्तानी’ या बाजीरावमधल्या गाण्यासाठी या स्पर्धेत असेल.
गायकांमध्ये ‘जीना जीना’ हे गाणं गायलेला आतीफ अस्लम, ‘तू है के नहीं’फेम अंकित तिवारी, ‘मटरगश्ती’ गाणं गायलेला मोहित चौहान हे तिघं आघाडीवर असतील.
कथेसाठी चौकटीबाहेरच्या सिनेमांना इथे संधी मिळेल असा अंदाज आहे. ‘तितली’, ‘मसान’, ‘पिकू’, ‘शमिताभ’, ‘बजरंगी भाईजान’, ‘जजबा’, ‘एनएच टेन’, ‘मार्गारेट विथ अ स्ट्रॉ’ असे काही सिनेमे यात असू शकतात. थोडक्यात काय, तर पुरस्कार आयोजकांना या विभागासाठी बरेच पर्याय आहेत. पण त्याच वेळी त्यांचं या पुरस्काराच्या निवडीसाठीचं कठीणही होणार आहे. सिनेमाटोग्राफीमध्ये ‘बाजीराव मस्तानी’, ‘तलवार’, ‘अँग्री इंडियन गॉडेस’, ‘बेबी’, ‘एनएच टेन’ हे सिनेमे पुढे असूू शकतात. सिनेमाचं यश हे काही प्रमाणात त्याच्या संकलनावर अवलंबून असतं. ‘दृश्यम’, ‘फँटम’, ‘तलवार’, ‘बदलापूर’ हे यातले महत्त्वाचे सिनेमे. यात ‘दृश्यम’ सर्वश्रेष्ठ ठरू शकतो. सवरेत्कृष्ट सिनेमा पुरस्कारासाठी ‘बाजीराव मस्तानी’, ‘तलवार’, ‘पिकू’, ‘बेबी’, ‘दृश्यम’, ‘तनू वेड्स मनूू रिटर्न्स’ अशा सिनेमांची शक्यता आहे. तर; सवरेत्कृष्ट दिग्दर्शकासाठी संजय लीला भन्साळी (बाजीराव मस्तानी), सुजित सरकार (पिकू), नीरज पांडे (बेबी), मेघना गुलजार (तलवार), निशिकांत कामत (दृश्यम) हे स्पर्धेत असू शकतात.
याशिवाय पदार्पण पुरस्कार, स्पेशल ज्युरी पुरस्कार, ऑडीअन्स चॉइस असे अनेक पुरस्कारही असतील. पदार्पणासाठी अक्षरा हसन (शमिताभ), भूमी पेडणेकर (दम लगा के हैशा) या अभिनेत्रींची शक्यता आहे. तर, ‘मसान’, ‘गौर हरी दास्तान’,‘मार्गारेट विथ अ स्ट्रॉ’, ‘अँग्री इंडिअन गॉडेस’ असे काही चौकटीबाहेरचे सिनेमे वेगळ्या पुरस्कारांसाठी गौरविले जातील असा अंदाज आहे. थोडक्यात काय तर, यंदा एकाच सिनेमावर पुरस्कारांचा वर्षांव होणार नाही, तर पुरस्कार वेगवेगळ्या सिनेमांमध्ये विभागले जाण्याची शक्यता जास्त आहे.
चैताली जोशी – response.lokprabha@expressindia.com
Twitter: @chaijoshi11