काव्यातील भावार्थ जाणून त्याला शब्दस्वरात बांधताना नावीन्यपूर्ण, मधुर ओठावर रेंगाळणारी अवीट गोडीची चाल गुंफली, की अविस्मरणीय श्रवणीय गीत जन्माला येते. गीतकार- संगीतकार यांच्या दिव्य प्रतिभेच्या आविष्कारातून साकारलेली अशी अनेक भावगीते मराठी संगीतप्रेमींचा मौल्यवान ठेवा आहेत. अशोक पत्की, अशोकजी परांजपे व सुमन कल्याणपूर या अनुक्रमे संगीतकार, गीतकार आणि गायिका या त्रयींनी भावमधुर गीतांचा नजराणा रसिकांना बहाल केला आहे.
भावगीत, नाटक, चित्रपट, जाहिराती जिंगल्स, शीर्षकगीत हे सारे संगीत प्रकार लीलया हाताळून संगीत क्षेत्रावर खास ठसा उमटविणारे गुणवंत तरी विनम्र संगीतकार म्हणजे अशोक पत्की. ‘एकदाच यावे सखया..’, ‘सहज तुला गुपित एक..’, ‘केतकीच्या बनी, नाचलासी..’, ‘वाट इथे स्वप्नांची..’, ‘नाविका रे..’ या अशोकजी परांजपेच्या मंजूळ गीतांना तेवढेच नादमधुर संगीत देऊन ख्यातनाम गायिका सुमन कल्याणपूर यांच्याकडून स्वरबद्ध करून अभिजात सांस्कृतिकता जोपासली आहे.
‘नाविका रे- वारा वाहे रे,
डौलाने हाक जरा आज नाव रे
सांज वेळ झाली आता,
पैल माझे गाव रे’
भावव्याकूळतेने गायिलेले हे गाणे असेच लाजवाब. नावक, गाव, डौलदार नाव, सांजवेळ असे रमणीय चित्र काव्यात चितारून साजणभेटीसाठी सासरी जाण्यास आतुर झालेली सखी भावार्ततेने नाविकास लवकर घेऊन जाण्याची विनंती करत आहे.
सोमेश्वरच्या नदीपात्रात कुटुंबीयांसह संध्याकाळी नौकाविहार करत असताना त्या विलोभनीय वातावरणात अभावितपणे माझ्या बहिणीच्या तोंडून वरील गीताच्या ओळी बाहेर पडल्या. सारे वातावरण भारावले. दुर्दैवाने माझ्या त्या बहिणीची जीवननौका अकाली काळाच्या पैलतीरी अस्तंगत झाली म्हणून हे गीत माझ्यासाठी यादगार आहे!
काही अभिजात गाणी अवीट गोडीच्या सुरांचे ऐश्वर्य लाभूनही कालौघात विस्मृतीत जातात. मात्र एखाद्या दिवशी अचानकपणे मनाच्या तळकप्प्यातून सकाळी सकाळी वर येऊन दिवसभर ओठावर रुंजी घालतात. श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेले, गंगाधर महांबरे यांनी लिहिलेले व कुंदा बोकील यांनी गायलेले ‘निळासावळा नाथ, तशी ही निळी सावळी रात’ हे विलक्षण आशयगर्भ भावमधुर भक्तिकाव्य- सुस्वर गाणं माझ्या मनातलं! गळ्यातलं! असाच अनुभव देऊन गेलं.
राधाकृष्णांच्या अलौकिक पारमार्थिक प्रेमावर ज्ञानेश्वर एकनाथादी संतकवींनी तसेच अर्वाचीन काळातील प्रतिभासंपन्न साहित्यिकांनी विपुल पद्यलेखन केले आहे. अशा पद्यरचनांना दिग्गज संगीतकार व सुरेल गायकांनी स्वरसाज चढवून हृदयाचा ठाव घेणाऱ्या भक्ती व भावगीतात परावर्तित केले आहे.
गंगाधर महांबरे यांच्या ‘निळासावळा नाथ’ या गूढरम्य कृष्णगीताची निवेदिका कृष्णाच्या प्रेमात आकंठ बुडालेली गोपिका आहे. निळ्यासावळ्या रात्री निळ्यासावळ्या घनश्यामाचा शोध घेत ती फिरत आहे. निळासावळा नाथ तशी ही निळीसावळी रात.
‘कोडे पडते तुला शोधीता कृष्णा’ – अंधारात सावळा कृष्ण त्या निळ्यासावळ्या अंधारात विलीन झाल्याने तिला तो वेगळा दिसतच नाही.
‘तुडविनी वन धुंडुनि नंदनवन! शोधुनि आले अवघे त्रिभुवन
एक ना उरले गोपीचे घर हाकेच्या टप्प्यात’
गोकुळरूपी नंदनवनातील सर्व रानावनात पायपीट करून सगळ्या गोपिकांची घरे पालथी घालूनही व शेवटी त्रिभुवनात शोधूनही तो सावळा नाथ तिला दिसतच नाही.
‘नीलजली यमुनेच्या सायी होडी सोडली मी देहाची
गवसला ना परी तू कान्हा लाटांच्या रासात’
निराश होऊन यमुनेच्या जळात आपल्या देहाची होडी समर्पण करते. पाण्यात मिसळताना लाटांच्या रासक्रीडेतही सावळा कान्हा सापडत नाही. विविध उपमा- अलंकारांमुळे या गीताला सौंदर्यानुभूती प्राप्त होते. अशरीरी व चराचर व्यापलेल्या कृष्णाचा शोध घेणे अवघड हेच गीतकाराचे सांगणे आहे.