अलीकडेच प्रदर्शित झालेल्या संजय लीला भन्साळी यांच्या ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटात मराठी कलाकारांनी वेगवेगळ्या भूमिका केल्या आहेत. मोठय़ा बॅनरबरोबर तसंच ऐतिहासिक चित्रपटात काम करण्याचा त्यांचा अनुभव कसा होता, त्यातून त्यांना नेमकं काय मिळालं याविषयी त्यांच्याशी गप्पा-
संजय लीला भन्साळीचा ‘बाजीराव मस्तानी’ प्रदर्शित झाला आणि दीपिका-प्रियंका-रणवीर यांच्याबरोबरच प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं ते या चित्रपटात भूमिका केलेल्या काही मराठी कलाकारांनी. महेश मांजरेकर यांचे शाहू महाराज, मिलिंद सोमण यांनी साकारलेले पंत प्रतिनिधी, वैभव तत्त्ववादीचा चिमाजी अप्पा, यतिन कार्येकरांचा कृष्णाजी भट, सुखदा खांडकेकरची अनुबाई, अनुजा साठेची भिऊबाई, मस्तानीची मैत्रीण असलेली स्वरांगी मराठे या भूमिका दखल घ्यायला लावणाऱ्या होत्या. सिनेमा मराठय़ांच्या इतिहासावर आधारलेला असल्यामुळे त्याला मराठी टच देण्यासाठी दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी मराठी कलाकारांची फळीच या सिनेमात उभारली असावी. सिनेमाच्या तुलनेत त्यांचा वाटा खारीचा असला तरी तो महत्त्वाचा आहे. म्हणूनच या कलाकार मंडळींशी केलेली बातचीत.
वैभव तत्त्ववादी : चिमाजी अप्पा
वैभव तत्त्ववादी या अभिनेत्याला सिनेसृष्टीत येऊन साधारण पाचेक वर्ष झाली. इतक्या कमी कालावधीत या कलाकाराची झेप कौतुकास्पद म्हणावी लागेल. मालिका, मराठी सिनेमा, हिंदी सिनेमा असा त्याचा प्रवास फार वेगाने होत गेला. वैभव खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आला तो, ‘कॉफी आणि बरंच काही’ या सिनेमापासून. ‘हंटर’ या हिंदी सिनेमातल्या त्याच्या भूमिकेचीही दखल घेतली गेली. यानंतर त्याचे काही मराठी सिनेमे प्रदर्शित झाले. २०१५ हे वर्ष वैभवसाठी चांगलं होतं. याचं कारण त्याचं काम अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचत होतं. ‘हंटर’, ‘कॉफी..’ या सिनेमांप्रमाणेच आता त्याच्या ‘बाजीराव मस्तानी’ या सिनेमातल्या चिमाजी अप्पा या भूमिकेसाठी कौतुक होतंय. पण, या सिनेमापर्यंत पोहोचण्याचा प्रवास थोडा यू टर्नचा आहे असं म्हणावं लागेल. ‘बाजीराव मस्तानी या सिनेमासाठी मी ऑडिशन दिली. त्यानंतर तिथून बरेच दिवस काही निरोप आला नाही. दरम्यान, माझं प्रकाश झा यांच्या एका आगामी सिनेमासाठी शूटिंग सुरू झालं होतं. माझं तिथलं काम बघून मला चिमाजी अप्पा ही भूमिका मिळाली. दोन्ही कामांमुळे आत्मविश्वास वाढत गेला. कॉलेजमध्ये असताना एकदा मी एकांकिका केली होती. त्याच्या पुढच्या वर्षी त्याच स्पर्धेसाठी संजय भन्साळी सर आले होते. त्यांनतर त्यांची-माझी भेट थेट ‘बाजीराव मस्तानी’च्या सेटवर. भव्यदिव्य अशा सेटवर भन्साळीसरांसोबत काम करायचं म्हणजे पर्वणी होती. त्यांच्याकडून असंख्य गोष्टी शिकलो’, वैभव सांगतो. रणवीर आणि प्रियंका या दोघांसोबत वैभवचं जास्तीत जास्त काम होतं. संवादफेक, डोळ्यांमधून व्यक्त होणं, घराणेशाहीचा रुबाब असं सगळंच वैभवने उत्तम रेखाटलंय. रणवीरसोबत त्याची चांगली मैत्री झाल्याचं तो सांगतो. चित्रपटाच्या सेटवर अनेक जण मराठी बोलायचे. याबाबत वैभव सांगतो, ‘भन्साळी सर उत्तम मराठी बोलतात. माझ्याशी ते नेहमी मराठीतच बोलतात. माझ्या पहिल्या सीननंतर ते माझ्याजवळ आले. मला मिठी मारली आणि तुझे डोळे खूप बोलतात असे म्हणाले. त्यांची ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप महत्त्वाची होती.’ वैभवची चित्रपटांची गाडी आता सुसाट वेगाने धावू लागली आहे. आगामी काही हिंदी सिनेमांमध्ये तो मोठमोठय़ा दिग्दर्शक-कलाकारांसोबत काम करताना लवकरच दिसेल.
अनुजा साठे : भिऊ बाई
अनुजा साठे या अभिनेत्रीला विविध मालिकांमधून प्रेक्षकांनी याआधी बघितलं आहे. ‘मांडला दोन घडीचा डाव’, ‘लगोरी’, ‘अग्निहोत्र’, ‘सुवासिनी’ अशा काही मालिकांमध्ये तिने तिच्या अभिनयाची चमक दाखवून दिली. मालिका ते ‘बाजीराव मस्तानी’ या प्रवासाचा तिचा अनुभव अत्यंत आनंददायी असल्याचं ती सांगते. ‘बाजीराव मस्तानी या सिनेमासाठी ऑडिशन्स सुरू होत्या. तिथे मला बोलावलं. नऊवारी नेसून ऑडिशनसाठी येण्यास सांगितलं. असं सांगितल्याप्रमाणे मी मराठमोळ्या लुकमध्ये ऑडिशनला गेले. महाराष्ट्रीय पारंपरिक दागिने घालून तयार झाले. ऐतिहासिक संवाद असलेले दोन प्रसंग तयार करून गेले होते. साधारण सहा दिवसांनी निवड झाल्याचा फोन आला’, अनुजा सांगते. २०१४ मध्ये ऑक्टोबरपासून सुरू झालेलं शूटिंग वर्षभराने म्हणजे २०१५ सप्टेंबरमध्ये संपलं. हिंदी इंडस्ट्रीतल्या अनुभवी, हुशार दिग्दर्शकासोबत वर्षभर काम केल्याचं समाधान अनुजाच्या बोलण्यातून झळकत होतं. अनुजा सांगते, ‘भन्साळीसरांचा एखाद्या प्रसंगाकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा असतो. त्यांचं व्हिजन उत्तम आहे. प्रत्येक गोष्टीतले बारकावे शोधण्याच्या त्यांच्या चांगल्या सवयीचं अप्रुप वाटलं. आमच्या साडय़ा कोणत्या रंगाच्या आणि डिझाइनच्या असतील याचाही व्यवस्थित अभ्यास करून मग त्या निश्चित केल्या गेल्या. जितके अभ्यासू आहेत तितकेच ते इतरांमध्ये मिसळणारेही आहेत. खूप दिवसांच्या ब्रेकनंतर मी शूटिंगला आल्यानंतर सेटवर माझं हसून, आनंदाने स्वागत करायचे. असं फक्त माझ्याच बाबतीत नाही तर इतरांच्याही बाबतीत मी बघितलं आहे. ज्यांच्यासोबत काम करण्यासाठी कोणताही कलाकार नेहमी प्रयत्नशील असतो त्यांच्यासोबत मला काम करायला मिळाल्यामुळे मी समाधानी आहे.’ चित्रपटात अनुजाचे सीन्स प्रियंकासोबत जास्त आहेत. त्यामुळे साहजिकच संपूर्ण शूटिंगमध्ये दोघी एकत्र असायच्या. हिंदी सिनेसृष्टीतल्या उत्तम अभिनेत्रींपैकी प्रियंका एक आहे. तिचं काम कमी असो वा जास्त ती तिचं काम चोख करते. याचा प्रत्यय ‘बाजीराव मस्तानी’तूनही आला. अनुजाही तिच्याबद्दल सांगते, ‘एखादा प्रसंग शूट होण्याआधी आम्ही तो एकत्र वाचायचो. ती प्रचंड क्रिएटिव्ह असल्याने प्रसंगांमध्ये थोडं वेगळपण यायचं. तिला नेमकं काय करायचं आहे हे ती अचूकपणे जाणते.’ रणवीर-दीपिका-प्रियंका हे तिघे एकत्र एका सिनेमात आहेत म्हणजे सेटवर धमाल तर होत असणारच. असाच एक किस्सा अनुजा सांगते. ‘रणवीर-दीपिका दोघेही उत्तम कलाकार तर आहेतच; शिवाय सहकलाकाराला मदत करणारेही आहेत. एका प्रसंगात मी बाजीरावांना उखाणा घेण्याचा आग्रह करते. तेव्हा माझं एक वाक्य आहे की उखाणा घेतला नाही तर नवीन खोलीत प्रवेश मिळणार नाही. तर ‘आपको नये कमरेमें प्रवेश नहीं मिलेगा’ मी प्रवेशऐवजी चुकून एंट्री म्हणाले आणि सगळे हसायला लागले. मग असं होत असतं, माझंही झालं होतं, मीही एकदा सॉरी म्हणालेलो असं सगळं सांगून त्याने समजूत काढली,’ ती सांगते.
यतिन कार्येकर : कृष्णाजी भट
‘हम दिल दे चुके सनम’ या सिनेमातल्या एका भूमिकेसाठी त्यांना विचारलं होतं. तेव्हा त्यांना ती भूमिका फारशी आवडली नसल्यामुळे नकार दिला. कट टू ‘सरस्वतीचंद्र’ या मालिकेचा सेट. तिथे संजय लीला भन्साळी आणि त्यांची पुन्हा एकदा भेट झाली. त्या वेळी ते भन्साळींना भेटून त्यांची ओळख करून देताना ‘अर्थात मी तुम्हाला ओळखतो’ असं भन्साळी म्हणाले. इथून खऱ्या अर्थाने ‘बाजीराव मस्तानी’चा त्यांचा प्रवास सुरू झाला. यातले ते म्हणजे यतिन कार्येकर. ‘बाजीराव मस्तानी’मधले कृष्णाजी भट. ‘मी ‘हम दिल..’ सिनेमातली भूमिका नाकारल्यानंतर भन्साळींचीच निर्मिती असलेल्या ‘सरस्वतीचंद्र’या मालिकेत कुमुदच्या वडिलांची भूमिका केली. या दोन्हींमध्ये साधारण पंधरा वर्षांचं अंतर आहे. तरी भन्साळी यांनी मला चटकन ओळखलं. त्या भेटीनंतर काही दिवसांनी मला त्यांच्या ऑफिसमधून ऑडिशनसाठी फोन आला. लुक टेस्ट वगैरे होऊन कृष्णाजी भट ही भूमिका मिळाली’, यतिन सांगतात. संजय भन्साळी यांच्या संतापाचे किस्से ऐकले-वाचले आहेत. पण, यतिन त्यांच्या संतापाचं समर्थन करतात ते असं, ‘मी त्यांच्या चिडण्याला पाठिंबा देतो. कारण त्यांनी एखाद्या सिनेमासाठी, प्रसंगासाठी जितकी तयारी, मेहनत घेतलेली असते तितकीच इतकांनी घ्यावी अशी त्यांची इच्छा असते. एखादा माणसू इतक्या एकाग्रतेने, जीव ओतून काम करत असेल तर त्याला अशी अपेक्षा करण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यांची विचारसरणी खूप वेगळी आहे. ते वेगवेगळ्या गोष्टी करत नाहीत तर गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने सादर करतात, घडवतात. प्रत्येक गोष्टीतले, घटनेतले नवनवीन कंगोरे, पैलू, बारकावे असं सगळ्याकडे त्यांचं लक्ष असतं.’ इतर कलाकारांप्रमाणे यतिनही भन्साळी यांच्या मराठी बोलण्याबाबत व्यक्त होतात. ‘भन्साळी यांनी काही मराठी पुस्तकं वाचली आहेत. ते व्यवस्थितपणे मराठी बोलतात. मराठी भाषेतले बारकावेही त्यांना अचूक कळतात. फक्त मिरच्यांचा ठेचा असतो आणि त्यात शेंगदाणे घातले की तो खरडा होतो हा फरक त्यांना समजतो,’ असं सांगत यतिन भन्साळी यांच्या बारकाव्यांनिशी अभ्यास करण्याची वृत्ती अधोरेखित करतात. एका दिवसात अमुक इतके सीन्स झालेच पाहिजेत, असा नियम घालणारे इंडस्ट्रीत अनेक असतील, पण भन्साळी हे अपवाद आहेत. ‘बाजीराव मस्तानी’च्या एका सीनसाठी तीन-तीन दिवस लागत होते. ‘मी, तन्वी आझमी, रणवीर आणि त्याची सिनेमातली दोन्ही मुलं, असा आम्हा सगळ्यांचा नदीकाठचा एक सीन होता. तो सीन शूट झाला. पण, सीनच्या शेवटी त्याचा परिणाम फार येत नव्हता. भन्साळी माझ्याजवळ आले. मला म्हणाले, सीनमध्ये शेवटी एक वाक्य घे. ते वाक्य त्यांनी मला इंग्रजीत सांगितलं. ‘तुम्ही असं केलंत तर आम्ही सगळे ब्राह्मण पेशवे घराण्यावर बहिष्कार घालू’ या अर्थाचं हिंदी वाक्य मी तयार केलं. या सीनचा आणखी एक टेक घेतला. तेव्हा मी हे जास्तीचं वाक्य म्हणालो. त्या वेळी या वाक्याला रणवीर आणि तन्वी आझमी यांची प्रतिक्रिया आली ती कृत्रिम नव्हती. त्यांना माहीतच नव्हतं, मी असं वाक्य घेणार आहे ते. असंच भन्साळींना हवं होतं म्हणून त्यांनी हे फक्त मलाच सांगितलं होत, यतिन सांगत होते.
सुखदा खांडकेकर : अनुबाई
इतर काही कलाकारांप्रमाणेच सुखदा खांडकेकर हीसुद्धा ऑडिशन-लुक टेस्ट-फोटो पाठवणे या सगळ्या प्रक्रियेतून गेली आहे. पारंपरिक मराठी वेशभूषा करून सुखदाची ऑडिशन घेतली होती. ‘नऊवारी, खोपा, पारंपरिक मराठी दागिने अशी तयारी करूनच मी ऑडिशनला गेले. काही दिवसांनी निवड झाल्याचं कळलं. लुकवर प्रयोग केले गेले. या सगळ्यात भन्साळी सर कपाळावरची चंद्रकोर नेमकी कुठे असावी यावरही विचार करत होते. बारकाव्यांचाही ते अभ्यास करतात, हे इथे सिद्ध होतं’, सुखदा सांगते. प्रियंका-रणवीर यांच्या नावाला वलय असलं तरी सेटवर सहकलाकारांसोबत ते वलय आड येत नसल्याचं सुखदा सांगते. दोघांनीही सुखदाला स्वत:हून भेटून ओळख करून दिली. कधी काही अडचण आलीच तर भन्साळींसोबत त्याची चर्चा होऊ शकायची. इथवर त्यांच्यात मोकळेपणा होता. ‘बाजीराव मस्तानीचा ट्रेलर प्रदर्शित झाला तेव्हा आपण इतक्या भव्य प्रोजेक्टचा भाग आहोत याचा विचार करून मी भारावूनच गेले,’ सुखदा तिचा अनुभव सांगते. ‘सिनेसृष्टीतली माणसं मोठी होतात ते त्यांच्या कामातून; याचा प्रत्यय भन्साळी आणि इतर कलाकारांच्या कामाच्या पद्धतीकडे बघून सतत यायचा. दीपिका कामाचं कौतुक करायची, छान दिसतेस सांगायची; आपण मोठय़ा कलाकारांसोबत काम करतोय असं वाटायचं नाही. सीन नसला की आम्ही सगळ्या एकत्र बसून सामाजिक विषयांवर बोलायचो. आजूबाजूला घडणाऱ्या घटनांवर चर्चा करायचो. यातून नकळत मी खूप काही शिकत गेले. कलाकार घडण्याची प्रक्रियाच होती ती,’ असं ती नमूद करते. भन्साळींसोबत अनेकदा मराठीतून बोलणं होत असल्याचाही ती उल्लेख करते. शूटिंग दरम्यानही एक आठवण ती सांगते, ‘आम्ही रांगोळ्या काढण्याचा एक प्रसंग आहे. तो प्रसंग शूट करताना एकदा सेटवर लीला भन्साळी म्हणजे संजय भन्साळींच्या आई आल्या. शूटिंगच्या अधेमधे आम्ही सगळेच त्यांच्याशी मराठीतून गप्पा मारत होतो. सेटवर येताना त्या काही ना काही आणायच्या. त्या दिवशी त्यांनी अळूवडय़ा आणल्या होत्या. रांगोळीचा प्रसंग सुरू असल्याने माझे हात खराब होते. म्हणून ‘नंतर घेते’ असं मी त्यांना म्हटलं. नंतर त्यांनी पुन्हा मला वडी दिली. पुन्हा माझं तेच उत्तर. शेवटी त्यांनी मला ‘अगं संपून जातील’ असं म्हणून त्यांच्या हाताने ती वडी भरवली. त्या क्षणी मी खूप भारावून गेले. त्यांनी ज्यांना भरवलं ते संजय सर आज उच्च स्थानावर आहेत आणि त्याच व्यक्तीने आज मलाही भरवलं हा माझ्यासाठी आशीर्वाद होता.’ सुखदाचा हा प्रवास तिच्या करिअरसाठी टर्निग पॉइंट ठरला आहे.
स्वरांगी मराठे : मस्तानीची सखी
‘आभाळमाया’ या लोकप्रिय मालिकेतली चिंगी आजही सगळ्यांना आठवते. गोड चेहरा आणि मोठय़ा माणसासारखं बोलणं हे त्या चिंगीचं वैशिष्टय़ होतं. या चिंगीने म्हणजे स्वरांगी मराठेने मोठी झेप घेतली आहे. ‘बाजीराव मस्तानी’मध्ये दीपिकाच्या म्हणजे मस्तानीच्या मैत्रिणीची भूमिका तिने साकारली आहे. स्वरांगीच्या निवडप्रक्रियेबद्दलही थोडी गंमत आहे. ‘संजय लीला भन्साळी यांचा मोठा प्रोजेक्ट सुरू आहे हे माहीत होतं. त्यासाठी ऑडिशन देण्यासंदर्भात मला सांगितलं. पेशव्यांवर आधारित सिनेमा असल्यामुळे मला पेशव्यांच्यांच एखाद्या व्यक्तिरेखेची ऑडिशन द्यावी लागेल असं वाटलं होतं. पण, तिथे गेले तर मला एका मुसलमान मुलीची ऑडिशन द्यायला सांगितली. दोन महिन्यांनी निवड झाल्याचं समजलं. लुक टेस्ट झाली. अखेर मस्तानीच्या मैत्रिणीची भूमिका मिळाली’, निवडप्रवासाबद्दल स्वरांगी सांगते. ‘खामोशी’, ‘ब्लॅक’, ‘हम दिल दे चुके सनम’ हे स्वरांगीचे आवडते सिनेमे. आवडत्या दिग्दर्शकासोबत काम करणं स्वरांगीसाठी आनंददायी घटना होती. संपूर्ण सिनेमात स्वरांगीचे दीपिकासोबत सगळ्यात जास्त सीन्स आहेत. ‘माझ्या कामाचं कौतुकही झालं आणि काही वेळा मला ओरडाही मिळाला आहे. त्यासाठी मी रडलेही आहे. त्या वेळी दीपिकाने मला खूप सांभाळून घेतलं, आधार दिला. ती सांगायची, ‘आम्हीही असे रडलो आहोत. आम्हालाही कामाचं दडपण असायचं, पण आपण प्रामाणिकपणे, जिद्दीने काम करत राहायचं.’ ते ऐकून आधार वाटायचा. शूटिंगदरम्यान आमची चांगली मैत्री झाली. माझ्या शूटिंगच्या शेवटच्या दिवशी तर ती स्वत:हून मला भेटायला आली. मिठी मारून छान काम केलंस, अशी प्रतिक्रियाही दिली’, ती सांगते. स्वरांगीच्या आवाजाला ब्राह्मणी ढब आहे. मुस्लिम मुलीची भूमिका साकारताना ती ढब काहीशी खटकत होती. त्याविषयी ती सांगते, ‘माझ्या आवाजातली ब्राह्मणी ढब काढून बुंदेली-हिंदी भाषेची ढब आणण्याचं श्रेय पूर्णपणे भन्साळी यांचं आहे. मी गात असल्याचा मला इथे खूप फायदा झाला. भन्साळीसर माझ्याशी बरेच वेळा मराठीतच बोलायचे. सेटवरही वातावरण बऱ्यापैकी मराठीच होतं.’ स्वरांगीच्या भूमिकेला मराठी सिनेसृष्टीतूनही चांगला प्रतिसाद मिळतोय.
चैताली जोशी –
response.lokprabha@expressindia.com
twitter – @chaijoshi11