साहित्य : दोन जुडय़ा अळूची पाने, एक वाटी तयार खिमा, अर्धी वाटी चिंचेचा कोळ, अर्धी वाटी गूळ, एक चमचा तिखट, पाव चमचा हिंग, दोन वाटी बेसन, दोन-तीन चमचे तेल, मीठ चवीनुसार.
कृती :
अळूच्या पानांचे देठ काढून साफ करून घ्यावीत. एका काचेच्या भांडय़ात बेसन, खिमा, चिंचेचा कोळ, गूळ, तिखट, हिंग, मीठ घालून जाडसर मिश्रण तयार करावे. हा मसाला एका पानावर लावून त्यावर दुसरे पान ठेवावे, मसाला लावून तिसरे पान ठेवावे असे करून त्याच्या गुंडाळ्या कराव्यात. काचेच्या पसरट भांडय़ात थोडे तेल लावून ह्य गुंडाळ्या थोडे पाणी शिंपडून झाकून मायक्रो हायवर पाच-सहा मिनिटे ठेवावे. थंड झाल्यावर वडय़ा कापून घ्याव्यात. त्याच पसरट भांडय़ात थोडे तेल टाकून मायक्रो कन्व्हेक्शनमध्ये आठ-दहा मिनटे ग्रील कराव्यात.
सुरणाचे कबाब
साहित्य : पाव किलो सुरण, एक-दोन बटाटे, एक चमचा आलं-लसूण पेस्ट, सहा-आठ हिरव्या तिखट मिरच्या (बारीक चिरलेल्या), अर्धी पुडी कोथिंबीर (बारीक चिरलेली), अर्धी वाटी रवा, मीठ चवीनुसार, तीन-चार चमचे तेल.
कृती :
सुरण व बटाटे उकडून घ्यावेत. एका भांडय़ात सुरण व बटाटे कुस्करून करून पेस्ट करून घ्यावी. त्यात आलं-लसूण पेस्ट, मिरची व मीठ टाकून नीट मिसळून घ्यावे. ह्यचे छोटे-छोटे कबाब बनवून त्यावर रवा लावावा व त्यावर कोथिंबीर लावून घ्यावी. एका पसरट भांडय़ात थोडे तेल टाकून त्यावर हे कबाब ठेवावे. मायक्रो ग्रीलवर आठ-दहा मिनिटे हायवर ठेवावे. गरम गरम कुठल्याही चटणीसोबत खायला द्यावे.
आंबा, नारळ व व्हाइट चॉकलेट वडी
साहित्य : दोन मोठय़ा ओल्या नारळाचे खोबरे, अर्धा वाटी साखर, अर्धा वाटी मँगो पल्प, दोनशे ग्रॅम व्हाइट चॉकलेट, पाव चमचा जायफळ पावडर.
कृती :
काचेच्या भांडय़ात चॉकलेटचे तुकडे टाकून मायक्रो मीडियमवर एक मिनिट ठेवून चॉकलेट पातळ करून घ्यावे. ओले खोबरे, साखर, मँगो पल्प, जायफळ पावडर मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावी. काचेच्या भांडय़ात हे मिश्रण ठेवून मायक्रो लोवर पाच-सहा मिनिटे ठेवावे. मधून मधून थोडेसे ढवळत रहावे. मिश्रण थोडेसे घट्ट झाल्यावर त्यात पातळ केलेले व्हाइट चॉकलेट टाकावे व नीट मिसळून घ्यावे. थाळीमध्ये थोडय़ा तुपाचा हात फिरवून हे मिश्रण थापावे. व लगेच त्याच्या वडय़ा पाडाव्यात.
हिरव्या वाटाण्याचा उपमा
साहित्य : दीड वाटी हिरवे वाटाणे (थोडेसे कुस्करून करून घेतलेले), चार-पाच हिव्या मिरच्या (बारीक चिरलेल्या), अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी, दोन चमचे तेल, अर्धी वाटी ओले खोबरे, अर्धी जुडी कोथिंबीर (बारीक चिरलेली), मीठ चवीनुसार
कृती :
एका काचेच्या भांडय़ात हिरवे वाटाणे व थोडे पाणी टाकून मायक्रो हायवर दोन-तीन मिनिटे ठेवावे. त्यानंतर सर्व पाणी काढून टाकावे. एका काचेच्या भांडय़ात तेल, जिरे, मोहरी टाकून मायक्रो हायवर एक मिनिटे ठेवावे. त्यावर शिजवलेले हिरवे वाटाणे टाकून मायक्रो मीडियमवर दोन मिनिटे ठेवावे. त्यावर कोथिंबीर व ओले खोबरे टाकून सव्र्ह करावे.
ओल्या नारळाच्या वडय़ा
साहित्य : दोन मोठय़ा ओल्या नारळाचे खोबरे (किसलेले), अर्धी वाटी साखर, अर्धी वाटी मिल्क पावडर, एक चमचा वेलची पूड.
कृती :
साखर, खोबरे, मिल्क पावडर, वेलची पूड मिक्सरमधून वाटून घ्यावे. एका काचेच्या भांडय़ात हे मिश्रण ठेवून मायक्रो लोवर पाच- सहा मिनिटे ठेवावे. मधून मधून साधारणत: दोन मिनिटांनंतर थोडेसे ढवळत रहावे व परत मायक्रोमध्ये ठेवावे. असे केल्याने मिश्रण थोडे घट्ट होईल. घट्ट झाल्यावर पसरट थाळीमध्ये थापून थोडे थंड झाल्यावर त्याच्या वडय़ा कापाव्यात.
विवेक ताम्हाणे – response.lokprabha@expressindia.com