ऐन दिवाळीत हिंदूीच्या स्पर्धेत मराठी चित्रपट प्रदर्शित करायला फारसा उत्साह नसतो. पण यंदा मात्र चक्क दोन मोठय़ा बॅनरच्या चित्रपटांच्या प्रदर्शनामुळे प्रेक्षकांना दिवाळीची मेजवानी तर मिळणार आहेच, पण एक चांगली सशक्त स्पर्धादेखील होणार आहे.

गेल्या चार वर्षांपासून मराठी चित्रपटसृष्टीत वर्षांला शंभर सव्वाशे चित्रपटांचा रतीब घातला जातोय. या वर्षी तर एकाच आठवडय़ात चार-चार चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. असे असले तरी एकाच वेळी दोन तुल्यबळ बॅनरचे चित्रपट आणि तेदेखील दिवाळीत असे आजवर कधी झाले नव्हते. किंबहुना मराठीतलाच एखादा बिग बजेट चित्रपट अथवा मोठे बॅनर असेल तर इतर चित्रपट फारसे फिरकतदेखील नाहीत. हिंदीतला बिग बजेट असेल तर सारेच गाशा गुंडाळतात. या पाश्र्वभूमीवर ‘कटय़ार काळजात घुसली’ आणि ‘मुंबई-पुणे-मुंबई २ लग्नाला यायचं हं.’ ह्य़ा दोन चित्रपटांच्या ऐन दिवाळीतल्या प्रदर्शनामुळे एक चांगली स्पर्धा आणि चित्रपट रसिकांना मेजवानीच मिळणार आहे.
एक आहे भरजरी, ऐतिहासिक परंपरा लाभलेला, राजप्रासादातून भारतीय संगीताचे सूर घुमणारा. तर दुसरा आहे एक खटय़ाळ प्रेमकथेला मिळालेला लग्नाचा गोडवा बहारदार सोहळ्यातून मांडणारा भावनात्मक चित्रपट.
पुरुषोत्तम दारव्हेकर, वसंतराव देशपांडे, आचरेकर अशा दिग्गजांची झळाळती परंपरा लाभलेल्या ‘कटय़ार काळजात घुसली’ या तमाम मराठी रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवलेल्या नाटय़कृतीच्या परंपरेची पाश्र्वभूमी ‘कटय़ार काळजात घुसली’ या चित्रपटाला लाभली आहे. ती जोपासत स्वत:चा वेगळा चित्रपट मांडणं हे नक्कीच कौशल्याचे काम. शंकर महादेवन यांचे रुपेरी पडद्यावरील आगमन, सुबोध भावेचे पहिले चित्रपट दिग्दर्शन, शंकर-एहसान-लॉय यांचे प्रथमच मराठीत संगीत अशा काही प्रथमच घडणाऱ्या घटना हादेखील याचा महत्त्वाचा घटक.
तर दुसरीकडे ‘मुंबई पुणे मुंबई’ या पहिल्या भागाची जबरदस्त लोकप्रियता. त्यातूनच मुक्ता बर्वे आणि स्वप्निल जोशी या लोकप्रिय कलावंताच्या या कथेतल्या आयुष्यात डोकावण्याची प्रेक्षकांची उत्सुकता. नातेवाईकांच्या रूपाने प्रशांत दामले, सुहास जोशी अशी मराठीतल्या तगडय़ा नामवंतांची मांदियाळीच ‘मुंबई-पुणे-मुंबई २ लग्नाला यायचं हं.’मध्ये जमणार आहे. मध्यमवर्गीयाच्या आयुष्यात आनंदाची पर्वणी असणाऱ्या घटनांमध्ये विवाह सोहळा हा अत्यंत महत्त्वाचा असतो. त्यामुळे खटय़ाळ प्रेमाची परिणती विवाहात होत असतानाची उत्सुकता यातून पूर्ण होणार आहे.
विषय आणि मांडणी यात दोन्ही चित्रपट वेगळे असले तरी सुबोध भावे आणि सतीश राजवाडे या दोघांनी सादरीकरणात बाजी मारल्याचे सध्या ट्रेलरवरून तरी जाणवतेय. त्यातून विषयाच्या मांडणीत वेगळपण आणण्याचा प्रयत्न दिसून येतोय. अर्थातच दोन्हीकडे प्रेक्षकांची अपेक्षा सारखीच असणारे आहे, वेगळे काय पाहायला मिळणार. जुन्याचे नूतनीकरण, की जुन्याचे पुढचे पाऊल की जुन्यातल्या गाळलेल्या जागा भरून नवे रूप, की जुन्यावरच आधारित नवं काही. दोन्ही चित्रपटांमागे पूर्वसंचिताचा भाग असला तरी साहजिकच तुलना होण्याची शक्यतादेखील हमखास आहे.
कटय़ारच्या परंपरेचे ओझे न होऊ देता, वेगळ्या कथानकाच्या मार्गाने संगीत या मूळ विषयाची व्याप्ती वाढवत पुढे नेणे दिसणार असल्याचं दिग्दर्शक सांगातात. तर मुंबई-पुणेमध्ये पहिल्या भागातील प्रेमकथेचा खटय़ाळ खोडकर आणि काहीसा तिरकस बाज न मोडता दोन घरांना एकत्र आणणाऱ्या सोहळ्यातून गोष्ट पूर्णत्वाला नेण्याची आस दिसणार आहे.
कटय़ारबद्दल सुबोध भावेंनी काहीसा वेगळा फॉर्म वापरत केवळ नाटकाचा चित्रपट न करता कथेचा विस्तार करत एक नवे कथानकच समोर आणले आहे. तर सतीश राजवाडे यांनी पहिल्या टप्प्यातले खटय़ाळ प्रेम पुढे नेताना त्याला सोहळ्यातून फुलवलेले आहे.
चित्रपटांचे ट्रेलर पाहिल्यानंतर आणि सिनेमाकर्त्यांशी बोलताना त्यांनी सादरीकरणावर, कथेवर घेतलेला वेळ, मेहनत जाणवते. जवळपास तीन-साडेतीन वर्षे दोघांनी या चित्रपटावर काम केले आहे आणि ट्रेलरच्या माध्यमातून सध्या तरी त्यांच्या सादरीकरणातलं नाविन्य नक्कीच जाणवते.
मराठी चित्रपटसृष्टीला ऊर्जितावस्था प्राप्त होऊन आता १० वर्षे लोटली. नवे प्रयोग, नवी कथा, नवी मांडणी असे सारे प्रयोग झाले. गेल्या दोन-तीन वर्षांत सीक्वेलचे प्रयोगदेखील झाले. पण कथेच्या मांडणीसाठी काळ -काम- वेगाचे समीकरण पैशाच्या गणितात बसवताना हात आखडता न घेणारे तसे विरळाच. अर्थात, या सर्व गणितातून साकारलेले हे दोन्ही चित्रपट यंदा ऐन दिवाळीत १२ नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहेत.
दीर्घ सुट्टीचा कालावधी आणि दिवाळीच्या सेलेब्रेशनचा मूड हा अशा चित्रपटांनी द्विगुणित होऊ शकतो ही व्यावसायिक संधी कोणाही निर्मात्याला हातची घालवणे शक्य नाही. एकीकडे मराठी चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरची तोकडी कामगिरी (अपवाद वगळता) असतानादेखील दिवाळीत दोन चित्रपटांची ही सशक्त आणि दर्जेदार जुगलबंदी चैतन्य आणणारी ठरू शकेल.
एखाद्या आठवडय़ात एक चांगला चित्रपट आणि बाकीचे तद्दन किंवा एकच चित्रपट बाकी कोणीच नाही हे काही चांगल्या स्पर्धेचे लक्षण म्हणता येणार नाही. पण यंदा ही व्यावसायिक स्पर्धा चांगल्या अर्थाने रंगणार आहे. महत्त्वाचे म्हणजे निर्माते वितरक एस्सेल व्हिजन आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेंट हेही व्यावसायिकता क्रिएटिव्हली जोपासणारे आहेत. अर्थातच त्याचा फायदा मराठी चित्रपटसृष्टीला, तसाच प्रेक्षकांनादेखील होऊ शकतो.
मराठी चित्रपटसृष्टीतल्या आणखीन व्यावसायिकतेकडे जाण्याची ही एक चांगली सुरुवात म्हणून पाहायला हरकत नाही. अर्थात ‘प्रेम रतन धन पायो’ हा सूरज बडजात्यांचा चित्रपट सलमान-सोनम कपूरसह अवतरला तर मात्र मराठी प्रेक्षकांची जबाबदारी वाढलेली असणार आहे.

बहारदार सोहळा – सतीश राजवाडे
मुंबई-पुणे-मुंबईमध्ये ज्या नोटवर संपतो त्यापुढे नायक-नायिकेच्या आयुष्यात पुढे काय होतं याची रसिकांना खूपच उत्सुकता होती. त्यामुळेच ‘मुंबई-पुणे-मुंबई २’ मध्ये हा प्रवास थेट लग्नापर्यंत पोहचला आहे. पहिल्या भागानंतर दुसरा भाग लगेचच लिहायला घेतला होता. पण स्क्रिप्ट पूर्ण होईपर्यंत मुक्ता आणि स्वप्निल खूपच लोकप्रिय झाले असल्यामुळे अनेक चित्रपटात व्यस्त होते. पहिल्या भागात या दोघांच्या आईवडिलांचा काहीच संदर्भ आलेला नव्हता. चित्रपट दोघांभोवतीच गुंफला होता. आता लग्न आहे. लग्न हे केवळ दोघांपुरते मर्यादित नसते. दोन घरांमध्ये होते. मुलामुलीवरचे संस्कार वागणे बोलणे यामागे त्याचे घरदेखील महत्त्वाचे असते. अर्थातच दुसऱ्या भागातले स्वप्निल-मुक्ताचे आई-वडील, इतर नातेवाईक हेदेखील त्यांच्या प्रतिमेला साजेसा असाच आहे. मोठी स्टारकास्ट हे याचे वैशिष्टय़ म्हणावे लागेल. अर्थात हे सारे पहिल्या भागाचा बाज घेऊनच पुढे जाणारे आहे. मध्यमवर्गीय घरातील आनंदाच्या सोहळ्यात जे अप्रूप असते तेच येथे बहारदार पद्धतीने मांडले आहे. बजेटसंदर्भात निर्मात्यांनी दिलेली मोकळीक हादेखील महत्त्वाचा मुद्दा आहे. सध्या एकाच आठवडय़ात दोन-तीन चित्रपट क्लॅश होण हे नेहमीचेच झाले आहे. पण जर दोन चांगले चित्रपट असे येत असतील तर इंडस्ट्रीची प्रगती होतेय असे सुद्धा म्हणता येईल. दर्जेदार चित्रपटांची संख्या वाढत असल्याचं लक्षण म्हणता येईल.

कटय़ारची कथा – सुबोध भावे
हा चित्रपट केवळ नाटकाचे चित्रपटरूपांतर नाही. नाटकासारखेच येथे पाहायला मिळेल अशी अपेक्षा ठेवू नये. तसे करायचे असते तर मी नाटकाचे चित्रीकरण केले असते. नाटकात वसंतरावांनी खाँसाहेब केल्यामुळे हे नाटक खाँसाहेबांचे झाले आहे. पण कथानकातली सारी पात्रे ही त्या कटय़ारभोवती गुंफली आहेत, म्हणूनच चित्रपट करताना कटय़ार मध्यवर्ती धरूनच ही पात्रे उलगडली आहेत. चित्रपट हा कटय़ारच्या आयुष्यात काय घडले, तिच्या आयुष्यात आलेली पात्रे दाखवतो. चित्रपटाची कथा ही वेगळी आहे. कटय़ार हे नाटकात बांधले गेलेय असे मला कायम वाटत होते. त्यामुळे जेव्हा माझ्या डोक्यात म्युझिकल फिल्म करायची असे होते तेव्हा कटय़ारच समोर होते. चित्रपट दिग्दर्शनाचा थेट अनुभव नसला तरी मी या नाटकाचे दिग्दर्शन केले होते. आणि गेली १५ वर्षे इंडस्ट्रीत काम करताना निर्मिती प्रक्रिया पाहताना अभ्यासली आहे. गाजलेल्या कलाकृतीवर काम करताना दडपण असतेच, नाही म्हटले तरी तुलना होतेच. शंकर महादेवन यांच्या पहिल्या वाहिल्या कामाबद्दल बोलायचे तर गायकांनी अभिनय करणे ही आपल्या भारतीय संगीताधारित नाटक चित्रपटाची परंपराच आहे. तीच मी पुढे नेतोय. सांगीतिक चित्रपट आपल्याकडे फारसे नाहीतच. या चित्रपटातून भारतीय संगीताचा वारसाच पुढे नेण्याचा प्रयत्न आहे. मराठीतल्या आजवरच्या चित्रपटांच्या तुलनेत याचा निर्मिती खर्च मोठा आहे.
सुहास जोशी – response.lokprabha@expressindia.com 

Story img Loader