किती तरी गाणी आपल्याला तोंडपाठ असतात. बऱ्याच गाण्यांचे गायक माहीत असतात. काही गाण्यांचे संगीतकार माहीत असतात, पण ती गाणी ज्यांनी लिहिली असतात, ते गीतकार आपल्याला माहीत असतात का?

साप्ताहिक ‘लोकप्रभा’च्या, १६ जानेवारी २०१५ च्या अंकात रघुवीर नातू यांचा ‘उपेक्षित सुरांची मांदियाळी’ हा लेख वाचण्यात आला. त्या अनुषंगाने उपेक्षित गीतकारांवर लिहावेसे वाटले. नातू यांनी शंभरहून जास्त गायक कलाकारांची यादी दिली आहे. हिंदी चित्रपटांच्या गीतकारांची संख्या यांच्यापेक्षा किती तरी जास्त आहे. एका संगीतकाराबरोबर तीन-चार गीतकारांची गाणी असणं, ही अगदी कॉमन गोष्ट आहे. त्यामुळे ही यादी निश्चितच, गायक/संगीतकारांच्या यादीपेक्षा किती तरी जास्त आहे.
आपण िहदी चित्रपटांतील गीते गातो, ऐकतो, गुणगुणतो; पण ते एखादे चित्रपट गीत कोणी लिहिले आहे, याविषयी सर्वथा अनभिज्ञ असतो किंवा त्याविषयी आपल्याला विशेष उत्सुकता नसते.
आपण एखादे गाणे ऐकतो, त्या वेळी गायक कलाकाराचे नाव बहुतेकांना माहीत असते. चित्रपटाचे नाव ९० टक्के जणांना माहीत असते. याच्या खालोखाल संगीतकाराचे नाव ५० टक्के लोकांना माहीत असते, पण त्या गीताचे जनक म्हणजे गीतकार कोण आहे हे जेमतेम ३० टक्के लोकांना माहीत असते. चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक व साल ही तर खूप पुढची गोष्ट आहे.
उदाहरण द्यायचे झाल्यास, लताजींच्या ‘आयेगा आनेवाला..’ हे गाणे. लतादीदींची ही एक मेलडी आहे. जुन्या- नव्या पिढीच्या बऱ्याच श्रोत्यांना हे गाणे माहिती आहे व ‘महल’ या चित्रपटातील हे गीत आहे, हेपण लोकांना माहीत आहे; पण या गाण्याचे संगीतकार खेमचंद प्रकाश आहेत, हे जेमतेम ४० टक्के लोकांना माहीत असते. यानंतर या गीताचे गीतकार कोण आहेत, हे जर विचारले तर बहुतेकांना प्रश्नचिन्ह पडून, दहा टक्के लोकच हे सांगू शकतील की याचे गीतकार ‘जे. नक्शब’ (नक्शब जारवीच) आहेत. या चित्रपटाचे साल १९४९ व दिग्दर्शक कमाल अमरोही आहेत हे तर जवळपास दुरापास्तच.
आता दुसरे उदाहरण घेऊ. आजकाल जुन्या चित्रपट गीतांचे बरेच (विशेषत: जुन्या पिढीतील) चाहते आहेत. ‘चोरी चोरी आग सी दिल में लगाकर चल दिये..’ हे सुलोचना कदम (चव्हाण) यांचे गाणे बऱ्याच लोकांनी ऐकलेले असते. त्यांना माहीत असते व पुष्कळशा लोकांना हे ‘ढोलक’ या चित्रपटातील आहे हेपण माहीत असते, पण पुढे डोक्यावर खूप ताण देऊन या चित्रपटाचे संगीतकार ‘श्यामसुंदर’ आहेत हे काही लोकांना आठवते. पण गीतकार? एक मोठे प्रश्नचिन्ह उभे राहते व काही बोटांवर मोजण्याइतकेच लोक सांगतात की याचे गीतकार आहेत ‘श्यामलाल शम्स’.
हे असे का होते? याचे कारण म्हणजे कोणत्याही चित्रपट गीताच्या संगीतकाराला व गायकाला जेवढे महत्त्व दिले जाते, तितके महत्त्व गीतकाराला दिले जात नाही, तो नेहमी दुय्यम/ दुर्लक्षितच असतो.
एखाद्या गीताची ओळख त्या गीताचे बोलच असतात. जसे ‘सब कुछ सीखा हमने ना सीखी होशियारी..’ हे मुकेशने गायलेले ‘अनाडी’ या चित्रपटाचे गीत, त्याच्या बोलांमुळेच आजही लोकप्रिय आहे; पण जेव्हा या गीताला १९५९ चे फिल्मफेअर अ‍ॅवॉर्ड मिळाले तेव्हा संगीतकार ‘शंकर जयकिशन’ यांच्याबरोबर या गीताचे गीतकार ‘शैलेंद्र’पण प्रकाशझोतात आले. अशा वेळी गीतकाराला काही प्रमाणात श्रेय मिळते, पण एरवी गीतकाराशी आपले काय देणेघेणे, अशीच श्रोत्यांची मानसिकता असते.
चित्रपट गीतात गीतकाराचे महत्त्व अनन्यसाधारण आहे, कारण त्याच्यामुळेच गाण्याला ओळख प्राप्त होत असते. काही वेळा गीतकाराला सर्वोच्च स्थान देण्यात येते, पण असे क्वचितच आढळते. याबाबत एक किस्सा म्हणजे ‘महफिल में जल उठी शमा परवाने के लिये..’ या लताजी यांच्या सुमधुर आवाजात असलेल्या, ‘निराला’ या चित्रपटातील गीताला, सर्वोच्च मान, निर्मात्याने या गीताच्या गीतकाराला म्हणजे पी. एल. संतोषीला दिला व त्याला अ‍ॅवॉर्डही दिले. संगीतकार सी. रामचंद्र यांचे या गीतात मोठे योगदान होते, पण गीतकाराला सर्वात जास्त सन्मान मिळाला.
जुन्या काळी, ज्याप्रमाणे शास्त्रीय संगीत गायक चित्रपटात गाणे म्हणणे हलक्या दर्जाचे मानत, त्याचप्रमाणे काही उच्च कोटीचे कवी/ गीतकार चित्रपटाकरिता गीत लिहिणे कमी दर्जाचे मानत असत. याबाबत एक किस्सा म्हणजे शैलेंद्र यांनी सुरुवातीस राज कपूरला आरकेच्या चित्रपटांकरिता गीत लिहिण्यास चक्क नकार दिला होता; पण पुढे त्यांना पशांची चणचण झाल्यामुळे त्यांनी राज कपूरची ऑफर स्वीकारली व पुढे काय इतिहास रचला हे सगळ्यांनाच माहीत आहे. साहिर, मजरुह ही मंडळीपण बरीच उशिरा चित्रपट क्षेत्रात आली.
पण काही गीतकार, जसे भरत व्यास, पं. प्रदीप, इ.इ., समाजप्रबोधनाकरिता चित्रपटांकडे वळले व त्यांनी ‘जागृती’, ‘तूफान और दिया’, ‘बूंद जो बन गयी मोती’, ‘नास्तिक’, ‘पगाम’ इ.इ. चित्रपटांकरिता आशयपूर्ण अशी गीतरचना केली.
िहदी चित्रपट गीतात गीत व गझल असे दोन मुख्य प्रवाह आहेत. तसेच शुद्ध िहदी व उर्दू मिश्रित िहदी, असेपण प्रवाह आहेत. शैलेंद्र, भरत व्यास, प्रदीप, इ.इ. हे गीतकार प्रामुख्याने िहदीत गीत लिहीत असत, तर साहिर, हसरत, मजरुह, इ.इ. हे सर्व उर्दू मिश्रित िहदीत गीत लिहीत असत.
िहदी चित्रपट क्षेत्रात निर्माते- संगीतकार- गीतकार, संगीतकार-गीतकार असे ग्रुप (विभाग) प्रामुख्याने पाहायला मिळतात व संगीतकार-गीतकारांच्याही जोडय़ा गाजल्या आहेत. याबाबतीत उदाहरण द्यायचे झाल्यास व्ही. शांताराम (राजकमल) – वसंत देसाई- सी. रामचंद्र- भरत व्यास- नूर लखनजी- हसरत जयपुरी हा एक ग्रुप होता. तसेच राज कपूर-शंकर जयकिशन- दत्ताराम- शैलेंद्र- हसरत हाही खूप प्रसिद्ध ग्रुप होता. बी. आर. चोप्रा- एन. दत्ता- रवी- साहिर हाही ग्रुप नावारूपास आला होता.
संगीतकार-गीतकार यांच्या जोडय़ा प्रामुख्याने नौशाद-शकील बदायुनी, सी. रामचंद्र-पी. एल. संतोषी, सी. रामचंद्र- राजेंद्रकृष्ण, एन. दत्ता-साहिर, रवी- साहिर, कल्याणजी आनंदजी-गुलशन बावरा, लक्ष्मीकांत प्यारेलाल-आनंद बक्शी, आर. डी. बर्मन-आनंद बक्शी, सलील चौधरी-शैलेंद्र, सलील चौधरी-योगेश, एस. डी. बर्मन- साहिर, मदन मोहन-कैफी आझमी, ओ. पी. नय्यर- एस. एच. बिहारी, हेमंत कुमार – एस. एच बिहारी, चित्रगुप्त- मजरूह इ. जोडय़ा प्रसिद्ध आहेत; पण काही वेगळ्या जोडय़ाही आहेत. जसे शंकर जयकिशन- राजेंद्रकृष्ण, सी. रामचंद्र- साहिर, हेमंतकुमार- शैलेंद्र, आर. डी. बर्मन-राजेंद्रकृष्ण; वसंत देसाई-हसरत जयपुरी इ.
पं. नरेंद्र शर्मा, नीरज, गुलजार यांनी लोकमानसात आपले आगळे स्थान निर्माण केले आहे. गुलजार तर आजचे सर्वात लोकप्रिय गीतकार आहेत.
बहुतेक लोकांना शैलेंद्र, हसरत, शकील, साहीर, मजरूह, गुलजार, प्रदीप, भरत व्यास, आनंद बक्शी, इंदीवर, नीरज इ.इ. असे वलयांकित गीतकार माहीत आहेत, पण असे अनेक गीतकार आहेत, की त्यांचे गाणे आपण ऐकतो / गुणगुणतो, पण त्यांची नावे आपल्याला माहीत नाहीत (किंवा माहीत करून घ्यायची इच्छा नाही) व यामुळे एक प्रकारे आपण त्यांची उपेक्षा करीत असतो.
गीतकारांच्या जगात प्रवेश करण्यापूर्वी आपण जर त्यांचे वर्गीकरण केले तर ते माहितीपूर्ण व मनोरंजक ठरेल.
काही गीतकार खऱ्या नावांपेक्षा एखादे अलंकारिक नाव (उपाधी) जास्त पसंत करतात उदा. गुलजार (संपूर्ण सिंह दीवाण), नीरज (गोपाल दास सक्सेना), प्रदीप (रामचंद्र नारायण द्विवेदी), शैलेंद्र (शंकरदास केसरीलाल), इंदीवर (श्यामलाल आझाद), इ.इ. तर बरेचशे गीतकार आपल्या नावाबरोबर आपल्या गावाचे/ शहराचे/ प्रदेशाचे नाव लावणे पसंत करतात. उदा. हसरत (जयपुरी), जिया (सरहदी), एस. एच. (बिहारी). काही गीतकार सरळ आपले मूळ नाव आडनावासहित ठेवणे पसंत करतात. काही गीतकार आपले प्रथम नाव हीच आपली ओळख ठेवतात. उदा. योगेश इ. याप्रमाणे खालील वर्गीकरण मनोरंजक ठरावे (या यादीत जितके शक्य होईल तेवढे गीतकार समाविष्ट केले आहेत; पण गीतकारांची संख्या इतकी जास्त आहे की काही नावे नक्कीच सुटली असावीत त्याबद्दल क्षमस्व)
गावाचे/ शहराचे/ प्रदेशाचे नाव लावणारे गीतकार-हसरत जयपुरी, शमीम जयपुरी, आह सीतापुरी, कमर जलालाबादी, नूर लखनवी, शम्स लखनवी, आरजू लखनवी, मजरूह सुलतानपुरी, साहिर लुधियानवी, नक्श लायलपुरी, अख्तर रोमानी, शकील बदायुनी, गोहर कानपुरी, एस. एच. बिहारी, नूर देवासी, अजीज काश्मिरी, फिराक गोरखपुरी, जिया सरहदी, जिगर मुरादाबादी, कैफ भूपाली, कैफ इरफानी, कैफी आझमी, जलाल मलिहाबादी, सरदार जाफरी, सरशार सलानी, जी. एस. नेपाली, असद भोपाली, खुमार बारावंकवी, बहजात लखनवी, मजाज लखनवी, कमर जलालाबादी, तनवीर नकवी, नजीम पानिपती, गुलशन जलालाबादी इ.इ.
उपाधी घेणारे गीतकार- नीरज, गुलझार, शैलेंद्र, अन्जान, पं. प्रदीप, मोती बी. ए., इंद्रजित सिंह-तुलसी, गुलशन बावरा, पं. इंद्र, सरस्वती कुमार-दीपक, शहरीयार, इंदीवर, इ.
फक्त पहिले नाव लावणारे गीतकार – योगेश, सत्येंद्र, शैलेश, समीर, मजार, राम मूर्ती इ.
पहिली दोन नावे लावणारे गीतकार – राजेंद्र कृष्ण, माया गोिवद, संतोष आनंद, शैली शैलेंद्र, उद्धवकुमार, मधू राज, वली साहेब इ.
नाव व आडनाव लावणारे गीतकार – भरत व्यास, पी. एल. संतोषी, गोिवद मुनीम, फारुक कैसर, जावेद अख्तर, जावेद अन्वर, जाँ निसार अख्तर, विश्व्ोश्वर शर्मा, व्ही. एम. (विश्वामित्र) आदिल, डी. एन. (दीनानाथ) मधोक, पं. नरेंद्र शर्मा, पं. नरेंद्र देव, जे. नक्शब (नक्शब जारवीच), देव कोहली, रवींद्र जैन, केदार शर्मा, प्रेम धवन, वर्मा मलिक, राजा मेहंदी अली खान, रतन शिलोत्री (एस. रतन), आनंद बक्शी, विठ्ठल भाई पटेल, दीवान शरार, निदा फाजली, ब्रजेंद्र गौड, ईर्षांद, उद्धव कुमार, रमेश पंत, के. एल. परदेसी, अमरनाथ चतुर्वेदी, ए. करीम, ए. राही, न्याय शर्मा शेवन रिजवी, आर. सी. कपूर, मुल्कराज आनंद, राही मासूम राजा, पं. रामानंद शर्मा, बालकवी बरागी, मकबूल मोईउद्दीन इ.
शैलेंद्र, हसरत, शकील, साहिर, मजरूह, गुलजार, नीरज, भरत व्यास, प्रदीप, इंदीवर, आनंद बक्शी, गुलशन बावरा, राजेंद्र कृष्ण इ.इ. गीतकारांनी, नौशाद, शंकर जयकिशन, सी. रामचंद्र, मदनमोहन, सलील चौधरी, इ. प्रथितयश संगीतकारांकरिता अनेक गाणी लिहिली. त्यांचे चित्रपट देण्याचे या लेखात ‘प्रयोजन’ नाही, पण जे काही गीतकार काहीसे विस्मरणात गेले आहेत (उदास, प्रेमधवन) व जे गीतकार बरेच विस्मरणात गेलेले आहेत (उदा. डी. एन. मधोक) अशा काही गीतकारांचे काही ‘मोजके’ पण ‘महत्त्वाचे’ चित्रपट खाली दिले आहेत. या चित्रपटांतील गाणी व इतर माहिती हा एक वेगळ्या लेखाचा विषय आहे. (हे चित्रपट बहुतांशी ५० च्या दशकातील आहेत, कारण ते दुर्लक्षित आहेत)
मोती बी. ए. (नदिया के पार, साजन), डी. एन. (दीनानाथ), मधोक (रतन, भक्त सुरदास संया), जे. नक्शब (महल, नगमा, अनहोनी, बारादरी, रफ्तार, जिंदगी या तूफान, अ‍ॅक्ट्रेस), बहजात लखनवी (गवैया, आग, अदा), ए. करीम (शाह बहराम, शोभा, गुनाह, चार चांद), मजाज लखनवी (ठोकर), तनवीर नकवी (शहजादा, शिरी फरहाद, अनमोल घडी), ए. राही (गुलबहार), अजीज काश्मिरी (अनमोल रतन, रक्कन, एक थी लडकी, ये रात फिर ना आयेगी), अमरनाथ चतुर्वेदी (आयी वसंत बहार), न्याय शर्मा (किनारे किनारे, अंजली), सरशार सलानी (चोर बाजार, लकीरे राजधानी, संस्कार, बिरहा की रात, जलतरंग), कैफ इरफानी (दायरा, छोटे बाबू, लाडला, शीशम, नाच), प्रेमधवन (तराना, टांगेवाली, आवाज, लाजवाब), अनजान (औलाद, गोदान, रत्नदीप), असद भोपाली (मस्त कलंदर, शाह बहराम, आधी रात, पारसमणी), शेवन रिजवी (बहराम डाकू, मेहेरबानी, प्यार की मंजिल), शम्स लखनवी (ढोलक, शोभा, दोस्त), पं. इंद्र (जोगन), नक्श लायलपुरी (दिवाली की रात, दिल की राहे, तुम्हारे लिए, मान जाईये), व्ही. एम. (विश्वामित्र) आदिल (आवाज, समुद्री डाकू), आह सीतापुरी (पहली नजर), कमर जलालाबादी (बडम्ी बहन, चंगेजखान, वारिस, कही प्यार ना हो जाये, चाँद), नूर लखनवी (परछाई, सुबह का तारा, हैदराबाद की नाजनीन), अख्तर रोमानी (हसीना मान जायेगी, हातिमताई), एस. एच. बिहारी (शर्त, एक झलक, हिल स्टेशन), नूर देवासी (किस्मत), जिया सरहदी (आवाज, शीशम), कैफी आझमी (४० दिन, शोला और शबनम, हकिकत, लालारुख, कागज के फुल, शमा), जी. एस. (गोपालसिंग), नेपाली (नवरात्री, साक्षी गोपाल), रमेश पांडे (चंडीपूजा), खुमार बाराबंकी (बारादरी, साज और आवाज, शहाजहान, हलचल), सरस्वती कुमार दीपक (आग), शहरीयार (उमराव जान, गमन), पं. नं. नरेंद्र शर्मा (भाभी की चूडियाँ, अफसर, मालती माधव रत्नघर), पं. नरेंद्र देव (उत्सव), योगेश (अ‍ॅडव्हेंचरस ऑफ रॉबिनहूड, रजनीगंधा, सखी रॉबिन, उसपार, अन्नदाता), गोिवद मुनीम (आँसू बन गये फूल), ईर्षांद (दूर का राही), जाँ निसार अख्तर (यास्मिन, ब्लॅक कॅट, ट्वेल्व्ह ओ क्लॉक, सीआयडी, प्रेम परबत), पी. एल. संतोषी (सरगम, शहनाई, शिनशिनाकी बूबला बू, हम पंछी एक डाल के, निराला, संगीता), परवेज शमसी (नौशेर वाने आदिल), शैलेश (आग), के. एल. परदेसी (दिल भी तेरा हम भी तेरे), शमीम जयपुरी (राज), उद्धव कुमार (शीशम), वली साहेब (व्हिलेज गर्ल, नई कहानी), आय. सी. कपूर (भाई बहेन, चांद मेरे आजा), सुदर्शन फाकिर (दूरियॉँ), राममूíत (सिपया), ब्रजेंद्र गौड (काफिला), फारुक कैसर (मदारी, नमस्तेजी, पारसमणी), राजा मेहंदी अलीखान (वह कौन थी, मेरा साया, नीला आकाश, रेशमी रुमाल), जावेद अन्वर (निशान), माया गोिवद (आरोप).
गीतकारांचे विश्व फार मोठे आहे. सर्व गीतकार त्यांची गाणी, त्यांचे संगीतकार व इतर माहिती यांच्यावर हजार पानांचे पुस्तकही कमीच पडेल; पण उपेक्षित गीतकारांवर २००-३०० पानांचे एक चांगले पुस्तक निश्चितच निघू शकते, त्याकरिता जुन्या चित्रपटगीतांच्या चाहत्यांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. या लेखात बऱ्याच गीतकारांना समाविष्ट केले आहे. लेखनविस्तारामुळे काही गीतकारांना समाविष्ट करणे जमले नाही. त्यांच्याविषयी पुन्हा केव्हा तरी!
वसंत राजूरकर

Tharla Tar Mag Maha Episode Promo sayali confess love
“तुमच्यावर खूप प्रेम…”, अखेर सायलीने दिली प्रेमाची कबुली! ‘ठरलं तर मग’ मालिकेत मोठा ट्विस्ट, नेमकं काय घडलं? पाहा प्रोमो
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Marathi Singer Arvind Pilgaonkar career information in marathi
व्यक्तिवेध : अरविंद पिळगावकर
Trending video boy from village singing song of nathicha nakhara goosebumps came on people after listing his song viral video
“नथीचा नखरा नऊवारी साडी” शाळकरी मुलाच्या गाण्यानं अख्ख्या महाराष्ट्राला लावलं वेड; सूर असा की अंगावर येतील शहारे, VIDEO पाहाच
renowned flautist pandit ronu majumdar creates guinness world record by performing at indian classical music event with 546 musicians
५४६ संगीतकारांचा सांगीतिक आविष्कार; ज्येष्ठ बासरीवादक पंडित रोणू मजुमदार यांचा विश्वविक्रम; ‘गिनीज बुक’मध्ये नोंद
Arvind Pilgaonkar passed away, Veteran singer-actor Arvind Pilgaonkar, Arvind Pilgaonkar ,
ज्येष्ठ गायक – अभिनेते अरविंद पिळगावकर यांचे निधन
Sangeet Manapmaan Movie Review in marathi
नावीन्यपूर्ण अनुभव देणारा चित्रप्रयोग
Various aspects of sounds that affect the mind and body
ध्वनिसौंदर्य : असह्य कलकलाटातून सुस्वरांकडे…
Story img Loader