अंधार सरून पूर्वेला तांबडं फुटू लागलं होतं. तांबूस पहाट मनात उत्साहाचे वातावरण निर्माण करीत होती. उगवती आज एका सुस्नात नवयुवतीसारखी तेजोमय भासत होती. उषेची लाली तिच्या गालावर पसरू लागली आणि माझं मनही तितकंच प्रसन्न होऊन हे सारं पाहत होतं.
खरंच अंधाराच्या वाटेवरून चालता चालता आपण प्रकाशाचे स्वप्न पाहत असतो. त्या अंधारातच प्रकाशाची वाट चोखाळत असतो आणि या अंधाराचे साम्राज्य संपले की, आपल्या पुढे ती प्रकाशलाट पुढे येते, प्रकाशवाट लख्ख उजळून दिसते.
खरंच असाच मनातील अंधार दूर झाला, ज्ञानाचा प्रकाश उजळला तर दाही दिशा उजळायला वेळ लागणार नाही. ज्ञानाचा सुकाळ सगळ्यांना प्रकाश देईल, तो दिवस दूर नाही.
समाजात अजून अनेक अंधश्रद्धांचे साम्राज्य आहे, असे नाही वाटत? हे नष्ट करण्यासाठी किती संतांनी, समाजसुधारकांनी आपले जीवन वेचले तरी हे गारूड अजून पुरते नष्ट होत नाही समाजमनातून! असे दिसते.
नवल वर्तले गें माये
उजळला प्रकाशु
मनाचिये अंधाराचा
होतसे विनाशु
हे स्वप्न संतांनी पाहिले. समाज या अंध:कारमय गारुडातून मुक्त व्हावा म्हणून अपरंपार प्रयत्न केले. तो काळ असा होता की, देवभोळ्या, शिक्षणाचा अभाव असणाऱ्या समाजाचे मन एकदम बदलून टाकणे शक्य नव्हते. तरीही एवढय़ा धर्मभोळ्या समाजालाही त्यांनी देव, देवळात शोधण्यापेक्षा स्वत:च्या अंतरात शोधा, तसेच उराउरी भेट देऊन एकमेकांच्या अंतरात, आत्म्यात देव पाहायला शिकविले. देह हे देवाचेच मंदिर आहे, हे परोपरीने समजाविले.
चराचरात देव पाहायला सांगितले. तुम्ही जे कार्य करता त्यातच देव पाहा. तुमचे कर्म मन लावून करा, तेच खरं देवकार्य आहे. असा देवसेवेचा, देवपणाचा व्यापक अर्थ सांगितला. अंधश्रद्धा, चमत्कारांना त्यांनी कधीच थारा दिला नाही म्हणूनच पुराणे किंवा इतिहास पाहता पहिले द्रष्टे समाजसुधारक संतांनाच म्हटले पाहिजे. विज्ञानाची प्रगती न झालेल्या त्या काळातही त्यांनी कर्मकांडांना महत्त्व न देता तुम्ही जे कर्म करता ते आणि माणुसकी, मानवतावाद यालाच महत्त्व दिले. इतकेच नव्हे तर ते आपल्या कृतीतून, समर्थ लेखणीतून, काव्यातून स्पष्ट करून दाखविले. म्हणूनच संत हे पहिले द्रष्टे समाजसुधारक असे मी मानते. चित्त एकाग्र करण्यासाठी देवभोळ्या लोकांना त्यांनी नाममाहात्म्य सांगितले, पण टाळकुटेपण त्यांनी नाही सांगितले. आपल्या लेखन, प्रवचन, कीर्तन यातून त्यांनी समाजप्रबोधनाचे कार्य केले. त्यांच्या टाळ चिपळ्यांतून गीतांना ताल लाभला आणि समाजमन आकृष्ट झाले. विचार करू लागले. शेतात काम करता करता बहिणाबाई जीवनाचे तत्त्वज्ञान आपल्या कवितेतून, गीतातून ठायी ठायी बोलू लागली. सावतामाळी ‘कांदा मुळा भाजी, अवघी विठाबाई माझी’ या आणि अशा अभंग रचनांतून हेच सुचवितो. आपले कार्य हाच आपला देव, हे आपले ध्येय! म्हणजे कर्म करणे आणि त्याचे फळ मिळणे यातच देवपण साठले आहे हेच सुचवितो.
ज्ञानदेवांनी तर मानवतेचे तत्त्वज्ञान लहान वयातच जगापुढे आपल्या मराठीतून, रसाळ वाणीतून मांडले. आपले जीवनच या युगपुरुषाने मानवतेचे जिवंत उदाहरण म्हणून जगापुढे मांडले आणि देव काय हे आपले जीवनच समर्पित करून दाखवून दिले.
एकनाथांनी आपल्या भारुडातून समाजमनातील व्यंगांवर बोट ठेवले. घराघरात डोकावून जणू त्यांनी नणंद भावजय, जावा जावा, भाऊबंदकी आदी विषय आपल्या रसाळ विनोदी वाणीतून प्रवचनांतून मांडले. यातून समाजाला विचार करायला प्रवृत्त केले. याहून वेगळे समाजशिक्षण ते कोणते?
जातिभेद, भेदभाव समाजातून नष्ट करण्याचे कार्य ज्यांनी केले, त्याच संतांचे नाव घेऊन आजच्या युगातही जातीयवाद माजविणारे समाजकंटक मिळावेत आणि त्याहूनही त्यांची री ओढणारेही आज सापडावेत ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे.
खरंच हा अज्ञानाचा अंधकार या समाजातून कधी नष्ट होणार आहे? आजही समाजात अंधश्रद्धा रुजून आहेत, यांचे आश्चर्य वाटते. चेटूक, भूतबाधा, धागेदोरे, जारण मारण, इ. विषयांवर कायद्याने बंदी, पण आश्चर्य वाटते की, तेही व्हायला आजचा दिवस उजाडावा लागतो याचे. हे सत्य तर नुकताच विचार करायला लागणाऱ्या लहान मुलासही कळते. अशाच काही छोटय़ा-मोठय़ा अंधश्रद्धा समाजमनाला चिकटून आहेत. भविष्यवाणीवर विश्वास ठेवणे, मांजर आडवे गेल्यावर अपशकुन होणे, एखाद्याचा पायगुण वाईट असणे. पत्रिकेत मंगळ असल्यावर संसाराची वाट लागणे, शनी राशीला लागला तर जीवनात अनंत संकटे येणे, अशा विषयांवर सुशिक्षित लोकही विश्वास ठेवतात याला काय म्हणावे? सुशिक्षितांची ही तऱ्हा तर अशिक्षितांनी काय करावे? कशा नष्ट होणार या अंधश्रद्धा? कशी होणार समाजसुधारणा? लहान मुलालाही कळेल यातील फोलपणा, त्या विषयावर एखाद्या सुशिक्षित माणसाने विचार करू नये याला काय म्हणावे? हे कळतच नाही.
भारताचे यान मंगळावर पोहोचले हे अभिमानाने सांगणाऱ्या देशात, पत्रिकेत मंगळ आहे म्हणून लग्नं मोडतात, हा विसंवाद कसा हटवावा? काही दुष्ट प्रवृत्तीसुद्धा माणसांच्या भोळेपणाचा फायदा घेऊन हे समाजमनात रुजवू पाहतात. याचा विचार झाला पाहिजे. हे दुष्ट मूळ नष्ट करून तिथे ठाम विचार रुजविले पाहिजेत.
आजही विज्ञान क्षेत्रात इतकी प्रगती होते, माणसाच्या बुद्धिसामर्थ्यांने माणसाचाच विकास होत आहे. वैद्यक शास्त्रातही आज कमालीची प्रगती झाली असून, अनेक माणसांना जीवदान दिले आहे. माणसांच्या आयुष्याची रेषा वाढविली आहे. हे माणसाच्या बुद्धीच्या विकासाचे फळ आहे, ना की भविष्य सांगणाऱ्या रेषेचे! एका बाजूला हे बुद्धिवादी, दुसऱ्या बाजूला सुशिक्षित असून, अशा अंधश्रद्धांवर विश्वास ठेवणारे लोक पाहून आश्चर्यचकित व्हायला होते. तिकडे अंधश्रद्धा पसरविणारे दुष्ट प्रवृत्तीचे लोक, यांना काय म्हणावे? माणसाच्या देवभोळेपणाचा फायदा घेऊन स्वत:चा स्वार्थ साधणारे विघ्नसंतोषी! पण मनुष्य जर सतर्क राहिला, स्वत: विचार करू लागला तर, एक स्वत:चे हित, एवढय़ा छोटय़ा गोष्टीवर जरी विचार करता झाला तर नक्कीच या अंधश्रद्धेच्या गर्तेतून वाचेल. आपोआप तो स्वत:च्या हिताबरोबर समाजसुधारकही होईल. या छोटय़ाशा वाटणाऱ्या गोष्टींवर प्रत्येकाने विचार केला आणि या अंधश्रद्धांचे समूळ उच्चाटन केले तर यासाठी आपले प्राण वेचणाऱ्या माननीय नरेंद्रजी दाभोलकर यांना खरी विनम्र श्रद्धांजली ठरेल.
हे सर्व घडेल तेव्हा नक्कीच या अंधश्रद्धांच्या अंधकारमय वाटा उजळून निघतील.
नलिनी दर्शने – response.lokprabha@expressindia.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा