अंकुश चौधरीसाठी २०१५ हे वर्ष उत्तम ठरलं. त्याची मुख्य भूमिका असलेले तिन्ही सिनेमे लोकप्रिय झाले. नवीन वर्षांत त्याचा पहिला सिनेमा आहे ‘गुरू’. या सिनेमातही तो एका वेगळ्या भूमिकेत दिसेल.

चित्रपटसृष्टीत कधी कोण पुढे असेल याची खात्री देता येत नाही. अर्थात चांगल्याला चांगलाच प्रतिसाद मिळतो म्हणूनच या सृष्टीतल्या कलावंतांच्या चांगल्या कामाचं कौतुक होत असतं. इथे स्पर्धाही वाढू लागली आहे. प्रत्येकाला नंबर वन होण्याची इच्छा आहे. पण, या स्वप्नासोबतच चांगलं काम करण्याचेही त्यांचे प्रयत्न असतात. असेच प्रयत्न करत चांगलं काम करून गेल्या वर्षी हिटवर हिट सिनेमे त्याने दिले. गेल्या वर्षी त्याचे वेगवेगळ्या धाटणीचे तीन सिनेमे आले. तिन्ही सिनेमांमध्ये त्याने बाजी मारली. आपल्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांचं मन जिंकून घेणाऱ्या अंकुश चौधरीचा नव्या वर्षांतला पहिला सिनेमा आलाय. ‘गुरू’ या सिनेमात तो मुख्य भूमिका साकारत असून यातही त्याच्या अभिनयाची वेगळी छटा बघायला मिळेल. संजय जाधव दिग्दर्शित ‘गुरू’ हा सिनेमा प्रदर्शित झाला.

‘क्लासमेट्स’, ‘डबलसीट’, ‘दगडी चाळ’ या सिनेमांमध्ये त्याने साकारलेल्या भूमिकांचं कौतुक झालं. क्लासमेट्समधला कॉलेजमध्ये जाणारा सत्या, डबलसीटमधला विचार करणारा, संवेदनशील, कुटुंबाला महत्त्व देणारा अमित, चाळीत राहणारा सामान्य मुलगा सूर्या अशा वेगवेगळ्या छटांच्या भूमिका त्याने चोख बजावल्या. एखाद्या कलाकाराचं एखादं वर्ष असतं. त्या वर्षांत त्याच्या चांगल्या कामामुळे तो चमकतो. मागचं वर्ष अंकुश चौधरीचं होतं असं म्हणायला हरकत नाही. ‘क्लासमेटस्’, ‘डबलसीट’, ‘दगडी चाळ’ या तिन्ही सिनेमांमुळे त्याने प्रेक्षकांची वाहवा मिळवली. या प्रवासाबद्दल अंकुश सांगतो, ‘कोणतीही व्यक्तिरेखा साकारताना त्या-त्या व्यक्तिरेखेचा स्वभाव समजून घ्यावा लागतो. माझा जो स्वभाव नाही तो आत्मसात करावा लागतो. गेल्या वर्षी साकारलेल्या तिन्ही भूमिकांसाठी स्वभावाचा अभ्यास करावा लागला. व्यक्तिरेखेचा स्वभाव कळला की पुढचं काम सोपं होतं. व्यक्तिरेखेच्या स्वभावाप्रमाणे त्याची बोलण्या-वागण्याची पद्धत, त्याचं व्यक्त होणं या सगळ्याचाच विचार करावा लागतो. भूमिका साकारताना केवळ दिलेले संवाद म्हणून अभिनय करायचा नसतो, तर त्यात खोलवर शिरावं लागतं. मी हे सगळं  करण्याचा प्रयत्न केला. तो यशस्वी झाल्यामुळेच मागचं वर्ष माझ्यासाठी चांगलं गेलं.’

व्यक्तिरेखेच्या अभ्यासाविषयी बोलताना त्याने नाटकाच्या प्रक्रियेचा मुद्दा मांडला. अंकुशची नाटकाची पाश्र्वभूमी असल्यामुळे त्याला नाटकाच्या प्रक्रियेतले खाचखळगे माहीत आहेत. तो सांगतो, ‘चित्रपटातली भूमिका साकारताना मी नाटकाच्या प्रक्रियेप्रमाणे वागतो. लिखाणापासूनच लेखकासोबत राहावं असं माझं मत आहे. लेखक एखादी व्यक्तिरेखा लिहीत असताना ती फुलत जाते, मोठी होते. मी लेखकासोबत या प्रक्रियेत पहिल्यापासून असलो तर मला त्या व्यक्तिरेखेला मोठं होताना बघता येतं. ती घडली कशी याचा अनुभव घेता येतो. या सगळ्यातून मला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात. मी स्वत: यातून घडत जातो.’ कलाकार म्हणून घडण्याचा अनुभव तो सांगतो.

संजय जाधव दिग्दर्शित ‘गुरू’ हा सिनेमा फिल्मी, रंगीबेरंगी आणि मनोरंजन करणारा आहे. या सिनेमाच्या निमित्ताने इरॉस या बडय़ा प्रॉडक्शन कंपनीने मराठी सिनेमाच्या निर्मितीत पदार्पण केलंय. हा सिनेमा आणि यातल्या भूमिकेविषयी अंकुश व्यक्त होतो, ‘प्रेम, दु:ख, अ‍ॅक्शन, संगीत, नृत्य, भावना असं सगळ्याचं पॅकेज असणारा ‘गुरू’ सिनेमा मनोरंजक आहे. यातली गुरू ही व्यक्तिरेखा मी साकारतोय. सामान्यांचा हिरो म्हणजे गुरू असं म्हणता येईल. त्याच्याही स्वभावाच्या वेगवेगळ्या छटा आहेत. प्रेमळ, खोडकर, भावुक, दयाळू, रागीट असे सगळे पैलू त्यात आहेत. सर्वसामान्य व्यक्ती ज्याप्रमाणे वावरते, वागते, व्यक्त होते त्याचप्रमाणे गुरू आहे. गुरू सामान्यांमधलाच एक असल्यामुळे त्याला साधं दाखवणं गरजेचं होतं. पण, गोष्टी साध्या पद्धतीने मांडताना अधिक कठीण वाटतात. बोली भाषा, साधी स्टाइल असं सगळं दाखवणं कठीण असतं.’ अभिनयाने रडवणं एकवेळ सोपं पण, हसवणं कठीण असं म्हणतात. तसंच एखादी कठीण गोष्ट मांडणं सोपं असतं पण, साधं-सहज गोष्ट सादर करणं हे सर्वात कठीण असतं. ‘गुरूला सामान्यांमधलंच एक बनवण्यासाठी पण, स्टायलिश ठेवण्यासाठी त्याच्या पेहरावावर प्रयोग केले आहेत. हर्षदा खानविलकर आणि अश्विनी यांनी त्यात विशेष कामगिरी केली आहे. गळ्यात अडकवलेलं ‘जी’ हे इंग्रजी अक्षर, हातातलं कडं, वेगवेगळ्या बाजूंनी फाडून पुन्हा शिवून तिथे चैन लावलेल्या जीन्स, मक्र्युरी गॉगल असा लुक तयार केला आहे’, अंकुश सांगतो. शिवाय या सगळ्या गोष्टी करताना तो सर्वसामान्य घरातला मुलगा आहे हे लक्षात ठेवून त्याचं स्टायलिंग केलं आहे.

‘दुनियादारी’ हा सिनेमा आला त्या वर्षांत स्वप्निल जोशी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. त्यानंतर आलेल्या त्याच्या विविध कामांमुळे त्याच्या चाहता वर्गात भरच पडली. स्वप्निलचे त्यानंतरचे सगळेच सिनेमे यशस्वी झालेच असे नाही, पण त्याच्या कामाचं कौतुक होत गेलं. तसंच यंदा अंकुशचं झालं असं म्हणायला हरकत नाही. ‘दुनियादारी’ या सिनेमात त्याची मुख्य भूमिका नसली तरी तो भाव खाऊन गेला. पण, मुख्य भूमिका असणाऱ्या त्याच्या काही सिनेमांमुळे नंतर त्याने प्रेक्षकांची पसंती मिळवली. त्याचे मात्र गेल्या वर्षी आलेले तिन्ही सिनेमे लोकप्रिय झाले आणि प्रेक्षकांच्या लक्षातही राहिले. दुनियादारीनंतर क्लासमेट्समध्येही त्याने महाविद्यालयीन तरुणाची भूमिका साकारल्याने प्रेक्षक काहीसे नाराज झाले होते. तो महाविद्यालयीन तरुण वाटत नाही, तो त्याच-त्याच भूमिका करतोय अशा त्याच्यावर टीकाही झाल्या. अंकुशपर्यंत या प्रतिक्रिया पोहोचल्या होत्या. पण, त्यावर नाराज न होता त्या खिलाडू वृत्तीने घेण्यास त्याने प्राधान्य दिलं. ‘प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया सकारात्मकदृष्टय़ा घेणं खूप गरजेचं असतं. मीही तेच केलं. मी दोन सिनेमांमध्ये तशाच भूमिकांमध्ये दिसत असेन तर प्रेक्षकांना तसं वाटणं अगदी स्वाभाविक आहे. पण, ‘दुनियादारी’ आणि ‘क्लासमेट्स’ या दोन्ही सिनेमांमध्ये फ्लॅशबॅक गोष्ट होती. सिनेमा आजच्या काळात सुरू होऊन भूतकाळात जातो, अशी सिनेमांची मांडणी होती. दोन्ही लेखणातल्या व्यक्तिरेखा तशाच हव्या होत्या. कॉलेजमध्ये जाणारा मुलगा हवा म्हणून तसाच दिसणारा कलाकार घेतला असता तर तो आताच्या काळातला दाखवताना त्याच्या दिसण्यावर वेगवेगळे प्रयोग करावे लागले असते. हे खोटं वाटण्याची जास्त शक्यता होती, असं मला वाटतं. याबाबतचा आणखी एक मुद्दा असा की, दुनियादारीमध्ये दिग्या हा काही वर्षं नापास झालेला दाखवला आहे. कॉलेजमध्ये नुकताच प्रवेश घेतलेला मुलगा दाखवला नाही. त्यामुळे तो थोडा मोठा दाखवल्याचं समर्थन इथे होऊ शकतं. दुसरं महत्त्वाचं म्हणजे मी, दिग्दर्शक आणि लेखक आम्हा सगळ्यांना जोवर विशिष्ट गोष्ट पटत नाही तोवर आम्ही त्यात पुढे जात नाही. मला स्वत:ला एखाद्या गोष्टीबद्दल विश्वास वाटल्याशिवाय मी ते करत नाही’, अंकुश प्रेक्षकांचं म्हणणं मान्य करत त्याचाही मुद्दा पटवून देतो.

खरं तर कलाकाराला मोकळा वेळ मिळणं तसं थोडं कठीण. त्यातही एखाद्या कलाकाराचे सिनेमे लोकप्रिय होत असतील तर त्याच्याकडील कामाचा आवाका वाढत जातो. तरी मोकळा वेळ मिळाला की अंकुश चित्रपट, नाटकं बघतो. इंग्रजी सिरीजचा तो चाहता आहे. आंतरराष्ट्रीय सिनेमेही त्याच्या यादीत असतात. विविध ठिकाणच्या विविध प्रकारच्या कलाकृती बघत राहणे हा त्याच्या अभ्यासाचा एक भाग असल्याचं तो सांगतो. मोकळ्या वेळेचा सदुपयोग कसा करतो हे सांगतानाच तो नाटक मिस करत असल्याचंही आवर्जून सांगतो. ‘नाटक हा माझ्या करिअरचा पाया होता. ती एक शाळाच होती माझ्यासाठी. तो पाया भक्कम केला म्हणूनच आज इथवर पोहोचलो आहे. नाटक करताना मिळालेल्या प्रत्येक शिकवणीचा मला आज खूप फायदा होतोय. आजही नाटक करायला आवडेल. पण, त्याची तालीम अडीच-तीन महिने व्हायला हवी. तालमीला पुरेसा वेळ दिला तरच उत्तम नाटय़कृती घडते. तसंच ब्रॉडवेला ज्या प्रकारे नाटकं होतात तसं करायला मिळालं तर उत्तमच. अशा नाटकाचे दोन वर्ष फक्त शनिवार-रविवार प्रयोग झाले तरी चालेल’, नाटकावरचं प्रेम अंकुश व्यक्त करतो.

वेगवेगळ्या विषयांच्या, प्रकारच्या सिनेमांमध्ये आपल्या आवडत्या प्रकाराबद्दल तो सांगतो, ‘लहानपणापासून बहुतेक जणांना सुपरहिरोचं वेड असतं. सुपरमॅन, बॅटमॅन, जेम्स बॉण्ड ही कॅरेक्टर्स मला नेहमीच आकर्षक वाटतात.  असं एखादं पात्र साकारायला मला नक्कीच आवडेल. यांचे सिनेमे सीरिजमध्ये चालायला हवेत. सीरिज करताना जवळपास सहा-सात सिनेमे होतील असं काम करायची इच्छा आहे.’ ‘गुरू’ या सिनेमानंतर लगेच त्याचा कुठलाही सिनेमा येत नाहीये. पण, नेहमीप्रमाणे वेगळं काही देण्याचा प्रयत्न असेल, असं तो सांगतो. त्यामुळे येणाऱ्या काही महिन्यांत अंकुशच्या वेगळ्या आणि नावीन्यपूर्ण भूमिका बघायला मिळू शकतात.
चैताली जोशी –

Story img Loader