सध्याची पिढी स्मार्ट वॉचकडे वळताना दिसते आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार स्मार्ट वेअरेबल्स आणि गॅजेट्सच्या विक्रीमध्ये आपल्या देशात १४४.३ टक्के वाढ बघायला मिळाली आहे. त्यांच्या विक्रीमध्ये आपण जगात तिसऱ्या क्रमांकावर आहोत. बजेटनुसार पर्याय, फिटनेससाठी फायदा, मोबाइलचा सहज वायरलेस अ‍ॅक्सेस अशा पर्यायांमुळे स्मार्टवॉचना पसंती मिळताना दिसत आहे.

साधारण तीन-चार  वर्षांंपूर्वी आपल्या देशामध्ये स्मार्ट वॉचचे प्रमाण मर्यादित होते. अ‍ॅपल, सॅमसंग या कंपन्यांची स्मार्ट वॉच मार्केटमध्ये असली तरीही त्यांच्या किमतीमुळे त्यांना ठरावीक मागणी होती. स्मार्ट वॉच म्हणजे खर्चीक प्रकरण असा समज लोकांमध्ये होता. मात्र गेल्या वर्षभरामध्ये हे चित्र बदलताना दिसत आहे. नॉइस, बोट, अमेझफिट यांसारख्या वेगवेगळ्या कंपन्या त्याचबरोबर शायोमी, वनप्लस, ओप्पो यांसारख्या मोबाइल कंपन्या स्मार्ट वॉचच्या निर्मितीमध्ये उतरल्यामुळे या गॅझेटच्या बाबतीत जोरदार स्पर्धा बघायला मिळते आहे. शिवाय यामुळे प्रत्येकाला आपल्या बजेटनुसार स्मार्ट वॉच निवडता येते आहे.

आयडीसीच्या रिपोर्टनुसार स्मार्ट वॉचच्या विक्रीमध्ये गेल्या दोन वर्षांत सातत्याने वाढ बघायला मिळत आहे. पारंपरिक अ‍ॅपल वॉच या स्पर्धेत आघाडीवर असून त्यापाठोपाठ अमेझफिट, सॅमसंग तसेच अन्य कंपन्यांचा यामध्ये समावेश आहे. नॉइस, ओप्पो, हॉनर, बोट यांसारख्या कंपन्यांनाही मार्केटमध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे. साधारणपणे १५०० ते २००० पासून ते थेट एक लाखापर्यंत स्मार्ट वॉचचे पर्याय सध्या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत, त्यामुळे आपल्या बजेटनुसार प्रत्येक जण घडय़ाळ खरेदी करू शकतात.

स्मार्ट बॅण्ड की स्मार्ट वॉच

नवीन स्मार्ट वॉच घेताना स्मार्ट बॅण्ड विकत घ्यावा की स्मार्ट वॉच याबाबत सामान्यांच्या मनामध्ये प्रश्न असतात. आकाराने लहान असणाऱ्या स्मार्ट बॅण्डमध्ये फिचर्स मर्यादित असतात. मात्र सहसा स्मार्ट बॅण्ड खिशाला परवडणारे असल्यामुळे त्यांना चटकन पसंती मिळते. डिजिटल इंडिकेटरबरोबरच फिटनेस ट्रॅकर, स्टेप्स काऊंटर यासारखे फिचर्स या बॅण्डमध्ये सध्या उपलब्ध आहेत. विविध कंपन्यांचे बॅण्ड्स साधारणपणे ८०० रुपयांपासून सध्या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. आयडीसीच्या अहवालानुसार गेल्या वर्षभरामध्ये स्मार्टबॅण्डच्या विक्रीमध्ये २८ टक्के घट झाल्याचे दिसून येते. त्याचबरोबर या अहवालानुसार शायोमीच्या स्मार्ट बॅण्डची सर्वाधिक ४१.९ टक्के विक्री होत आहे.

एकीकडे स्मार्टबॅण्डचा वापर फिटनेसपुरता मर्यादित आहे दुसरीकडे सामान्यांना स्मार्टवॉचमध्ये वेगवेगळी फिचर्स मिळतात. सीमकार्ड स्लॉट, ब्लू टूथ, हेडफोन्स कनेक्टिव्हिटी, वायरलेस मेसेजिंग, कॅमेरा यामुळे एखादा स्मार्टफोन ऑपरेट करण्याची क्षमता वॉचमध्ये असते. शिवाय घडय़ाळासारखे डायलचे वेगवेगळे पर्याय, बेल्टमध्ये विविध पर्याय यामुळे त्यामध्ये कस्टमायझेशन शक्य आहे. शिवाय एकदा मोबाइल ब्लूटुथने कनेक्ट केले की इनकमिंग कॉल, मेसेज, नोटिफिकेशन्स याबरोबरच तुमच्या आरोग्याबाबतची सर्व माहिती तुम्हाला मिळते. तुमचा रक्तदाब, तुम्ही किती उष्मांक जाळता, तुम्ही दिवसभरात किती अंतर चालता, तुमच्या हृदयाची गती, ताणतणावाची पातळी अशा सगळ्या गोष्टी आपल्याला सहजपणे पाहता येतात. त्यामुळे एंटरटेनमेंट आणि फिटनेस असे दोन्हीचा मध्य यामध्ये साधला जात आहे.

स्मार्टवॉचचा वाढता प्रभाव बघून घडय़ाळ निर्मितीच्या क्षेत्रातील कंपन्या पण याकडे वळताना दिसत आहेत. फास्ट ट्रॅक, रोलेक्स, कॅसिओ यांसारख्या कंपन्या स्मार्टवॉच निर्मितीमध्ये येत आहेत. अलीकडेच फास्ट ट्रॅकने डिजिटल आणि अ‍ॅनलॉग यांचा कॉम्बो असणारे स्मार्टवॉच आणले आहे. तर टायटननेसुद्धा स्टेट बँकेच्या मदतीने नवे स्मार्टवॉच आणले आहे. यामध्ये घडय़ाळाच्या मदतीने पेमेंट करण्याची सुविधा आहे. एखाद्या घडय़ाळामध्ये असे फिचर पहिल्यांदाच देण्यात आले आहे. त्यामधून पाच हजार रुपयापर्यंतचे व्यवहार ओटीपीशिवाय करता येणार आहेत. अशीच वेगवेगळी फिचर्स सध्याच्या स्मार्ट वॉचमध्ये बघायला मिळत आहेत. मोबाइल खिशामध्ये ठेवून स्मार्टवॉचच्या मदतीने अनेक कामे करता येतील अशी क्षमता स्मार्ट वॉचमध्ये आहे. एखादा फोन लावण्यापासून ते मोबाइलमधले मेसेजेस बघणे, फोटोज, अपडेट्स चेक करणे, गाणी, व्हिडीओज बघणे अशी वेगवेगळी फिचर्स स्मार्ट वॉचमध्ये नव्याने येत आहेत. भविष्यात अशा पद्धतीने स्मार्ट वॉचचा वापर वाढत जाण्याची शक्यता यातून दिसते आहे. त्यामुळे एकंदरच स्मार्ट वॉच क्षेत्रामध्ये येत्या काळात आणखी स्पर्धा आणि पर्याय आपल्याला बघायला मिळू शकतात. आता यामध्ये अ‍ॅपल, हुवाई यांसारखे पर्याय आपले वर्चस्व टिकवतात की नव्याने येणारे पर्याय त्यांना मागे टाकतात हे काळच ठरवेल.

महिलांसाठी खास पर्याय

स्मार्ट वॉचमध्ये महिलांसाठी डिझायनर आणि ट्रेण्डी पर्याय उपलब्ध आहेत. मासिक पाळी नियोजन, ताण तणाव नियोजन यांसारखी वेगवेगळी फिचर्स यामध्ये आहेत. याचबरोबर नव्याने येत असलेल्या स्मार्ट वॉचमध्ये स्लीप ट्रॅकिंग, रेस्परेशन ट्रॅकिंग, हार्ट रेट अलर्ट (उच्च आणि निम्न) यासारखे पर्याय उपलब्ध आहेत.  अलीकडेच आलेल्या गार्मीन स्मार्ट वॉचद्वारे बाळाच्या हालचालींचा मागोवा घेणे, रक्तातील ग्लुकोजच्या पातळीचे मूल्यांकन करणे, रिमाइंडर सेट करणे, व्यायाम आणि खाण्या-पिण्याशी संबंधित टिप्स मिळविणे अशा गर्भावस्थेसंबंधित विविध गोष्टींचे नियोजन महिला करू शकतात. महिलांच्या आरोग्याची विशेष काळजी मार्केटमधील सर्वच स्मार्ट वॉच कंपन्या घेताना दिसत आहेत.

चायनीज क्लोनिंगपासून सावधान

स्वस्त आणि मस्त पर्याय म्हणून अनेक चायनीज कंपन्यांची स्मार्ट वॉच सध्या मार्केटमध्ये दिसतात. अगदी ३०० ते ४०० रुपयांपासून उपलब्ध असणाऱ्या या स्मार्ट वॉचना मात्र कोणतीही गॅरंटी दिली जात नाही. त्यामुळे कोणताही बिघाड झाल्यास पैसे पाण्यात जाण्याची शक्यता यामध्ये असते. बहुतांश कंपन्या सॅमसंग तसेच अ‍ॅपल वॉचचा लूक फॉलो करण्याचा प्रयत्न करतात. अ‍ॅपल वॉचचे तर मोठय़ा प्रमाणावर क्लोनिंगसुद्धा होते. ऑनलाइन स्टोअर्समध्ये तसेच छोटय़ा दुकानांमध्ये या क्लोन्सची विक्री केली जाते. बनावट सॉफ्टवेअर्स आणि डय़ुप्लिकेट पार्ट्स वापरून या घडय़ाळांना हुबेहूब ब्रॅण्डेड घडय़ाळांचा फील दिला जातो. प्रत्यक्षात मात्र या घडय़ाळांची खरेदी करून तुमची फसवणूक होऊ शकते. याचा लूक उत्तम असला तरीही यामध्ये वापरण्यात आलेले पार्ट्स बनावट असल्याने ही घडय़ाळे फार काळ टिकू शकत नाहीत. मुंबईमध्ये अनेक ठिकाणी ओरिजिनल म्हणूनसुद्धा या चायनीज तसेच क्लोनिंग केलेल्या घडय़ाळांची विक्री होताना दिसते. यातील फसवणुकीच्या बऱ्याच घटना समोर आलेल्या आहेत.

फेसबुक आणि वनप्लसचे स्मार्ट वॉच

स्मार्ट वॉच सेगमेंटला वाढत असलेली मागणी पाहता अनेक मोठमोठय़ा कंपन्या निर्मितीमध्ये येण्याच्या दृष्टीने तयारी करत आहेत. यामध्ये सोशल नेटवर्किंग जायंट फेसबुक तसेच मोबाइल कंपनी वनप्लस यांची जोरदार चर्चा आहे. वनप्लसने फिटनेस बॅण्ड मार्केटमध्ये आणल्यानंतर आता कंपनी मोठय़ा डिस्प्लेसह स्मार्ट वॉच घेऊन येण्याची तयारी करत आहे. सोशल मीडियावर याबद्दल मोठय़ा प्रमाणावर उत्सुकता असून स्मार्ट वॉचचे फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. याचप्रमाणे फेसबुकच्या स्मार्ट वॉचचीसुद्धा सध्या चर्चा आहे. वर्षभरात फेसबुक स्मार्ट वॉच मार्केटमध्ये प्रवेश करणार आहे. याबद्दल अधिकृत घोषणा झाली नसली तरी सोशल मीडियावर संशोधनाचे फोटो लीक झाले आहेत. हे स्मार्ट वॉच युजर्सला मेसेज पाठवण्याबरोबरच हेल्थ आणि फिटनेस फिचर्स ऑफर करणार आहे. फेसबुकचे स्मार्ट वॉच सेल्युलर कनेक्शनवर काम करेल. हे स्मार्ट वॉच युजर्सला मेसेज पाठवण्याबरोबरच इतर सेवा तसेच हेल्थ आणि फिटनेस कंपनीच्या अन्य हार्डवेअरशी कनेक्ट करण्याची संधी देणार आहे. यात पेलोटॉन इंटरअ‍ॅक्टिव आदींचा समावेश आहे. फेसबुकचे स्मार्ट वॉच गूगल अ‍ॅण्ड्रॉईड सॉफ्टवेअरच्या ओपन सोर्स व्हर्जनवर काम करेल. या वॉचचे पहिले जनरेशन २०२२ मध्ये, तर दुसरे जनरेशन २०२३ मध्ये लाँच केले जाऊ शकते.