शेवाळे  सुकट (ड्राय फ्रॉन्स) ओपन टेस्ट

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

साहित्य :

१ मध्यम जुडी शेवाळे

१ वाटी सुकट

३-४ हिरवी मिरची

१/२ चमचा बडीशेप

१/२ वाटी किसलेले चीज

१ चमचा लसूण आले पेस्ट

२-३ चमचा तेल

मीठ चवीनुसार

८-१० स्लाईस ब्रेड.

कृती :

एका काचेच्या बाऊलमध्ये शेवाळे साफ करून थोडेसे पाणी टाकून मायक्रो हायवर ३-५ मिनिटे ठेवावे. नंतर सर्व पाणी काढून टाकावे व बारीक चिरून घ्यावे. एका काचेच्या बाऊलमध्ये साफ केलेले सुकट, हिरवी मिरची, जिरे, बडीशेप, आले-लसूण पेस्ट तेल टाकून मायक्रो मीडिअमवर ५ मिनिटे ठेवावे. त्यात शेवाळाची बारीक केलेली भाजी टाकून मायक्रो मीडिअमवर २-३ मिनिटे ठेवावे. मीठ चवीनुसार टाकून सर्व मिश्रण मिसळावे. ब्रेडचे टोस्ट बनवून घ्यावेत त्यावर या तयार केलेल्या भाजीचा जाडसर पसरट थर लावावा. त्यावर किसलेले चीज टाकून मायक्रो लोवर १ मिनिटे ठेवावे. त्याचे काप करून सव्‍‌र्ह करावे.

टोमॅटो बेसील चटणी

साहित्य :

१/२ किलो टोमॅटो

१/२ वाटी लसूण बारीक चिरलेला

१/२ वाटी बेसील बारीक चिरलेले

१/२ वाटी कोथिंबीर    बारीक चिरलेली

५-६ हिरवी मिरची

१/२ वाटी ऑलिव्ह तेल

मीठ चवीनुसार.

कृती :

एका भांडय़ात थोडे पाणी टाकून टोमॅटो वाफवून घ्यावेत. टोमॅटोच्या साली काढून टाकाव्यात व बारीक चिरून घ्यावे. एका काचेच्या बाऊलमध्ये टोमॅटो, लसूण, बेसील, कोथिंबीर हिरवी मिरची टाकून मायक्रो मीडिअमवर ८-१० मिनिटे ठेवावे. त्यात मीठ व ऑलिव्ह तेल टाकून मायक्रो लो वर ३-४ मिनिटे ठेवावे.

थंड झाल्यावर काचेच्या बाटलीत भरून ठेवावे. साधारणत: १ महिना फ्रीजमध्ये चांगले राहाते.

मोदक

साहित्य :

१/२ वाटी ओल्या नारळाचे खोबरे

१/२ वाटी काजू

१/२ वाटी बदाम

१/२ वाटी बेदाणे

१/२ वाटी साखर

१ चमचा वेलची पूड

१/२ वाटी हरीयाली मावा

३ वाटय़ा तांदळाचे पीठ

२ चमचे तूप.

कृती :

काजू, बदाम, व बेदाण्यांचे जाडसर मिश्रण मिक्सरमधून करून घ्यावे. त्यात खोबरे, साखर, वेलची पूड व मावा टाकून जाडसर मिश्रण बनवावे. हे मिश्रण मंद गॅसवर थोडेसे शिजवून घ्यावे. एका बाऊलमध्ये तांदळाच्या पिठात गरम पाणी टाकून व तूप टाकून नीट मळून घ्यावे. पाणी कमी वाटल्यास थोडे अजून टाकावे. छोटे गोळे करून, मिश्रणाचे सारण त्यात भरून पाकळ्या करून मोदक वरून बंद करावेत. यासाठी मोदकाचा साचाही वापरू शकता.

एका काचेच्या पसरट भांडय़ात थोडे पाणी शिंपडून त्यावर मोदक ठेवावे. मायक्रो लोवर ३ मिनिटे ठेवून परत पाणी शिंपडून मायक्रो लोवर ३ मिनिटे असे शिजू द्यावे. जर मायक्रोमध्ये जास्त ठेवले तर मोदक न शिजता फुटून जाऊ शकते. तसे होऊ नये म्हणून मध्ये मध्ये वेळ द्यावा व गरम गरम सव्‍‌र्ह करावे.

मशरूम क्रिमी सूप

साहित्य :

२५० ग्रॅम मशरूम

१ वाटी दूध

१ चमचा काळी मिरी पावडर

१०० ग्रॅम काजू

२-३ हिरवी मिरची

१ चमचा बटर

२ वाटी पाणी

मीठ चवीनुसार

कृती :

मशरूमचे बारीक तुकडे करून, साफ करून मायक्रो हायवर २-३ मिनिटे ठेवावे. सर्व पाणी काढून टाकावे. मिक्सरमधून वाफवलेले मशरूम, दुध, काळी मिरी, काजू, हिरवी मिरची, बटर टाकून पेस्ट करून घ्यावी.

एका काचेच्या भांडय़ात ही सर्व मिक्स केलेली पेस्ट व पाणी टाकून मायक्रो लो वर ६-७ मिनिटे ठेवावे. गरम गरम सव्‍‌र्ह करावे.

भरलेली तोंडली

साहित्य :

१५-२० मध्यम तोंडली

३-४ लाल मिरची

१/२ वाटी शेंगदाणे (भाजलेले)

१ चमचा धणे

१ चमचा जिरे

१ चमचा बडीशेप

१/२ चमचा काळी मिरी  ल्ल मीठ चवीनुसार  ल्ल २-३ चमचे तेल.

१/२ वाटी ओला नारळ (खवलेला) चव

कृती :

तोंडली स्वच्छ धुऊन चिरा पाडून घ्याव्यात. मंद गॅसवर तेलावर बाकीचे सर्व साहित्य परतून घ्यावे. थंड झाल्यावर मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावे. हा मसाला चिरा पाडलेल्या तोंडलीमध्ये भरून काचेच्या पसरट बाऊलमध्ये ठेवून मायक्रो हायवर  ५ मिनिटे ठेवावे. हे करताना त्यावर मायक्रो लेबल झाकण ठेवावे. त्यामुळे पदार्थ लवकर शिजतो. थोडेसे पाणी शिंपडून मायक्रो लोवर २-३ मिनिटे ठेवावे.
विवेक ताम्हाणे – response.lokprabha@expressindia.com

मराठीतील सर्व स्मार्ट कुकिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Smart cooking shevale sukat