कोशिंबीर आणि रायतं याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत. कोशिंबिरी आपण कच्च्या खातो. त्यात जीवनसत्त्व भरपूर असते. तेलही खूप कमी असते. त्या चावून खाल्ल्यामुळे पोटाचे आरोग्य टिकून राहते. कधी कधी याच कोशिंबिरी आणि रायतं यांचा ब्रेंडमध्ये स्प्रेड करून दुपारच्या जेवणात वापर करू शकतो.

गाजराची कोशिंबीर

साहित्य :
दोन तीन गाजरं किसून घ्या. एक कांदा बारीक चिरून घ्या. एक-दोन हिरव्या मिरच्या चिरून घ्या. िलबाचा रस एक चमचा, मीठ चवीप्रमाणे.

कृती :
सर्व वस्तू एकत्र करून खा आणि आणखी चविष्ट पर्याय हवा असेल तर फोडणी द्या.

बीटरूटची कोशिंबीर

साहित्य :
दोन बीटरूट, दही एक कप, दोन-तीन हिरव्या मिरच्या, कोिथबीर पाव कप, मीठ चवीप्रमाणे, जिरेपूड एक टीस्पून, साखर एक टीस्पून, तेल फोडणीसाठी.

नोट : ही कोशिंबीर दोन प्रकारांनी करता येईल.

१.     न उकडता बीटरूट किसून त्यात मीठ व जिरेपूड घालून हिरव्या मिरचीची फोडणी करूनही चविष्ट लागते.

२.     बीटरूट उकडून किसून घ्या. दही घुसळून त्यात मीठ, साखर, जिरेपूड घाला. फ्रिजमध्ये ठेवा. किसलेले बीटरूट जेवताना दह्यमध्ये मिसळून वरून कोिथबीर चिरून घाला व खायला घ्या.

पालक रायतं

साहित्य :
कोवळा पालक दोन जुडय़ा, दही एक कप, लसूण दोन-तीन पाकळ्या, दोन-तीन हिरव्या मिरच्या, मीठ चवीप्रमणे, जिरेपूड अर्धा टीस्पून, तेल दोन-तीन टेस्पून.

कृती :
पालक धुऊन निथळून घ्या, लसूण आणि मिरची ठेचून घ्या, तेल तापवून त्यात लसूण व मिरचीची फोडणी करा. पालक जाडजाड चिरा आणि फोडणीत घाला व परतून गॅसवरून खाली उतरा. दही घुसळून त्यात मीठ, जिरेपूड घाला व पालक घालून नीट ढवळा. आवडीप्रमाणे गार करून खा.

काकडीची कोशिंबीर

साहित्य :
दोन काकडय़ा, अर्धा कप दही, दोन-तीन हिरव्या मिरच्या, मीठ चवीप्रमाणे, एक टीस्पून फोडणीसाठी तेल.

कृती :
काकडी चोचून घ्या किंवा बारीक चिरून घ्या. त्याला थोडे मीठ लावून ठेवा. अर्धा तासाने पिळून घ्या. त्यात थोडे मीठ, मिरचीचा कूट व दही घालून फोडणी करून लगेच खायला घ्या.

लेटय़ुस बुंदी रायतं

साहित्य :
लेटय़ुस एक जुडी, बुंदी एक कप, दही एक कप, मीठ चवीप्रमाणे, भाजून लगेच केलेली जिरेपूड, आवडीप्रमाणे लाल तिखट पावडर.

कृती :
दही घुसळून त्यात मीठ आणि जिरेपूड मिक्स करून ठेवा. बुंदी गरम पाण्यात बुडवून लगेच बाहेर काढा. लेटय़ुसची पाने कापून सर्व एकत्र करून लगेच खायला घ्या.
सीमा नाईक – response.lokprabha@expressindia.com

Story img Loader